दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाच्या योजना संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात यासाठी टपाल विभागाच्या पंचतारांकित गावे योजनेचे उद्घाटन
ग्रामीण डाक सेवक, टपाल सेवेच्या जनजागृती मोहिमेचे नेतृत्व करणार
महाराष्ट्रातील अनुभवाच्या धर्तीवर देशभर ही योजना राबवली जाणार - केंद्रीय मंत्री संजय धोत्रे
Posted On:
10 SEP 2020 5:30PM by PIB Mumbai
मुंबई, 10 सप्टेंबर 2020
टपाल विभागाच्या योजना देशातील संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात यासाठी टपाल विभागाच्या पंचतारांकित गावे योजनेचे उद्घाटन आज करण्यात आले. टपाल विभाग अनेक उत्पादने आणि सेवा पुरवते मात्र ते खेड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणूनच अशी सर्व उत्पादने आणि सेवा ग्रामीण स्तरावर उपलब्ध करुन देण्यासाठी पंचतारांकित गावे योजना सुरू करण्यात आली आहे. शाखा कार्यालये त्यांच्या टपालविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 'वन स्टॉप शॉप' म्हणून काम करतील.
खेड्यातील प्रत्येक घरात खाली नमूद केलेल्या टपाल योजनांची 100 टक्के व्याप्ती सुनिश्चित करणे हे पंचतारांकित गाव योजनेची संकल्पना आहे. कोणत्याही गावाने खालीलपैकी चार योजना पूर्ण केल्या तर त्या गावाला चार तारांकित दर्जा मिळतो, जर कोणत्याही खेड्यातून तीन योजना पूर्ण झाल्या तर त्या गावाला तीन तारांकित दर्जा मिळतो.
-बचत बँक खाते (एसबी / आरडी / टीडी / एमआयएस किंवा एनएससी / केव्हीपी प्रमाणपत्र )
-सुकन्या समृद्धि खाते / पीपीएफ खाते
-वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले आयपीपीबी खाते
-टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी
-पंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
सुरुवातीला महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येईल, त्यानंतर त्या अनुभवाच्या धर्तीवर संपूर्ण देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. पोस्टमन आणि टपाल विभाग हे सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण घटक आहेत. कोविड19 मुळे उद्भवलेल्या कठिण काळातही भारतीय टपाल विभागाने वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य करत सामान्यांना अतिशय चोख सेवा दिली असे धोत्रे यावेळी म्हणाले. पंचतारांकित गावे योजनेअंतर्गत असलेल्या विविध योजनांमध्ये प्रत्येक घर, प्रत्येक व्यक्ती समाविष्ट झाल्यावर विभागाकडून जनतेच्या आर्थिक सुरक्षिततेचे मोठे समाजकार्य घडून येईल असेही त्यांनी नमूद केले. पंचतारांकित गावे योजना देशाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल आणि या शा प्रयत्नातूनच आत्मनिर्भर भारताचे ध्येय गाठता येईल, असे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्र या योजनेअंतर्गत येईल. सुरुवातीला प्रत्येक प्रांतासाठी दोन ग्रामीण जिल्ह्यांची निवड पुढीलप्रमाणे केली आहे. अकोला, वाशीम(नागपूर विभाग), परभणी, हिंगोली (औरंगाबाद विभाग), सोलापूर, पंढरपूर (पुणे विभाग), कोल्हापूर, सांगली(गोवा विभाग), मालेगाव, पालघर (नवी मुंबई विभाग). 2020-2021 या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यातील 50 गावे समाविष्ट केली जातील. प्रादेशिक कार्यालये पंचतारांकित गावे अंतर्गत समाविष्ट करावयाच्या गावांची निवड करतील.
योजना अंमलबजावणी गट
पाच ग्रामीण डाक सेवकांची टीम तयार करून हे साध्य केले जाईल . या चमूला टपाल विभागाच्या सर्व उत्पादने, बचत आणि विमा योजनांच्या विपणनासाठी एक गाव सोपवले जाईल. पाच जीडीएस अधिकाऱ्यांच्या चमूमध्ये शाखा कार्यालय आणि जवळच्या शाखा कार्यालयांचे ग्रामीण डाक सेवक असतील आणि त्यांचे नेतृत्व संबंधित शाखा कार्यालयातील बीपीएम करतील. मेल ओव्हरसिर दररोज या गटाच्या प्रगतीवर वैयक्तिक नजर ठेवतील. विभागीय प्रमुख, सहाय्यक अधीक्षक टपाल (एएसपी) आणि संबंधित निरीक्षक टपाल या गटांवर देखरेख ठेवतील.
मोहीम
सर्व योजनांसाठी जनजागृती मोहीम राबवून आणि पात्र ग्रामस्थांना एकत्र करून हा गट घरोघरी भेट देईल. बीओच्या नोटीस बोर्डवर दाखवून व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. त्याचप्रमाणे पंचायत कार्यालये, शाळा, ग्रामीण दवाखाने, बस आगार, बाजारपेठ इत्यादी सर्व प्रमुख ठिकाणी नोटिस बोर्ड लावले जातील. टपाल योजना व उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी पत्रके वाटप केले जाऊ शकते. कोविड -19 च्या प्रसारापासून बचाव करण्याच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन छोटे मेळावे आयोजित केले जाऊ शकतात.पाल (आयपी) या पथकांचे नेतृत्व आणि देखरेख करतील.
पायाभूत सुविधा / उपकरणे / प्रशिक्षण
निवडलेल्या गावांमधील सर्व बीओंना पायाभूत सुविधांच्या उपकरणाच्या आवश्यकतेबाबत आणि अशा प्रकारच्या बीओंपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक निधीची आवश्यकता. दर्पण डिव्हाइसेस आणि आयपीबी मोबाईलमधील अॅप्स वापरली जातील. उपविभागाच्या संबंधित आयपी / एएसपीमार्फत मेल ओव्हरसिअर्स / बीपीएम / जीडीएसना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण सत्रात सर्व योजनांचा समावेश केला जाईल.
देखरेख
उद्दिष्टाच्या प्रगती व कामगिरीवर परिमंडळ , प्रादेशिक आणि विभागीय स्तरावर बारीक लक्ष ठेवले जाईल. दररोज देखरेखीसाठी व्हाट्सएप ग्रुप तयार केले जाईल. मासिक प्रगती अहवाल सादर केला जाईल ज्याचा आढावा सीपीएमजी घेतील.
पंचतारांकित गावे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे एक आदर्श उदाहरण महाराष्ट्र देशासमोर निर्माण करेल असा विश्वास महाराष्ट्र सर्कल आणि गोवा राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश चंद्र अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याकडे व्यक्त केला. महासंचालक विनीत पांडे, मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
* * *
R.Tidke/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653038)
Visitor Counter : 1332