उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी आयआयटी आणि उच्च शिक्षण संस्थांना सामाजिक समस्यांबाबत संशोधन करण्याचे केले आवाहन


उपराष्ट्रपतींनी उच्च शिक्षण संस्थांना उद्योगांशी परस्पर हिताचे संबंध विकसित करायला सांगितले

संशोधन प्रकल्पांना निधी पुरवठा करण्यासाठी खासगी क्षेत्राला केले आवाहन

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व हितधारकांकडून सामूहिक कृतीचे केले आवाहन

विविध तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याची भारतात अपार क्षमता

दिल्ली आयआयटीच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे केले उद्घाटन

उद्योजकतेत अग्रेसर म्हणून उदयाला आलेल्या आयआयटी दिल्लीची केली प्रशंसा

Posted On: 17 AUG 2020 1:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020

 
आयआयटी आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन हे समाजाशी संबंधित असले पाहिजे आणि हवामान बदलापासून आरोग्याच्या प्रश्नांपर्यंत मानवजातीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दिल्ली आयआयटीच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करताना केली. ते म्हणाले की, जेव्हा भारतीय संस्था देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर अनुकूल आणि शाश्वत उपाय विकसित करून सभोवतालच्या समाजांवर प्रभाव टाकण्यास सुरवात करतील तेव्हाच जगातील सर्वोत्तम संस्थांमध्ये भारतीय संस्थांची गणना होईल. 

सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूकीचे आवाहन करताना उपराष्ट्रपतींनी खाजगी क्षेत्राला असे प्रकल्प जाणून घेण्यात शैक्षणिक क्षेत्राबरोबर सहकार्य करण्याचे आणि उदारपणे वित्तपुरवठा करण्याचे आवाहन केले.

संशोधनामध्ये लोकांचे जीवन आरामदायी  बनवण्यावर , प्रगतीला गती देण्यावर आणि अधिक न्याय्य जागतिक सुव्यवस्था सुनिश्चित करण्याकडे लक्ष दिले जावे यावर त्यांनी भर दिला. आयआयटीतून शिक्षण घेतलेल्यांना शेतकरी आणि ग्रामीण भारताला भेडसावणाऱ्या समस्यांकडे  लक्ष देण्याचे आवाहन करत नायडू यांनी त्यांना केवळ कृषी-उत्पादन वाढवण्यासाठीच नव्हे तर पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त खाद्य उत्पादनावर विशेष लक्ष देण्याची सूचना केली.

उच्च शिक्षण संस्थांनी दबावाखाली काम करू नये तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी सहकार्याचे  संबंध स्थापन करावेत, असे ते म्हणाले, विविध क्षेत्रांतील उद्योग तज्ज्ञांनी संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम केले पाहिजे. “अशा प्रकारच्या सहकार्याने प्रकल्पांना गती मिळेल आणि लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील ”, असे ते पुढे म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरण भारताला जागतिक अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रोत्साहित करणारे असल्याबद्दल आनंद व्यक्त करत  जागतिक स्तरावरील  अव्वल 500 संस्थांमध्ये केवळ आठ  भारतीय संस्थांचा समावेश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ते म्हणाले की, ही परिस्थिती बदलायाला हवी  आणि आपल्या उच्च शिक्षण संस्थांच्या शिक्षणाच्या दर्जात आणि गुणवत्तेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व हितधारक-सरकार, विद्यापीठे, शिक्षणतज्ञ आणि खासगी क्षेत्र यांच्याकडून एकत्रित आणि सामूहिक कृती व्हायला हवी. 

लोकसंख्येचा फायदा आणि अत्यंत प्रतिभावान तरुणांची संख्या लक्षात घेऊन विविध तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याची अपार क्षमता भारतामध्ये असल्याचे निरीक्षण नोंदवत उपराष्ट्रपती म्हणाले, “गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज आहे”.

उद्योजकतेच्या बाबतीत अग्रेसर म्हणून उदयाला येत असलेल्या आयआयटी दिल्लीचे कौतुक करताना नायडू म्हणाले: “ आयआयटी दिल्लीसारख्या संस्था नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी देणारे तयार करत आहेत आणि देशातील अन्य संस्थांसाठी उदाहरण ठरत आहेत ही चांगली गोष्ट आहे. .”

यावेळी उपराष्ट्रपतींनी हीरक महोत्सवी लोगो आणि आयआयटी दिल्ली 2030 रणनीती दस्तवेजांचे प्रकाशन केले. 

यावेळी शिक्षणमंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक, आय.आय.टी. दिल्लीचे संचालक प्रा. व्ही. रामगोपाल राव आदी मान्यवर उपस्थित होते.


* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646397) Visitor Counter : 162