उपराष्ट्रपती कार्यालय

नव भारताच्या निर्मितीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सक्रीय परिवर्तनकार व्हावे : उपराष्ट्रपती


सरकार प्रदान केलेल्या सेवांसाठी नेहमी आठवणीत राहील

साथीचा आजार असतानाही विकासाच्या अनेक संधी उपलब्ध : उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या प्रशिक्षणार्थींना समारोपाच्या भाषणात संबोधित केले

Posted On: 07 AUG 2020 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020

उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी आज तरुण आय.ए.एस. अधिकाऱ्यांना श्रीमंत-गरीब, पुरुष-स्त्रिया आणि शहरी-ग्रामीण भाग हे सर्व भेदभाव दूर करून नव भारताच्या निर्मितीमध्ये सक्रिय परिवर्तनकार म्हणून काम करण्याचे आवाहन केले.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी येथे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2018 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना ते म्हणाले की, दुर्लक्षित घटकाचा सामाजिक-आर्थिक विकास करणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.

सरदार पटेल यांच्या स्वप्नाचे स्मरण करून देताना उपराष्ट्रपती म्हणाले की, सरदार पटेल यांनी गरिबी आणि भेदभावाविरुद्ध लढा देऊन नव भारताच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या नागरी सेवेचे स्वप्न पहिले होते. उपराष्ट्रपतींनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात प्रामाणिक, शिस्तबद्ध, मेहनती, जबाबदार, पारदर्शक बनण्यास सांगितले.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण करताना म्हणाले की ते एक महान नेते होते, त्यांचे व्यक्तिमत्त्व सचोटी आणि विनम्रता, सहानभूती आणि कार्यक्षमता, राष्ट्रवाद आणि धैर्य अशा गुणांनी परिपूर्ण होते.

उपराष्ट्रपतींनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना नेहमी शिकत राहायचे, विचार करायचे आणि नवोन्मेष करत राहण्याचे आवाहन केले. सुप्रशासन ही आज काळाची गरज आहे, असे नायडू म्हणाले. प्रशासकीय व्यवस्था ही लहान परंतु कार्यक्षम व कार्यतत्पर तसेच पारदर्शक असावी जी लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करेल असे ते म्हणाले. एक अशी व्यवस्था जी तत्परतेने सोयी –सुविधा उपलब्ध करून देईल आणि प्रगतीची संधी आणि परिस्थिती निर्माण करू शकेल.

उपराष्ट्रपती म्हणाले की, संसद कितीही धोरणे व कायदे बनवू शकते परंतु शेवटी त्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणीच महत्त्वाची ठरते.

सरकार प्रदान करत असलेल्या सेवांमुळेच ते नेहमी स्मरणात राहते असे नमूद करत ते म्हणाले की, कोणताही विलंब न करता लोकांना त्यांचा हक्क मिळवून देणे सुनिश्चित करणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.

तुम्ही कोणत्याही पदावर जरी कार्यरत असलात तरी तुम्ही चांगले काम करून नवीन विक्रम प्रस्थापित केले पाहिजेत जेणेकरून लोकं तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवतील असे त्यांनी तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

सरदार पटेल यांचा एकत्रित सांघिक पद्धतीने काम करण्यावर दृढ विश्वास होता हे सांगत उपराष्ट्रपतींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि अधिनस्थ कर्मचाऱ्यांसोबत एकत्रितपणे एक संघ निर्माण करून लोकांची सेवा करण्याचा सल्ला दिला.

नायडू म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला "परफॉर्म, रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म" हा मंत्र तरुण अधिकाऱ्यांना प्रयोग करण्यासाठी प्रेरित करेल आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची प्रगती होईल. ते म्हणाले की, भारत वेगाने होणाऱ्या परिवर्तनाच्या युगात आहे, साथीचा आजार असूनही विकासासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत अधिकाऱ्यांनी पुढे सरसावून बदलत्या नव भारताच्या निर्मितीमध्ये नेतृत्व करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपराष्ट्रपतींनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने प्रकशित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाचे संकलन असलेल्या Sixty-five Conversations या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644142) Visitor Counter : 193