गृह मंत्रालय
माओवादी/ नक्षली कारवाया रोखण्यासाठी उचललेली पावले
Posted On:
16 SEP 2020 5:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2020
देशात डाव्या कट्टरवादी विचारसरणीशी संबंधित हिंसाचारात आणि त्याच्या भौगोलिक विस्तारात सातत्याने घट होत आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारात झालेल्या मृत्यूंच्या( नागरिक आणि सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांच्या) संख्येतही सातत्याने घट होत असून 2010 मध्ये हे प्रमाण 1010 होते ते 2019 मध्ये 202 पर्यंत खाली आले आणि 2020 मध्ये( 15-8-2020 पर्यंत) त्यात आणखी घट झाली असून गेल्या वर्षी याच काळातील 137 मृत्यूंच्या तुलनेत ते यावर्षी 102 पर्यंत कमी झाले आहे. महाराष्ट्रात 2017 ते 2019 या काळात नक्षली हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या संख्येत चढउतार राहिले असून 2017 मध्ये 16, 2018 मध्ये 14 तर 2019 मध्ये 34 मृत्यूंची नोंद झाली. मात्र, यावर्षी 15-8-2020 पर्यंत हे प्रमाण कमी होऊन 7 मृत्यूंची नोंद झाली.
डाव्या कट्टरवादी विचारसरणीच्या समस्येला तोंड देण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना 2015 तयार केली. यामध्ये सुरक्षा उपाययोजना, विकासाच्या योजना आणि स्थानिक समुदायांना त्यांचे अधिकार आणि इतर फायदे मिळवून देण्याच्या बहुआयामी दृष्टीकोनाचा समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारांना केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाच्या तुकड्या, हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात करून आणि इंडिया रिझर्व बटालियन्स(आयआरबी)/ स्पेशल इंडिया रिझर्व बटालियन्स(एसआयआरबी) इ. मंजुरी देऊन खूप मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिले जात आहे. पोलिस दलाचे आधुनिकीकरण, सुरक्षा संबंधित खर्च योजना आणि राज्य पोलिसांचे आधुनिकीकरण आणि प्रशिक्षणासाठी विशेष पायाभूत सुविधा योजनांतर्गत निधीचा पुरवठा करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या आघाडीच्या योजनांव्यतिरिक्त रस्त्यांचे बांधकाम, मोबाईल टॉवरची उभारणी, कौशल्य विकास, बँकांच्या आणि टपाल कार्यालयांच्या जाळ्यांमध्ये सुधारणा, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा यांसारख्या विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बहुतेक डाव्या कट्टरवादी विचारसरणीग्रस्त जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्रीय मदत निधी योजनेंतर्गत विकासासाठी निधी देखील पुरवला जात आहे. राष्ट्रीय धोरण आणि कृती योजनेची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे डाव्या कट्टरवादी हिंसाचारामध्ये आणि भौगौलिक विस्तारामध्ये सातत्याने घट होऊ लागली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
विस्तृत आकडेवारीसाठी येथे क्लिक करा
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655128)
Visitor Counter : 145