रेल्वे मंत्रालय

पंतप्रधान ऐतिहासिक कोसी रेल महासेतू राष्ट्राला करणार समर्पित, प्रवाशांच्या सोयीसाठी बिहारमधील नवे रेल्वे मार्ग आणि विद्युतीकरण प्रकल्पांचे देखील करणार उद्घाटन


या प्रकल्पांमुळे प्रांतात रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारेल

Posted On: 17 SEP 2020 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 सप्‍टेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऐतिहासिक कोसी रेल महासेतू राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार,  केंद्रीय मंत्री,  रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री  पीयूष गोयल,कायदा आणि  न्याय , दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री, रविशंकर प्रसाद, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री. गिरिराज सिंह,गृह राज्यमंत्री नित्यानंद राय  आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी  या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कोसी रेल महासेतू शिवाय बिहार राज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी अन्य  रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये किऊल नदीवरील एक नवा पूल, दोन नवे रेल्वे मार्ग, पाच विद्युतीकरण प्रकल्प, बरौनी येथील विद्युत लोकोमोटिव शेड आणि बरह- बख्तियारपूर दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

कोसी रेल महासेतूचे राष्ट्रार्पण म्हणजे बिहार आणि ईशान्य भागाला जोडणाऱ्या संपूर्ण प्रदेशाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा क्षण असणार आहे.

1887 मध्ये निरमाली आणि भापतियाही (सराईगड ) दरम्यान मीटर गेज मार्ग बांधण्यात  आला होता. 1934 मध्ये आलेला महापूर आणि इंडो नेपाळ भूकंप यामुळे हा रेल्वेमार्ग वाहून गेला आणि त्यानंतर कोसी नदीच्या प्रवाह बदलण्याच्या प्रवृत्तीमुळे बराच काळ हा रेल्वेमार्ग पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले नाहीत.

2003-04 मध्ये केंद्र सरकारने कोसी महासेतू  प्रकल्प मंजूर केला होता.  कोसी रेल महासेतू हा 1.9 किलोमीटर लांबीचा पूल असून त्याच्या बांधकामासाठी  516 कोटी रुपये खर्च आला आहे. भारत-नेपाळ सीमेजवळ असलेला हा पूल सामरिक दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. कोविड महामारीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि या कामात  स्थलांतरित मजुरांनी  देखील योगदान दिले.

या  प्रकल्पाच्या लोकार्पणामुळे 86 वर्षांचे जुने स्वप्न आणि या प्रदेशातील लोकांची दीर्घ प्रतीक्षा पूर्ण होणार असून महासेतूच्या लोकार्पणाबरोबरच पंतप्रधान सुपौल स्थानकावरून  सुपौल-राघोपूरा डेमू गाडीला झेंडा दाखवून रवाना करतील. एकदा नियमित रेल्वे सेवा सुरू झाली की सुपौल, अररिया आणि सहरसा या जिल्ह्यांसाठी ही विशेष लाभदायक सेवा  ठरणार आहे. तसेच कोलकाता, दिल्ली आणि मुंबईच्या दिशेचा लांब पल्ल्याचा प्रवास देखील या भागातील लोकांसाठी सुलभ होणार आहे.

हाजीपूर-घोसवर- वैशाली आणि इस्लामपूर- नटेशर या दोन नव्या रेल्वे प्रकल्पांचे देखील पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. कर्नावती- बख्तियारपूर लिंक बायपास आणि बरह- बख्तियारपूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे देखील ते उद्घाटन करतील.

मुझफ्फरपूर-सीतामढी, कटीहार-न्यू जलपायगुडी, समस्तीपूर-दरभंगा-जयनगर,समस्तीपूर- खगरिया, भागलपूर- शिवनारायणपूर मार्गाच्या रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पाचे देखील पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1655987) Visitor Counter : 124