भूविज्ञान मंत्रालय

संपूर्ण देशात आत्तापर्यंत 7 टक्के जास्त पाऊस


मौसमी पाऊस सुरूच राहण्याची शक्यता; सप्टेंबरच्या तिस-या आठवड्यापासून जास्त पावसाचा अंदाज

अतिवृष्टीचा अंदाज वर्तवताना हवामानशास्त्र विभाग 80 टक्क्यांपेक्षा जास्त अचूक असल्याचे सिद्ध

Posted On: 07 SEP 2020 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2020


यावर्षी संपूर्ण देशात आत्तापर्यंत 7 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आणि नैऋत्य मौसमी पाऊस देशात सर्वत्र मुबलक प्रमाणात झाला आहे. तसेच इतक्या लवकर पावसाचा देशातून मुक्काम हलण्याची शक्यताही नाही, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला आहे. यंदा वरूणराजाने शेतकरी बांधवांवर खूप चांगली कृपा केली आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांना त्याचा लाभ होणार असून भारतीय अर्थव्यवस्थेलाही चांगलीच मदत मिळणार आहे. मात्र या पावसाचा नेमका किती फायदा अर्थव्यवस्थेला होईल, याविषयी नेमकी आकडेवारी सध्या तरी देता येणार नाही. तसेच त्याचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी स्पष्ट केले आहे.

 

हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. एम महापात्रा यांनी आज सांगितले की, देशामध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात बहुतेक भागात पाऊस विश्रांती घेईल. सामान्यपणे 17 सप्टेंबरपासून मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. मात्र वायव्य आणि मध्य भारतामध्ये 17 सप्टेंबरपासून पावसाची पुन्हा हजेरी लागण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. डॉ. एम. राजीवन आणि डॉ. महापात्रा यांनी आज एका आभासी पत्रकार परिषदेमध्ये पावसाविषयीचा अंदाज व्यक्त केला.

अतिवृष्टीचा अंदाज वर्तवताना हवामानशास्त्र विभाग 80 टक्क्यांपेक्षा जास्त अचूक असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगून अम्फान चक्रीवादळाचा अचूक अंदाज खूप आधीच वर्तविल्यामुळे जीवितहानी तसेच मालमत्तेची हानी होण्यापासून वाचण्यास मदत झाली. याकडे डॉ. एम. राजीवन आणि डॉ. महापात्रा यांनी यावेळी पत्रकारांचे लक्ष वेधले. तथापि पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला येवून धडकणा-या चक्रीवादळाचा प्रकार वेगळा असल्याने  त्यांचा मागोवा घेवून त्याविषयी अंदाज घेणे अतिशय अवघड असते, असे त्यांनी सांगितले. मात्र निसर्ग या चक्रीवादळाचा प्रवास कमी दाबाच्या क्षेत्रापासून सुरू झाला होता त्याच्या उच्चबिंदूपर्यंतचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तरीही हे वादळ भूप्रदेशाकडे सरकताना थोडा फरक झाला होता.

हवामानशास्त्र विभागाच्या पुढाकाराने ‘‘साप्ताहिक व्हिडिओ स्वरूपात हवामान अंदाज’’ वर्तविण्यात येत आहे. ही ध्वनिचित्रफीत इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये असते. तसेच लोकांना उपयुक्त ठरतील असे हवामान ॲप आहेत. यामध्ये ‘मौसम ॲप’, ‘मेघदूत ॲप’ आणि ‘दामिनी ॲप’चा समावेश आहे.

‘पीपीटी’साठी येथे क्लिक करावे

 
* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652115) Visitor Counter : 112