आयुष मंत्रालय

कुपोषण नियंत्रणासाठी आयुष मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 20 SEP 2020 7:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आयुष मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयादरम्यान आज पोषण अभियानाचा भाग म्हणून कुपोषण रोखण्यासाठी नवी दिल्ली येथे परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कराराच्या माध्यमातून देशात कुपोषण रोखण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या आयुष-आधारीत उपाय राबवण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, देशभरातील महिला आणि बालकांमधील कुपोषण रोखण्यासाठी दोन्ही मंत्रालय प्रयत्न करतील. प्रत्येक अंगणवाडीत न्यूट्री-गार्डन्स आणि औषधी उद्यानांची उभारणी करण्यात येईल.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, आयुर्वेद आणि आयुष पद्धतींच्या माध्यमातून सौम्य आणि अतिसौम्य कुपोषण दूर करण्यासाठी गर्भवती महिलांचा योग्य आहार, स्तनदा मातांसाठी आहार पद्धती, दुधाचे स्राव वाढविण्यासाठी पारंपारिक उत्पादनांचा वापर, बालकांसाठी पोषक आहार या उपायांचा अवलंब करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, पारंपरिक आरोग्य सेवा प्रणालीचे सर्वात मोठे जाळे भारतात आहे. ही आरोग्य प्रणाली व्यापक सुलभता, परवडणारी क्षमता, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासामुळे व्यापकपणे स्वीकारली जात आहे.

या सामंजस्य कराराचा एक मोठा परिणाम म्हणून आयुष मंत्रालय आणि महिला आणि बालविकास मंत्रालय आयुष, योग आणि इतर आयुष प्रणालीतील तत्त्वे व पद्धतींच्या माध्यमातून आयुषला पोषण अभियानात एकत्रित करण्यासाठी आणि कुपोषणाच्या व्यवस्थापनासाठी एकत्रित काम करतील. पोषण अभियान किंवा राष्ट्रीय पोषण मिशन ही महिला, बाल विकास मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे ज्यायोगे मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्‍या मातांचे पौष्टिक परिणाम सुधारता येतील.

दोन्ही मंत्रालयांनी डिजीटल माध्यमातून जागृती करण्यासाठी #Ayush4Anganwadi हा हॅशटॅग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1657023) Visitor Counter : 263