• Sitemap
  • Advance Search
Technology

सायबर-भौतिक प्रणाली

तंत्रज्ञान-चालित भविष्याचा पाया

Posted On: 31 AUG 2026 12:33PM

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

सायबर-भौतिक प्रणाली (CPS) डिजिटल आणि भौतिक जगाला जोडतात, त्यामुळे यंत्रांना जाणणे, विश्लेषण करणे आणि बुद्धिमत्तेचा वापर करुन प्रतिसाद देणे शक्य होते भारत राष्ट्रीय आंतरशाखीय सायबर-भौतिक प्रणाली अभियाना (NM-ICPS) च्या माध्यमातून एक मजबूत सीपीएस परिसंस्था विकसित करत आहे. हे अभियान संशोधन संस्था, उद्योग, सरकार आणि जागतिक भागीदारांना एकत्र आणून स्वदेशी सीपीएस क्षमतांचा विकास करत आहे. त्याचे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब्स आणि ट्रान्सलेशन रिसर्च पार्क्स संशोधनाचे रूपांतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रत्यक्ष अनुप्रयोगांमध्ये करत आहेत. हे प्रयत्न भारताच्या तंत्रज्ञानाधारित, नवोन्मेषी आणि आत्मनिर्भर विकसित भारताच्या प्रवासाला बळ देत आहेत.

 

सायबर-भौतिक प्रणाली समजून घेताना

जग आता केवळ कामे करणाऱ्या यंत्रांकडून समजून घेणाऱ्या, विचार करणाऱ्या आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रणालींकडे वाटचाल करत आहे. भौतिक आणि डिजिटल जगाच्या या संगमामुळे सायबर-भौतिक प्रणाली (CPS) नावाच्या बुद्धिमान प्रणालीच्या एका नव्या पिढीचा उदय होत आहे.

सीपीएस सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि कम्युनिकेशन नेटवर्क्सद्वारे भौतिक प्रणालींना कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाशी जोडते. यामुळे यंत्रांना त्यांच्या सभोवतालची परिस्थिती समजून घ्यायला, माहितीवर प्रक्रिया करायला आणि बदलत्या परिस्थितीला प्रत्यक्ष काळात प्रतिसाद देणे शक्य होते. उदाहरणार्थ, चालकविरहित कार मानवी हस्तक्षेपाशिवाय रस्त्यांवर मार्गक्रमण करू शकतात. स्मार्ट कारखाने उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवू शकतात आणि आपोआप कामे समायोजित करू शकतात. वैद्यकीय उपकरणे रुग्णांचा सतत मागोवा घेऊ शकतात आणि वेळेवर हस्तक्षेपाला समर्थन देऊ शकतात. स्मार्ट इमारती प्रत्यक्ष काळातल्या परिस्थितीनुसार प्रकाश, तापमान आणि ऊर्जेच्या वापराचे नियमन करू शकतात. अगदी क्लिनिंग रोबोट्स आणि फिटनेस ट्रॅकर्ससारखी दैनंदिन उपकरणेही अशाच क्षमतांचा वापर करतात.

मुळात, सीपीएस कॉम्प्युटेशन, संवाद आणि भौतिक प्रक्रिया एकत्र आणते. या एकत्रीकरणामुळे बुद्धिमान, संलग्न आणि प्रतिसादक्षम प्रणालींची नवी पिढी निर्माण होत आहे.

भारत सरकारचे सीपीएस उपक्रम

सीपीएस मुळे महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर वाढता प्रभाव पडत असताना, या क्षेत्रातील स्वदेशी क्षमता भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. हे लक्षात घेऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) राष्ट्रीय आंतरशाखीय सायबर-भौतिक प्रणाली अभियान (NM-ICPS) राबवत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2018 मध्ये या अभियानाला मंजुरी दिली असून, नऊ वर्षांसाठी 3,660 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. NM-ICPS हे प्राधान्य क्षेत्रांमध्ये सीपीएस संशोधन, नवोन्मेष आणि अनुप्रयोगांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय चौकट उपलब्ध करून देते.

हे अभियान शिक्षणक्षेत्र, उद्योग, सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांना एका समान व्यासपीठावर आणते. या एकत्रीकरणामुळे वैज्ञानिक संशोधन राष्ट्रीय प्राधान्यक्रम, औद्योगिक क्षमता आणि उदयोन्मुख बाजारपेठांशी जोडले जात आहेत. संशोधन आणि विकासापासून ते उत्पादन विकास आणि स्टार्टअप इनक्युबेशनपर्यंत संपूर्ण नवोन्मेष प्रवास यामध्ये समाविष्ट आहे.

NM-ICPS उदयोन्मुख सीपीएस क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय प्राधान्याच्या तंत्रज्ञानांचा विकास, मूलभूत कौशल्ये आणि विशेष तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करत आहे. देशभरात जागतिक दर्जाची बहुविषयक उत्कृष्टता केंद्र उभारली जात आहेत. ही केंद्रे प्रगत संशोधन, तंत्रज्ञान विकास, तज्ज्ञता आणि धोरणात्मक मार्गदर्शनासाठी केंद्रबिंदू म्हणून कार्य करतात.

या समन्वित दृष्टिकोनातून NM-ICPS भारताला महत्त्वाच्या राष्ट्रीय आव्हानांसाठी स्वदेशी सीपीएस पर्याय विकसित करण्याची क्षमता देत आहे. भारतीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेवर आधारित तंत्रज्ञानाधारित भविष्यासाठी संस्थात्मक पायाभरणी केली जात आहे.

 

सायबर-भौतिक भविष्याकडे भारताची झेप

सीपीएसला संशोधन प्रयोगशाळांमधून व्यावहारिक उपयोगांपर्यंत नेण्यासाठी भारत एक राष्ट्रीय परिसंस्था तयार करत आहे. NM-ICPS विशेष संस्था, कुशल प्रतिभा आणि औद्योगिक भागीदारीद्वारे ही परिसंस्था विकसित करत आहे.

या अभियानाअंतर्गत, सरकारने सेक्शन 8 कंपन्या म्हणून 25 तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रे (TIHs) स्थापन केली आहेत. ही केंद्रे देशभरातल्या प्रमुख शैक्षणिक संस्थांद्वारे चालवली जातात. ही केंद्रे चार विस्तृत क्षेत्रांमध्ये काम करतात: तंत्रज्ञान विकास; मानवी संसाधन विकास आणि कौशल्य विकास; नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्ट-अप विकास; आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य.

ही केंद्रे पारंपारिक संशोधन प्रक्रियांच्या पलीकडे जातात. ती तंत्रज्ञान मंच विकसित करतात, संशोधनाचे उत्पादनांमध्ये रूपांतर करतात आणि तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देतात. राष्ट्रीय पातळीवरची आव्हाने ओळखण्यासाठी आणि त्यावर व्यावहारिक उपाय विकसित करण्यासाठी ती सरकारी मंत्रालयांशी देखील जोडलेली आहेत. हा दृष्टिकोन वैज्ञानिक क्षमतांना समाज आणि अर्थव्यवस्थेच्या गरजांशी जोडतो.

तंत्रज्ञान विकासापासून तंत्रज्ञान रुपांतरणाकडे

हे अभियान आता आशादायक तंत्रज्ञानांना उपयोजन आणि व्यापारीकरणाकडे नेण्यावर अधिक भर देत आहे. 2025 मध्ये, उच्च कामगिरी करणाऱ्या 4 तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रांची टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशन रिसर्च पार्क्स (TTRPs) म्हणून निवड करून त्यांना पाठिंबा दिला गेला. हे पार्क्स आयआयटी कानपूर, आयआयएससी बंगळुरू, आयआयटी-आयएसएम धनबाद आणि आयआयटी इंदूर इथे स्थापन करण्यात आले. प्रत्येक TTRP एका धोरणात्मक तंत्रज्ञान डोमेनवर लक्ष केंद्रित करते. आयआयटी कानपूर सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करते, तर IISc बंगळुरू रोबोटिक्स आणि एआय प्रणालींवर भर देते. आयआयटी धनबाद खाण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते, त्यामध्ये उत्खननापासून खनिज शुद्धिकरणापर्यंतच्या प्रक्रियांचा समावेश आहे. आयआयटी इंदूर डिजिटल आरोग्यावर लक्ष केंद्रित करते. हे चार TTRPs तंत्रज्ञान रुपांतरण आणि व्यापारीकरणाला गती देण्यासाठी तयार केले आहेत.

तंत्रज्ञान, कौशल्य आणि उद्योगनिर्मिती

NM-ICPS आपल्या TIHs आणि TTRPs च्या माध्यमातून तंत्रज्ञान, कौशल्य आणि उद्योग यांना जोडणारी एकात्मिक परिसंस्था उभारत आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत या अभियानाने 1,146 तंत्रज्ञानांना चालना दिली असून, बौद्धिक संपदा निर्मिती आणि परवाना प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे. तसेच शेती, आरोग्य, खाण, सायबर सुरक्षा, प्रगत संवाद आणि पोझिशनिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये 1,329 तंत्रज्ञान उत्पादने विकसित करण्यात योगदान दिले आहे.

मानव संसाधन विकास आणि कौशल्यवृद्धी हे या परिसंस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. चाणक्य (Comprehensive and Holistic Advancement of National Knowledge Yield and Analytics) शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून पदवी, पदव्युत्तर, पीएचडी आणि पोस्टडॉक्टरल संशोधकांना मदत करण्यात येते. हा कार्यक्रम विशेष TIHs च्या माध्यमातून वास्तव समस्यांवर आधारित प्रकल्पांना निधी पुरवतो. ऑगस्ट 2026 पर्यंत या अभियानाअंतर्गत 5,824 शिष्यवृत्त्या देण्यात आल्या आहेत.

यासोबतच विविध कौशल्यविकास उपक्रमांमुळे भारतातील सीपीएस क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळ बळकट होत आहे. या अभियानाने 2.46 लाखांहून अधिक व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे.

हे अभियान संशोधनाधारित नवोन्मेषांना व्यापारी स्तरावर आणण्यासाठी उद्योजकतेलाही चालना देत आहे. याअंतर्गत 1,136 स्टार्टअप्स आणि स्पिन-ऑफ्सना प्रोत्साहन देण्यात आले असून 24,000 हून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय भागीदारींमुळे भारताच्या सीपीएस अर्थात सायबर-फिजिकल सिस्टम्स क्षमतांचा आणखी विस्तार झाला आहे. या मोहिमेअंतर्गत 200 आंतरराष्ट्रीय सहकार्य-करार करण्यात आले असून, यामुळे या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा सहभाग अधिक दृढ झाला आहे.

टीआयएचएस आणि टीटीआरपीएस चे विस्तारणारे जाळे संशोधन, कौशल्ये, उद्योजकता आणि उद्योग या क्षेत्रांमधील भारताच्या सीपीएस परिसंस्थेला बळकट करत आहे. एनएम-आयसीपीएस हे नाविन्यपूर्ण संकल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास गतिमानतेने करत असून, राष्ट्रीय प्राधान्यक्रमांसाठी स्वदेशी उपाययोजना विकसित करत आहे.

भारतजेन: सायबर-फिजिकल सिस्टीमच्या बौद्धिक स्तराचे बळकटीकरण

 

जसजसे सायबर-फिजिकल सिस्टीम अधिक बुद्धिमान होत आहे, तसतसे यंत्रे, माणसे आणि भौतिक पर्यावरण यांना जोडणारा एक महत्त्वाचा स्तर म्हणून कृत्रिम बुद्धीमत्ता उदयास येत आहे. या दिशेने, एनएम-आयसीपीएस अंतर्गत समर्थित भारतजेन, भारतीय भाषा आणि संदर्भांनुसार तयार केलेल्या सार्वभौम कृत्रिम बुद्धीमत्ता क्षमता विकसित करत आहे.

आयआयटी मुंबईच्या नेतृत्वाखाली आणि शैक्षणिक संस्थांच्या संघासह, भारतजेन टेक्स्ट, स्पीच आणि व्हिजन-लँग्वेज तंत्रज्ञानाचा विस्तार करते. त्याच्या नवीनतम परम-2 या पायाभूत मॉडेलमध्ये 17 अब्ज पॅरामीटर्स, निकष आहेत आणि ते सर्व 22 अनुसूचित भारतीय भाषांना समर्थन देते.

भारतजेनने 12 भारतीय भाषांना समर्थन देणारे श्रुतम स्पीच-टू-टेक्स्ट आणि सूक्तम टेक्स्ट-टू-स्पीच मॉडेलदेखील विकसित केले आहेत. डॉकबोध फ्रेमवर्क अंतर्गत विकसित केलेले पत्रम, जटिल भारतीय दस्तऐवजांमध्ये बहुभाषिक प्रवेशला सक्षम करते.

क्षेत्र-विशिष्ट मॉडेल्समध्ये आयुर्वेदासाठी आयुर् परम, कृषीसाठी ॲग्री परम आणि भारतीय कायदेशीर क्षेत्रासाठी लीगल परम यांचा समावेश आहे. या क्षमतांमुळे सायबर-फिजिकल सिस्टीम भारताच्या भाषिक विविधतेसाठी आणि क्षेत्र-विशिष्ट गरजांसाठी अधिक प्रतिसादक्षम बनू शकते.

स्वदेशी कृत्रिम बुद्धीमत्तेला जोडलेले फिजिकल सिस्टीम्ससोबत जोडून, भारतजेन अधिक सुलभ मानवी-यंत्र संवाद शक्य करू शकते. तसेच ते आरोग्यसेवा, कृषी, प्रशासन आणि इतर सार्वजनिक हिताच्या अनुप्रयोगांमध्ये स्थानिक पातळीवर सुसंगत निर्णय घेण्यासही मदत करू शकते. अशाप्रकारे, भारतजेन एक सार्वभौम, बहुभाषिक आणि बहुविध बुद्धिमत्तेचा स्तर जोडून भारताच्या सीपीएस परिसंस्थेला पूरक ठरते.

 

एनएम-आयसीपीएस: नवोन्मेषाचे वास्तविक परिणामात रूपांतर

सीपीएसची शक्ती प्रयोगशाळेच्या पलीकडील समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये आहे. एनएम-आयसीपीएस-समर्थित तंत्रज्ञान आता आरोग्यसेवा, कृषी, खाणकाम, दळणवळण, सायबर सुरक्षा आणि गतिशीलता या क्षेत्रांतील आव्हानांना सामोरे जात आहे.

आरोग्यसेवा

सीपीएस सतत देखरेख, सिम्युलेशन-आधारित उपचार आणि रोगाचे लवकर निदान यामध्ये परिवर्तन घडवत आहे. आयआयटी इंदौर येथील दृष्टी सीपीएस फाउंडेशनने मानवी शरीराचा डिजिटल ट्विन, चरक डीटी विकसित केला आहे. रोगाच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी आणि उपचारांची आभासी चाचणी घेण्यासाठी हे फुफ्फुसे, डोळे आणि हृदयाचे सिम्युलेशन करते.

डिजिटल ट्विन

डिजिटल ट्विन म्हणजे वास्तविक भौतिक वस्तू, प्रक्रिया किंवा प्रणालीची एक जिवंत, आभासी प्रतिकृती होय. मूळ वस्तू कशी कार्य करते आणि कशी वागते याचे अनुकरण करण्यासाठी, त्याचा मागोवा घेण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी, ते स्मार्ट सेन्सरकडून मिळणाऱ्या रिअल-टाइम डेटाचा वापर करते.

 

कृषी

सीपीएस पिके आणि शेताच्या स्थितीबद्दलच्या रिअल-टाइम डेटाचा वापर करून शेतकऱ्यांना निर्णय घेण्यास मदत करत आहे. आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी माती, हवामान आणि सूक्ष्म-हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ॲग्री-आयओटी फार्म मॅनेजमेंट सिस्टीम विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान शेतीची उत्पादकता सुधारताना पाणी आणि खतांच्या कार्यक्षम वापरास मदत करते.

 

खनन उद्योग

खनन उद्योगाच्या कामांमध्ये अनेकदा धोकादायक आणि दुर्गम ठिकाणांचा समावेश असतो. ड्रोन, रोबोटिक्स आणि दूरस्थ देखरेखीद्वारे सीपीएस सुरक्षितता सुधारत आहे. आयआयटी (आयएसएम) धनबाद येथील टेक्समिन हबने 50 किमी पर्यंत डेटा प्रसारित करण्यास सक्षम असलेले ड्रोन विकसित केले आहेत. यामुळे धोकादायक ठिकाणांवरील धोका कमी करून रिअल-टाइम देखरेख शक्य होते.

 

प्रगत दळणवळण आणि स्थाननिश्चिती

सीपीएस तंत्रज्ञान कमी सेवा असलेल्या प्रदेशांमध्ये विश्वसनीय आणि किफायतशीर कनेक्टिव्हिटीला समर्थन देत आहे. आयआयआयटी बंगळूरु येथे विकसित केलेले 5जी-ॲडव्हान्स्ड ओरान मॅसिव्ह मिमो रेडिओ युनिट (32टीआरआरयु) हे एक महत्त्वाचे यश आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान उच्च-गती, विश्वसनीय आणि किफायतशीर 5जी कनेक्टिव्हिटी सक्षम करते. दुर्गम भागांमध्ये प्रगत दळणवळण पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

 

सायबर सुरक्षा

भौतिक पायाभूत सुविधा डिजिटल पद्धतीने जोडल्या जात असल्यामुळे, सायबर धोक्यांपासून सायबर सुरक्षा प्रणालीचे संरक्षण करणे अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहे. आयआयटी कानपूर येथील आयहब एनटीआयएचएसी फाउंडेशन महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि सायबर सुरक्षा प्रणाली सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना विकसित करत आहे. त्याचे आयटी-ओटी सुरक्षा कार्य केंद्र माहिती तंत्रज्ञान आणि परिचालन तंत्रज्ञान वातावरणावर सतत देखरेख ठेवते. या हबने क्रिप्टोकरन्सी-संबंधित गुन्ह्यांच्या तपासात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना साहाय्य करण्यासाठी क्रिप्टो-फॉरेन्सिक साधने देखील विकसित केली आहेत.

 

मोबिलिटी, रोबोटिक्स आणि स्वायत्त प्रणाली

नियंत्रित चाचणी आणि बुद्धिमान प्रणालींच्या माध्यमातून सायबर सुरक्षा प्रणाली स्वायत्त वाहने आणि ड्रोनच्या अधिक सुरक्षित तैनातीस सक्षम करत आहे. आयआयटी हैदराबाद येथील तिहान फाउंडेशनने स्वायत्त नेव्हिगेशनसाठी भारतातील पहिले समर्पित चाचणी मैदान स्थापित केले आहे. हे चाचणी केंद्र हवाई आणि जमिनीवरील स्वायत्त वाहनांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरापूर्वी प्रमाणित करते. आयआयएससी बंगळूरु येथे, रोबोटिक्स आणि स्वायत्त प्रणालींसाठी असलेले आय-हब बुद्धिमान गतिशीलता उपाययोजनांना पुढे नेत आहे. त्याचे आयरास्ते ॲप्लिकेशन अपघातप्रवण ठिकाणे ओळखते आणि चालकांना रिअल-टाइम सूचना देते. ही प्रणाली सध्या नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालवली जात असून, इतर शहरांमध्ये तिचा विस्तार करण्याची योजना आहे.

हे अनुप्रयोग दर्शवतात की, एनएम-आयसीपीएस कशाप्रकारे प्रगत संशोधनाचे महत्त्वपूर्ण क्षेत्रांसाठी व्यावहारिक उपायांमध्ये रूपांतर करत आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, कौशल्ये आणि नवोन्मेष यांना सक्षम करून, हे अभियान अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम प्रणालींना सक्षम करत आहे. हे प्रयत्न भारताला तंत्रज्ञान-चालित आणि आत्मनिर्भर 'विकसित भारत'च्या दिशेने पुढे नेत आहेत.

 

तंत्रज्ञान-चालित आणि आत्मनिर्भर विक्सिट भारताच्या दिशेने

सायबर-फिजिकल सिस्टीम्स बौद्धिक पायाभूत सुविधा आणि प्रगत सार्वजनिक सेवांसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत. एनएम-आयसीपीएसच्या माध्यमातून, भारत वैज्ञानिक संशोधनाला राष्ट्रीय विकासाच्या प्राधान्यक्रमांशी जोडणाऱ्या क्षमता निर्माण करत आहे.

हे अभियान आरोग्यसेवा, कृषी, खाणकाम, दळणवळण, सायबर सुरक्षा आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये स्वदेशी उपायांना प्रोत्साहन देत आहे. याचे टीआयएच आणि टीटीआरपी संशोधनापासून ते प्रमाणीकरण, अंमलबजावणी आणि व्यापारीकरणापर्यंतच्या प्रवासाला गती देत आहेत.

भारतजेनसारखा उपक्रम या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सार्वभौम, बहुभाषिक कृत्रिम बुद्धीमत्ता क्षमतांची भर घालत आहे. एकत्रितपणे, हे प्रयत्न कनेक्टेड सिस्टीम्सना अधिक बुद्धिमान, सुरक्षित, सुलभ आणि भारतीय गरजांना प्रतिसाद देणाऱ्या बनवू शकतात. शिक्षण आणि उद्योग यांच्यातील अधिक मजबूत भागीदारीमुळे नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार आणखी वेगवान होईल. कुशल मनुष्यबळ, स्टार्ट-अप्स आणि जागतिक सहकार्यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताच्या क्षमतांचा विस्तार होईल.

स्वदेशी सीपीएसच्या व्यापक अंमलबजावणीमुळे अधिक स्मार्ट पायाभूत सुविधा, कार्यक्षम सेवा आणि नवीन आर्थिक संधींना पाठिंबा मिळू शकतो. म्हणूनच, एनएम-आयसीपीएस तंत्रज्ञान-चालित, नवनिर्मिती-प्रवर्तित आणि आत्मनिर्भर विक्सिट भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देत आहे.

 

संदर्भ

NM-ICPS

Ministry of Science & Technology

IIT Madras

Departmemt of Science & Technology

 

Click here to see pdf

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

(Explainer ID: 159846) आगंतुक पटल : 34
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Tamil , Kannada , Malayalam