पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 15 सप्टेंबर रोजी बिहारमधील शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित सात प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार

Posted On: 14 SEP 2020 8:18PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित सात प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार आहेत. यापैकी चार प्रकल्प पाणीपुरवठा, दोन सांडपाणी शुद्धीकरण व एक नदी विकासाशी संबंधित आहेत. या प्रकल्पांचा एकूण खर्च 541 कोटी रुपये आहे. बिहारच्या नगरविकास व गृहनिर्माण विभागांतर्गत या प्रकल्पांची अंमलबजावणी बिडको द्वारे केली जाणार  आहे.  बिहारचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला  उपस्थित राहणार आहेत.

 

तपशील

पटना महानगरपालिकेच्या बेऊर आणि करमलीचक येथे नमामि गंगेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्लांटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

सिवान नगरपरिषद व छपरा महानगरपालिकेत अमृत मिशन अंतर्गत बांधलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांना  चोवीस तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यास मदत होईल.

अमृत मिशन अंतर्गत मुंगेर पाणीपुरवठा योजनेची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेमुळे मुंगेर महानगरपालिकेतील रहिवाशांना पाइपलाइनद्वारे शुद्ध पाणी मिळण्यास मदत होईल. जमालपूर नगरपरिषदेत अमृत मिशन अंतर्गत जमालपूर पाणीपुरवठा योजनेचा शिलान्यासही करण्यात येणार आहे.

नमामि गंगे अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या मुझफ्फरपूर नदी विकास योजनेची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुझफ्फरपूरचे तीन घाट (पूर्वी आखाडा घाट, सीढी घाट आणि चांदवारा घाट) विकसित केले जातील. नदीकिनारी शौचालय, माहिती बूथ, कपडे बदलण्याची सोय, पदपथ, देखरेख मनोरा इत्यादी मुलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या घाटांवर योग्य सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक व पुरेशा प्रकाशयोजनाची व्यवस्था केली जाईल. नदी विकासामुळे पर्यटनाला चालनाही मिळेल आणि भविष्यात ते आकर्षणाचे केंद्र बनतील.

***

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654215) Visitor Counter : 203