गृह मंत्रालय

विशाखापट्टणम वायुगळती दुर्घटनेचा पंतप्रधानांनी घेतला आढावा


परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू

Posted On: 07 MAY 2020 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2020

 

विशाखापट्टणम वायुगळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एका उच्चस्तरीय बैठक घेतली. बाधितांच्या सुरक्षेसाठी तसेच या दुर्घटनाग्रस्त जागेच्या संरक्षणासाठी होत असलेल्या उपायांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस संरक्षणमंत्री श्री.राजनाथ सिंग, गृहमंत्री श्री.अमित शहा, गृहराज्यमंत्री श्री.नित्यानंद राय आणि श्री.जी.किशन रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आज सकाळी या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून, परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी  आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य केंद्र सरकारकडून दिले जाईल अशी ग्वाही दिली. सद्यस्थितीवर त्यांचे सातत्याने व बारकाईने लक्ष आहे.

या बैठकीनंतर लगेचच प्रत्यक्ष त्या जागेवरील परिस्थितीचे व्यवथापन करण्यासाठी पाठबळ पुरविण्याच्या दृष्टीने नेमकी कोणती पावले उचलावीत, याचा आराखडा तयार करण्यासाठी, कॅबिनेट सचिवांनी एक तपशीलवार आढावा बैठक घेतली. या बैठकीत गृहमंत्रालय, पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्रालय, रसायने व पेट्रोरसायने मंत्रालय, औषध मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय या मंत्रालयाचे सचिव, NDMA अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य, NDRF अर्थात राष्ट्रीय आपत्ती उपाय दलाचे महासंचालक, आरोग्यसेवा विभागाचे महासंचालक, AIIMS चे महासंचालक आणि वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ  यांचा सहभाग होता.

NDRF ची पुण्यातील CBRN म्हणजेच रासायनिक, जैविक किरणोत्सर्गविषयक आणि आण्विक प्रकारणांसंबंधीची तुकडी आणि नागपूरच्या NEERI म्हणजेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक त्वरित विशाखापट्टणम येथे जाऊन राज्य सरकारला मदत करण्यास सुरुवात करेल, असे यावेळी निश्चित करण्यात आले. या दुर्घटनेमुळे प्रत्यक्ष  ठिकाणी उत्पन्न झालेली स्थिती हाताळण्याबरोबरच, या प्रकारामुळे नजीकच्या काळात व भविष्यात होणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम लक्षात घेऊन त्यांवर उपाय करण्यासाठी या पथकांची राज्य सरकारला मदत होणार आहे.

विशाखापट्टणम जिल्ह्यात गोपाळपट्टणम मंडलामध्ये आर.आर.वेंकटपुरम गावातील एका रसायन कारखान्यात आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास स्टिरीन वायूगळतीचा प्रकार घडला. यामुळे भोवतालची नरावा, बीसी कॉलनी, बापूजीनगर, कंपालापालेम, आणि कृष्णानगर ही गावे बाधित झाली. स्टिरीन हा विषारी वायू असून, यामुळे त्वचा व डोळ्यांना खाज सुटणे, श्वसनास त्रास, आणि अन्य आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

विशाखापट्टणममधील NDRF चे पथक व CBRN ची तुकडी, राज्य सरकारच्या व स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी ताबडतोब घटनास्थळी रुजू झाले. घटनास्थळाजवळ राहणाऱ्या लोकांना NDRF च्या पथकाने लगेचच तेथून हलवून सुरक्षित स्थळी नेले. विशेष CBRN तुकडी पुण्याहून व NEERI च्या तज्ज्ञांचे पथक नागपूरहून विशाखापट्टणमकडे रवाना झाले आहे. त्याशिवाय, आरोग्यसेवा महासंचालक तेथील आरोग्यसेवकांना वैद्यकीय सल्ला देणार आहेत.

गळती झालेल्या संयुगाचे गुणधर्म, त्याचा परिणाम, बाधितांमधील सर्वसामान्य लक्षणे, प्रथमोपचार, प्रतिबंधात्मक काळजी, या घटनेसंबंधाने करण्याच्या व टाळण्याच्या गोष्टी- ही सर्व माहिती येथे मिळू शकेल.

 

* * *

G.Chippalkatti/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1621957) Visitor Counter : 224