निती आयोग

अटल नवसंकल्पना अभियानाअंतर्गत नव्या कल्पनांना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोळसा इंडिया लिमिटेड बरोबर भागिदारी

Posted On: 20 JUN 2020 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2020

सीआयएल म्हणजेच कोल इंडिया लिमिटेडने अटल नवसंकल्पना अभियानाअंतर्गत नीति आयोगाबरोबर संपूर्ण देशभरामध्ये प्रमुख नवसंकल्पना आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी भागिदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. अटल नवसंकल्पना अभियान आणि कोल इंडिया लिमिटेड यांच्या दरम्यान यासंबंधी रणनीतिक भागिदारीचे आशयपत्र शुक्रवारी, दि.19 जून,2020 रोजी तयार करण्यात आले. या आशय पत्रावर स्वाक्षरी करून त्याचे एका आभासी संमेलनामध्ये आदान-प्रदान करण्यात आले.

एआयएम म्हणजेच अटल नवसंकल्पना अभियानानुसार शालेय स्तरावर अटल टिंकरिंग लॅब्स (एटीएल), संस्थेच्या स्तरावर अटल इन्क्यूबेशन सेंटर (एआयसी), दुस-या आणि तिस-या पातळीवरच्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भारतामध्ये अटल सामुदायिक नवसंकल्पना केंद्र (एसीआयसी), उद्योगांच्या स्तरावर अटल नव भारत आव्हाने (एएनआयसी) आणि एमएसएमई उद्योगामध्ये नवसंकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी अॅप्लाइड रिसर्च  अँड इनोव्हेशन (एआरआयएसआय) यासारख्या वेगवेगळ्या स्तरावर कार्यक्रम आहेत. त्यांच्या माध्यमातून उद्योजकता विकासाचे तंत्र निर्माण करण्यात येणार आहे.

कोल इंडिया लिमिटेड आणि अटल नवसंकल्पना अभियान यांच्यामध्ये झालेल्या सहकार्याचा उद्देश या सर्व कार्यक्रमांना आणि नवनवीन कल्पनांच्या माध्यमांतून नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्र विकसित करणे आहे. त्याचबरोबर अधिकाधिक जागरूकता निर्माण करून उद्योजकतेसाठी प्रेरणा देणे आहे. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. कोल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये अटल नवसंकल्पना अभियान, नीति आयोगाचे मोहीम संचालक आर.रामानन आणि कोल इंडियाचे तंत्रज्ञान विषयक संचालक बिनय दयाल यांनी एका आभासी आशय पत्रावर स्वाक्षरी केल्या.

यावेळी नीति आयोगाचे मोहीम संचालक आर. रामानत म्हणाले की, सीआयएलबरोबर या आशय पत्रावर स्वाक्षरी करणे म्हणजे एका ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण संधीची व्दारे मुक्त केल्यासारखे होणार आहे. यामुळे या भागिदारीविषयी आम्हाला अतिशय गर्व वाटतोय. सीआयएलमुळे आपल्या देशाच्या प्रतिभावान नवयुवकांकडे असलेल्या नवनवीन संकल्पना विकसित करण्यासाठी खूप मोठी मदत मिळणार आहे. यासाठी एआयएमचा सहभाग असणार आहे. यामुळे भारताला आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे शक्य होणार आहे. रामानन यावेळी म्हणाले की, ही भागिदारी आपल्या देशातल्या नवसंकल्पना, उद्योजकता यांच्यासाठी अतिशय लाभदायक होणार आहे. नवी कल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ विकसित होत आहे. आत्तापर्यंत ज्या कल्पना विकसित होवू शकल्या नाहीत, त्या आता चांगल्या प्रकारे कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. यामुळे आगामी वर्षांमध्ये स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होवू शकणार आहेत.

कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी अशा  प्रकारच्या भागिदारी आशय-पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी मिळाल्यामुळे सीआयएलला एआयएम, नीति आयोग यांच्याबरोबर सहकार्या करण्याची घोषणा करताना गर्व वाटत आहे. या मोहिमेमध्ये सर्वोत्कृष्ट योगदान देवून कोल इंडिया भारतामध्ये नवसंकल्पनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तंत्र विकसित करून त्याला बळकटी देईल.

या आशय-पत्रानुसार भागिदारी कार्यक्रमानुसार वर्गिकरण करण्यात आले आहे. यामध्ये अटल टिंकरिंग लॅबअंतर्गत सीआयएल निवडक शाळांना दत्तक घेणार आहे. तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी मदत करणार आहे. एटीएलच्या विद्यार्थी वर्गाला सल्ला देवून त्यांना मदत करणार आहे.

याचप्रमाणे अटल सामुदायिक नवसंकल्पना केंद्र (एसीआयसी) अंतर्गत सीआयएल आपल्या परिसरातल्या क्षेत्रामध्ये अटल सामुदायिक नवसंकल्पना केंद्रांना दत्तक घेवून त्यांना मदत करणार आहे. सामाजिक नवसंकल्पना क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या युवकांना मदत देणे आणि देशाच्या ज्या भागात विकास फारसा झालेला नाही, अशा क्षेत्रामध्ये नवसंकल्पनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. सामुदायिक नवसंकल्पना राबवताना सामोरी येणारी आव्हाने लक्षात घेवून त्यावर उपाय योजण्यात येणार आहेत. त्याचबरोबर इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी यावेळी सहमती दर्शवण्यात आली.

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1632986) Visitor Counter : 151