पंतप्रधान कार्यालय

जंजगिर-चंपा येथे शेतकरी मेळाव्याला पंतप्रधानांचे संबोधन, पायाभूत सुविधा प्रकल्पाची छत्तीसगड येथे पायाभरणी

Posted On: 22 SEP 2018 6:11PM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडला भेट दिली. जंजगिर-चंपा येथे त्यांनी पारंपारिक हातमाग आणि शेतीविषयक प्रदर्शनाला भेट दिली. तसेच त्यांनी तिसऱ्या पेंद्रा-अनुप्पूर रेल्वेमार्गाची आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली.

विशाल शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला ज्यांनी उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगडची निर्मिती केली होती. वाजपेयींच्या विकासाच्या दृष्टीमुळेच ही राज्ये वेगाने प्रगती करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकार विकास आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटत आहे असे पंतप्रधान म्हणाले. आम्हाला लोकांचे जीवन सुलभ करायचे आहे असे ते म्हणाले.

मतांच्या राजकारणासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी सरकार योजना बनवत नाही. नवीन आणि आधुनिक छत्तीसगड बनवण्याचे उद्दिष्ट आहे असे पंतप्रधान म्हणाले.

‘सबका साथ सबका विकास’च्या दिशेने आमची घोडदौड सुरु असून, मूल्यवर्धनाद्वारे शेतकऱ्यांचा फायदा करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधान मंत्री किसान संपदा योजना यात उपयोगी सिद्ध होत आहे असे ते म्हणाले. सॉईल हेल्थ कार्ड, पीक विमा योजना तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाईल.   

पंतप्रधान पुढे म्हणाले, की एके काळी काही ठराविक लोकांनाच कल्याणकारी योजनांचा फायदा होत असे, भ्रष्टाचाराने सरकारी यंत्रणा पोखरली होती. सद्य सरकार सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि 2022 पर्यंत सर्वांच्या डोक्यावर छत देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.  

पंतप्रधान म्हणाले की, शौचालय बांधणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत, गरिबांना स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यात आला आणि सौभाग्य योजनेद्वारे, सर्वांना वीज पुरवण्यात येईल.

                                                                              ***

BG/MC



(Release ID: 1547003) Visitor Counter : 96