नौवहन मंत्रालय
खलाशांसाठीच्या, प्रशिक्षणोत्तर ऑनलाईन एक्झिट परीक्षा प्रणालीचे मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन
कोविड-19 साथीच्या काळात खलाशी घरुनच परीक्षा देऊ शकतील
सागरी क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करण्यासाठीच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने मंत्रालयाचे प्रयत्न
खलाशांसाठी प्रशिक्षणोत्तर ऑनलाईन एक्झिट परीक्षा प्रणाली विकसित करणारा भारत जगातला एकमेव देश
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2020 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020
केंद्रीय जहाजबांधणी मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज खलाशांसाठीच्या, प्रशिक्षणोत्तर ऑनलाईन एक्झिट परीक्षा प्रणालीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. जहाजबांधणी महासंचालनालयाच्या वतीने, विविध सागरी प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक खलाशांना प्रशिक्षण दिले गेले आहे, ते सर्व खलाशी आता कोविडच्या काळात, घरूनच प्रशिक्षणोत्तर ऑनलाईन एक्झिट परीक्षा देऊ शकतील. यामुळे, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कामावर रुजू होता येईल.

यावेळी बोलतांना मनसुख मांडवीय यांनी सांगितले की भारत, कुशल आणि दर्जेदार खलाशांसाठी संपूर्ण जगात ओळखला जातो. 2017 साली देशात, 1.54 लाख खलाशी होते, 2019 मध्ये त्यांची संख्या 2.34 लाखांवर पोहोचली आहे. भारतीय आणि जागतिक सागरी व्यवसायाची मागणी पूर्ण करण्यासाठी पाच लाख खलाशी तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे मांडवीय म्हणाले. सागरी व्यवसायात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जहाजबांधणी मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
बदलत्या काळानुसार प्रशिक्षण संस्थांनी देखील आपल्यात बदल केले आहेत. या साथीच्या आजाराच्या काळात, खलाशांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरु करणारा, भारत हा जगातील एकमेव देश आहे. या ऑनलाईन परीक्षेमुळे, परीक्षा पद्धतीत अचूकता आणि उमेदवारांची निवड करतांना समानता जपली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जहाजबांधणी विभागाचे महासंचालक अमिताभ कुमार यांनी मंत्र्यांना या परीक्षा प्रणालीची संपूर्ण माहिती दिली. उमेदवार, https://www.dgsexams.in/ या संकेतस्थळावरून लॉगइन करुन ही परीक्षा देऊ शकतील.
खलाशांना नोकरी मिळण्यासाठी, तीन स्तरीय परीक्षा द्यावी लागते. यात- इ लर्निग च्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करणे, मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण आणि शेवटी एक्झिट परीक्षा यांचा समावेश आहे.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1644180)
आगंतुक पटल : 235