सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

केव्हीआयसी आणि आयटीबीपीने केला सामंजस्य करार, निमलष्करी दलाचे जवान चाखणार खादी ग्रामोद्योगचे मोहरी तेल

Posted On: 31 JUL 2020 9:38PM by PIB Mumbai

 

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) मोहरीच्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी आयटीबीपीशी सहकार्य करून भारताला ``आत्मनिर्भर`` बनविण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. याचाच परिणाम म्हणजे, आज केव्हीआयसी आणि आयटीबीपी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केव्हीआयसीचे अध्यक्ष श्री विनय कुमार सक्सेना यांच्या उपस्थितीत केव्हीआयसीचे संचालक श्री व्ही के नगर आणि आयटीबीपीचे उपमहानिरीक्षक श्री रमाकांत शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

केव्हीआयव्हीने म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ``आत्मनिर्भर भारत मोहिमे``ला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलाला दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने या उपक्रमाचा विकास झाला आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संपूर्ण देशभरातील सीएपीएफ कँटिनद्वारे केवळ ``स्वदेशी`` उत्पादनांची विक्री करणे देखील श्री अमित शहा यांनी बंधनकारक केले आहे. आयटीबीपी ही सर्व निमलष्करी दलांच्या वतीने गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी केंद्रिय गृहमंत्रालयाने नेमलेली एक मुख्य प्रतिनिधी आहे.

आयटीबीपी लवकरच 1200 क्विंटल उच्च दर्जाच्या घाण्यावरच्या मोहरीच्या तेलाची ऑर्डर देईल, जी केव्हीआयसीकडून पीएमईजीपी केंद्रांच्या माध्यमातून एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाईल.

केव्हीआयसीचे अध्यक्ष श्री विनयकुमार सक्सेना यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पुढाकाराचे आभार मानताना सांगितले की हा सामंजस्य करार एक ऐतिहासिक पाऊल आहे, कारण केव्हीआयसीने प्रथमच निमलष्करी दलाशी कोणत्याही साहित्याचा पुरवठा करण्यासाठी करार केला आहे. या कठीण काळात शाश्वत स्थानिक रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले. ``आमच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना उत्तम प्रतीचे तेल देणे, याला देखील आमचे वेळोवेळी सर्वोच्च प्राधान्य असेल, `` सक्सेना म्हणाले.  

केव्हीआयसी आणि आयटीबीपी यांच्यात झालेल्या या एक वर्षाच्या सामंजस्य कराराचे त्यानंतर नूतनीकरण करण्यात येईल. आगामी काळात सुती मॅट (दरी), ब्लँकेट, बेडशीट, उशांचे अभ्रे, लोणचे, मध, पापड आणि सौंदर्यप्रसाधने इत्यादी उत्पादने नियोजित आहेत. तेल आणि दरी यांचे एकूण मूल्य साधारणपणे 18 कोटी रुपयांच्या आसपास असेल.

उल्लेखनीय म्हणजे, केआयसीएफने अलिकडे चाचणी तत्त्वावर सीएपीएफ कँटीनला मध, लोणचे, खाद्यतेल, अगरबत्ती, पापड, आवळा कँडी आणि सुती टॉवेल्स इत्यादी उत्पादने पुरविली. यापुढे, पुरवठा वाढविण्यासाठी 63 नवीन उत्पादनांची यादी तयार केली जात आहे.

.....

G.Chippalkatti/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642747) Visitor Counter : 134


Read this release in: English , Hindi , Manipuri , Tamil