उपराष्ट्रपती कार्यालय

ऐतिहासिक घटनांचा सर्वंकष आणि वस्तुनिष्ठ लेखाजोखा घेणे आवश्यक उपराष्ट्रपती


देशभरातील सर्व स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या त्यागाची पाठ्यपुस्तकात मांडणी आवश्यक - उपराष्ट्रपती

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील पुस्तकाचे अनावरण

Posted On: 12 AUG 2020 4:28PM by PIB Mumbai

 

ऐतिहासिक घटनांचा सर्वंकष, सत्य आणि वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वैंकेय्या नायडू यांनी आज केले.

नेताजी सुभाष बोस- भारतीय राष्ट्रीय सेना (INA) ट्रस्ट मधील सहयोगी सदस्य असलेल्या डॉ कल्याण कुमार डे लिखित ‘नेताजी-इंडियाज इंडिपेन्डन्स अँड ब्रिटीश अर्काइव्हज’ या पुस्तकाचे अनावरण केल्यानंतर उपराष्ट्रपती निवास येथे ते बोलत होते.

नेताजींशी संबधीत काही महत्वाचे दस्तावेज या पुस्तकात त्याद्वारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजींनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकल्याचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी नवीन पिढीला भारताच्या इतिहासाबद्दल सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

याशिवाय, देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचे धैर्य आणि त्याग यांच्या गाथा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात झळकल्या पाहिजेत तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी विविध प्रकारचा त्याग केला आहे त्यांच्या गाथाही अधोरेखित व्हायला हव्यात असेही नायडू म्हणाले.

भारतीय राष्ट्रीय सेनेची (INA) उभारणीच त्या सेनेला दखलपात्र करण्यासाठी पुरेशी होती असे म्हणून नायडू यांनी या पुस्तकातील कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते की भारतीय राष्ट्रीय सेनेकडे लोकांच्या सहानुभूतीची लाट वाढत असल्याने त्यापासून असलेला धोका ब्रिटीशांनी ओळखला होता, असे सांगीतले. देशाच्या स्वांतत्र्यलढ्यातील हा महत्वाचा घटक असल्याचे ते म्हणाले.

आजच्या युवा दिनाचा उल्लेख करुन उपराष्ट्रपतींनी नेताजींच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेत नवीन भारताच्या उभारणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन युवावर्गाला केले.

भारताची नागरी सभ्यता, इतिहास आणि संस्कृती यांचा नेताजींना फार अभिमान होता आणि महान राष्ट्रे स्वतःचे विधीलिखित स्वतः घडवतात यावर त्यांचा विश्वास होता. “ही तेजाची शलाका इतरांच्या हृद्यात पुन्हा चेतवावी असा त्यांचा मानस होता, असेही उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अजित डोवाल, नेताजी सुभाष बोस- INA ट्रस्ट अध्यक्ष आणि नेताजींची नात रेणुका मालाकर आणि गरुड प्रकाशनाचे अंकुर पाठक आदी मान्यवर या पुस्तक अनावरणाच्या सोहळ्याला उपस्थित होते.

 

उपराष्ट्रपतींचे पूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

 

B.Gokhale/V.Sahajrao/P.Korr

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645342) Visitor Counter : 208