पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांची श्री साई बाबा शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त शिर्डीला भेट, सभेला उपस्थिती

Posted On: 19 OCT 2018 1:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील शिर्डीला भेट दिली.

एका जन सभेत  त्यांनी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विविध विकासकामांच्या  पायाभरणीच्या फलकांचे अनावरण केले. श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त एका  चांदीचे नाण्याचेही अनावरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 महाराष्ट्रातील पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण   यांच्या लाभार्थ्यांना   नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गृहप्रवेशानिमित्त चाव्यांचे वितरण करण्यात आले . व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सातारा, लातूर, नंदुरबार, अमरावती, ठाणे, सोलापूर, नागपूरसारख्या विविध जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांशी देखील त्यांनी यावेळी संवाद साधला. लाभार्थ्यांपैकी पुष्कळ स्त्रियांनी त्यांच्या नवीन घरांच्या चांगल्या  दर्जासाठी, वित्तसहाय्याची सहज उपलब्धता व पंतप्रधान आवास योजना-ग्रामीणशी सबंधित भ्रष्टाचार मुक्त प्रक्रियेसाठी पंतप्रधानांचे  आभार मानले. पंतप्रधानांनी नंतर जनसभेला संबोधित केले.

याप्रसंगी  पंतप्रधानांनी सर्व भारतीयांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या. दसराच्या शुभ प्रसंगी लोकांमध्ये उपस्थित राहून    देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्यासाठी शक्ती आणि  नवी उमेद मला मिळते, अशी भावना  पंतप्रधानांनी व्यक्त केली.  

श्री साईबाबांच्या सामाजिक  योगदाना संदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी सांगितले की त्यांच्या शिकवणींनी आपल्याला मजबूत एकनिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी आणि प्रेमाने मानवतेची सेवा करण्यासाठीचा एक मंत्र मिळाला आहे.   शिरडीला नेहमी सार्वजनिक सेवेचा एक  सर्वोच्च बिंदू मानले जाते. साईबाबांनी दाखविलेल्या मार्गावर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट  कार्य करत आहे, ही बाब आनंददायक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  शिक्षणाद्वारे समाजाचे सशक्तीकरण व आत्मिक शिकणीच्या माध्यमातून  विचार परिवर्तन  यामध्ये  ट्रस्टच्या  योगदानाची त्यांनी प्रशंसाही केली.

 पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण च्या   अंतर्गत   2 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना नवीन घर मिळवून देण्याचा आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की दारिद्रयाविरोधातील लढ्याचे  हे एक मोठे पाऊल आहे. पंतप्रधानांनी 2022 पर्यंत 'सर्वांसाठी घरे '  हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांविषयी बोलतांना गेल्या चार वर्षात सरकारने 1.25 कोटीपेक्षा जास्त घरे बांधली आहेत, ही बाब अधोरेखीत केली.  बांधकाम केलेले प्रत्येक घर केवळ चांगल्या दर्जाचेच नाही तर त्यात शौचालय, गॅस कनेक्शन आणि वीज देखील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले .

संमेलनास संबोधित करताना, पंतप्रधानांनी महाराष्ट्र राज्य  हगणदरीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या  जनतेचे अभिनंदन केले. महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी कौतुक केले . पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत  आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना योजनेचा लाभ मिळाला आहे  व या योजने अंतर्गत आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविध उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्राने दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी  केलेल्या उपाय –योजनांची देखील पंतप्रधानांनी  यावेळी दखल घेतली. या संदर्भात त्यांनी कृषि सिंचन योजना आणि  पीक विमा योजनेचा विशेष उल्लेख केला आणि महाराष्ट्र सरकारच्या  जलयुक्त शिवार अभियानचे कौतुक केले. सिंचन कालव्यातून गाळउपसा करण्याच्या कार्यात  लोकसहभागाची प्रशंसाही त्यांनी याप्रसंगी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा  ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे स्मरण करतांना पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना त्यांच्या  आदर्शांचे व विचारांचे अनुपालन करण्यास आणि   एक मजबूत अविभाज्य समाज  निर्माण करण्यासाठी कार्य करण्यास सांगितले.‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’  साकार करण्याच्या दिशेने नागरिकांना काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरास भेट दिली आणि प्रार्थना केली. श्री साईबाबाच्या शताब्दी उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमातही त्यांनी आज सहभाग घेतला.

***

 

पी .आय. बी. नागपूर / ध.वानखेडे


(Release ID: 1550072) Visitor Counter : 87