रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

‘एनएचएआय’महामार्ग क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी ‘पायाभूत गुंतवणूक न्यास’स्थापन करणार


उत्कृष्ट गुंतवणूक व्यवस्थापक मंडळ नियुक्तीसाठी समितीची निर्मिती

Posted On: 02 JUL 2020 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

महामार्ग क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘पायाभूत गुंतवणूक न्यास’ (InvIT) स्थापण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रस्तावित न्यासाचे कामकाज पाहण्यासाठी त्यामध्ये उत्कृष्ट गुंतवणूक व्यवस्थापक मंडळ असावे, हे लक्षात घेवून या मंडळाच्या नियुक्तीसाठी समितीची निर्मिती करण्यात आली आहे.

पायाभूत गुंतवणुकीसाठी तसेच देशातल्या कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी संस्थेने प्रायोजित केलेल्या स्वतंत्र न्यासाची स्थापना करणारे एनएचएआय हे देशातले पहिले प्राधिकरण असणार आहे. गुंतवणुकीचे सुनियोजित व्यवस्थापन करण्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापकीय रचना असणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेवून या न्यासाची स्थापना करण्यात येणार आहे.

या गुंतवणूक व्यवस्थापन मंडळामध्ये दोन स्वतंत्र संचालक आणि एका अध्यक्षाचा समावेश असेल. त्यांची निवड उत्कृष्ट प्रतिभेचा कस लावून करण्यात येणार आहे. त्यासाठी एक ‘शोध-निवड’ समिती नियुक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुखबिर सिंग संधू या समितीने संयोजक आहेत. इतर सदस्यांमध्ये एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष गिरीशचंद्र चतुर्वेदी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे माजी सचिव संजय मित्रा यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केलेल्या महामार्ग प्रकल्पांमधून आता पुरेशी कमाई व्हावी, यासाठी बाजारपेठेतून संसाधने एकत्रित करून व्यावसायिकतेने पायाभूत न्यास चालवण्यासाठी तज्ज्ञांची एक सक्षम संस्था स्थापन करण्याची कल्पना यामागे आहे.

 

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635933)