Posted On:
09 JUL 2020 11:16PM by PIB Mumbai
सांस्कृतिक मंत्रालयाने राष्ट्रीय हस्तलिखित अभियानाअंतर्गत (एनएमएम) 'मंगोलियन कंजूर'चे सर्व 108 खंड पुनर्मुद्रित करण्याची योजना हाती घेतली आहे. 'एनएमएम' अंतर्गत मंगोलियन कंजूरच्या पहिल्या पाच पुनर्मुद्रित खंडांचा पहिला संच 4 जुलै 2020ला गुरुपौर्णिमेच्या, ज्याला 'धम्म चक्र दिन' असेही म्हटले जाते, त्याप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट देण्यात आला होता. यानंतर एक संच सांस्कृतिक राज्य मंत्री आणि पर्यटन राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी अल्पसंख्याक राज्य मंत्री किरेन रीजीजू यांच्या उपस्थितीत, भारतातले मंगोलियाचे राजदूत गोनचिंग गानबोल्ड यांच्याकडे सुपूर्द केला. 2022 पर्यंत 'मंगोलियन कंजूर'चे सर्व 108 खंड प्रकाशित करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धम्म चक्र दिन कार्यक्रमात संबोधित करताना म्हटले होते, ”गुरु पौर्णिमेच्या या पवित्र दिनी, आपण भगवान बुद्ध यांना आदरांजली अर्पण करतो. या प्रसंगी मंगोलियन कंजूरच्या प्रती मंगोलिया सरकारला भेट दिल्या जात आहेत. मंगोलियन कंजूरचा मंगोलिया मधे मोठा आदर आहे.
भारत सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने फेब्रुवारी 2003 मधे, हस्तलिखितामधल्या ज्ञानाचे दस्तावेजीकरण, संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय हस्तलिखित अभियान हाती घेतले. दुर्मिळ आणि अप्रकाशित हस्तलिखिते प्रकाशित करणे, ज्यामुळे यातले ज्ञान, संशोधक, विद्वान यांच्यापर्यंत, तसेच व्यापक प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत पोहोचावे, हाही यामागचा उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत, मंगोलियन कंजूरचे सर्व 108 खंड पुनर्मुद्रित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 2022 पर्यंत मंगोलियन कंजूरचे सर्व 108 खंड प्रकाशित करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. गाढा व्यासंग असलेले प्रोफेसर लोकेश चंद्रा यांच्या देखरेखीखाली हे काम केले जात आहे.
108 खंडांचा बौद्ध धर्म वैधानिक ग्रंथ मंगोलियन कंजूर, मंगोलियात सर्वात महत्वाचा धर्म ग्रंथ मानला जातो. मंगोलियन भाषेत कंजूर म्हणजे ‘संक्षिप्त आदेश’ विशेषकरून, भगवान बुद्ध यांचे शब्द. मंगोलियन बौद्ध याचा सर्वोच्च सन्मान करतात आणि मंदिरात कंजूरची पूजा करतात, तसेच धार्मिक रिवाज म्हणून दररोज कंजूरच्या ओळींचा पाठ करतात. मंगोलियात जवळजवळ प्रत्येक बौद्ध मठात कंजूर ठेवला जातो. मंगोलियन कंजूर, तिबेटी भाषेतून अनुवादित करण्यात आला आहे. कंजूरची भाषा अभिजात मंगोलियन आहे. मंगोलियन कंजूर, मंगोलियाला एक सांस्कृतिक ओळख देण्याचा स्त्रोत आहे.
समाजवादी काळात काष्ठ चित्रे जाळण्यात आली आणि मठ आपल्या पवित्र ग्रंथापासून वंचित राहिला होता. 1956-58 या काळात प्राध्यापक रघु वीरा यांनी दुर्लभ कंजूर हस्तलिखितांची एक मायक्रोफिल्म प्रत प्राप्त केली आणि त्यासह ते भारतात आले, तसेच 108 खंडांमधे मंगोलियन कंजूर भारतात 1970 च्या दशकात राज्यसभेचे माजी खासदार प्रा. लोकेश चंद्रा द्वारा प्रकाशित करण्यात आले. सध्याच्या आवृत्तीचे प्रकाशन भारत सरकारच्या राष्ट्रीय हस्तलिखित अभियान द्वारे करण्यात येत आहे, ज्यामध्ये प्रत्येक खंडात आशयाची एक सूची आहे, जी मंगोलियन मधे मूळ शीर्षक दर्शवते.
भारत आणि मंगोलिया यांच्यात शतकांपासून प्राचीन संबंध आहेत. मंगोलियात बौद्ध धर्म भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक राजदूताकडून इसवी सनच्या सुरवातीच्या काळात आणला गेला. परिणामी आज मंगोलियात हा सर्वात मोठा धार्मिक संप्रदाय आहे. भारताने 1955 मधे मंगोलियासमवेत औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून दोनही देशांमधले घनिष्ठ संबंध आता नव्या उंचीवर पोहोचले आहेत. भारत सरकारकडून मंगोलियाच्या सरकारसाठी मंगोलियन कंजूरचे प्रकाशन, भारत आणि मंगोलिया यांच्यातल्या सांस्कृतिक बंधाचे प्रतिक म्हणून काम करेल, तसेच येत्या काळात द्विपक्षीय संबंध आणखी पुढे नेण्यात योगदान देईल.
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/video1.mp4
*****
S.Pophale/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com