महिला आणि बालविकास मंत्रालय

कोविड-19 महामारीच्या काळामध्ये अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीस यांनी दिलेली सामाजिक सुरक्षा

Posted On: 22 SEP 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020


कोविड-19 महामारीच्या काळामध्ये अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीस यांना पुढील विमा योजनांच्या अंतर्गत सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय):- 18 ते 50 वयोगटातल्या अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीस यांना पीएमजेजेबीवायअंतर्गत दोन लाख रुपयांचे आयुर्विमा कवच देण्यात आले आहे. ( आयुष्याची जोखीम, कोणत्याही कारणामुळे मृत्यू आल्यास विमा रक्कम मिळू शकणार)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) :- 18 ते 59 वयोगटातल्या अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीस यांना पीएमजेजेबीवायअंतर्गत दोन लाख रुपयांचे सुरक्षा कवच अपघात झाल्यास नुकसान भरपाई म्हणून प्रदान करण्यात आले आहे. (यामध्ये काही काळासाठी अथवा कायमचे अपंगत्व आल्यास भरपाई मिळू शकणार आहे)

अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना (एकेबीवाय)(सुधारित):- 51 ते 59 वयोगटातल्या अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीस यांना सुधारित एकेबीवायअंतर्गत  30,000 रुपये देण्यात येणार आहेत. (आयुष्याची जोखीम, कोणत्याही कारणामुळे मृत्यू आल्यास विमा रक्कम मिळू शकणार)

18 ते 59 वयोगटातल्या अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीस यांना ‘फिमेल क्रिटिकल इलनेस’ अंतर्गत 20,000 रुपयांचा लाभ दिला जातो. ज्या महिलांना कर्करोग तसेच ट्यूमर अशा रोगांचे निदान झाले असेल तर ही मदत केली जाते. त्याचबरोबर अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीस यांच्या इयत्ता 9 ते 12 च्यावर्गात शिकणा-या मुलांना, आयटीआयचा अभ्यासक्रम करणा-या मुलांना दर चार महिन्यांना 300 रुपये छात्रवृत्ती दिली जाते. छात्रवृत्तीचे अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीसांच्या कुटुंबातल्या दोन मुलांना प्रत्येकी  300 रुपये दिले जातात.

कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत:- 51 ते 59 वयोगटातल्या अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीसांना देण्यात येणा-या मदतीमध्ये 30,000 रुपयांवरून दोन लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेवक, अंगणवाडी मदतनीसांना देण्यात येणा-या सामाजिक सुरक्षा विमा योजनेच्या पूर्ण हप्ता भरण्याच्या पद्धतीमध्ये दि. 1 एप्रिल, 2020 पासून बदल करण्यात आला आहे. यानुसार  पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय, एकेबीवाय, एफसीआय या योजनांनुसार दि. 31 मे, 2021 पर्यंत सर्वांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे.

मधान्ह भोजनाचा लाभ मिळणा-या मुलांना भोजन मिळण्याची सुनिश्चितता करण्यासाठी मंत्रालयाने केलेले उपाय - कोविड-19 महामारीच्या काळामध्ये पात्र लाभार्थी मुलांना अन्न सुरक्षा भत्ता म्हणून अन्नधान्य, डाळी, तेल अशा वस्तू देण्यात याव्यात असा सल्ला राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांना देण्यात आला होता. महामारीमुळे जोपर्यंत मुले शाळेत येवू शकत नाहीत, तोपर्यंत त्या त्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी  या वस्तू मुलांना पुरवावेत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महामारीच्या काळामध्ये महिलांनी जन औषधी केंद्रांचा वापर किती केला याची माहिती - महामारीच्या काळामध्ये महिलांनी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांचा (पीएमबीजेके)चा वापर नेमका किती केला, याची गणना करणे अवघड आहे. कारण या केंद्रावर येणा-या व्यक्ती कोण आहेत, त्यांची जात, धर्म, लिंग, आर्थिक स्तर, अशा माहितीची कोणत्याही प्रकारे नोंद केली जात नाही. केंद्रांचा सर्वांना आणि जास्तीत जास्त जनतेला लाभ व्हावा, यासाठी मार्च 2025 पर्यंत 10,500 पीएमबीजेके सुरू करण्यात येणार आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेअंतर्गत (पीएमबीजेपीे) दि. 18.09.2020 च्या आकडेवारीनुसार देशामध्ये जवळपास 6611पीएमबीजेके कार्यरत आहेत. ही केंद्रे 732 जिल्ह्यांमध्ये आहेत. जनौषधी विभागाने ‘जनौषधी सुलभ’ हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. त्याचा लाभ सर्वसामान्य जनता घेत आहे. यामुळे डिजिटल माध्यमातून जवळपासचे पीएमबीजे केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळू शकते. तसेच जनौषधी, उत्पादनांचे विश्लेषण, जेनरिक विरुद्ध ब्रँडची औषधे यांच्या किंमतीमध्ये असलेली तुलना आणि वापरकर्ते किती पैसे वाचवू शकतात, याची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळू शकते.

अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज एक लेखी उत्तरामध्ये राज्यसभेत दिली.

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657841) Visitor Counter : 426