पंतप्रधान कार्यालय

इंदूर येथे आशरा मुबारक या इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मृती कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 14 SEP 2018 6:32PM by PIB Mumbai

महामहीम डॉ. सैय्यदना मुफद्द्ल सैफुद्दीन साहिब, मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इथे उपस्थित दाऊदी बोहरा समाजातील माझे सर्व कुटुंबीय,

तुमच्या कार्यक्रमात सहभागी होणे ही माझ्यासाठी नेहमीच  प्रेरणादायी संधी असते, एक  नवीन अनुभव मिळतो.

आशरा मुबारकच्या या पवित्र प्रसंगी देखील तुम्ही मला इथे येण्याची संधी दिलीत याबद्दल मी तुमचा  मनापासून खूप खूप आभारी आहे.

मला सांगण्यात आले आहे की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील आणि जगभरातील वेगवेगळ्या सर्व केंद्रांमध्ये देखील आपल्या समाजातील लोक आता आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत. सुदूर तंत्रज्ञानाने जोडलेल्या तुम्हा सर्वांना मी आज इथून नमस्कार करतो.

मित्रांनो, इमाम हुसेन यांचा पवित्र संदेश तुम्ही आपल्या जीवनात अंमलात आणला आहे आणि शतकानुशतके देशात आणि जगात संदेश पोहचवला आहे. इमाम हुसेन शांती आणि न्यायासाठी शहीद झाले. त्यांनी अन्याय आणि अहंकाराविरुद्ध जोरदार आवाज उठवला होता. त्यांची ही शिकवण त्याकाळी  जेवढी महत्वपूर्ण होती त्याहीपेक्षा अधिक आजच्या जगासाठी महत्वाची आहे. या परंपरांना प्रखरपणे प्रसारित करण्याची आवश्यकता आहे. आणि मला आनंद होत आहे की सय्यदना साहेब, बोहरा समाजातील प्रत्येकजण या अभियानाशी जोडलेला आहे.

मित्रांनो, आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणारे "वसुधैव कुटुंबकम " लोक आहोत, आपण ते लोक आहोत, जे सर्वाना बरोबर घेऊन चालण्याची परंपरा आपल्या वागण्यातून  दाखवतात. आपल्या समाजाची , आपल्या वारशाची हीच ताकद आहे  आपल्याला जगातील अन्य देशांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देते.

मला आनंद आहे की बोहरा समाज संपूर्ण जगाला भारताच्या या शक्तीची ओळख करून देत आहे. जगात कुठेही जा, ते मला भेटून 'केम छोविचारतात .

आपल्याला आपल्या  भूतकाळाचा अभिमान आहे . वर्तमानावर विश्वास आहे आणि उज्वल भविष्याच्या आत्मविश्वासाबरोबरच संकल्प देखील आहे. मी जगात जिथे कुठे जातो, शांतता आणि विकासासाठी आपल्या समाजाने जे योगदान दिले आहे त्याचा उल्लेख मी आवर्जून करतो.

मित्रांनो, शांती, सद्भाव, सत्याग्रह आणि राष्ट्रभक्तीप्रती बोहरा समाजाची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण ठरली आहे. आपला देश, आपली मातृभूमी यांच्याप्रति प्रेम आणि समर्पणाची शिकवण स्वतः सैय्यदना साहेब आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून देत आले आहेत आणि आताही बहुतांश वेळ ते जितके बोलले, त्यातून आपल्याला हीच शिकवण दिली की आपण देशासाठी, समाजासाठी, नियमांसाठी , कायद्यांसाठी कसे जगायला हवे.

यापूर्वीही पूज्य सैय्यदना ताहिर सैफुद्दिन साहेबांनी देखील गांधीजींच्या बरोबरीने ही मूल्ये स्थापित करण्यात अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

मी कुठेतरी वाचले होते की दोन्ही महापुरुषांची भेट रेल्वेगाडीतून प्रवास करताना झाली होती. त्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्यात नेहमीच निरंतर संपर्क राहिला आणि प्रत्येक मोठी घटना किंवा आंदोलना संदर्भात उभयतांमध्ये विचार-विनिमय व्हायचा , वाद-विवाद व्हायचे.

आपणा  सर्वाना माहित आहे दांडी यात्रेच्या वेळी , जे भारताच्या स्वातंत्र्याचे  सुवर्णपान आहे, या काळात पूज्य बापू महात्मा गांधी, सैय्यदना साहेब यांच्या घरी सैफी व्हिला इथे राहिले होते. गांधीजींची मैत्री आणि त्यांच्या मूल्यांप्रति आदर व्यक्त करत सैय्यदना ताहिर सैफुद्दीन साहेबांनी ही सैफी व्हिला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्राला समर्पित केली. आज तीच सैफी व्हिला देशातील तरुण पिढीला प्रेरित करत आहे.

 मित्रांनो , बोहरा समाजाबरोबरचे  माझे नाते देखील खूप जुने आहे आणि आता सैय्यदना साहेबांनी जे वर्णन केले, मी खरोखरच एक प्रकारे कुटुंबाचा सदस्य बनलो. नेहमीच म्हणजे एक आपलेपणा वाटणे, कधी  त्यांच्याकडे जाणे, हे माझे एक सहज आपलेपण मला जाणवत होते. आजही माझे दरवाजे तुमच्या कुटुंबियांसाठी नेहमी  खुले असतात. आणि माझे सौभाग्य आहे की तुमचा स्नेह, तुमच्या पूर्ण कुटुंबाचा माझ्यावर अपरंपार स्नेह राहिला आहे, नेहमीच राहिला आहे.

आजही, अजून वाढदिवस यायचा आहे, मात्र तुम्ही सर्वप्रथम आणि या पवित्र मंचावरून तुम्ही मला आशिर्वाद दिलेत आणि आशिर्वाद देखील राष्ट्र कल्याणासाठी मला अधिक शक्ती प्रदान करणारे दिले, ही खूप मोठी गोष्ट  असते. आणि म्हणूनच मी तुमचा मनापासून आभारी आहे.

गुजरातमध्ये क्वचितच एखादे गाव असेल जिथे बोहरा व्यापारी समाजाचा कुणी प्रतिनिधी भेटणार नाही. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा पावलोपावली बोहरा समाजाने साथ दिली. तुमच्या याच आपलेपणाने मला आज इथे खेचून आणले आहे. मला आठवतंय की कशा प्रकारे सैय्यदना साहेबांना मी , एकदा सैय्यदना साहेब पाटणहून परत येत होते त्यांना सुरतला जायचे होते, वेळ नव्हता, त्यामुळे मी विमानतळावर गेलो. कारण मी म्हटले मी असे कसे तुम्हाला जाऊ देईन. तुम्ही नाही आलात तर मी येईन. आणि त्यांनी मला , एवढा वेळ आम्ही विमनतळावर बसलो होतो, एवढे प्रेम दिले जसे  एखाद्या लहान मुलावर प्रेम करतात. आणि तिथे बोलता बोलता मी गुजरातमधील पाण्याच्या टंचाईबाबत चर्चा केली,धरण बांधण्याबाबत चर्चा केली आणि मला आज अतिशय समाधानाने सांगायचे आहे की एवढीशी छोटीशी गोष्ट सैय्यदना साहेबानी त्यावेळी, आणि तेव्हा त्यांनी वयाची  ९७-९८ वर्ष ओलांडली असतील, बहुधा ९५ च्या पुढे असतील कारण खूप वर्षे झाली. मात्र गेल्याबरोबर त्यांनी मिशन मोडमध्ये हे काम हाती घेतले आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी तुमच्या प्रयत्नांतून अनेक गावांना धरणातून पावसाचे पाणी साठवण्याचे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले ज्यामुळे गावांना पाणी मिळाले.

एवढेच नाही, काही वर्षांपूर्वी,मी एका कार्यक्रमात कुपोषणाविरोधात गुजरातमध्ये लढाई लढण्यासाठी बोहरा समाजाकडून सहकार्य मागितले होते. लोकजागृती अभियान राबण्याची विनंती केली होती. ते देखील बोहरा

समाजाने , सैय्यदना साहेबांनी हाती घेतले आणि भीषण समस्या दूर करण्यासाठी गुजरातची मदत केली.

योगायोग बघा, यावेळी जेव्हा दाऊदी बोहरा समाज अशरा मुबारकच्या पवित्र प्रसंगी एकत्र आला आहे तेव्हा देशात आपण पोषण सप्ताह पाळत आहोत. पोषण अभियान राबवले जात आहे. एक-एक शिशु, एक-एक माता सुरक्षित करण्याचे हे अभियान आज देशभरात सुरु आहे.

तुम्ही सर्वजण , प्रत्येक मुलाला शिक्षण, त्याचे पोषण, त्याचे आरोग्य याबाबत जे कार्य करत आहात त्याने समाजाला सशक्त करण्याचे काम केले आहे. आणि मला सांगण्यात आले आहे की प्रोजेक्ट राईसच्या माध्यमातून तुम्ही देखील महाराष्ट्रासह देशातील अन्य भागात मुलांना पोषक आहार देण्याचे अभियान चालवत आहात. तुमचा हा प्रयत्न निश्चितपणे देशाचे भवितव्य तंदुरुस्त आणि सशक्त बनवण्यासाठी मदत करेल.

मित्रानो, पोषण आणि  आरोग्याच्या बाबतीत दाऊदी बोहरी समाज नेहमीच जागरूक राहिला आहे. फैज़ अल मवेद आणि  थाली, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून सुनिश्चित करत आहेत की समाजातील कोणतीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही. एवढेच नाही, देशातील गरीबाला , मध्यम वर्गाला आरोग्य सुविधा देण्यासाठी तुम्ही डझनभर रुग्णालये चालवत आहेत. सार्वत्रिक आरोग्याप्रति तुमचे हे विचार देशाला, समाजाला बळ देत आहेत आणि भविष्यातही अधिक ताकद देईल.

तुम्हा सर्वाना हे देखील माहित आहे की देशात आरोग्याला सरकारने प्रथमच एवढे प्राधान्य दिले आहे. किफायतशीर आरोग्यसेवा, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन दिले जात आहे. दर्जेदार रुग्णालये, आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे जाळे पसरवले जात आहे. जन-औषधी केंद्रांवर स्वस्त औषधे उपलब्ध केली जात आहेत. मोफत डायलिसिसची सुविधा देण्यात आली आहे , हृदय आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाच्या किमतीही खूप कमी झाल्या आहेत. आता आयुष्मान भारत देशातील सुमारे ५० कोटी गरीब -बंधू-भगिनींसाठी संजीवनी बनून आले आहे.

हा छोटा कार्यक्रम नाही. अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोची जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त लोकांसाठी आयुष्मान भारत कार्यक्रम आम्ही भारतात राबवणार आहोत.

संपूर्ण युरोपची जेवढी लोकसंख्या आहे अंदाजे तेवढ्या लोकांच्या आरोग्यासाठी भारतात आरोग्यासाठी आयुष्मान भारत योजना लागू होत आहे. केवढे मोठे काम, किती लोकांच्या भल्याचे कामयाची तुम्ही कल्पना करू शकता..

 

एका वर्षात पाच लाख रुपयांपर्यंत प्रत्येक कुटुंबाचे मोफत उपचार हा छोटा निर्णय नाही. ५० कोटी लोकांच्या प्रत्येक कुटुंबाचा पाच लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक संपूर्ण खर्च, त्याच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी सुनिश्चित करणारी ही आयुष्मान योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबवली जात आहे आणि २५ सप्टेंबर रोजी, जी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे, देशभरात तिची अंमलबजावणी केली जाईल,.

मित्रानो, पोषण आणि आरोग्यसेवेबरोबरच गरीबांना, गरजवंतांना घरे देण्याचा जो  विडा तुम्ही उचलला आहात तो देखील प्रशंसनीय आहे. मला सांगण्यात आले आहे की सुमारे ११ हजार लोकांना तुमच्या प्रयत्नांतून स्वतःचे घर मिळाले आहे. सरकारने देखील २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक बेघर गरीब बंधू-भगिनीला पक्के घर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की, आतापर्यंत एक कोटींहून अधिक बंधू-भगिनींना त्यांच्या घराची चावी सोपवण्यात आली आहे, म्हणजे नुसत्या घोषणा नाही तर त्यांना घराची चावी मिळाली. आणि अन्य घरांचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. याशिवाय, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातही तुमचे सहकार्य सरकारच्या प्रयत्नाना अधिक ताकद देत आहे. कधी-कधी समाजाची शक्ती आणि सरकारची शक्ती एकत्र आल्या तर त्याचा परिणाम कित्येक पट वाढतो. केवळ दुपटीने वाढतो असे नाही तर अनेक पटीने अधिक असतो. देशातील जनमानसाचे आयुष्य सरळ आणि सोपे बनवण्यासाठी , जीवन स्तर उंचावण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत असतो, पुढे नेत असतो.

मित्रानो, गरीब आणि मध्यमवर्गाशी निगडित आणखी एक विषय आहे ज्यावर सरकारने भर दिला आहे. तो विषय आहे स्वच्छतेचा. स्वच्छ भारत अभियान भलेही सरकारने सुरु केले असेल मात्र आज हे अभियान देशातील सव्वाशे कोटी जनता स्वतः पुढे नेत आहे . गाव-गाव, गल्ली-बोळ्यांमध्ये स्वच्छतेप्रति एक अभूतपूर्व आग्रह निर्माण झाला आहे.

चार वर्षांपूर्वीपर्यंत देशातील ४० टक्के घरांमध्ये , मी पंतप्रधान झालो त्याआधी आपल्या देशात केवळ ४० टक्के घरांमध्ये शौचालये होती. आपल्या माता-भगिनींना किती त्रास होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. मी आलो तेव्हा घरात शौचालयांची संख्या ४० टक्के होती , एवढ्या कमी वेळेत आता ती ९० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. आणि मला विश्वास आहे की लवकरच संपूर्ण देश उघड्यावरील शौचापासून मुक्त घोषित होण्याच्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण करेल.

आज आपण ज्या इंदूर शहरात जमलेलो आहोत, ते तर या आंदोलनाचे नेतृत्व आहे , नेता बनले आहे. इंदूर नेहमीच स्वच्छतेच्या निकषांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर राहिले आहे आणि म्हणूनच मी इंदूरच्या सर्व नागरिकांचे, इथल्या निवडून आलेल्या प्रतिनिधींचे , इथल्या नगरपालिकेतील व्यवस्थापकांचे , इथल्या राज्य सरकारचे , इथल्या पाटील ,त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.

इंदूरच नाही तर भोपाळने देखील यावेळी कमाल केली आहे. एक प्रकारे मध्यप्रदेशातील माझे तरुण मित्र , प्रत्येकजण या आंदोलनाला गती देत आहे. स्वच्छता आणि पर्यावरणाची पवित्रता सुनिश्चीतता करण्यात तुमच्या समाजाच्या योगदानाबद्दल देश चांगल्याप्रकरे परिचित आहे. सैय्यदना साहेब तर स्वतः स्वच्छता आणि पर्यावरणाच्या सुरक्षेप्रति आग्रही आहेतच. आणि मला आठवतंय की बडे सैय्यदना साहेबांची जनशताब्दी .त्या कार्यक्रमात मला बोलावले होते.

अन्य लोक कशा प्रकारे जन्मशताब्दी किंवा जयंती साजरी करतात माहित नाही? त्या दिवशी आपण सर्वानी, तुम्हालाही आठवत असेल, चिमण्या वाचवण्यासाठी आंदोलन केले होते. प्रत्येकाला एक खोका देण्यात आला ज्यामध्ये त्या आपले घरटे बांधतील. हे पर्यावरणाचे रक्षण नाही  तर काय आहे ? हे आपले संस्कार आहेत आणि त्यांनी मनाच्या पावित्र्याला आपल्या वातावरणातील स्वच्छता आणि शुद्धतेशी जोडले आहे.

मला सांगण्यात आले आहे आणि आता सैय्यदना साहेब हेच म्हणाले-स्वच्छता हृदयाची नि मनाची देखील करायची आहे. मला सांगण्यात आले आहे की इंदूरची  प्रतिष्ठा लक्षात घेऊन अशरा मुबारकच्या या संपूर्ण आयोजनाला पर्यावरण आणि स्वच्छतेच्या संदेशाशी जोडण्यात आले आहे.

प्लास्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे. या संपूर्ण आयोजनाला शून्य कचरा म्हणजे कचराविरहित बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. इथे दररोज सुमारे दहा टन कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रूपांतर करण्याचे काम केले जाते आणि नंतर ते शेतकऱ्यांना मोफत वाटले जाते.

या सर्व कामांच्या माध्यमातून तुम्ही पर्यावरणाची सेवा तर करत आहातच , कचऱ्यापासून ऊर्जा हे जे सरकारचे स्वप्न आहे त्यालाही तुम्ही बळ देत आहात. त्याचबरोबर शेतकरी बंधू-भगिनींसाठी देखील तुमचे हे पाऊल लाभदायक ठरणार आहे. माझे तर देशभरातील स्वच्छाग्रहींना आवाहन आहे की अशा प्रकारच्या आयोजनांतून धडा घेऊन स्वच्छतेशी संबंधित जे आमचे आगामी कार्यक्रम आहेतत्यात देखील कचऱ्यापासून उर्जेवर भर दिला जावा.

उद्या १५ सप्टेंबरपासून स्वच्छता हीच सेवा - ऑक्टोबर पर्यंत गांधी जयंतीपर्यंत -स्वच्छता हीच सेवा हा पंधरवडा सुरु होत आहे. या काळात देखील आपण हा प्रयोग देशभरात करू शकतो. हा कार्यक्रम गेल्या वर्षी प्रमाणेच महात्मा गांधी जयंती म्हणजेच ऑक्टोबर पर्यंत चालेल.

मी उद्या स्वतः देशातील स्वच्छाग्रहींबरोबर समाजातील स्वच्छतेप्रति जनजागृती करणाऱ्या देशातील सर्व धर्मगुरू, सर्व कलाकार, सर्व खेळाडू , उद्योजक , समाजात जेवढे मान्यवर लोक आहेत त्या सर्वांबरोबर उद्या सकाळी .३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहे आणि त्यांनतर जगातील एक खूप मोठा विक्रम बनेल. एकाचवेळी कोट्यवधी लोक उद्या स्वच्छतेचे काम करणार आहेत.

एवढेच नाही तर ऑक्टोबरपासून महात्मा गांधींच्या  दीडशेव्या जयंतीचे कार्यक्रम सुरु होणार आहेत आणि सैय्यदना साहेबांनी देखील आपल्याला पूज्य बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त संदेश दिला आहे. पुढील दोन वर्षे चालणाऱ्या या कार्यक्रमांदरम्यान स्वच्छते बरोबरच बापूनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी देशाला आणि जगाला प्रोत्साहित करू.

आज इथे इंदूरमध्ये तुम्हा सर्वांसमोर दाऊदी बोहरा समाजाला आणि मध्य प्रदेशातील माझ्या बंधू-भगिनींना स्वच्छतेच्या या अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यासाठी देखील मी आलो आहे.

 

मित्रांनो, आज या निमित्त मला  तुम्हा सर्वांची आणखी एका गोष्टीसाठी प्रशंसा करायची आहे. तुमच्यापैकी बहुतेक व्यापार आणि व्यवसायाशी संबंधित आहेत. नियम, कायद्यानुसार काम कसे  करायचे , शिस्त पाळून व्यापार कसा वाढवायचा, याबाबत तुम्ही आदर्श स्थापित केले आहेत आणि आताच सैय्यदना साहेबांनी आपल्याला तीच शिकवण दिली. वारंवार हीच शिकवण दिली जाते. ही छोटी गोष्ट नाही. दाऊदी बोहरा समाज जगात  कुठे वसला, या मूल्यांनी त्यांनी आपली एक वेगळी ओळख  केली, एक नवीन आदर  निर्माण केला.

प्रामाणिकपणा , सचोटी आणि निष्ठेने व्यापार करून कसे जीवन जगायचे  याचे उदाहरण तुम्ही सर्वानी  आपल्या आचरणातून दाखवून  देशातील व्यापारी आणि व्यावसायिक अर्थव्यवस्थेचा कणा जातोदेशात रोजगार निर्मितीच्या  संधी निर्माण करणारा  तो महत्वाचा घटक आहे. त्याला जितके प्रोत्साहन देता येईल, यालाच  सध्याच्या  केंद्र सरकारचे आणि ज्या-ज्या राज्यांमध्ये आम्हाला सेवा करायची संधी मिळाली आहे त्या सर्वांचे प्राधान्य आहे , आणि आम्ही ते देत आहोत.

मात्र हे देखील खरे आहे की पाचही बोटे एकसारखी नसतात. आपल्यातूनच असे काही लोक निघतात जे छळालाच व्यवसाय मानतात. गेले सरकार हा स्पष्ट संदेश देण्यात यशस्वी झाली आहे की जे काही असेल ते नियमांच्या कक्षेत असायला हवे. जीएसटी, दिवाळखोरी आणि नादारी संहिता यासारख्या  कायद्यांच्या माध्यमातून प्रामाणिक व्यावसायिकांना प्रोत्साहित केले जात आहे. आणि याचा सर्वात जास्त फायदा कुणी उठवत असेल तर तो माझा बोहरा समाज उठवत आहे.

हे एक मोठे कारण आहे  की चार वर्षांमध्ये देशातील, जगभरातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. आज अशी स्थिती आहे की मेक इन इंडिया अंतर्गत मोबाईल फोन असेल, गाड्या असतील किंवा अन्य सामान , आज आपल्याकडे विक्रमी उत्पादन होत आहे. विक्रमी गुंतवणूक होत आहे. याचाच परिणाम आहे की गेल्या तिमाहीत आठ टक्क्यांहून अधिक विकास दर तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांमुळे, सव्वाशे कोटी देशबांधवांच्या मेहनतीमुळे देशाने गाठला आहे आणि आपली अर्थव्यवस्था जगातील  मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.

आता दशकी विकास दरावर देशाची नजर आहे. आणि ज्या गतीने आपण पुढे जात आहोत तिथे तमाम आव्हाने असूनही देशाची ताकद आहे, देश पोहोचू शकतो आणि मला खात्री आहे.

मित्रांनो, जगभरात भारताप्रति सद्भावना वाढवण्यात तुम्ही सर्व एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहात. जगात ज्याप्रमाणे प्राचीन भारताचा ठसा होता, आज नवीन भारताला तो सन्मान देण्याचे सौभाग्य आपणा सर्वाना लाभले आहे.

देशाच्या नवनिर्माणासाठी आपण निरंतर एकत्रितपणे पुढे जात राहू. याच विश्वासासह मी माझे भाषण संपवतो. तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप-खुप आभार मानतो. सैय्यदना साहेबांचे, त्यांच्या सर्व कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानतो आणि मला कायम प्रेम, स्नेह, आशिर्वाद तुम्हा सर्वांकडून मिळत आला आहे. तुमचे आशिर्वाद हा माझ्यासाठी ठेवा आहे, ती माझी शक्ती आहे, जी शक्ती माझ्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त सव्वाशे कोटी देशबांधवांसाठी आहे. हे आशिर्वाद, ही शक्ती, हे सामर्थ्य मी देशवासीयांच्या चरणी समर्पित करत पून्हा एकदा तुम्हा सर्वांचे हृदयापासून अभिनंदन करतो.

धन्यवाद !

***



(Release ID: 1546382) Visitor Counter : 68


Read this release in: English , Bengali , Tamil , Kannada