वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वाहन उद्योग क्षेत्रात भारताने जागतिक वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करावी : पियुष गोयल


प्रतिसादात्मकता, उच्च गुणवत्ता, किफायतशीर आणि उत्तम अर्थव्यवस्था यामुळे आपल्याला जागतिक बाजारपेठेत विस्तार करणे शक्य होईल : पियुष गोयल

Posted On: 04 SEP 2020 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2020


वाहनउद्योग क्षेत्रात आपण जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी, विशेषतः वाहनांचे सुटे भाग आणि वाहननिर्मितीमध्ये विस्तार व्हायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली आहे. भारतीय वाहनउद्योग उत्पादक संघटनेच्या वार्षिक संमेलनात ते आज बोलत होते. आम्ही जे निर्माण करतो आहोत आणि ज्या सेवा देत आहोत, त्यांची व्याप्ती आणि दर्जा, दोन्ही वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासोबतच, जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी भारत कशी सुधारणा करु शकेल, या कडेही लक्ष देत आहोत, असे गोयल म्हणाले.

प्रतिसादात्मकता, उच्च दर्जा, वाजवी दर आणि उत्तम अर्थव्यवस्था या सर्व घटकांमुळे आपल्याला जागतिक बाजारपेठेत आपला विस्तार करता येईल असे गोयल म्हणाले. जागतिक बाजारात आपल्या उत्पादनांना स्थान मिळवून देण्यासाठी, डिझाईन, पैकेजिंग आणि ब्रांड तयार करणे या पूर्वअटी आहेत, असे त्यांनी सांगितले.

आपण आज वाहनउद्योग क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत असतांना, उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. जागतिक बाजारपेठेत जातांना ज्या अडचणी येतील, त्या सोडवण्यासाठी सरकार वेळोवेळी उद्योगजगताला मदत करण्यास तत्पर असेल, असे त्यांनी सांगितले. काही विशिष्ट क्षेत्रांच्या बाबत एक निश्चित दृष्टीकोन ठेवून जागतिक पुरवठा साखळीत त्यांचे योगदान वाढवता येईल. असे ते म्हणाले.

भारतातील वाहनउद्योग कंपन्यांनी आपल्या मूळ परदेशी भागीदार कंपन्यांना रॉयल्टीची रक्कम कमी करण्याची विनंती करावी, असा सल्ला गोयल यांनी दिला. यामुळे, त्यांच्या भारतातील कंपन्यांना सध्याच्या संकटकाळात मदत मिळेल. भारतातील वाहनउद्योग क्षेत्रात, मोठा वाटा असलेल्या या वाहनकंपन्या आपल्या मूळ कंपन्याना रॉयल्टीपोटी लक्षावधी रक्कम देत असतात, ती कमी झाल्यास, या कंपन्याकडे भांडवल शिल्लक राहील आणि, देशात वाहनांच्या किंमतीही कमी होतील ज्यामुळे त्यांची देशांतर्गत विक्री वाढेल.   

या संकटातून बाहेर पडण्यासाठी वाहन उद्योगांचे पुनर्धोरण आखले गेले पाहिजे, तरच या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होऊ शकेल, असे गोयल म्हणाले.

गुणवत्ता नियंत्रण आदेशांना अडथळे मानले जाऊ नयेत. भारताने आता आपल्या गुणवत्ता नियंत्रणाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे आणि देशाला उच्च दर्जाची उत्पादने दिली पाहिजेत, से गोयल म्हणाले.

गोयल यांनी, स्वामी विवेकानंदांचे वचन उद्धृत केले- “जर आपल्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तर काहीही साध्य करणे अशक्य नाही.निश्चय केला तर उंच  पर्वतालाही चूर चूर करता येते.” आता वाहन उद्योग देखील आपली कौशल्ये पुन्हा नव्याने शिकत आहे, आणि उत्पादन क्षेत्रात नव्याने आपले पाव रोवण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा विशेष आनंद असल्याचे, गोयल म्हणाले.

वाहनउद्योगाला परवडणाऱ्या लॉजिस्टिक कामांसाठी भारतीय रेल्वे अल्पदरात मालवाहतुकीची सुविधा देण्यास तयार आहे, असेही गोयल यांनी यावेळी संगितले. पैसा उभा करण्यासाठी वाहन उद्योगांनी काही अभिनव उपाय शोधावेत, आसे आवाहन त्यांनी केले.  

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1651423) Visitor Counter : 114


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri