पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 10 SEP 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्‍टेंबर 2020

रउआ सभेच्या सर्वांना नमस्कार !!

देशासाठी, बिहारसाठी, गावामध्ये आपल्या सर्वांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी आणि व्यवस्था मजबूत करण्यासाठी मासे उत्पादन, दुग्धालय, पशुपालन आणि कृषी क्षेत्राविषयी अभ्यास तसेच संशोधन यांच्याशी संबंधित शेकडो कोटींच्या योजनेचा शिलान्यास आणि लोकार्पण करण्यात येत आहे. या योजनांसाठी बिहारच्या बंधू-भगिनींचे  खूप-खूप अभिनंदन करतो.

बिहारचे राज्यपाल फागू चैहानजी, मुख्यमंत्री नीतीश कुमारजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी गिरीराज सिंहजी, कैलाश चौधरीजी, प्रतापचंद्र सारंगी जी, संजीव बालियान जी, बिहारचे उप मुख्यमंत्री भाई सुशील जी, बिहारचे विधानसभा अध्यक्ष विजय चैधरी जी, राज्य मंत्रिमंडळाचे इतर सदस्य, खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

मित्रांनो, आज ज्या ज्या योजना सुरू झाल्या आहेत, त्यांच्यामागे विचार असा आहे की, आपल्या गावांनी 21व्या शतकामध्ये आत्मनिर्भर भारताची शक्ती, ताकद बनले पाहिजे, ऊर्जा बनले पाहिजे. प्रयत्न असा आहे की, या शतकामध्ये नील क्रांती म्हणजेच मत्स्य पालनाशी संबंधित कामे, श्वेत क्रांती म्हणजे दुग्धालयाशी संबंधित कामे, मधूर क्रांती म्हणजे मध उत्पादनाशी संबंधित कामे, यांच्यामुळे आमची सर्व गावे समृद्ध आणि सशक्त झाली पाहिजेत. हे लक्ष्य समोर ठेवूनच प्रधानमंत्री मत्स्य  संपदा योजना तयार करण्यात आली आहे. आज देशातल्या 21 राज्यांमध्ये या योजनेचा शुभारंभ होत आहे. आगामी 4-5 वर्षांमध्ये या योजनेसाठी 20 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये आज 1700 कोटी रूपयांची कामे सुरू होत आहेत. याचप्रमाणे बिहारमधल्या पाटणा, पूर्णिया, सीतामढी, मधेपुरा, किशनगंज आणि समस्तीपूर येथे विकसित करण्यात आलेल्या अनेक सुविधांचे लोकार्पण तसेच नवीन कामांचा शिलान्यास करण्यात आला आहे. यामुळे मत्स्य उत्पादकांना नवी पायाभूत सुविधा मिळतील, आधुनिक उपकरणे, साधने मिळतील नवीन बाजारपेठही मिळेल. यामुळे शेतीबरोबरच इतर माध्यमांतून उत्पन्न घेण्याची संधीही मिळतील.

मित्रांनो, देशाच्या प्रत्येक भागामध्ये, विशेषतः ज्याठिकाणी सागरी आणि नदीचे किनारे आहेत, तिथे मत्स्य व्यवसाय होतो, हे लक्षात घेवून; देशात पहिल्यांदाच इतक्या व्यापक प्रमाणावर योजना तयार करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर या क्षेत्रामध्ये जितकी गुंतवणूक झाली आहे, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त गुंतवणूक प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी करण्यात येत आहे. ज्यावेळी आत्ता गिरिराज जी सांगत होते, कदाचित ती आकडेवारी ऐकूनच लोकांना खूप मोठे आश्चर्य वाटत असेल. या क्षेत्रात असेही काम चालत होते, याचे नवल वाटेल. परंतु आपण खरी परिस्थिती जाणून घेतली तर आपल्यालाही वाटेल की, सरकार कितीतरी क्षेत्रांमध्ये कितीतरी लोकांच्या भल्यासाठी खूप मोठ-मोठ्या योजनांवर काम करीत पुढे वाटचाल करीत आहे.

देशामध्ये मत्स्य व्यापारासंबंधित क्षेत्राचा व्यवसाय नेमका जाणून घेण्यासाठी आता वेगळे- स्वतंत्र मंत्रालय बनविण्यात आले आहे. यामुळे आमच्या मत्स्यपालक, मच्छिमार बांधवांना, मासे पालन आणि व्यापार यासंबंधित सर्व सुविधा मिळत आहेत. आगामी 3-4 वर्षांमध्ये मासे निर्यात दुप्पट व्हावी, असे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यामुळे केवळ मत्स्य उद्योग क्षेत्रामध्ये रोजगारांच्या लाखों संधी उपलब्ध होतील. आता ज्या सहकारी वर्गाशी मी बोलत होतो, त्यांच्याशी बोलल्यानंतर माझा विश्वास तर आता जास्तच दृढ झाला आहे. ज्यावेळी मी राज्यांचा विश्वास पाहिला आणि मी भाई ब्रिजेश यांच्याशी चर्चा केली, भाई ज्योती मंडल यांच्याशी, कन्या मोनिका यांच्याशी बोललो, त्यावेळी लक्षात आले, यांच्या बोलण्यामधून विश्वास स्वच्छ दिसून येत आहे.

मित्रांनो, मासे पालन ब-याच प्रमाणात स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यासाठी गंगामातेला स्वच्छ आणि निर्मळ बनविण्याच्या मोहिमेची मदत मिळत आहे. गंगाप्रवाहाच्या आजू-बाजूच्या परिसरामध्ये नदी वाहतूक मार्गासाठी जे काम सुरू आहे, त्याचा लाभही मत्स्य उद्योगाला मिळणार हे नक्की आहे. या 15 ऑगस्टला ज्या मिशन डाॅल्फिनची घोषणा केली आहे, त्याचाही समावेश मत्स्य उद्योगामध्ये केला जाणे, स्वाभाविक आहे, म्हणजेच एक प्रकारे या उप-उत्पादनांमुळे जास्त लाभ होणार आहे. आमचे नीतीशबाबूजी या मोहिमेविषयी जास्त उत्साहित आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. आणि म्हणूनच माझा अगदी पक्का विश्वास आहे की, ज्यावेळी गंगेमध्ये डॉल्फिनची संख्या वाढेल, त्याचा लाभ गंगेच्या किना-यावरील लोकांना तर खूप मिळणार आहे, सर्वांनाच लाभ होणार आहे.

मित्रांनो, नीतीशजी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये गावां-गावांमध्ये पाणी पोहोचण्यासाठी जे काम होत आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे. 4-5 वर्षांपूर्वी बिहारमध्ये फक्त दोन टक्के घरांमध्ये स्वच्छ पेयजलाचा पुरवठा होत होता. आज हा आकडा 70 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. या काळात जवळपास दीड कोटी घरांमध्ये पेयजलाचे नळ आले आहेत. नीतीश यांच्या अभियानाला आता जल जीवन मिशनची नवीन ताकद मिळाली आहे. कोरोनाच्या काळामध्येही बिहारममध्ये जवळपास 60 लाख घरांमध्ये नळाने पाणी पुरवठा करण्याचे काम सुनिश्चित करण्यात आले, अशी माहिती मला देण्यात आली आहे. हे खरोखरी खूप मोठे काम केले आहे. अशा संकटकाळामध्ये देशामध्ये  जवळपास सगळी कामे ठप्प झाली होती, त्यावेळी आमच्या गावांमध्ये कशा प्रकारे एका आत्मविश्वासाने काम सुरू होते, याचे हे एक उदाहरण आहे. ही खरी आमच्या गावांची ताकद आहे. कोरोना संकट असतानाही अन्नधान्य असो, फळे-भाज्या असो, दूध असो ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्या बाजारपेठांपर्यंत, दुग्धालयांपर्यंत कोणत्याही कमतरतेविना, तंत्रज्ञानाविना पोहोचते होत गेले, लोकांनाही सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळत गेल्या.

मित्रांनो, या काळामध्ये अन्न उत्पादन असो, दूधाचे उत्पादन असो, सर्व प्रकारचे बंपर पिक, उत्पादन आले आहे. इतकेच नाही तर सरकारांनी दुग्धालय उद्योगांनीही या अवघड काळातही विक्रमी खरेदी केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेमुळेही देशातल्या 10 कोटींपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे जमा करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास 75 लाख शेतकरी बंधू आपल्या बिहारचे आहेत. मित्रांनो, ज्यावेळेपासून ही योजना सुरू झाली आहे, त्यावेळेपासून आत्तापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रूपये बिहारच्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले आहेत. असेच अनेक प्रयत्न केल्यामुळे गावांमध्ये या वैश्विक महामारीचा परिणाम कमीत कमी व्हावा, यासाठी यश मिळाले आहे. हे काम अशासाठी कौतुकास्पद आहे, कारण बिहार कोरोनाच्या बरोबरच महापुराच्या संकटालाही अतिशय धैर्याने तोंड देत आहे.

मित्रांनो, कोरोनाच्या बरोबरच अतिवृष्टी आणि महापूर या कारणांमुळे बिहार आणि आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याची आम्हा सर्वांना चांगली कल्पना आहे. राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही प्रयत्न करून महापूराच्या संकटात सर्वांसाठी बचाव कार्य वेगाने केले. तसेच मोफत धान्य देणा-या प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानाचा लाभ बिहारमधल्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचावा, बाहेरून गावांमध्ये परतलेल्या श्रमिक परिवारांना अन्नधान्य मिळावे, यासाठी मोफत अन्नधान्य योजना जूननंतर दीपावली आणि छठपूजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मित्रांनो, कोरोना संकटामुळे शहरांतून परतलेले जे श्रमिक सहकारी आहेत, त्यांच्यापैकी अनेकजण पशुपालनाच्या व्यवसायाकडे वळत आहेत. केंद्र सरकार आणि बिहार सरकारच्या अनेक योजनांमुळे त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे. मी अशा मित्रांनो सांगतो की, आज आपण जे पाऊल उचलले आहे, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. आपण माझे हे शब्द लिहून ठेवावेत, आपण जे काही करीत आहात त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. देशामध्ये दुग्धालय क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करीत राहणार आहे. नवीन दूधाची उप उत्पादने बनावित, नवीन संकल्पना आणाव्यात, त्यामुळे शेतकरी बांधवांना, पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होवू शकेल. त्याचबरोबर देशामध्येच उत्तम जातीच्या पाळीव जनावरांची पैदास व्हावी, यावरही सर्वांनी भर दिला पाहिजे. पशुंच्या स्वास्थ्याची उत्तम व्यवस्था करण्यात यावी, त्यांच्यासाठी चांगला, पोषक आहार आणि स्वच्छता यांचे पालन करण्यात यावे, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

हे लक्ष्य समोर ठेवून आज देशातल्या 50 कोटींपेक्षा जास्त पशुधनाला  खुरपका आणि मंुहपका यासारख्या आजारातून मुक्त करण्यासाठी मोफत लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. जनावरांसाठी चांगला चारा मिळावा यासाठीही वेगवेगळ्या योजनांमधून उपाय करण्यात आले आहेत. देशामध्ये चांगल्या वाणाच्या विकासासाठी मिशन गोकुळ सुरू करण्यात आले आहे. एका वर्षापूर्वी देशव्यापी कृत्रिक गर्भाधान कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्याचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला आहे.

मित्रांनो, बिहार आता उत्तम देशी जातीच्या विकास कार्यासाठी देशाचे एक प्रमुख केंद्र बनत आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत आज पूर्णिया, पाटणा, बरौनी येथे ज्या आधुनिक सुविधा आहेत, त्यामुळे दुग्धालय क्षेत्रामध्ये बिहारची स्थिती अधिक मजबूत होणार आहे. पूर्णियामध्ये जे केंद्र बनले आहे, ते भारतातल्या सर्वात मोठ्या केंद्रापैकी एक आहे. यामुळे फक्त बिहारच नाही तर पूर्व  भारताच्या मोठ्या भागाला त्याचा खूप लाभ होणार आहे. या केंद्रामध्ये ‘बछौर’ आणि ‘रेड पूर्णिया’ यासारख्या बिहारच्या देशी जातींचा विकास आणि संरक्षणही होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

मित्रांनो,

एक गाय सर्वसामान्यपणे एक वर्षामध्ये एक बछडा देते. परंतु आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानामुळे एक गाय एका वर्षात अनेक बछड्यांना जन्म देवू शकते, यासंबंधी प्रयोगशाळेत कार्य होत आहे. आमचे लक्ष्य हे तंत्रज्ञान गावांगावांपर्यंत पोहोचविण्याचे आहे.

मित्रांनो,

पशुंच्या चांगल्या जातींची पैदास करतानाच त्यांच्या देखभालीकडे आणि त्यांच्याविषयी वैज्ञानिक माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या शृंखलेतली एक कडी म्हणजे आज ‘ई-गोपाला’ हे अॅप सुरू करण्यात आले आहे. ई-गोपाला अॅप एक असे आॅनलाइन डिजिटल माध्यम असेल की, त्याच्या मदतीने पशुपालकांना उन्नत पशुधन निवडणे अधिक सोपे होणार आहे. त्यांची मध्यस्थांपासून सुटका होईल. हे अॅप पशुपालकांना उत्पादकतेपासून ते त्यांच्या आरोग्याविषयी, आहाराविषयी सर्व माहिती देवू शकते. यामुळे शेतकरी बांधवाला आपल्याकडच्या पशुला नेमकी कशाची आवश्यकता आहे, जर एखादे जनावर आजारी पडले असेल तर स्वस्त दरामध्ये कसे औषधोपचार करायचे, याची माहिती दिली आहे. इतकेच नाही तर या अॅपला पशू आधारशी जोडण्यात येत आहे. ज्यावेळी हे काम पूर्ण होईल, त्यावेळी ई-गोपाला अॅपमध्ये पशु आधार क्रमांक घातल्यानंतर त्या जनावरांशी संबंधित सर्व माहिती सहजपणे मिळू शकणार आहे. यामुळे पशुपालकांना जनावर खरेदी-विक्री करणेही तितकेच सोपे होणार आहे.

मित्रांनो, कृषी असो, पशुपालक असो, मत्स्यपालक असो, या सर्वांचा विकास अधिक वेगाने व्हावा, यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि पद्धतीचा स्वीकार करून आणि गावामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा बनविणे गरजेचे आहे. बिहार तर असेही कृषी विषयक अभ्यास आणि संशोधन यांचे एक प्रमुख केंद्र आहे. दिल्लीमध्ये आम्ही लोक पूसा-पूसा असे ऐकत असतो. खूप कमी लोकांना माहिती आहे की, पूसा, दिल्ली मध्ये नाही तर बिहारच्या समस्तीपूरमध्ये आहे. इथला तर तो एका दृष्टीने त्याचा जुळा बंधूच असतो.

मित्रांनो, गुलामीच्या काळामध्येच समस्तीपूरच्या पूसामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे कृषी संशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर डाॅक्टर राजेंद्र प्रसाद आणि जननायक कर्पूरी ठाकूर यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी या परंपरेला पुढे नेले. या प्रयत्नांना पाहून, त्यांच्यापासून प्रेरणा घेवून सन 2016 मध्ये डाॅक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानंतर या विद्यापीठामध्ये आणि त्यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमांमध्ये तसेच सुविधांमध्ये व्यापक विस्तार करण्यात आला आहे. मग मोतिहारी कृषी महाविद्यालय असो किंवा वन विषयाचे नवीन महाविद्यालय असो, पूसामध्ये शालेय कृषी व्यवसाय आणि ग्रामीण व्यवस्थापन असो, बिहारमध्ये कृषी विज्ञान आणि कृषी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येत आहेत.  हे काम आणखी पुढे नेवून शालेय कृषी व्यवसाय आणि ग्रामीण व्यवस्थापन शिक्षणासाठी नवी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्याचबरोबर, नवी वसतिगृह, स्टेडियम आणि अतिथी गृह यांचाही शिलान्यास केला आहे.

मित्रांनो, कृषी क्षेत्राच्या आधुनिक गरजा पाहता, गेल्या 5-6 वर्षांपासून देशामध्ये एक मोठे अभियान सुरू आहे. 6 वर्षांपूर्वी ज्यावेळी देशामध्ये फक्त एक केंद्रीय कृषी विद्यापीठ होते, तिथंच आज देशात 3-3 केंद्रीय कृषी विद्यापीठे आहेत. येथे - बिहारमध्ये दरवर्षी महापूर येतो, त्या पुरापासून शेतीला कसे वाचवता येईल, यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी महात्मा गांधी संशोधन केंद्र बनविण्यात आले आहे. अशाच प्रकारे मोतीपूर येथे मासेमारी संबंधित क्षेत्रीय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. मोतिहारीमध्ये पशुपालनसंबंधित कृषी आणि दुग्धालय विकास केंद्र, अशा अनेक संस्था कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

मित्रांनो, आता भारताची एका पुढच्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता गावांच्या जवळच क्लस्टर बनविण्यात येत आहेत. तिथे अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित व्यवसाय आणि संशोधन केंद्रही सुरू होतील. म्हणजेच एका पद्धतीने आम्ही असे म्हणू शकती की, ‘‘ जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन’’!! या तिन्हींची ताकद ज्यावेळी एकजूट होवून काम करेल, त्यावेळी देशाच्या ग्रामीण जीवनाचे चित्र पूर्णपणे बदलून जाणार आहे, हे निश्चित! बिहारमध्ये तर याच्या अनेक संभावना आहेत. इथली फळे मग लिची असो, जर्दाळू असो अथवा आवळा असो, मखाना असो अथवा मधुबनी चित्रे असो असे अनेक उत्पादने बिहारच्या जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये आहेत. आपल्याला या स्थानिक उत्पादनांसाठी आणखी जास्त व्होकल व्हायचे आहे. आपण स्थानिकांसाठी जितके व्होकल होवू, तितकाच बिहार आत्मनिर्भर होईल. तितकाच देशही आत्मनिर्भर होईल.

मित्रांनो, बिहारचे युवक, विशेषतः आमच्या भगिनींचे यामध्ये कौतुकास्पद योगदान देत आहे. श्रीविधी धानाची शेती असेल, भाडेतत्वाने जमीन घेवून भाजीपाला पिकवण्याचे काम असेल, अज्जोलासहित इतर जैविक खतांचा उपयोग असेल, कृषी यंत्र सामुग्री भाड्याने देण्याचे केंद्र असो, बिहारची स्त्री शक्तीही आत्मनिर्भर भारत अभियानाला बळकटी देण्यासाठी पुढेकार घेत आहे. याचा मला आनंद होतो. पूर्णिया जिल्ह्यामध्ये मक्याच्या व्यापारामध्ये असलेले ‘अरण्यक एफपीओ’ आणि कोसी क्षेत्रामध्ये महिला दुग्धालया कृषीचे ‘‘कौशिकी मिल्क प्रोड्युसर कंपनी, असे अनेक समूह प्रशंसनीय काम करीत आहेत. आता तर आमच्या या उत्साही युवकांसाठी, भगिनींसाठी केंद्र सरकारने विशेष निधीही तयार केला आहे. एक लाख कोटी रुपये या पायाभूत निधीतून अशा एफपीओ- कृषी उत्पादक संघांना, सहकारी समूहांना, गावांचे भंडार, शीतगृहे आणि इतर सुविधा तयार करण्यासाठी आर्थिक मदत सुकरतेने दिली जात आहे. आज बिहारमध्ये अशी स्थिती आहे की, वर्ष 2013-14 च्या तुलनेमध्ये आता स्वमदत समूहांना मिळणा-या कर्जामध्ये 32 पट वाढ झाली आहे. यावरून लक्षात येते की, देशाला बँकांना, आमच्या भगिनींच्या सामर्थ्यवर, त्यांच्या उद्यमशीलवर किती विश्वास आहे.

मित्रांनो, बिहारमधल्या गावांना, देशांतल्या गावांन आत्मनिर्भर भारताचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने वाढत आहेत. या प्रयत्नांमध्ये बिहारचे परिश्रमी मित्रांची भूमिका मोठी, महत्वपूर्ण आहे. आणि आपल्याकडून देशाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. बिहारचे लोक या देशात असोत  अथवा विदेशामध्ये आपल्या परिश्रमाने, आपल्या प्रतिभेने आपले नाणे खणखणीत वाजवतात. मला विश्वास आहे की, बिहारचे लोक आता आत्मनिर्भर बिहारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही असेच निरंतर कार्यरत राहतील. विकास योेजनांच्या प्रारंभासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. परंतु पुन्हा एकदा मी आपल्या भावना प्रकट करू इच्छितो. मला आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, त्याही मी सांगतो. माझी अपेक्षा अशी आहे की, आपण सर्वांनी मास्क वापरावा आणि दोन गज अंतर राखण्याच्या नियमाचे पालन अवश्य करावे. सुरक्षित रहावे आणि निरोगी-स्वस्थ रहावे.

आपल्या घरामध्ये असलेल्या वृद्धांची योग्य ती काळजी घ्यावी, कोरोना हा विषयी काही किरकोळ समजण्यासारखा नाही. आणि प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. कारण आमचे संशोधक कोरोनाविरोधातली लस ज्यावेळी आणायची, त्यावेळी आणतीलच. परंतु हा जो सामाजिक अंतर राखण्याचा उपाय आहे, तो कोरोनापासून संरक्षण करण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. बचावाचा हाच मार्ग आहे. म्हणूनच दो गज अंतर राखण्याचा आणि मास्क वापरण्याचा तसेच कुठेही थुंकण्यात येवू  नये, वृद्धांची काळजी घ्यावी, याची मी वारंवार आठवण करून देत असतो. आज आपल्यामध्ये आलो आहे म्हणून पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. मला पुन्हा एकदा आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे. मी राज्य सरकारला, आमच्या गिरिराजजींना, आणि सर्वांनाच खूप-खूप धन्यवाद देतो.

खूप-खूप धन्यवाद!!

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653173) Visitor Counter : 175