आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड-19 वरील मंत्री गटाच्या (जीओएम) 20 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले
जागतिक पातळीवर भारतातील कोविड मृत्यू दर सर्वात कमी : डॉ. हर्षवर्धन
Posted On:
29 AUG 2020 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2020
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 वरील उच्चस्तरीय मंत्री गटाची 20 वी बैठक झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ, एस जयशंकर, नागरी उड्डयन मंत्री हरदीप एस पुरी, जहाजबांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख लाल मांडविया, रसायन आणि खत मंत्री अश्विन कुमार चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे देखील बैठकीला उपस्थित होते. नीती आयोग सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद पॉल हे आभासी पद्धतीने बैठकीला उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला, डॉ हर्ष वर्धन यांनी केंद्र सरकार आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या विविध समन्वित प्रयत्नांवर समाधान व्यक्त केले. “31 जुलै रोजी झालेल्या मंत्री गटाच्या बैठकीनंतर या आजाराचा सामना करण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत एकूण 26.4 लाख कोविड रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोविड मृत्यू दर सर्वात कमी 1.81 % असून रुग्ण बरे होण्याच्या दरात सतत वृद्धी होऊन तो 76.47% झाला आहे," असे ते म्हणाले. त्यांनी मंत्री गटाला अधिक माहिती देत सांगितले की पुरेशी आरोग्य सुविधा निर्माण झाल्याने देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बरीच बळकटी मिळाली आहे. तसेच, केवळ 0.29% रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, आयसीयूमध्ये 1.93% रुग्ण आणि केवळ 2.88% रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. सध्या एकूण 1576 प्रयोगशाळांमुळे चाचणी प्रक्रियेला वेग आला सून दररोज 10 लाख चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गेल्या 24 तासांत 9 लाखाहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आणि यामुळे एकूण चाचणी संख्येने 4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे,” असेही त्यांनी सांगितले. डॉ. हर्ष वर्धन यांनी मंत्री गटाला सांगितले की, केंद्राकडून राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 338 लाखांहून अधिक एन-95 मास्क, सुमारे 135 लाख पीपीई आणि सुमारे 27,000 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत.
डॉ. हर्षवर्धन यांनी आरोग्य मंत्रालयाला खासदार आणि आमदार यांच्यासाठी कोविड प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक उपायांचा समावेश असलेले एसओपी विकसित करण्याच्या सूचना दिल्या.
जागतिक तुलनेत हे स्पष्ट निदर्शनाला आले आहे की, भारतात 3161 आणि 107.2 च्या जगतील सरासरीच्या तुलनेत प्रति मिलियन (2424) सर्वात कमी रुग्ण आहेत तर प्रति मिलियन (44) मृत्यू कोविड मुळे झाले आहेत. मर्यादित संसाधने आणि दाट लोकवस्ती असूनही, वेळेवर लॉकडाउन आणि वेगाने पायाभूत सुविधा वाढविल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कोविड रुग्णांचे प्रमाण / दशलक्ष आणि मृत्यू / दशलक्ष कमी झाले आहेत हे निदर्शनाला आले आहे. देशामध्ये, आजवरचे सुमारे 73% सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यात होते. याशिवाय शिवाय, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमध्ये 81% मृत्यू झाले आहेत.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649597)
Visitor Counter : 216