Social Welfare

प्रत्येक शाळा, एक आदर्श शाळा

'पीएम श्री' आणि भविष्यासाठी सज्ज शाळांच्या दिशेने भारताची आगेकूच

Posted On: 09 SEP 2026 12:23PM

7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या 'प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया' (पीएम श्री) या  योजनेचा उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी )  2020 च्या दृष्टिकोनाला अनुरूप  14,500 हून अधिक आदर्श शाळा विकसित करणे हा आहे.  2022–23 ते  2026–27 या कालावधीसाठी एकूण 27,360 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज करण्याबरोबरच पायाभूत सुविधा, अध्यापन पद्धती, सर्वसमावेशकता आणि शाश्वतता यांना बळकटी देते. जुलै 2026 पर्यंत, 36  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13,092 शाळांची म्हणजेच  एकूण उद्दिष्टाच्या सुमारे  90% शाळांची  निवड करण्यात आली आहे, यात  केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) अंतर्गत येणाऱ्या शाळांचाही समावेश आहे.  या शाळांची निवड निश्चित केलेल्या गुणवत्तेच्या निकषांवर आधारित 'चॅलेंज मोड' द्वारे  केली जाते. आसपासच्या शाळांसाठी मार्गदर्शक संस्था म्हणून काम करण्याच्या उद्देशाने उभारल्या जाणाऱ्या 'पीएम श्री' शाळा, केवळ पायाभूत सुविधांवर केंद्रित असलेल्या विकासाकडून सर्वसमावेशक, न्यायसंगत आणि भविष्यासाठी सज्ज शिक्षणाकडे होणारे स्थित्यंतर दर्शवतात.

 

पीएम श्री : उदाहरण घालून देणाऱ्या आदर्श शाळांची उभारणी

भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडत आहे; यात गुणवत्ता, समानता, सर्वसमावेशकता आणि भविष्यासाठी सज्ज करणाऱ्या शिक्षणावर विशेष भर दिला जात आहे. 14.71 लाख शाळांमध्ये 24.69 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .  या शिक्षण व्यवस्थेत , आता अध्ययन गुणवत्ता सुधारण्यावर आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरेल असे पोषक वातावरण निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनएपी ) 2020 ' या परिवर्तनासाठी एक व्यापक आराखडा प्रदान करते, तर 'पीएम श्री ' उपक्रम शालेय स्तरावर हा दृष्टिकोन राबवतो जेणेकरून धोरणाचा उद्देश संस्थात्मक कार्यपद्धतीत रूपांतरित होऊ शकेल.  7 सप्टेंबर  2022 रोजी  सुरू झालेली 'प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया' (पीएम श्री ) ही योजना शिक्षण मंत्रालयाच्या 'शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग'द्वारे राबवली जाणारी केंद्र-पुरस्कृत योजना आहे. या योजनेचा उद्देश विद्यमान शाळांचा दर्जा उंचावणे आणि 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020 )  ची प्रभावी अंमलबजावणी करून उदाहरण स्थापित करणाऱ्या आदर्श संस्था म्हणून त्यांचा विकास करणे हा आहे. एकूण 27,360  कोटी रुपये खर्चाच्या या योजनेअंतर्गत,  14,500 हून अधिक विद्यमान शाळांना आदर्श संस्था म्हणून सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या शाळांमध्ये शिकण्यासाठी सुरक्षित, उत्साही आणि स्वागतार्ह वातावरण उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे; ज्याला  दर्जेदार पायाभूत सुविधा, योग्य शैक्षणिक संसाधने आणि वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव यांची जोड दिली जाणार आहे.

जुलै 2026 पर्यंत, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 13,092 शाळांची 'पीएम श्री'  शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे; यामध्ये केंद्रीय विद्यालय संगठन (केव्हीएस ), नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस ) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी ) अंतर्गत येणाऱ्या शाळांचाही समावेश आहे. हे प्रमाण नियोजित उद्दिष्टाच्या सुमारे 90 %  इतके आहे. या योजनेचा  20  लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

'पीएम श्री'चा धोरणात्मक भर


ही योजना केवळ वेगवेगळ्या शाळांना मजबूत करण्यापुरती सीमित नाही तर त्याही पुढे जाऊन सहाय्य प्रदान करते. पीएम श्री शाळांकडे त्या त्या प्रदेशातील आदर्श शाळा म्हणून पाहिले जाते , ज्या त्यांच्या कार्यपद्धती सामायिक करतात आणि मार्गदर्शन, सहाय्य, सहयोग व समूहीकरणाद्वारे आसपासच्या  शाळांना मदत करतात. याचा उद्देश एक व्यापक प्रभाव निर्माण करणे आहे, ज्यामुळे कालांतराने जास्तीत जास्त शाळा उत्कृष्ट मानकांना अनुरूप विकसित होऊ शकतील.

या योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षणाचा एक असा दृष्टिकोन आहे,  जो आयुष्यभर शिकण्याला प्रोत्साहन देतो आणि विद्यार्थ्यांना शिकण्याची, जुन्या गोष्टी विसरून नव्या गोष्टी शिकण्याची व पुन्हा नव्याने  शिकण्याची क्षमता आणि वृत्ती प्रदान करतो.  एक न्याय्य, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण समाजाच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यास सक्षम असे सक्रिय , उत्पादक आणि जबाबदार नागरिक घडवणे हे या योजनेचे व्यापक उद्दिष्ट आहे.

पीएम श्री योजनेच्या माध्यमातून शालेय शिक्षणाचे सशक्तीकरण


'प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया' (पीएम श्री ) ही योजना 2022–23 ते 2026–27 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जात आहे. या योजनेचा एकूण प्रकल्प खर्च 27,360 कोटी रुपये असून, त्यात केंद्राचा  वाटा  18,128 कोटी रुपये आहे. 'प्रकल्प मंजुरी मंडळा'ने मंजूर केलेल्या खर्चात केंद्राचा वाटा 2023–24 मधील  2,520 कोटी रुपयांवरून वाढून 2026–27 मध्ये  5,224 कोटी रुपये झाला आहे. ही वाढ सुमारे 107% टक्के असून, त्यावरून पीएम श्री शाळा बळकट करण्याच्या दिशेने गुंतवणुकीची वाढती व्याप्ती दिसून येते.

पीएम श्री  शाळा: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020  चा दृष्टिकोन पुढे नेणे

पीएम श्री योजनेचा उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे  सर्व पैलू लागू करणे हा आहे. ही योजना केवळ बौद्धिक विकासावरच नव्हे, तर 21 व्या शतकातील आवश्यक कौशल्यांनी युक्त अशा सर्वांगीण आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीवर केंद्रित आहे . विविध पार्श्वभूमी आणि शैक्षणिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी न्याय्य, सर्वसमावेशक आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर या योजनेत भर दिला जातो.  या शाळांची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होतील; तसेच, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरणात प्रत्येक मुलाला आपलेपणाची भावना, देखभाल आणि सहकार्य मिळेल याचीही यात सुनिश्चिती केली जाते.

पीएम श्री अंतर्गत गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचे प्रमुख पैलू


पीएम श्री  शाळांची रचना 'आदर्श शाळा' म्हणून करण्यात आली आहे, ज्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक पद्धती आणि शाश्वत विकास यांद्वारे एनईपी  2020  ची प्रमुख पैलू दाखवतात.

  • सर्वसमावेशक शिक्षण: विविध पार्श्वभूमी, बहुभाषिक गरजा आणि शिकण्याच्या भिन्न क्षमता यांचा विचार करून उच्च-गुणवत्तेचे, न्यायपूर्ण  आणि आनंददायी शिक्षण प्रदान करणे.

  • मार्गदर्शन : पीएम श्री  शाळा 'आदर्श शाळा' म्हणून कार्य करतील आणि आपल्या परिसरातील इतर शाळांना नेतृत्व व मार्गदर्शन करतील.

  • हरित शाळा: शाळेच्या गुणवत्तेचा एक महत्त्वाचा मापदंड म्हणून शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देणे .

  • अनुभवात्मक शिक्षण: सुरुवातीच्या वर्षांमध्ये खेळ आणि खेळण्यांवर आधारित शिक्षणासह, अनुभवात्मक, समग्र, एकात्मिक, कुतूहल आधारित आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनांवर भर देणे

  • अध्ययन निष्पत्ती: अध्ययन निष्पत्ती आणि ज्ञानाचा वापर मजबूत करण्यासाठी अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकनावर भर दिला जातो

  • दर्जेदार पायाभूत सुविधा: यामध्ये आवश्यकतेनुसार सुविधा , कार्यक्षमता, सुंदरता आणि सुरक्षितता यांसारख्या मापदंडांवर शाळेच्या पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.

  • भविष्यासाठी सज्ज कौशल्ये: 21 व्या शतकातील कौशल्यांची ओळख करून देण्यास प्रोत्साहन देते आणि शाळांना स्थानिक उद्यमशीलता परिसंस्थेशी जोडते.  

  • गुणवत्ता मूल्यांकन: शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा (SQAF) पीएम श्री शाळांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन आणि देखरेख करण्यासाठी एक संरचित यंत्रणा प्रदान करतो.

पीएम श्री शाळांचे सहा आधारस्तंभ


पीएम श्री शाळा योजना ही एनईपी 2020 च्या 9 प्रकरणांमधून घेतलेल्या सहा प्रमुख आधारस्तंभांच्या उप-क्षेत्रांच्या विकासावर आधारित आहे, जे खालीलप्रमाणे आहेत:

पीएम श्री शाळा शालेय शिक्षणात कसे परिवर्तन घडवतात

मुलाच्या गरजांनुसार तयार केलेले शिक्षण

पीएम श्री शाळा त्यांच्या संलग्नतेनुसार सीबीएसई  किंवा संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अभ्यासक्रमाचे पालन करतात. त्यांचा अभ्यासक्रम एनईपी  2020 अंतर्गत 5+3+3+4 अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय रचनेनुसार विकसित केलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे किंवा राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे अनुसरण करतो. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मूळ तत्त्वे आणि घटनात्मक मूल्यांचे पालन करून स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रमात बदल करण्याची सूट आहे.

पीएम श्री शाळा दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त शिक्षण , स्थानिक कारागिरांसोबत शिकणे , स्थानिक कला, हस्तकला आणि परंपरांचा अभ्यास, महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि स्वदेशी ज्ञान व प्रथांचे जतन यांसारख्या उपक्रमांद्वारे अनुभव-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देतात.

समानता, समावेशन आणि बहुभाषिक शिक्षण

‘पीएमश्री’ शाळांनी सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ग्रामीण आणि ज्यांच्यापर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचल्या नाहीत, अशा  समुदायांसह विविध पार्श्वभूमी असलेल्या  विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे याची हमी मिळाली आहे. शैक्षणिक असमानता दूर करण्यावर लक्ष केंद्रित करून, या शाळांनी संपूर्ण भारतात अधिक समान शिक्षण वातावरण निर्माण करण्यात मदत केली आहे.

या योजनेमध्‍ये मातृभाषा, स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा अध्यापन आणि शिकण्याचे माध्यम म्हणून वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. विशेषतः सुरुवातीच्या इयत्तांमध्ये. नवीनतम युडीआयएसई+ 2025-26 डेटा पीएमश्री शाळांमध्ये 6,102 संस्कृत शिक्षक, 1,994 उर्दू शिक्षक आणि 9,152 प्रादेशिक भाषा शिक्षकांची नोंद केली गेली आहे.

हे स्थानिक भाषांद्वारे शिक्षणास प्राधान्य देण्यासाठी समुदायाच्या सहभागास प्रोत्साहन देते. प्रत्येक मुलामध्ये मजबूत पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये विकसित होतात याची खात्री करण्यासाठी हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

तंत्रज्ञान सक्षम शिक्षण

पीएमश्री शाळांची एक महत्त्वाची  कामगिरी म्हणजे अध्यापन-शैक्षणिक  वातावरणात तंत्रज्ञानाचे पद्धतशीर एकत्रीकरण. माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी ) सुविधा, स्मार्ट क्लासरूम, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आणि स्‍टेम -आधारित कार्यक्रमांची तरतूद अधिक परस्परसंवादी, अनुभवात्मक आणि शिकाऊ-केंद्रित शैक्षणिक वातावरणाच्या निर्मितीमध्ये योगदान देत आहे. हे हस्तक्षेप केवळ विविध शिक्षण संसाधनांमध्ये प्रवेश वाढवत नाहीत; तर डिजिटल साक्षरता, तांत्रिक क्षमता, गंभीर विचार आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांच्या विकासाला देखील समर्थन देतात. ‘दीक्षा’सारखे मंच उच्च-गुणवत्तेच्या डिजिटल शैक्षणिक संसाधनांचे भांडार म्हणून काम करतात आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण सामग्रीची देवाणघेवाण आणि प्रसार सुलभ करतात,  त्यामुळे तंत्रज्ञान-सक्षम शैक्षणिक पद्धती मजबूत होतात.

विद्यार्थ्‍यांचा सर्वांगीण विकास 

पीएमश्री  शाळा अभ्यासेतर उपक्रम, क्रीडा, कला आणि जीवन-कौशल्याचे  शिक्षण एकत्रित करून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारतात. नेतृत्व क्षमता, सर्जनशीलता, सामाजिक-भावनिक क्षमता आणि परस्पर कौशल्यांचा विकास करण्यासाठी हा बहुआयामी दृष्टीकोन पारंपरिक शैक्षणिक कामगिरीच्या पलीकडे विस्तारित आहे. विविध प्रकारच्या शिक्षण आणि सहभागासाठी संधी उपलब्ध करून देऊन, शाळा विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक आव्हानांना नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक क्षमता, लवचिकता आणि अनुकूलन क्षमतेने सुसज्ज करण्याचा प्रयत्न करतात.

शिक्षक आणि शाळा नेतृत्व सक्षम करणे

पीएम श्री शाळा जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाद्वारे समर्थित संरचित व्यावसायिक विकास उपक्रमांद्वारे शिक्षक क्षमता आणि संस्थात्मक नेतृत्व मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. उपक्रमांतर्गत, क्षमता-निर्मिती कार्यक्रमांसाठी प्रति जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाद्वारे  ₹3 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.  विषय शिक्षक, मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, आयसीटी  शिक्षक आणि मास्टर ट्रेनर यांच्या प्रशिक्षणासाठी प्रति शिक्षक ₹2,500 पर्यंतचे सहाय्य दिले जाते.

मुख्याध्यापकांना शैक्षणिक नेतृत्व, शाळा व्यवस्थापन आणि योग्यतेवर आधारित शैक्षणिक नियोजनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्‍यामुळे ते संस्थात्मक नियोजन आणि शैक्षणिक प्रशासन बळकट करू शकतात. शिक्षकांना सर्वंकष प्रगती पुस्तिका, शालेय सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि कल्याण, प्रथम-स्तरीय समुपदेशन आणि आयसीटी  एकत्रीकरण यासह क्षेत्रांमध्ये व्यावसायिक विकास प्राप्त होतो. या हस्तक्षेपांमुळे शैक्षणिक क्षमता वाढवणे, शालेय नेतृत्व मजबूत करणे आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांमध्ये सतत व्यावसायिक विकासाला चालना देणे.

वाढणारे राष्ट्रीय नेटवर्क

पीएम श्रीच्‍या पुढाकाराने केंद्रीय विद्यालय संघटना (केव्हीएस), नवोदय विद्यालय समिती (एनव्‍हीएस), आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) अंतर्गत संस्थांसह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 13,092 निवडक शाळांचा समावेश असलेले एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय नेटवर्क स्थापित केले आहे. या उपक्रमाने 725 जिल्हे आणि 8,340 ब्लॉक्स/यूएलबी यांचा समावेश करून व्यापक भौगोलिक व्याप्ती वाढवली आहे.  त्यामुळे देशभरात एक व्यापक संस्थात्मक आणि स्थानिक पदचिन्ह स्थापित झाले आहे.

निवडलेल्या 13,092 शाळांपैकी 1,305 प्राथमिक शाळा, 3,102 उच्च प्राथमिक शाळा, 3,141 माध्यमिक शाळा आणि 5,544 उच्च माध्यमिक शाळा आहेत. नेटवर्कमध्ये पुढे 80 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये (केजीबीव्‍ही), 913  केंद्रीय विद्यालये , 620 नवोदय विद्यालये शाळा आणि 4 एनसीईआरटी  शाळांचा समावेश आहे. या नेटवर्कची व्याप्ती आणि विविधता पाहिल्यानंतर लक्षात येते की, पीएम श्री शाळांचा विस्तार होत चालला आहे.

गुणवत्तेच्या निकषांवर आधारित निवड


पीएम श्री शाळांची निवड ‘चॅलेंज मोड’ द्वारे केली जाते.  त्यामध्ये  आदर्श शाळा बनण्यासाठी  स्पर्धा घेतली जाते.  निवड निश्चित काल मर्यादेसह तीन-टप्प्यातील  प्रक्रियेद्वारे केली जाते. ही प्रक्रिया  खालीलप्रमाणे आहे:

• टप्पा 1: सामंजस्य करारावर स्वाक्षरी (एमओयू)

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत सामंजस्य करार  केला जातो.  आवश्यक समर्थन प्रदान करण्यासाठी आणि निवडलेल्या शाळांना पीएम श्री  शाळांसाठी निर्धारित गुणवत्ता मानके साध्य करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेची रूपरेषा देतात.

• टप्पा 2: पात्र शाळा चिह्नीत करणे

पीएम श्री शाळा म्हणून निवडीसाठी पात्र असलेल्या शाळांचा समूह विहित किमान बेंचमार्क आणि यूडीआयएसई+ डेटाद्वारे उपलब्ध असलेल्या संबंधित निर्देशकांच्या आधारे ओळखला जातो.

• टप्पा 3: आव्हान पद्धतीद्वारे निवड

टप्पा-2 मध्ये ओळखल्या गेलेल्या पात्र शाळा विशिष्ट निकषांचे पालन दर्शविण्यासाठी आव्हान-आधारित निवड प्रक्रियेत भाग घेतात. शाळा निर्धारित आवश्यकतांच्या पूर्ततेसह, विहित आव्हान परिस्थितीशी स्पर्धा करतात.

• अटींची पूर्तता संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेश, KVS, किंवा NVS प्राधिकरणांद्वारे भौतिक तपासणीद्वारे सत्यापित आणि प्रमाणित केली जाते आणि शाळांची यादी मंत्रालयाकडे शिफारस केली जाते.

शाळांच्या अंतिम निवडीसाठी शिक्षण मंत्रालयातील सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाते. शाळांनी पक्की इमारत, अडथळामुक्त प्रवेश, सुरक्षितता उपाय, स्वतंत्र स्वच्छतागृहे, पेयजल , हात धुण्याची सुविधा, वीज, शिक्षकांसाठी ओळखपत्र, प्राथमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील नावनोंदणी राज्याच्या सरासरी नोंदणीपेक्षा आणि ग्रंथालय किंवा क्रीडा सुविधांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. आव्हान पद्धतीसाठी, शहरी भागातील शाळांना किमान 70 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, तर ग्रामीण भागातील शाळांना किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मूल्यांकनामध्ये पायाभूत सुविधा, शिकण्याचे परिणाम, अध्यापनशास्त्र, पीएम पोषण, व्यावसायिक शिक्षण, हरित उपक्रम आणि भागधारकांची वचनबद्धता समाविष्ट आहे.

व्यापक बदलाचे मॉडेल म्हणून शाळा

पीएम श्री पायाभूत सुविधा-केंद्रित दृष्टीकोनातून शालेय विकासाकडे सर्वसमावेशक, न्याय्य आणि भविष्यासाठी तयार शिक्षण संस्थांच्या स्थापनेकडे एक आदर्श बदल दर्शवितात. गुणवत्ता आणि सक्षमता-आधारित शिक्षण, सतत शिक्षक व्यावसायिक विकास, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण आणि सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सक्षम शालेय वातावरणाची निर्मिती यावर भर देऊन हा उपक्रम एनईपी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची दृष्टी आणि प्राधान्यक्रम कार्यान्वित करतो.

आदर्श संस्था म्हणून, पीएम श्री  शाळांना अभिनव शैक्षणिक पद्धतींचे प्रदर्शन आणि प्रसार करण्याची संकल्पना आहे.  परिसरातील  तसेच  शेजारच्या शाळांद्वारे या संकल्पना  स्वीकारल्या जाऊ शकतात आणि त्यांची प्रतिकृती बनवता येवू शकते.  यामुळे शालेय शिक्षणामध्ये व्यापक प्रणालीमध्‍ये  सुधारणांना हातभार लागेल. अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज भारतात अर्थपूर्णपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांनी सुसज्ज सक्षम, आत्मविश्वासू, सर्जनशील आणि जबाबदारीने शिक्षण घेणा-यांचे  पालनपोषण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

References

Ministry of Education

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2290004&reg=48&lang=2

https://pmshri.education.gov.in/#aboutPmshri

https://pmshri.education.gov.in/assets/pdf/part1_pmshri.pdf

https://pmshri.education.gov.in/faqs

https://pmshri.education.gov.in/#main-content

https://www.pib.gov.in/PressReleaseDetail.aspx?PRID=2291330&reg=1&lang=1

https://education.vikaspedia.in/viewcontent/education/policies-and-schemes/pm-schools-for-rising-india-scheme?lgn=en

https://sansad.in/getFile/annex/271/AU1144_1PgQNc.pdf?source=pqars

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2291279&reg=1&lang=1

https://x.com/EduMinOfIndia/status/1567485212476702721

 

NITI Aayog

https://www.niti.gov.in/sites/default/files/2026-05/School-Education-System-in-India.pdf?utm_source=chatgpt.com

Click here to see pdf 

***

NehaKulkarni / SushamaKane / SuvarnaBedekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

(Explainer ID: 160341) आगंतुक पटल : 70
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Telugu , Kannada , Malayalam