महिला आणि बालविकास मंत्रालय
तिस-या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये पहिल्या 1000 दिवसात माता आणि बालकांना पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयीच्या यशोगाथांचे प्रदर्शन
Posted On:
08 SEP 2020 10:22PM by PIB Mumbai
महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने सप्टेंबर 2020 हा तिसरा राष्ट्रीय पोषण महिनामुळे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पोषण अभियानामध्ये सर्वोकृष्ट आचरण आणि यशोगाथा यांच्यावर पहिले वेबिनारचे काल आयोजन करण्यात आले होते. तर दुस-या वेबिनारचे आज आयोजन करण्यात आले. या दुस-या वेबिनारमध्ये पहिल्या 1000 दिवसांमध्ये माता आणि बालके यांच्यासाठी पौष्टिक आहाराची किती आवश्यकता असते, याविषयावर माहिती देण्यात आली. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी होत्या. तर महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री देवश्री चैधरी, या मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्र, तसेच या क्षेत्राशी संबंधित मंत्रालये, राज्य सरकारचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटना आणि विकास भागीदारांचे प्रतिनिधी, पीआरआय सदस्य, आयसीडीसीचे कार्यकर्ते, राज्यांच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी, डोमेन तज्ज्ञ, पोषण आहार विशेषज्ञ, मंत्रालयातले अधिकारी आदि उपस्थित होते.
या वेबिनारला मार्गदर्शन करताना स्मृती इराणी यांनी पोषण महिन्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ज्या प्रकारे विविध मंत्रालयांमध्ये समन्वय साधला जात आहे, त्याचे कौतुक केले. तसेच हे अभियान जनतेच्या भागीदारीमुळेच यशस्वी होणार आहे, त्यामुळे सर्वांनी यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले. माता-बालकांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये पोषक आहार मिळाल्यामुळे किती लाभ होतात, याची यशोगाथा ई-पुस्तकाच्या माध्यमातून संकलित करून ते प्रकाशित करण्याची योजना तयार करण्यात आल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.
या वेबिनारमध्ये दोन नामवंत वैद्यकीय व्यावसायिकांना अतिथी व्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये माता आणि बालकांच्या दृष्टीने पहिल्या 1000 दिवसांचा काळ अतिशय नाजूक असतो, अशावेळी संगोपन, पोषण कसे करावे, याविषयी प्रा. डाॅ. एच पी एस सचदेव यांचे व्याख्यान झाले. गर्भधारणेच्या काळापासून दोन वर्षांपर्यंत पोषक आहार मिळणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. तर मुले आणि माता यांच्या पहिल्या 1000 दिवसांमध्ये पोषणाच्या गरजा कोणकोणत्या असतात, याची माहिती दुसरे व्याख्याते सेंट जाॅन वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख प्रा. एव्ही कुरपाद यांनी दिली. माता आणि बालकांना कमी किंवा जास्त आहार देण्यामुळे धोका निर्माण होवू शकतो, तो टाळण्यासाठी दोघांचाही आहार काळजीपूर्वक तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांनी आपल्या भाषणामध्ये बाळाच्या जन्मानंतर त्याला पहिले 180 दिवस मातांनी आपले दूध पाजण्याची गरज आहे, यावर भर दिला.
****
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652486)
Visitor Counter : 174