रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिने बांगलादेशला सुपूर्द केली


बांगलादेश मधल्या वाढत्या प्रवासी व मालगाड्यांच्या वाहतुकीला यामुळे मदत होणार

Posted On: 27 JUL 2020 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2020

 

रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज एका समारंभात दहा ब्रॉडगेज रेल्वे गाड्यांना आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून बांगलादेश कडे रवाना केले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी उपस्थित होते. बांगलादेशचे रेल्वेमंत्री मोहम्मद नुरूल इस्लाम सुजन व परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर अबुल कलाम अब्दुल मोमीन यांनी बांगलादेश सरकार तर्फे या रेल्वेगाड्या स्वीकारल्या.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताला ऑक्टोबर 2019 मध्ये दिलेल्या भेटीदरम्यान भारताने बांगलादेशला जाहीर केलेल्या मदतीअंतर्गत या रेल्वेगाड्या देण्याचा निर्णय झाला होता. आजच्या या हस्तांतरणामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे.

बांगलादेशच्या गरजा लक्षात घेऊन भारताने या रेल्वे गाड्यांमध्ये काही बदलही केले आहेत. बांगलादेश मध्ये वाढत्या प्रवासी व मालवाहतुकीची हाताळणी करण्यास यामुळे मोठी मदत मिळेल.

या प्रसंगी बोलताना परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर म्हणाले की "दहा रेल्वेगाड्या बांगलादेशला हस्तांतरित करण्याच्या या समारंभाला उपस्थित राहण्यास मला आनंद होत आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान पार्सल व कंटेनर वाहतूक सुरू करणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू झाल्याबद्दलहि मला आनंद वाटत आहे. यामुळे व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. रेल्वेगाड्या मार्फत व्यापारी वाहतूक सुरळीत झाल्याबद्दलही मी समाधानी आहे."  बांगलादेश व भारत यांच्यातले परस्पर विश्वास व आदर यावर आधारित संबंध काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहेत, असे त्यांनी म्हटले. उभय देशांच्या परस्पर सहकार्यावर कोविड महामारी चा विपरीत परिणाम न झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या ऐतिहासिक 'मुजीब बारशो' दरम्यान अनेक नवीन उपक्रम सुरू राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही या वेळी दहा रेल्वेगाड्या बांगलादेशला हस्तांतरित करण्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की "भारत व बांगलादेश दरम्यानच्या मालवाहतुकीसाठी यामुळे मदत होईल. बांगलादेश मध्ये चालवण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये आवश्यक ते बदल केलेले आहेत. दोन्ही देशांच्या प्रगती व विकासाच्या दिशेने अनेक मोठी पावले उचलली जात आहेत. गेल्या काही वर्षात बांगलादेश व भारत दरम्यान संबंध सुधारले आहेत. सध्या हे संबंध चरम पातळीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या घोषणेला अनुसरूनच आमची परदेश नीती चालत आहे. भारत-बांगलादेश मधील रेल्वे वाहतूक 1965 साला पूर्वीच्या पातळीवर नेण्यासाठी दोन्ही देशांचे नेतृत्व वचनबद्ध आहे. त्या काळी चालू असलेल्या सात रेल्वेमार्ग पैकी चार सध्या कार्यरत आहेत. रेल्वे वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी भारतातील आगरतळापासून बांगलादेशच्या आखोरापर्यंत एक नवा रेल्वेमार्ग तयार होत असून भारत यासाठी आर्थिक मदत तसेच प्रत्यक्ष बांधकामात ही सहभागी होत आहे. कोविड महामारी दरम्यान देखील दोन्ही देशांच्या दूरदृष्टीमुळे वस्तूंच्या वाहतुकीसाठी दोन्ही देशांमध्ये रेल्वे वाहतूक सुरू राहिली होती. बांगला देशातल्या बिनापोल पासून पार्सल ट्रेन तसेच कंटेनर ट्रेन सेवा जुलै पासूनच सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे दोन्ही बाजूंनी बरीच वाहतूक करण्यात यश मिळाले आहे. आरोग्याला धोका न पोचविता दोन्ही देशांदरम्यान मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करण्यात रेल्वेची मदत झाली आहे. दोन्ही देशांच्या रेल्वेसेवामुळे नागरिकांचा उज्वल भविष्यकाळ निश्चित झाला आहे. " 

बांगलादेश मधल्या रेल्वे जाळ्याच्या विकासासाठी भारताकडून संपूर्ण अबाधित व अमर्यादित पाठिंबा असल्याचे रेल्वेमंत्री गोयल यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांमधल्या आर्थिक भागीदारीला प्रोत्साहन मिळण्याच्या दिशेने द्विपक्षीय व्यापार वाहतुकीसाठी रेल्वे सेवेची महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. रस्ते वाहतुकीमध्ये कोविड महामारी मुळे अडथळे निर्माण होत असताना दोन्ही देशांनी रेल्वे वाहतुकीद्वारे परस्पर सहकार्य वाढवले आहे. रेल्वे हे स्वस्त व पर्यावरणपूरक दळणवळणाचे साधन असून सीमापार मालवाहतुकीसाठी या काळात त्यांची मोठी मदत झाली आहे. जून महिन्यात दोन्ही देशांदरम्यान सर्वात जास्त वाहतूक झाली होती. कच्चामाल व  अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या 103 रेल्वे गाड्यांचा या महिन्यात वापर झाला.

भारत व बांगलादेश दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या पार्सल व कंटेनर रेल्वे सेवांमुळे द्विपक्षीय व्यापाराला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

M.Chopade/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641582) Visitor Counter : 282