ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहकांच्या अधिकारांना प्रोत्साहन, त्यांचे संरक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था आवारातून कामकाज पाहील
Posted On:
30 JUL 2020 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
ग्राहक संरक्षण कायदा, 2019, 20 जुलै 2020 पासून अंमलात आला आहे. कायद्याच्या कलम 10 मधील तरतुदीनुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ची 24 जुलै, 2020 रोजी स्थापना करण्यात आली
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या कार्यान्वयनासाठी ग्राहक व्यवहार विभागातील अतिरिक्त सचिव निधी खरे यांना मुख्य आयुक्त पदाची, विभागाचे सहसचिव अनुपम मिश्रा यांना आयुक्त पदाची, बीआयएसचे महासंचालक प्रमोद के तिवारी यांना महासंचालक (अन्वेषण) पदाची तर नॅशनल टेस्ट हाऊसचे महासंचालक विनीत माथूर यांना अतिरिक्त संचालक (अन्वेषण) पदाची जबाबदारी 29 जुलै 2020 पासून तत्काळ प्रभावाने सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या आवारात काम सुरू करेल. सहाय्यक कर्मचाऱ्यांची व्यवस्था भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या (आयआयपीए) च्या ग्राहक अभ्यास केंद्राकडून आणि राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडून केली जात आहे, ज्यांना या विभागाकडून 2007 पासून आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या अधिकाराना प्रोत्साहन, त्यांचे संरक्षण आणि अंमलबजावणी करणे हे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे (सीसीपीए) उद्दिष्ट आहे. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन प्रकरणी चौकशी करणे आणि तक्रारी / खटला चालवणे, असुरक्षित वस्तू व सेवा परत मागवणे, अन्यायकारक व्यापार पद्धती आणि दिशाभूल करणार्या जाहिरातीं बंद करण्याचा आदेश देणे, उत्पादकांना / जाहिरात करणाऱ्यांना / प्रकाशकांना दंड आकारण्यासंदर्भात अधिकार प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.
कायद्यातील तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खालील नियम अधिसूचित केले गेले आणि 20 जुलै, 2020 पासून अंमलात आले आहेत-
- ग्राहक संरक्षण (सामान्य) नियम, 2020
- ग्राहक संरक्षण (केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद) नियम, 2020
- ग्राहक संरक्षण (ग्राहक तंटा निवारण आयोग) नियम, 2020
- ग्राहक संरक्षण (मध्यस्थी) नियम, 2020
- ग्राहक संरक्षण (राज्य आयोग आणि जिल्हा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे वेतन, भत्ते व सेवेच्या अटी) मॉडेल नियम, 2020
- ग्राहक संरक्षण (नियुक्तीची पात्रता, भरतीची पध्दत, नियुक्तीची कार्यपद्धती, पदाचा कालावधी , राजीनामा आणि अध्यक्ष आणि राज्य आयोग व जिल्हा आयोगाचे सदस्य यांना बढतर्फ करणे ) नियम, 2020
- ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, 2020 . [ 23 जुलै 2020 पासून लागू].
राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोगानेही 24 जुलै, 2020 पासून लागू केलेले पुढील नियम अधिसूचित केले आहेत :
- ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग प्रक्रिया) नियम 2020.
- ग्राहक संरक्षण (राज्य आयोग व जिल्हा आयोगावरील प्रशासकीय नियंत्रण) नियम, 2020.
- ग्राहक संरक्षण (मध्यस्थीकरण) नियम 2020.
* * *
D.Wankhede/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642460)
Visitor Counter : 534