• Sitemap
Social Welfare

9 वा राष्ट्रीय पोषण माह

पोषणासाठीचा महिनाभर चालणारा उत्सव

Posted On: 08 SEP 2026 5:10PM

 

नवी दिल्ली,8 सप्टेंबर 2026

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पाळण्यात येणारा ‘राष्ट्रीय पोषण माह’ हा उपक्रम गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुलांसाठी पोषक घटकांची आवश्यकता, त्यांचे आरोग्य आणि त्यांची काळजी घेण्याचे महत्त्व त्यांच्या कुटुंबांना अधिक ठळकपणे पटवून देण्याचे त्याबरोबरच या अनुषंगाने समुदायांना सक्रिय करण्यासाठीचे समर्पित व्यासपीठ आहे. 9 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असलेल्या नवव्या ‘पोषण माह 2026’ मध्ये अंगणवाडी केंद्रांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येईल. या अभियानाच्या माध्यमातून गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी संतुलित आणि प्रथिनयुक्त आहाराच्या गरजेविषयी लोकांना अधिक सजग केले जाईल. गेली काही वर्षे सातत्याने राबवण्यात आलेल्या ‘पोषण माह’ अभियानामुळे प्रसूतीनंतर मातांचे पोषण, अर्भके आणि लहान बालकांच्या आहाराच्या पद्धती (IYCF), मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवणे आणि स्वच्छता याबाबत सजगता तसेच वर्तणुकीत सकारात्मक बदलांचे महत्त्व अधिक प्रभावीपणे ठसवले गेले आहे त्याचबरोबर देशभर पोषणाचे अधिक प्रभावी परिणाम दिसून येण्यासाठी व्यापक प्रयत्नही केले जात आहेत.

पार्श्वभूमी

भारतातील सार्वजनिक आरोग्याबाबतच्या प्रमुख समस्यांपैकी कुपोषण ही एक सर्वात मोठी समस्या आहे; याचा महिला आणि मुलांच्या संपूर्ण जीवनचक्रात त्यांच्या आरोग्यावर, वाढीवर, अध्ययन क्षमतेवर आणि उत्पादकतेवर परिणाम होत असतो. या समस्येवर समन्वयाने उपाययोजना केली जावी यासाठी भारत सरकारने मार्च 2018 मध्ये ‘पोषण अभियान’ सुरू केले. हे विविध मंत्रालयांच्या सहकार्याने राबवले जाणारे एक अभियान असून, त्याद्वारे ‘पोषण’ या विषयाला विकासाच्या अजेंड्यात मध्यवर्ती स्थान देण्यात आले आहे.

सन 2021–22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात यावर केलेल्या उपाययोजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक ‘राष्ट्रीय पोषण अभियान’ या मूळ योजनेनुसार- ‘मिशन पोषण 2.0’ अंतर्गत एकत्रितपणे समाविष्ट करण्यात आल्या. ‘पोषण 2.0’ मध्ये तीन प्रमुख योजना एकाच चौकटीत एकत्रित करण्यात आल्या आहेत:

पोषण अभियान (तंत्रज्ञानाचा वापर करून देखरेख ठेवणे, जनआंदोलनाच्या स्वरुपात मोठ्या जनसमुदायाला सहभागी करून घेणे, आणि वर्तणुकीत बदल).

अंगणवाडी सेवा / एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) (पूरक पोषण, गरम शिजवलेले जेवण आणि बालपणाच्या सुरुवातीच्या काळातील घ्यावयाची काळजी).

किशोरवयीन मुलींसाठी योजना (शालाबाह्य/किशोरवयीन मुलींसाठी पोषणविषयक सहाय्य)

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सरकारद्वारे पाळण्यात येणारा ‘राष्ट्रीय पोषण माह’ हा ‘मिशन पोषण 2.0’ योजना आणि तिची उद्दिष्टे याबाबत जागरुकतेचा प्रसार करण्याचा एक मार्ग आहे.

अंगणवाडी केंद्रांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, 9 सप्टेंबर 2026 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ‘रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये 9व्या ‘राष्ट्रीय पोषण माह’चा शुभारंभ केला जाईल. अंगणवाडी केंद्र हे बालसंगोपनाचे जगातील सर्वात मोठे जाळे असून, या केंद्रांद्वारे अत्यंत दुर्गम भागातील बालकांपर्यंतही अत्यावश्यक सेवा आणि सहाय्य पोहोचवले जाते. “हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी” ही यावर्षीची मुख्य संकल्पना आहे; या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला अंगणवाडी केंद्रांची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

9वा राष्ट्रीय पोषण माह

यंदाची म्हणजे ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’ ची “हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी” ही मध्यवर्ती संकल्पना असून पोषण, काळजी आणि बालवयातील विकासासाठी पोषणाकडे लक्ष ही सामूहिक जबाबदारी असल्याची भावना दृढ करण्यासोबतच अंगणवाडी केंद्रांना समुदाय-नेतृत्वाखालील कृतींच्या केंद्रस्थानी ठेवणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. हा उपक्रम परस्परपूरक अशा पाच प्राधान्यक्रमांवर आधारित असेल:

पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन, विविध अन्नगट आणि स्थानिक अन्नपदार्थ यांवर भर देण्यासह आहारात वैविध्य आणण्यास प्रोत्साहन देणे;

रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश म्हणजे मेनूमध्ये बदल, स्वच्छता आणि गुणवत्ता हमी यांद्वारे ‘एसएनपी’ अंतर्गत ताज्या आणि वैविध्यपूर्ण ‘एचसीएम’ ला प्रोत्साहन देणे;

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एएमसी (23 जून 2026 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना)नुसार आणि एसएनपी मेनू फलकांच्या प्रदर्शनाद्वारे ‘पोषण’ कार्यक्रमासाठी समुदायाची मालकी आणि उत्तरदायित्व दृढ करणे;

मुलाचा आहार आणि त्याची शिकण्याची प्रक्रिया यांच्यातील अविभाज्य संबंध अधोरेखित करून ‘बालपणातील सुरुवातीच्या काळातील देखभाल आणि शिक्षण’ (ईसीसीई) यासाठीचे मूलभूत आधारस्तंभ म्हणून बोधात्मक विकास आणि योग्य पोषण यांना चालना देणे; 

याशिवाय ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’ मध्ये प्रसूती झालेल्या मातांना लाभ मिळवून देण्यासाठीच्या ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ (पीएमएमव्हीवाय) या भारतातीत प्रमुख योजनेची 10वी वर्षपूर्तीही साजरी केली जाणार आहे. याद्वारे मातांचे पोषण, आरोग्याशी संबंधित सकारात्मक वर्तणुकीला प्रोत्साहन आणि गरोदरपणात मिळणारी आर्थिक मदत यामध्ये या योजनेचे योगदानही स्पष्ट करण्यात येईल; तसेच बालकांची निकोप वाढ, बोधात्मक विकास आणि त्यांच्या आयुष्यभरासाठीच्या कल्याणाकरिता त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या 1,000 दिवसांमधील मातांचे पोषण आणि काळजी या गोष्टींना अत्यंत महत्त्व असल्याचेही अधोरेखित केले जाईल.

राष्ट्रीय पोषण माह 2026 साठीच्या प्रस्तावित संकल्पना

1. आहारातील विविधता आणि पुरेशी प्रथिने: पोषक तत्वांची गरज पूर्ण करण्यासाठी, तसेच निकोप वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी तसेच सर्व प्रकारचे कुपोषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या म्हणजे तृणधान्ये व भरडधान्ये, कडधान्ये व डाळी, फळे व भाज्या, सुकामेवा व बिया, तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा अशा घटकांचा समावेश असलेला आहार आणि त्यासोबतच वनस्पती आणि प्राणीजन्य स्रोतांपासून मिळणारी योग्य प्रथिने घेणे अत्यंत आवश्यक आहेत. संपूर्ण आयुष्यात आणि विशेषतः पूरक आहार सुरू करण्याच्या काळात, आहारातील विविधतेला प्रोत्साहन देणे हे पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी तसेच लहानपणापासूनच आहाराच्या निरोगी सवयी अंगी बाणल्या जाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

यासाठी पुढील गोष्टी करता येतील –

आरोग्यदायी आणि वैविध्यपूर्ण पाककृतींची प्रात्यक्षिके: यासाठी विविध अन्नगटांमधील उदा. तृणधान्ये व भरडधान्ये, कडधान्ये, फळे व भाज्या, सुकामेवा व बिया, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी परवडणाऱ्या व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून अंगणवाडी केंद्रांमध्ये आरोग्यदायी आणि वैविध्यपूर्ण पाककृतींची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करणे.

पोषण मेळावे: स्थानिक पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन आणि पाककृतींचे प्रात्यक्षिक दाखवता येईल असे पोषण मेळावे आयोजित करणे; तसेच, प्रत्येक वयोगटासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार कसा असावा, याविषयी मार्गदर्शन करणे.

‘प्रथिनयुक्त पदार्थ’ अभियान: वनस्पती आणि प्राणीजन्य स्रोत, डाळी, द्विदल धान्ये, सुकामेवा आणि बिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ व अंडी यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवणे; तसेच दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश करण्याचे व्यावहारिक आणि परवडण्याजोग्या पर्यायांचे प्रात्यक्षिक करून दाखवणे.

पोषण वाटिकेतील उत्पादने आणि स्थानिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन: पोषण वाटिकांमधील उत्पादने आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या हंगामी खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरविणे; तसेच, घरगुती आहारांत आणि लहान मुलांच्या पूरक आहारामध्ये त्यांचा नियमित वापर करण्यास प्रोत्साहन देणे.

2. अंगणवाडी केंद्रांमध्ये ताजे गरमागरम शिजवलेले अन्न: सर्वसमावेशक पोषण कार्यक्रमाची (Supplementary Nutrition Programme–एसएनपी) गुणवत्ता, उपयुक्तता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी लाभार्थींना नियमितपणे ताजे, पौष्टिक, विविध आणि दर्जेदार शिजवलेले अन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांची नियमित उपस्थिती वाढण्यासही मदत होते. भरडधान्ये (मिलेट्स), डाळी आणि हंगामी भाज्यांसह स्थानिक पातळीवर उपलब्ध घटकांपासून तयार केलेल्या ताज्या आणि पौष्टिक आहारावर भर दिल्याने आहारातील वैविध्य वाढते. तसेच, कुटुंबांमध्येही निरोगी आणि संतुलित आहाराच्या सवयी विकसित होण्यास मदत होते.

पोषण माह 2026 निमित्त साप्ताहिक मेनूमध्ये बदल करून आहारात विविधता आणण्यावर भर दिला जात आहे. तसेच, समुदायाचा सहभाग वाढवून आणि अन्नाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून अंगणवाडी केंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या ताज्या शिजवलेल्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वीकारार्हता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उपक्रमांमध्ये खालील बाबींचा समावेश असू शकतो –

साप्ताहिक मेनू फेरबदल: अंगणवाडी केंद्रांमध्ये साप्ताहिक मेनूमध्ये विविधता आणण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पुढाकार घ्यावा. स्थानिक पातळीवर उपलब्ध घटक, भरडधान्ये, डाळी आणि हंगामी भाज्यांचा वापर करून आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी विविध प्रकारचे ताजे शिजवलेले अन्न देण्याची व्यवस्था करावी.

ताज्या शिजवलेल्या अन्नाचे प्रात्यक्षिक: सर्वसमावेशक पोषण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताजे शिजवलेले अन्न तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित केले जाईल. यामध्ये योग्य घटकांचा वापर, स्वच्छता आणि पौष्टिक व संतुलित आहाराची रचना यावर भर दिला जाईल.

ताज्या शिजवलेल्या अन्नाच्या गुणवत्तेची विशेष मोहिम अन्नाची सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (एफ एस एस ए आय) सहकार्याने ताज्या शिजवलेल्या अन्नाची देशभर चाचणी करण्यात येईल. यामुळे अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके अधिक बळकट करण्यास मदत होईल.

ताज्या शिजवलेल्या अन्नाचा सामुदायिक आस्वाद: पालक, ग्रामपंचायत, महिला बचत गट आणि अंगणवाडी व्यवस्थापन समित्यांच्या सहभागातून, अंगणवाडी केंद्रांवर ताज्या शिजवलेल्या अन्नाचा आस्वाद घेण्याचे कार्यक्रम आयोजित करावेत.

3. समुदायाचा सहभाग आणि जबाबदारी: मंत्रालयाने 23 जून 2026 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अंगणवाडी व्यवस्थापन समित्यांची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. सर्वसमावेशक पोषण कार्यक्रमात समुदायाचा सहभाग आणि जबाबदारी वाढवण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या समित्यांमुळे समुदायाचा सहभाग वाढवणे, अंगणवाडी केंद्रातील सेवांवर लक्ष ठेवणे आणि सेवांची गुणवत्ता तसेच परिणामकारकता सुधारण्यास मदत होईल. पोषण माह 2026 हे या समित्यांना सक्रिय करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते. यामध्ये जनजागृती करणे, लाभार्थ्यांना सहभागी करून घेणे आणि पोषण तसेच पूर्वप्राथमिक बालसंगोपनाच्या सेवांवर लक्ष ठेवण्यासाठी समित्यांचा सक्रिय सहभाग वाढवला जाईल.

या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी, सर्व अंगणवाडी केंद्रांवर सर्वसमावेशक पोषण कार्यक्रमाचे आहारतक्ते (मेनू बोर्ड) लावणे आणि त्याचा नियमित वापर करणे महत्त्वाचे आहे. यामुळे लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सेवा आणि दररोजच्या उपलब्ध खाद्यपदार्थांची (मेनू) माहिती समुदायाला सहज उपलब्ध होईल आणि सेवांमध्ये पारदर्शकता वाढेल. अंगणवाडी व्यवस्थापन समित्या आणि मेनू बोर्ड यांच्या माध्यमातून मेनूनुसार अन्न दिले जाते की नाही, अन्नाचा दर्जा आणि सेवा नियमितपणे मिळत आहेत की नाही, यावर समुदायाचे लक्ष राहण्यास मदत होईल. तसेच, पूरक पोषण, लाभार्थ्यांना मिळणारे हक्क आणि मुलांची योग्य काळजी घेण्याबाबत जनजागृती होण्यास मदत होईल.

उपक्रमांमध्ये खालील बाबींचा समावेश असू शकतो –

अंगणवाडी व्यवस्थापन समित्यांचे सक्रियकरण: सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी व्यवस्थापन समित्या (एएमसी) सक्रीय करून समुदायाचा सहभाग वाढवणे, पोषण सेवांचा आढावा घेणे आणि पोषण माह उपक्रमांना सहकार्य करणे. तसेच, पोषण माहदरम्यान प्रत्येक अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी व्यवस्थापन समितीची  किमान एक बैठक आयोजित केली जाईल, याची खात्री करणे.

सर्वसमावेशक पोषण कार्यक्रम अंतर्गत आहार तक्ता (मेनू बोर्ड) लावणे:

सर्व अंगणवाडी केंद्रांवर सर्वसमावेशक पोषण कार्यक्रमाचा आहार तक्ता लावणे सुनिश्चित करावे. या तक्त्यावर दररोज दिले जाणारे ताजे शिजवलेले अन्नपदार्थ आणि घरी नेण्यासाठीचे धान्य याबाबतची माहिती दिली जाईल. यामुळे लाभार्थींना आहाराची माहिती सहज मिळेल, सेवा पुरवठ्यात पारदर्शकता राहिल आणि समुदायाचे या सर्वांवर लक्ष राहण्यात मदत होईल.

अन्न गुणवत्तेवर समुदायाची देखरेख: अन्नाची गुणवत्ता, प्रमाण आणि आहार तक्त्यानुसार (मेनू) अन्नपदार्थ दिले जातात की नाही, याची पाहणी करण्यासाठी अंगणवाडी व्यवस्थापन समित्या आणि माता समित्यांचा सहभाग वाढवावा. तसेच, सर्वसमावेशक पोषण कार्यक्रमाची वेळोवेळी सामाजिक पाहणी (सोशल ऑडिट) करण्यासाठी त्यांना सहभागी करून घ्यावे.

संकल्पना 4: लहान मुलांच्या विकासासाठी योग्य पोषण आणि सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शन: मुख्य सचिवांच्या परिषदेतील निर्देशांनुसार, लहान मुलांच्या योग्य विकासासाठी पुरेसे पोषण आणि चांगले शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मूल काय खाते आणि ते कसे शिकते, यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे, हे या विषयातून अधोरेखित केले आहे.

मुलाच्या जन्मानंतरच्या पहिल्या 1,000 दिवसांत पुरेसे पोषण आणि योग्य काळजी मिळणे मेंदूच्या चांगल्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात कुपोषण झाल्यास मुलाच्या बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक-भावनिक विकासावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. सुधारित गृहभेट वेळापत्रका अंतर्गत 0 ते 3 वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासाचे 34 टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यास आणि मुलांच्या सुरुवातीच्या विकासासाठी आवश्यक कृती सुचवण्यास, अंगणवाडी सेविकांना मदत होईल.

उपक्रमांमध्ये खालील बाबींचा समावेश असू शकतो –

सुधारित गृह वेळापत्रक: मुलाच्या जन्मानंतरच्या पहिल्या 1,000 दिवसांत आणि लहान वयात पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी गृहभेटींचे नियोजन अधिक प्रभावी केले जाईल. तसेच, मुलांचे वयानुसार शिक्षण आणि विकास चांगला व्हावा आणि त्यांना शाळेसाठी तयार करता यावे, यासाठी नवचेतना आणि आधारशिला अभ्यासक्रम राबवून पूर्वप्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाईल.

विकास खुंटणाऱ्या मुलांना आवश्यक सेवा: आरोग्य यंत्रणा आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम  पथकांच्या मदतीने विकास खुंटत असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक उपचार आणि सेवांसाठी योग्य ठिकाणी पाठवण्यास प्रोत्साहन दिले जाईल आणि याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येईल.

लहान वयातील पोषण आणि बौद्धिक विकासाबाबत जनजागृती: मुलांच्या मेंदूचा योग्य विकास आणि बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी पुरेसे पोषण तसेच लहान वयात योग्य उत्तेजन मिळणे महत्त्वाचे आहे. याबाबत व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात येईल.

संकल्पना 5: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना: माता आरोग्यासाठी रोख हस्तांतरण: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला भारतातील प्रमुख मातृत्व लाभ योजना म्हणून 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या माध्यमातून मातांना पोषणासाठी मदत दिली जाते, आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि गरोदरपणात आर्थिक मदत दिली जाते. पोषण माह 2026 निमित्त सर्व पात्र लाभार्थी महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे, नागरिकांमध्ये योजनेबाबत जागरूकता वाढवणे आणि माता तसेच बाल आरोग्याच्या क्षेत्रातील गेल्या दशकातील प्रगतीचा आढावा घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

उपक्रमांमध्ये समावेश असू शकतो-

100% व्याप्ती मोहिम : पीएमएमव्हीवाय अंतर्गत सर्व पात्र गर्भवती आणि स्तनदा मातांची ओळख पटवण्यासाठी व त्यांनी नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवणे. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणे आणि पडताळणी, मंजुरी आणि थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने करणे. पीएमएमव्हीवाय डॅशबोर्डद्वारे नियमित प्रगतीचा आढावा घेणे.

नागरिक जनजागृती मोहिम: पीएमएमव्हीवाय पात्रता, लाभ, हप्ते आणि अर्ज प्रक्रिया यांबाबत जनजागृती मोहिम राबवणे. समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांद्वारे लाभार्थ्यांचे अनुभव आणि यशोगाथा यांचा प्रसार करणे.

समुदाय सहभागः पोषण एक जन आंदोलन

पोषण अभियानाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, पोषण चळवळीकडे केवळ सरकारी कार्यक्रम म्हणून न पाहता, त्याकडे जनआंदोलन म्हणून त्याला स्थान देण्यात आले आहे. सक्रिय सामुदायिक सहभाग आणि तळागाळातील लोकांच्या योगदानातूनच, बालकांच्या आहार पद्धती, आहारातील विविधता, प्रसूतिपूर्व काळजी, हातांची स्वच्छता आणि आरोग्यसेवेसाठी संस्थात्मक सहकार्याची मदत घेणे यांसारख्या बाबींमध्ये वर्तणुकीशी संबंधित कायमस्वरूपी बदल साध्य होऊ शकतो, याची नोंद या अभियानातून घेतली आहे. पोषण माह आणि पोषण पंधरवडा हे या पोषण केंद्रित समुदाय जागृतीच्या सर्वांत मोठ्या मोहिमांपैकी आहेत. आरोग्य, सुदृढता आणि रोगप्रतिकारक क्षमता वृद्धिंगत करणाऱ्या सवयींचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी मोहिमा राबवल्या जातात.

पीएमएमव्हीवाय टूलकिटचे अनावरणः राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील क्षेत्रीय अंमलबजावाणीसाठी पीएमएमव्हीवाय साधनसंग्रह जारी करणे. केंद्रशासित आणि राज्यांना प्रादेशिक भाषांमध्ये साधन संग्रहाचे रूपांतर करण्यास आणि त्याचा प्रसार करण्यास प्रोत्साहित करणे. पोषण पंधरवडा (एप्रिल 2026) 2018 पासून दरवर्षी साजरा केला जाणारा पोषण पंधरवडा ही पोषण अभियानाअंतर्गत, समुदाय सहभाग वृद्धिंगत कऱण्यासाठी आणि आहाराशी निगडीत महत्त्वाच्या सवयी अंमलात आणण्यासाठी एप्रिल महिन्यात राबवली जाणार दोन आठवड्यांची व्यापक मोहिम आहे.

2026मध्ये पोषण पंधरवड्याची 8 आवृत्ती 9 ते 23 एप्रिल या कालावधीत आयोजित केली गेली. वैज्ञानिक पुराव्यांनुसार, वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत मेंदूचा 85% विकास पूर्ण झालेला असतो हे दिसून येते; त्यातही सर्वाधिक जलद विकास हा पहिल्या 1000 दिवसांमध्ये होतो - मेंदूची सर्वाधिक वाढ, शारिरीक विकास आणि सर्वांगीण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा काळ असतो.

लहानपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मुलांची काळजी आणि पोषण यांचे महत्त्व अनन्यसाधारण असत, ते ओळखून आठवा पोषण पंधरवडा, जीवनाच्या पहिल्या सहा वर्षांत मेंदूचा जास्तीत जास्त विकास या मुख्य वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि परिवर्तनशील विषयावर लक्ष केंद्रित करून जन आंदोलन अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. तसेच मुलांची निरोगी वाढ आणि मेंदूच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या पद्धतींविषयी कुटुंब आणि समुदायामध्ये जागरूकता निर्माण कऱण्याचे उद्दिष्ट आहे.

आरोग्यसाठी पोषण या दृष्टीकोनातून मेंदूच्या योग्य उत्तम विकासासाठी पोषण आणि बालवयात योग्य उत्तेजना हा दृष्टीकोन ठेवून वाटचाल करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.

8वा राष्ट्रीय पोषण माह

मध्य प्रदेशमधील धर जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजा स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानासह पंतप्रधानांच्या हस्ते 8व्या राष्ट्रीय पोषण माह चा शुभारंभ झाला. महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातो. 2025च्या राष्ट्रीय पोषण माहमध्ये पोषणविषयक साक्षरता आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. यामध्ये मातांचे पोषण, अर्भक आणि लहान बालकांचा आहार, बालकांचे सुरुवातीच्या काळातील संगोपन आणि शिक्षण तसेच लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी साखर आणि तेलाचा वापर घटवणे यांसारख्या प्रमुख विषयांचा अंतर्भाव होता. एकंदरीत 20हून अधिक मंत्रालयांच्या समन्वयातून देशभरात एकूण 14.33 कोटी उपक्रम राबववण्यात आले.

पोषण निरीक्षण/ट्रॅकरः 1 मार्च 2021 रोजी पोषण ट्रॅकर हे डिजीटल व्यासपीठ पोषण व्यवस्थापनासाठी सुरू झाले, हे पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचे प्रमुख व्यवस्थापन साधन आहे. या अॅप्लिकेशनमुळे, अंगणवाडी सेवांशी निगडीत ज्यामध्ये अंगणवाडी केंद्र सुरू होण्याची वेळ, मुलांची दैनंदिन उपस्थिती, बालकांचे प्रारंभिक शिक्षण आणि काळजी (ईसीसीई) उपक्रम तसेच वाढीचे निरीक्षण यांसारख्या बाबींचाही समावेश आहे. सध्या ही प्रणाली गर्भवती महिला, स्तनदा माता, 6 वर्षांपर्यंतची मुले आणि किशोरवयीन मुलींशी निगडीत माहितीची देखरेख ठेवते.

भारताच्या पोषणविषयक सुविधांमध्ये, 31 जुलै 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे, 13.99 लाख अंगणवाडी केंद्रांचा आणि तिथे कार्यरत असलेल्या 13.30 लाख अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे; तळागाळातील हे एक विशाल जाळे असून त्याद्वारे 8.94 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे.

या उपक्रमांत प्रामुख्याने मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या एकंदर लाभार्थ्यांपैकी 7.2 कोटींहून अधिक आहे, जी बालपणातील सुरुवातीच्या काळातील पोषण आणि विकासावर देण्यात आलेला भर अधोरेखित करते.

दरम्यान, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची एकत्रित संख्या जवळपास 1.1 कोटी इतकी आहे, जी पहिल्या गुंतागुंतीच्या 1000 दिवसांतील मातांच्या आरोग्याकडे दिले जाणारे सातत्यपूर्ण लक्ष प्रतिबिंबित करते.

निरोगी कुटुंबे आणि राष्ट्र निर्मितीच्या दिशेने

तंत्रज्ञानाधारित प्रत्यक्ष वेळेवरील देखरेख आणि मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग यांचा मेळ घालून, राष्ट्रीय पोषण माह ने पोषणविषयक उपक्रमाचे रूपांतर एका राष्ट्रव्यापी जनआंदोलनात केले आहे. मिशन पोषण 2.0 च्या एकात्मिक आराखड्यांतर्गत राबवला जाणारा हा वार्षिक उपक्रम सेवा वितरणातील त्रुटी, आहारातील विविधता वृद्धिंगत करणे आणि निरोगी व कुपोषणमुक्त भारत घडवण्यासाठी मुलांच्या वाढीच्या सुरुवातीच्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षांना प्राधान्य देणे ही उद्दीष्ट्ये सातत्याने साध्य करत आहे.

References

Ministry of Women and Child Development

https://www.pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1910097&reg=48&lang=2

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2180384&reg=48&lang=2

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2249920&reg=48&lang=2

https://www.poshantracker.in/aboutus

https://www.pib.gov.in/PressReleaseDetail.aspx?PRID=2307291&reg=48&lang=1

https://cdn.poshantracker.in/public-assets/pdf/Resources/Awareness/Navchetana/Navchetana_en.pdf

Ministry of Health and Family Welfare

https://www.nfhsiips.in/nfhsuser/assets/National%20Family%20Health%20Survey%20(NFHS-6)%202023-2024%20Fact%20Sheets.pdf

https://www.nfhsiips.in/nfhsuser/publication.php

PIB Backgrounders

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2025/sep/doc2025918640501.pdf

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2251769&reg=3&lang=1

UNICEF

https://www.unicef.org/laos/ensuring-healthy-start-first-1000-days-0

पीडीएफ येथे पाहता येईल

नितीन फुल्लुके / मंजिरी गानू / आशुतोष सावे / विजयालक्ष्मी साळवी /प्रिती मालंडकर 

 

 

(Explainer ID: 160097) आगंतुक पटल : 73
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Telugu , Kannada , Malayalam , हिन्दी , Bengali , Assamese , Tamil