• Sitemap
  • Advance Search
Infrastructure

रांगेपासून क्लिकपर्यंत : भारतीय रेल्वेतील प्रवासी आरक्षणाची चार दशकांची वाटचाल

Posted On: 06 AUG 2026 2:10PM

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2026

 

रांगांपासून क्लिकपर्यंत भारतीय रेल्वेने प्रवासी आरक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला आहे. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरक्षण व्यवस्थांपैकी एक व्यवस्था कार्यरत आहे. सातत्यपूर्ण आधुनिकीकरणामुळे आरक्षण प्रक्रिया अधिक जलद आणि विश्वासार्ह झाली असून, आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणालीमुळे अधिक स्मार्ट आणि सुलभ प्रवासाचा अनुभव निर्माण होत आहे.

 

रेल्वे आरक्षणाचा कणा

भारतीय रेल्वे दररोज जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एका जाळ्यावर लाखो प्रवाशांना जोडते. नोकरी, शिक्षण, आरोग्यसेवा, व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी विश्वासार्ह आरक्षण व्यवस्थेची आवश्यकता असते. प्रत्येक आरक्षित तिकिटामागे जवळपास चार दशकांपासून रेल्वे आरक्षणाचा तंत्रज्ञानाधारित कणा म्हणून प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) कार्यरत आहे. 1986 मध्ये सुरू झालेल्या पीआरएसने मॅन्युअल आरक्षण केंद्रांची जागा घेण्यापासून ऑनलाइन आणि मोबाईल तिकीट आरक्षणापर्यंत मोठी उत्क्रांती साधली आहे.

वापरकर्त्यांची संख्या आणि ऑनलाइन सेवांचा वापर वाढत गेल्याने अधिक जलद, विश्वासार्ह आणि सुलभ आरक्षण सुविधांची अपेक्षाही वाढली आहे. विशेषतः तत्काळ आरक्षणाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होते, त्यामुळे वेगळ्या काळातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण येतो. या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे पीआरएसचे व्यापक आधुनिकीकरण करत आहे. नवीन पीआरएसमुळे आरक्षण क्षमता वाढेल, प्रवाशांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि अधिक सक्षम ऑनलाइन पायाभूत व्यवस्था निर्माण होईल.

 

प्रवासी आरक्षण प्रणालीची चार दशकांची वाटचाल

पीआरएस ही भारतीय रेल्वेच्या संपूर्ण जाळ्यात आरक्षित तिकिटांची व्यवस्था करणारी संगणकीकृत प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे प्रवाशांना आरक्षित तिकिटांचे आरक्षण, बदल आणि रद्द करणे शक्य होते. तसेच आसन वाटप, प्रतीक्षा यादी, आरक्षण रद्द झाल्यास उपलब्ध होणाऱ्या जागांची व्यवस्था (आरएसी), आरक्षण तक्ते आणि प्रवाशांच्या चौकशीची व्यवस्थाही पीआरएसद्वारे केली जाते. आरक्षण केंद्रे आणि ऑनलाइन आरक्षण माध्यमांना जोडल्यामुळे रेल्वे आरक्षण अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुलभ झाले आहे.

पीआरएसने मॅन्युअल आरक्षण नोंदवही आणि काउंटरवर आधारित तिकीट आरक्षणाची जागा इलेक्ट्रॉनिक व्यवस्थेने घेतली. रेल्वेचे जाळे विस्तारत गेले तसे पीआरएसचेही देशव्यापी आरक्षण व्यवस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे प्रवाशांना देशातील कोणत्याही ठिकाणाहून देशभरातील रेल्वेगाड्यांसाठी तिकिटांचे आरक्षण करता येऊ लागले.

देशव्यापी संगणकीकृत सुधारित आरक्षण आणि तिकीट प्रणाली (कंट्री-वाइड नेटवर्क फॉर कम्प्युटराइज्ड एन्हान्स्ड रिझर्व्हेशन अँड टिकटिंग - कॉन्सर्ट)च्या माध्यमातून पीआरएसचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही जोडलेल्या आरक्षण केंद्रातून, रेल्वेगाडीचे सुरुवातीचे किंवा अंतिम स्थानक कोणतेही असले तरी, प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येऊ लागले. कालांतराने आरक्षण केंद्रांव्यतिरिक्त वेबसाइट आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनही आरक्षणाची सुविधा उपलब्ध झाली. आज प्रवासी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाच्या (आयआरसीटीसी) वेबसाइट आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पीआरएसचा ऑनलाइन वापर करू शकतात. त्यामुळे कोणत्याही ठिकाणाहून आरक्षित तिकिटांचे बुकिंग करणे शक्य झाले आहे.

पीआरएसच्या उत्क्रांतीतील महत्त्वाचे टप्पे

वर्ष

महत्त्वाचा टप्पा

1986

पीआरएस सुरू करण्यात आली. भारतातील संगणकीकृत रेल्वे आरक्षणाची सुरुवात झाली.

1990 चे दशक

रेल्वेच्या विविध विभागांमध्ये पीआरएस नेटवर्कचा विस्तार करण्यात आला आणि परस्पर जोडलेल्या देशव्यापी नेटवर्कद्वारे आरक्षण शक्य झाले.

2002

इंटरनेट आधारित तिकीट आरक्षण सुरू झाले. त्यामुळे प्रत्यक्ष आरक्षण केंद्रांच्या पलीकडे आरक्षण सेवा उपलब्ध झाली.

2014

ऑनलाइन आरक्षण क्षमता आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी नेक्स्ट जनरेशन ई-तिकीटिंग (एनजीईटी) प्रणाली सुरू करण्यात आली.

2025

रेलवन ॲप सुरू करण्यात आले. सरकारने अधिक क्षमतेच्या पुढील पिढीतील पीआरएस विकसित करण्याची घोषणा केली.

ऑगस्ट 2026

सुधारित पीआरएसकडे रेल्वेगाड्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सुरू झाले. रेल्वे आरक्षणाच्या डिजिटल परिवर्तनाच्या नव्या टप्प्याची सुरुवात झाली.

या उपक्रमांमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत झाली.

 

मोठ्या प्रमाणावर कार्यरत डिजिटल व्यासपीठ म्हणून पीआरएस

जून 2025 ते जून 2026 या कालावधीत प्रवाशांनी पीआरएसद्वारे 65.08 कोटी आरक्षित तिकिटांचे बुकिंग केले. यापैकी 57.90 कोटी तिकिटे, म्हणजेच 89 टक्के तिकिटे ऑनलाइन बुक करण्यात आली. यावरून रेल्वे प्रवाशांकडून डिजिटल सेवांचा वेगाने स्वीकार होत असल्याचे दिसून येते.

सध्या पीआरएस हे जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन रेल्वे आरक्षण व्यासपीठांपैकी एक आहे. रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (सीआरआयएस) यांनी ही प्रणाली विकसित केली असून तिची देखभालही त्यांच्याकडून केली जाते. विविध आरक्षण माध्यमांद्वारे पीआरएस दररोज 20.5 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देते. पीआरएसमधील सुमारे 73 टक्के व्यवहार रोखरहित पद्धतीने होतात. त्यामुळे पीआरएस हे भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या डिजिटल व्यासपीठांपैकी एक बनले आहे.

डिजिटल भारताच्या गरजांची पूर्तता

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेला अधिक मोठ्या प्रमाणावर व्यवहार हाताळण्यास सक्षम, तसेच जलद, विश्वासार्ह आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या आरक्षण प्रणालीची आवश्यकता आहे.

आरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुधारणा केल्या आहेत :

  • आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांच्या आरक्षणाच्या पद्धतीशी तो अधिक सुसंगत झाला आहे.
  • पारदर्शकता आणि समानता वाढवण्यासाठी जुलै 2025 मध्ये आधार प्रमाणीकरणावर आधारित तत्काळ आरक्षण सुरू करण्यात आले.
  • स्वयंचलित बॉट्स आणि अनधिकृत एजंटांकडून होणारा गैरवापर रोखण्यासाठी त्यानंतर ओटीपी-आधारित पडताळणी सुरू करण्यात आली. 2010 मध्ये इटॅनियम सर्व्हर आणि ओपनव्हीएमएस प्लॅटफॉर्मवर कार्यान्वित करण्यात आलेली विद्यमान पीआरएस त्या काळातील डिजिटल मागणीच्या प्रमाणानुसार तयार करण्यात आली होती. आता या प्रणालीचे क्लाउड-आधारित, पुढील पिढीच्या आरक्षण प्रणालीमध्ये आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

अद्ययावत करण्यात आलेल्या पीआरएस प्रणालीमुळे पुढील सुविधा उपलब्ध होणार आहेत :

  • विद्यमान प्रणालीतील प्रतिमिनिट 32 हजार तिकीट आरक्षणांच्या तुलनेत, आता 1.5 लाखांहून अधिक तिकीट आरक्षणे करता येणार आहेत.
  • सध्या प्रतिमिनिट 4 लाख चौकशींच्या तुलनेत, आता 40 लाखांहून अधिक चौकश्या हाताळण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.
  • तिकीट आरक्षण व चौकशीसाठी बहुभाषिक आणि वापरकर्ता-अनुकूल (यूजर-फ्रेंडली) इंटरफेस उपलब्ध होणार आहे.
  • भविष्यातील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रणाली अधिक विस्तारक्षम (स्केलेबल), लवचिक आणि विश्वासार्ह करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) चे संकेतस्थळही नव्याने विकसित करण्यात आले आहे. जुलै 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या बीटा आवृत्तीत सुलभ इंटरफेस, कमी टप्प्यांत तिकीट आरक्षणाची सुविधा आणि सर्व श्रेणींतील आसन उपलब्धतेची माहिती देण्यात आली आहे. नवीन पोर्टल पुढील पिढीच्या पीआरएस (PRS) प्रणालीशी एकात्मिक करण्यात येणार असून, त्यामुळे तिकीट आरक्षणाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

रेल्वे तिकीट आरक्षणाव्यतिरिक्त, आयआरसीटीसी आपल्या पर्यटन प्लॅटफॉर्मद्वारे हॉटेल बुकिंग, रिटायरिंग रूम, लाउंज बुकिंग, पर्यटन पॅकेजेस, विमान तिकीट आणि बस तिकीट आरक्षण यांसारख्या प्रवासाशी संबंधित विविध सुविधा देखील उपलब्ध करून देते.

 

सीआरआयएस (CRIS): भारतीय रेल्वेच्या तंत्रज्ञान परिवर्तनाला गती देणारी संस्था

1986 मध्ये स्थापन झालेली सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) ही संस्था भारतीय रेल्वेसाठी माहिती-तंत्रज्ञान (IT) पायाभूत सुविधा विकसित करणे, त्यांची उभारणी करणे आणि देखभाल करण्याचे काम करते. गेल्या जवळपास चार दशकांत सीआरआयएसने रेल्वे आरक्षणाच्या संगणकीकरणापासून ते एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यापर्यंत मोठी प्रगती केली आहे. सध्या, सीआरआयएसच्या विविध तंत्रज्ञान प्रणालींचा लाभ दररोज लाखो प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी घेत आहेत.

प्रवाशांकेंद्रित डिजिटल सेवा

सीआरआयएसने (CRIS) पीआरएससह अनेक डिजिटल प्रणाली विकसित केल्या असून, त्यामुळे प्रवाशांचा भारतीय रेल्वेशी संवाद अधिक सुलभ आणि आधुनिक झाला आहे.

  • अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS): अनारक्षित प्रवासासाठी पेपरलेस आणि मोबाईलद्वारे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते.
  • नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिम (NTES): रेल्वेगाड्यांचे रिअल-टाइम धावते स्थान, वेळापत्रक तसेच आगमन आणि प्रस्थानाची माहिती उपलब्ध करून देते.
  • रेलकनेक्ट : 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या मोबाईल अॅपद्वारे पीआरएसच्या सेवा स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्या. यामध्ये ऑनलाइन तिकीट आरक्षण, तिकीट रद्द करणे आणि पीएनआर चौकशीची सुविधा आहे.
  • रेलवन : जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आलेले हे एकात्मिक मोबाईल अॅप असून, रेल्वेच्या विविध सेवा एकाच इंटरफेसवर उपलब्ध करून देते. 22 जुलैपर्यंत अँड्रॉइड आणि आयओएसवर या अॅपचे 4.55 कोटींहून अधिक डाउनलोड्स झाले आहेत. सध्या या अॅपद्वारे दररोज सुमारे 9.65 लाख तिकीट आरक्षणे केली जात आहेत. या अॅपमधील नव्या सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित वेटिंग लिस्ट तिकीट कन्फर्मेशन अंदाज ही सुविधा समाविष्ट आहे. तिकीट आरक्षणाच्या वेळीच वेटिंग लिस्ट तिकीट निश्चित होण्याची शक्यता यामध्ये दर्शविली जाते. या अंदाजाची अचूकता 53 टक्क्यांवरून 94 टक्क्यांपर्यंत वाढली असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक माहितीपूर्ण प्रवास नियोजन करता येते.
  • रेलमदद : प्रवाशांच्या तक्रारी, अभिप्राय आणि सेवा विनंत्यांसाठी एकात्मिक व्यासपीठ उपलब्ध करून देते. रेलमदद संकेतस्थळ, मोबाईल अॅप, एसएमएस आणि रेल्वे हेल्पलाईन 139 द्वारे प्रवासी मदत मिळवू शकतात. तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी या प्रणालीमध्ये स्वयंचलित तक्रार हाताळणी आणि स्वयंचलित एस्कलेशन सुविधा उपलब्ध आहे.

वर्ष

निराकरण झालेल्या तक्रारींची टक्केवारी

2023-2024

99.98%

2024-2025

99.99%

2025-2026

99.98%

 

  • कोचमित्र : प्रवासादरम्यान हाऊसकीपिंग, स्वच्छता तसेच इतर आवश्यक मदतीसाठी प्रवाशांना विनंती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
  • रेल सुगम : रेल्वे सेवा, मालवाहतूक आणि प्रवाशांसाठी उपलब्ध विविध सुविधांची माहिती प्रदान करते.
  • रेल राजभाषा : डिजिटल साधनांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनात हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणारी प्रणाली.

 

रेल्वेच्या कार्यप्रणालीला बळ देणारी तंत्रज्ञान प्रणाली

प्रवासी सेवांव्यतिरिक्त, सीआरआयएसने (CRIS) रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या अनेक डिजिटल प्रणाली विकसित केल्या आहेत.

  • फ्रेट ऑपरेशन्स इन्फॉर्मेशन सिस्टिम (FOIS): मालवाहतुकीची हालचाल, वॅगन व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स नियोजनाचे डिजिटायझेशन करते.
  • क्रू मॅनेजमेंट सिस्टिम (CMS): रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे नियोजन, नियुक्ती आणि देखरेखीची प्रक्रिया अधिक सुलभ करते.
  • ई-दृष्टी (eDrishti): रेल्वेची कामगिरी आणि विविध कार्यप्रणाली निर्देशकांवर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड उपलब्ध करून देते.
  • आपूर्ती : खरेदी आणि निविदा (टेंडर) व्यवस्थापनाची प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पाडते.
  • चालक दल आणि हँड-हेल्ड टर्मिनल्स: क्षेत्रीय कामकाज, तपासण्या आणि रिअल-टाइम देखरेखीसाठी सहाय्य करतात.

 

उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार

सीआरआयएस (CRIS) प्रगत डिजिटल उपाययोजनांच्या माध्यमातून रेल्वे तंत्रज्ञानाचे सातत्याने आधुनिकीकरण करत आहे. संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), बिग डेटा अॅनालिटिक्स आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यांसह ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) तसेच ऑगमेंटेड/व्हर्च्युअल रिअॅलिटी (AR/VR) या तंत्रज्ञानांचा विविध रेल्वे सेवांमध्ये वापर करत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग पुढील बाबींसाठी केला जात आहे :

  • रेल्वेगाड्यांचा विलंब आणि वेटिंग लिस्ट तिकीट निश्चित होण्याचा अंदाज वर्तविणे.
  • रेल्वे मार्ग आणि वेळापत्रक अधिक परिणामकारकपणे नियोजित करणे.
  • ऊर्जा वापराचा अंदाज बांधणे.
  • रेल्वे मालमत्तेची पूर्वानुमानाधारित (Predictive) देखभाल करणे.
  • नियोजन आणि कार्यप्रणालीशी संबंधित निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी करणे.

पुढील पिढीची पीआरएस (Passenger Reservation System) ही प्रणाली याच तांत्रिक पायावर विकसित करण्यात आली आहे. क्लाऊड-सक्षम पायाभूत सुविधांसह प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रणाली अधिक वेगवान, स्मार्ट आणि विस्तारक्षम आरक्षण व्यवस्था उपलब्ध करून देते.

 

भविष्यासाठी सज्ज आरक्षण परिसंस्था

प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ही गेल्या जवळपास चार दशकांतील भारतीय रेल्वेच्या डिजिटल परिवर्तनाचे प्रतीक आहे. आज ही प्रणाली देशभरातील लाखो प्रवाशांचा विश्वास संपादन केलेले आरक्षण व्यासपीठ बनली आहे. याच भक्कम पायावर पुढील पिढीची पीआरएस विकसित करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे रेल्वेच्या सेवा अधिक वेगवान, विश्वासार्ह आणि अखंड होणार आहेत. प्रवाशांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज अशी आधुनिक आणि सक्षम आरक्षण परिसंस्था उभारत आहे.

 

संदर्भ

Centre for Railway Information Systems:

Ministry of Railways

 

Click to see PDF

 

* * *

नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा/हेमांगी केणेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Explainer ID: 159585) आगंतुक पटल : 37
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Tamil , Telugu , Kannada , Malayalam