मंत्रिमंडळ
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश सी. अंगडी यांच्या दुःखद निधनाबद्दल मंत्रिमंडळाच्यावतीने श्रद्धांजली
सुरेश सी. अंगडी यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली
Posted On:
24 SEP 2020 1:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2020
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश सी. अंगडी यांचे काल- दि. 23, सप्टेंबर, 2020 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्यावतीने अंगडी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मंत्रिमंडळाच्यावतीने सुरेश सी. अंगडी यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
यावेळी मंत्रिमंडळाने खालील प्रस्ताव मान्य केला:
“केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश सी. अंगडी यांचे काल- दि. 23, सप्टेंबर, 2020 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ तीव्र दुःख व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनामुळे देशाने एक प्रमुख नेता, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, प्रतिष्ठित- उत्तम खासदार आणि सक्षम प्रशासक गमावला आहे.
कर्नाटकातल्या बेळगावी जिल्ह्यातल्या के.के. कोप्पा या गावात सुरेश अंगडी यांचा दि.1 जून,1955 रोजी जन्म झाला होता. त्यांनी बेळगावीच्या एस.एस.एस. समिती महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यानंतर बेळगावीच्याच राजा लाखमगौडा विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली.
भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले सुरेश अंगडी 1996 मध्ये पक्षाचे बेळगावी जिल्ह्याचे उपाध्यक्ष बनले. त्यानंतर 2001 मध्ये पक्षाचे बेळगावी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 2004 मध्ये त्यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. 14 व्या लोकसभेचे ते पहिल्यांदा सदस्य बनले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकींमध्ये बेळगावीमधून सुरेश अंगडी विजयी झाले.
लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी वेगवेगळ्या समितींवर कार्य केले. यामध्ये अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण विषयक नियुक्त करण्यात आलेल्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले, तसेच ते मनुष्य बळ विकास आणि संरक्षण समितीचे सदस्य होते. अर्थ मंत्रालयाच्या सल्लागार समितीमध्ये सुरेश अंगडी कार्य करीत होते. तसेच निवृत्तीवेतन, वेतन आणि संसद सदस्यांचे भत्ते याविषयी नियुक्त करण्यात आलेल्या संयुक्त समितीचे सदस्य होते. केंद्रीय प्रत्यक्ष करविषयक सल्ला समिती, सभागृह समिती आणि याचिका समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. मे 2019 मध्ये सुरेश अंगडी यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.
सुरेश अंगडी अनेक सामाजिक आणि संस्कृतिक कार्यामध्ये सहभागी होत असत. उद्योग, कृषी व्यवसाय तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष कार्य केले. बेळगावी येथे सुरेश अंगडी शिक्षण प्रतिष्ठानची 2009 मध्ये स्थापना करण्यात आली असून, त्याचे ते अध्यक्ष होते. त्यांना वाचनाची आणि प्रवासाची आवड होती.
सरकार आणि संपूर्ण देशाच्यावतीने शोकग्रस्त अंगडी परिवाराविषयी मंत्रिमंडळ सहसंवेदना व्यक्त करीत आहे".
U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658612)
Visitor Counter : 143
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam