Social Welfare

पंतप्रधान आदिवासी विकास मिशन

भारताच्या आदिवासी वन अर्थव्यवस्थेला नवी दिशा

Posted On: 20 AUG 2026 11:10AM

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2026

 

भारतातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येपैकी 10.4 कोटी जण त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा 20 ते 40 टक्के भाग गौण वनोपजांच्या (मायनर फाॅरेस्ट प्रोड्युस-एम एफ पी) विक्रीतून मिळवतात. ऐतिहासिकदृष्ट्या, आदिवासी उत्पादकांना आपला माल दलालांना अत्यंत कमी दराने विकावा लागत असे. परिणामी, त्यांच्या श्रमाच्या खर्चाचीही भरपाई होईल इतके उत्पन्न त्यांना मिळत नसे. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकार 'प्रधानमंत्री जनजातीय विकास मिशन' (पीएमजेव्हीएम) राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत आदिवासी समुदायांना ‘वन धन विकास केंद्रां’च्या (व्हीडीव्हीकेएस) माध्यमातून संघटित करून, कच्चा माल विकणाऱ्यांपासून मूल्यवर्धित उत्पादन करणारे उद्योजक बनवले जात आहे. आतापर्यंत 4,172 वन धन विकास केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून,12.48 लाख आदिवासी सदस्यांना या योजनेत सहभागी करण्यात आले आहे. याशिवाय, सरकार पूर्व-निर्धारित किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) हे गौण वनोपज खरेदी करते. पीएमजेव्हीएम उद्योगांसाठी निधी पुरवते आणि मेळे, ई-कॉमर्स मंच आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून आदिवासींना बाजारपेठ मिळवून देण्यास मदत करते.

 

आदिवासी वन अर्थव्यवस्थेचे संरक्षण

वनांमध्ये राहणाऱ्या लाखो आदिवासी कुटुंबांसाठी मध, तेंडूची पाने, महुआची फुले, चिंच, लाख, बांबू आणि विविध औषधी वनस्पती यांसारखी गौण वनोपजे ही केवळ वनातील साधनसंपत्ती नसून त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत आहेत. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा 20 ते 40 टक्के भाग हा या वनोपजांच्या विक्रीतून येतो. मात्र, थेट वनोपज गोळा करूनही आदिवासींना त्याच्या बाजारमूल्याचा अत्यंत अल्प हिस्सा मिळत असे. कारण त्यांना हा माल दलालांना अत्यंत कमी दरात विकावा लागत असे.

2021-22 मध्ये सुरू झालेल्या 'प्रधानमंत्री जनजातीय विकास मिशन'ने हे चित्र बदलण्याचे काम केले आहे. या योजनेच्या माध्यमातून आदिवासींना नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि वनोपजांच्या मूल्यवर्धनाची प्रक्रिया याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे वनोपजांचे मूल्यवर्धन करण्यासाठी त्यांना पद्धतशीर मार्ग उपलब्ध होतो. त्यांना अधिक वाव मिळावा आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढावी अशा पद्धतीने ही योजना या समुदायांना मोठ्या राष्ट्रीय आणि डिजिटल बाजारपेठांशी जोडते. तसेच, थेट खरेदीच्या माध्यमातून आदिवासींना किमान आधारभूत किंमत मिळण्याची हमी दिली जाते.

या प्रयत्नांमुळे वनोपज गोळा करणारे नागरिक आता त्यांच्या समुदाय-उद्योगांचे मालक बनत असून, तळागाळातील आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.

गौण वनोपज आणि किमान आधारभूत किंमत

पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सरकार बहुतांश जंगलांचे व्यवस्थापन करत असले, तरी आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या उपजीविकेचे साधन जपण्यासाठी या वनक्षेत्रात प्रवेश दिला जातो.

2006 मध्ये सरकारने 'अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता) कायदा' (फाॅरेस्ट राईट्स ॲक्ट) संमत केला. या कायद्यानुसार, "बांबू, झुडपे, खोडे, बांबूच्या काठ्या, रेशमाचे कोष, मध, मेण, लाख, तेंडू किंवा केंंदूची पाने, औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींची मुळे, कंद आणि यांसारख्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या सर्व लाकूड-व्यतिरिक्त वनोपजांना" गौण वनोपज (एमएफपी) म्हणून परिभाषित केले गेले आहे. सरकार पीएमजेव्हीएम अंतर्गत 87 गौण वनोपज वस्तूंसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करते.

वन हक्क कायदा वननिवासी समुदायांची उपजीविका ऐतिहासिकदृष्ट्या वनउत्पादनांवर अवलंबून असल्याचे मान्य करतो. या कायद्यांतर्गत आदिवासींना लाकूड वगळता इतर गौण वनोपज गोळा करून त्याची विक्री करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, 'पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा, 1996' (पीईएसए-पेसा) अंतर्गत आदिवासी ग्रामपंचायतींना गौण वनोपजांवर मालकी हक्क प्रदान करण्यात आले आहेत.

आदिवासी उत्पादनांचे विपणन (मार्केटिंग) आणि विकासाची जबाबदारी असलेल्या 'ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया' (ट्रायफेड-टीआरआयएफईडी) या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघा द्वारे बाजारातील किमतींचा विचार न करता पूर्व-निर्धारित दराने (एमएसपी) वनोपजांची खरेदी केली जाते. हे काम राज्य अंमलबजावणी यंत्रणांच्या (जसे की आदिवासी विकास सहकारी संस्था आणि वनविकास महामंडळे) जाळ्याद्वारे केले जाते. 2013-14 पासून, राज्य सरकारांनी या योजनेअंतर्गत 693.98 कोटी रुपये मूल्याचे 2,67,954 मेट्रिक टन गौण वनोपज खरेदी केले आहे.

 

पीएमजेव्हीएम आदिवासींना कशी मदत करते?

किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याव्यतिरिक्त, ही योजना आदिवासींना कौशल्य विकास, तांत्रिक साहाय्य, विपणन आणि पायाभूत सुविधा पुरवते.

वन धन विकास केंद्रांमध्ये आदिवासींचे संघटन

या मिशनद्वारे वनोपज गोळा करणाऱ्या आदिवासींना स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित केले जाते. सुमारे 300 आदिवासी सदस्यांचा समावेश असलेले 15 स्वयंसहाय्यता गट एका वन धन विकास केंद्रा अंतर्गत एकत्रित केले जातात. या व्हीडीव्हीकेमधील किमान 60 टक्के सदस्य अनुसूचित जमाती समुदायातील असणे बंधनकारक आहे.

14 एप्रिल 2018 रोजी सुरू करण्यात आलेली 'वन धन योजना' ही पीएमजेव्हीएमचा एक भाग आहे. ही योजना व्हीडीव्हीके मॉडेलचा पाया असून सर्व आदिवासी समुदायांमध्ये तिच्या अंमलबजावणीस बळ देते.

कौशल्य विकास, वित्तपुरवठा आणि तांत्रिक सहाय्य

सरकारकडून 'वन धन विकास केंद्रां'मध्ये गौण वन उत्पादने (एमएफपी) गोळा करणाऱ्यांसाठी कौशल्य विकास आणि इतर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; यामध्ये वनोपज वैज्ञानिक पद्धतीने गोळा करण्यासंबंधीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे.

स्वयंसहाय्यता गटांना पुढील गोष्टीदेखील पुरवल्या जातात:

  • लाभार्थ्याच्या घरी किंवा सरकारी अथवा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये स्थापित पायाभूत सुविधाविषयक सहाय्य
  • स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या गौण वनोपजांवर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी लागणारी उपकरणे म्हणजे उदा. कापणे, चाळणे यासाठी लागणारी साधने, साल काढण्यासाठीची यंत्रे (डिकॉर्टिकेटर्स), सुकविण्यासाठी ड्रायर्स आणि पॅकेजिंगची साधने
  • शाश्वत पद्धतीने काढणी आणि मूल्यवर्धन याविषयीचे 30 सदस्यांना प्रशिक्षण; तसेच कच्चा माल आणि प्रशिक्षणार्थी किट्सचा पुरवठा.
  • आर्थिक संस्था, बँका आणि 'राष्ट्रीय अनुसूचित आदिवासी वित्त आणि विकास मंडळ' (NSTFDC) यांच्याशी केलेल्या करारामधून खेळते भांडवल उपलब्ध होण्याची सोय.
  • साठवणूक आणि वाहतुकीची भाडेतत्त्वावर सुविधा.

विपणन आणि व्यवसाय सहाय्य

मूल्यवर्धनासोबतच, वन धन विकास केंद्रे ही अंतिम उत्पादनांसाठी स्थानिक आणि दूरवरच्या बाजारपेठांशी दुवा साधणारी केंद्रे देखील आहेत.

  • आदिवासींना त्यांनी उत्पादित केलेला माल विकणे सोपे जावे यासाठी, गौण वनोपज खरेदीची मुख्य केंद्रे असलेल्या स्थानिक हाट-बाजारांच्या जवळच्याच परिसरात वन धन विकास केंद्रे स्थापन केली जातात.
  • आदिवासी भागांमध्ये असे 5,000 हून अधिक हाट (बाजार) आहेत.
  • या हाटांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण केले जात असून त्यामध्ये पक्क्या बांधकामांसह साठवणूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, शेडची उभारणी आणि वजन करण्याची साधने या गोष्टींचा समावेश आहे.
  • वन धन विकास केंद्रांना आपल्या उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी किंवा त्यांच्या विपणनासाठी खाजगी संस्था किंवा ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांशी भागीदारी करता येऊ शकते.
  • वन धन विकास केंद्रांची व्यावसायिक सौद्यांबाबतची निर्णयक्षमता सुधारण्यासाठी ट्रायफेडद्वारे दैनंदिन भाव आणि ई-कॉमर्सच्या संधी यांसारखी बाजारपेठेसंबंधीची माहिती प्रसारित केली जाते.
  • पीएमजेव्हीएमअंतर्गत हे देखील सहाय्य पुरविले जाते:
  • महोत्सव, प्रदर्शने आणि कारागीर मेळ्यांच्या माध्यमातून आदिवासी उत्पादनांचे ब्रँडिंग, प्रचार आणि जाहिरात.
  • व्हीडीव्हीके आणि इतर योजनांतर्गत वनसंपदेचे जिओ-टॅगिंग
  • आदिवासी उत्पादनांसाठी भौगोलिक निर्देशक (जीआय हे चिन्ह विशिष्ट भौगोलिक उगमस्थान असलेल्या आणि त्या उगमस्थानामुळे विशिष्ट गुणधर्म किंवा लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांसाठी वापरले जाते)
  • संशोधन आणि विकासासाठी पाठबबळ

पीएमजेव्हीएम योजनेअंतर्गत:

  • 4,172 वन धन विकास केंद्रे मंजूर करण्यात आली असून त्यातील 2,911 केंद्रे सुरू झाली आहेत, त्यांनी सुमारे 168 कोटी रुपयांची (31 जुलै 2026 पर्यंत) विक्री नोंदवली आहे .
  • 12.48 लाख आदिवासी सदस्य वन धन विकास केंद्रांशी जोडले गेले आहेत.

वन धन विकास केंद्रांची आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणास मदत होत आहे

वनोपजांचे संकलन आणि विक्रीची बहुतांश कामे महिलांद्वारे केली जातात, ज्यामुळे पीएमजेव्हीएम आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे.

अरुणाचल प्रदेशातील लेपारादा जिल्ह्यातील 'निगामाने, हो योर्बे, मेडुम्हागदम' या 'वन धन विकास केंद्रा'ची (VDVK) स्थापना ऑक्टोबर 2021 मध्ये 300 महिला स्वयं-सहायता गट सदस्य आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून करण्यात आली. ही केंद्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या लाकडाव्यतिरिक्त अन्य वनोपज आणि कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यापासून विक्रीयोग्य उत्पादने तयार करते. या केंद्राद्वारे पुढील उत्पादने तयार करण्यात येतात:

  • 'किंग चिली'चे ( ईशान्य भारताची खासीयत असलेली — भूत जोलोकिया ही वैशिष्ट्यपूर्ण मिरची) लोणचे
  • बांबूच्या कोवळ्या कोंबांचे लोणचे (ईशान्य भारतातील सामान्य बिगर-लाकूड वन-उत्पादन)
  • स्थानिक पातळीवर पिकवलेल्या हळदीपासून बनवलेली हळदीची पूड
  • स्थानिक पातळीवर पिकवलेल्या आल्यापासून बनवलेली सुंठीची पूड
  • अननसापासून बनवलेले अननस जॅम (अरुणाचल प्रदेशात मुबलक प्रमाणात अननस पिकतात)
  • अननसापासून बनवलेला अननसाचा स्क्वॅश
  • संत्र्यांपासून बनवलेला संत्रा स्क्वॅश

येथील वन धन विकास केंद्राने 2022-23 पासून या उत्पादनांची 11 लाख रुपयांची विक्री केली आहे. यामुळे महिलांचे सक्षमीकरण झाले असून, उत्पन्नासाठी त्यांना आता वर्षभर केवळ हंगामी शेतीवर अवलंबून राहावे लागत नाही. या व्यवसायाची महिलांकडे संयुक्त मालकी आहे; त्यामुळे त्या केवळ कामगार नसून ब्रँड आणि व्यवसायातही त्या वाटेकरी आहे.

 

शाश्वत वन-अर्थव्यवस्थेच्या दिशेने

'प्रधानमंत्री जनजातीय विकास मिशन' (पीएमजेव्हीएम) हे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना उदरनिर्वासाठीच्या संधी उपलब्ध करून देते तसेच त्यांना लाकडाव्यतिरिक्त इतर वनोपजांचे उत्पादन आणि विपणन करण्यासाठी एक पद्धतशीर पर्याय उपलब्ध करून देत आहे. ही स्थानिक पातळीवर मिळणारी उत्पादने असून ती पारंपरिक पद्धतींवर आधारित आहे; अशा प्रकारे, ही सामुदायिक मालकी आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकता यांचा समतोल साधणारी वन-आधारित अर्थव्यवस्था आहे.

जगात मोठ्या प्रमाणावर उत्पादित आणि प्लास्टिकच्या वेष्टनात मिळणाऱ्या वस्तूंचे प्रमाण वाढत असताना ही उत्पादने भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनली आहेत: ती नैसर्गिक, समुदायाच्या मालकीची आणि थेट जंगलातून आलेली आहेत. 'पीएमजेव्हीएम' हे 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पनेचे मूर्तिमंत उदाहरण आहे; याद्वारे भारताच्या विकासाची गंगा देशातील सर्वात दुर्गम जंगलांपर्यंत आणि तिथे वास्तव्यास असलेल्या समुदायांपर्यंत पोहोचवली जात आहे. याचे पर्यवसन भारताच्या 'विकसित भारत @ 2047' चे ध्येय साकार करण्यात योगदान देण्याच्या रुपात होणार आहे.

 

संदर्भ

Ministry of Tribal Affairs:

Ministry of Finance:

 

Pradhan Mantri Janjatiya Vikas Mission

 

* * *

नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/मंजिरी गानू/दर्शना राणे

(Explainer ID: 159791) आगंतुक पटल : 185
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Tamil , Telugu , Kannada , Malayalam