पंचायती राज मंत्रालय
ग्राम पंचायतींमध्ये शाश्वत विकासावरील लक्ष्यांवर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे पुणे येथे उद्घाटन
गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची : केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांचे मत
केंद्र सरकार गावांच्या विकासासाठी कटिबद्ध - कपिल मोरेश्वर पाटील
Posted On:
22 SEP 2022 6:57PM by PIB Mumbai
पुणे/मुंबई , 22 सप्टेंबर 2022
गावाच्या विकासात ‘सरपंच’च्या भूमिकेच्या महत्त्वावर पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज भर दिला. सरपंच हे केवळ पद नाही तर ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ती एक शक्ती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्राम पंचायतींमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांवर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे पुणे येथे आज उद्घाटन झाले. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात पाटील बोलत होते. जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत या संकल्पनांच्या माध्यमातून पंचायती संस्थांमध्ये शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचे स्थानिकीकरण, हा या कार्यशाळेचा विषय आहे. पंचायती राज मंत्रालयाने महाराष्ट्र , सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेली ही परिषद 24 सप्टेंबर 2022 पर्यंत चालेल.
‘सरपंचांनी’नेहमी उच्च ध्येय ठेवावे, ध्येय निश्चित करावे आणि ते लक्ष्य यशस्वीरित्या साध्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. केंद्र सरकारने देशातील गावाचा विकास मोठ्या शहरांसारखा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ग्रामपंचायती आणि सरपंचांची भूमिका हे साध्य करण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल असे पाटील यांनी आवर्जून सांगितले. संयुक्त राष्ट्रांनी ग्रामीण विकासासाठी 17 शाश्वत विकास लक्ष्ये (एसडीजी) निश्चित केली आहेत, ती गाठण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. ज्या ग्रामपंचायतींनी शाश्वत विकासाची जास्तीत जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत त्यांना पुरस्कार दिला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या गावांच्या सरपंचांशी संवाद साधतील, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
सरपंचाची भूमिका आणि जबाबदारी तसेच ग्रामपंचायतींना थेट निधी हस्तांतरित करून गळती दूर करणे याविषयी महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. शेवटच्या टप्प्यावर गावांमध्ये सरकारी सेवा देण्यावर त्यांनी भर दिला.पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ई-ग्राम पोर्टलचे उद्घाटन तसेच ग्रामविकासावरील दोन पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
उद्घाटन सत्रादरम्यान पंचायत राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी सादरीकरण करून ग्रामपंचायतींना सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अर्ज प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली.
जलशक्ती मंत्रालयाच्या जल आणि स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांनी एका चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषविले. ग्रामपंचायतीमधील पाणी व्यवस्थापन यासारख्या विषयांवर माहितीपट दाखवण्यात आले. त्यांना सहभागींचा चांगला प्रतिसाद मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार मान्यवरांमध्ये उपस्थित होते.
पंचायती राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाचे अतिरिक्त प्रमुख सचिव राजेश कुमार आजच्या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात उपस्थित होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी आणि कार्यकर्ते या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी होत आहेत.
राष्ट्रीय कार्यशाळेविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
R.Aghor /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861569)
Visitor Counter : 260