Social Welfare
क्रीडाक्षेत्रातील भारताची प्रगती
जागतिक स्तरावर चमकदार कामगिरीसाठी खेलो इंडिया उपक्रमाचे योगदान
Posted On:
03 AUG 2026 5:10PM
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
|
सुधारित खेलो इंडिया योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मिळालेली मंजुरी हे भारताच्या क्रीडाप्रवासातील एक महत्वाचे पाऊल आहे. यासाठी साल 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी केलेल्या रु 36441 कोटीच्या तरतुदीमुळे राष्ट्रीय क्रीडा महामंडळांना वाढीव मदत मिळू शकेल. गुणवान होतकरू खेळाडूंचा शोध घेणे, त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळवून देणे, त्यासाठी मदतीचा हात देणे, इत्यादी मार्फत लहान गावातील प्रतिभावंत खेळाडूंना जागतिक स्तरापर्यंत नेण्यासाठी या योजनेचा उपयोग होत आहे. या योजनेतून अशा अनेक उपक्रमांद्वारे भविष्यकाळातील पदकविजेते घडवले जात आहेत.
|
क्रीडाक्षेत्रात भारताची वाटचाल
क्रीडाक्षेत्रात रस घेतल्यास देशाच्या मानसिकतेमध्ये मोठा बदल होऊ शकतो, व्यक्तिमत्व विकास होतो आणि देशाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळू शकते. यामुळे नागरिकांचे चारित्र्य घडते आणि आत्मविश्वास निर्माण होतो, या सर्वांमुळे आपला देश क्रीडा क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येऊ शकतो. मैदानावर मिळणाऱ्या विजयामुळे प्रचंड राष्ट्रीय अभिमान जागृत होतो आणि जात, पंथ व धर्माच्या पलीकडे जाऊन तो लोकांना एकत्र आणू शकतो. या सामायिक अभिमानामुळे अधिक आनंदी, निरोगी आणि एकोप्याने नटलेला समाज घडवण्यास मदत होते.

भारताची सर्वात मोठी क्रीडा-विषयक संपदा म्हणजे येथील युवाशक्ती होय. देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील वयोगटातील आहे. ही प्रचंड क्षमता ओळखून, देशभरात युवा विकासाला आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याचे कार्य 'युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय' सातत्याने करत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये या मंत्रालयासाठी विक्रमी 4,479.88 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; 2013-14 मध्ये ही रक्कम 1,219 कोटी रुपये इतकी होती.
या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी 'खेलो इंडिया' हा कार्यक्रम आहे, आणि आता त्याचा आवाका खूप वाढला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेच्या विस्तारास मंजुरी दिली असून, हा विस्तार केवळ स्पर्धा सहभाग आणि पायाभूत सुविधांच्या विकासापुरता मर्यादित न राहता त्याही पलीकडे जाणार आहे.
शाळेची मैदाने आणि गावातील शिवारांमध्ये खेळणाऱ्या तरुण खेळाडूंना आता पुढे जाण्यासाठी एक अधिक सुस्पष्ट मार्ग मिळेल. होतकरू व प्रतिभावंत खेळाडूंची गुणवत्ता त्यांच्या लहानपणीच ओळखता आली तर त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आणि नियमित स्पर्धासहभागाच्या संधी उपलब्ध करून देता येतील. अधिक मजबूत संस्थागत पाठबळ आणि व्यापक भागीदारीमुळे होतकरू खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट दर्जा प्राप्त करण्यासाठी स्थिरपणे वाटचाल करता येणे शक्य होईल. इतर अनेक प्रमुख उपक्रमांच्या जोडीने, 'खेलो इंडिया' मुळे भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सहभाग वाढतो आहे आणि क्रीडा उत्कृष्टतेला प्रोत्साहन मिळते आहे. या सर्व उपक्रमांमधून प्रत्येक स्तरावरील प्रतिभा ओळखण्यासाठी आणि जोपासण्यासाठी पायाभूत सुविधा, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते आहे. भौगोलिक परिस्थिती, मर्यादित संसाधने किंवा संधीचा अभाव यामुळे कोणत्याही प्रतिभावंत खेळाडूला मागे राहावे लागू नये, यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.
क्रीडा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत भारताने केलेल्या भक्कम पायाभरणीच्या जोरावर क्रीडाजगतात मोठी झेप घेण्याचा आत्मविश्वास देशाला मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने पदकतालिकेत मिळवलेले चौथे स्थान म्हणजे याच आत्मविश्वासाचे दृश्यरूप आहे. अशा विशेष प्रसंगांमध्ये पदकांहूनही अधिक महत्वाचे काहीतरी हाती लागत असते.
‘खेलो इंडिया’ दृष्टिचित्र

भारतीय क्रीडाक्षेत्राचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी 2017 साली सुरु करण्यात आलेल्या खेलो इंडिया उपक्रमात आधीच्या तीन उपक्रमांचा समावेश केला गेला होता. राजीव गांधी खेल अभियान, शहरी क्रीडा पायाभूत सुविधा योजना व राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध योजना यांचा समावेश असलेल्या या संयुक्त यंत्रणेतून क्रीडा क्षेत्र विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
क्रीडा परिसंस्थेचा प्रत्येक स्तर बळकट बनवण्यासाठी या योजनेद्वारे सर्वसमावेशक प्रयत्न केले जात आहेत. तिचे प्रमुख पाच आधारस्तंभ आहेत :
- गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या क्रीडाप्रकारात सर्वोत्कृष्ट निपुण करण्यासाठी विविध स्तरांवर प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे.
- समर्पित विकास कार्यक्रमांतून क्रीडाप्रशिक्षक आणि इतर सहकारी कर्मचाऱ्यांची फळी उभारणे
- क्रीडाविज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खेळाडूंची कामगिरी सुधारणे
- विविध स्तरांवर स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना चढाओढीची संधी मिळवून देणे व चैतन्यमयी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहित करणे.
- क्रीडा प्रशिक्षण व स्पर्धात्मक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा परिसंस्था उभारणे.
या मोहिमेअंतर्गत सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या प्रत्येक जिल्ह्यात एका खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राचे नियोजन केले गेले आहे. तसेच प्रत्येक खेळाडूला क्रीडाविज्ञानावर आधारित मानसिक स्वास्थ्य व पोषक आहाराचे नियोजन करून मिळावे यावर भर दिला गेला आहे. प्रत्येक खेळाडूच्या प्रत्यक्षात सुरु असलेल्या वाटचालीचा मागोवा घेणारे डेटा आधारित मंच कार्यरत आहेत. भारताची गणना 2036 सालापर्यंत क्रीडाक्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांमध्ये व्हावी यासाठी हे एकात्मिक प्रयत्न सुरु आहेत.
|
‘खेलो इंडिया'मधील वाढती गुंतवणूक
|
|
2017-18 ते 2019-20: योजनेच्या पुनर्रचनेसाठी तीन वर्षांकरिता 1,756 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी.
2020-21: एका वर्षासाठी 328.77 कोटी रुपयांची तरतूद.
2021-22 ते 2025-26: उपक्रमांचा विस्तार आणि क्रीडा पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने, पाच वर्षांसाठी आर्थिक तरतूद वाढवून 3,790.50 कोटी रुपये करण्यात आली.
2026-27: ही योजना आता परिणाम-केंद्रित अंमलबजावणीच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत असल्याने , तिला अधिक पाठबळ मिळण्याच्या दृष्टीने 924.35 कोटी रुपयांची तरतूद;
|

खेलो इंडिया' योजनेच्या प्रमुख कामगिरीमध्ये (जुलै 2026 पर्यंत) खालील बाबींचा समावेश आहे:
- एकूण ₹3,176 कोटींच्या गुंतवणुकीसह 349 नवीन क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी.
- तळागाळातील प्रशिक्षण आणि खेळाडूंना मिळणारा पाठिंबा बळकट करण्यासाठी 1,067 'खेलो इंडिया केंद्रां'ची (KICs) स्थापना.
- विविध क्रीडा प्रकारांमधील क्रीडा-प्रतिभेला वाव देण्यासाठी 267 अकादमींना सहाय्य.
- प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, वैद्यकीय सुविधा आणि मासिक निर्वाह भत्ता (out-of-pocket allowance) देऊन 2,745 'खेलो इंडिया ॲथलीट्स'ना (KIAs) सहाय्य.
'खेलो इंडिया' मधील सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि स्पष्ट दीर्घकालीन नियोजनाद्वारे, गुणवान विजेत्या खेळाडूंची एक भक्कम फळी भारतात तयार केली जात आहे .
सुधारित 'खेलो इंडिया' योजना: तळागाळापासून जागतिक स्तरावरच्या यशापर्यंतचा प्रवास
'खेलो इंडिया' योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधीत एका मोठ्या विस्तारलेल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. या योजनेसाठी 36,441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा महासंघांना मिळणाऱ्या वाढीव मदतीचाही समावेश आहे.
सर्वसमावेशक खेळाडू विकास पथदर्शी योजना :
याअंतर्गत आता प्रथमच तरुण क्रीडापटूंना अगदी लहान वयातील किंवा लहान गावातील होतकरू खेळाडू शोधून काढण्यापासून प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सहभाग आणि ऑलिम्पिकसाठी विशेष तयारी करून घेतली जाईल. या देशभरात रुजलेल्या क्रीडा परिसंस्थेमुळे खालील बाबी घडून येतील :
- राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे
- खेलो इंडिया उत्कृष्टता केंद्रे
- राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ची प्रशिक्षण केंद्रे
- खेलो इंडिया पुरस्कृत क्रीडा अकादमी
- खेलो इंडिया केंद्रे
- सशस्त्र दलांच्या युवा क्रीडा तुकड्या
या सर्व संस्था एकत्रितपणे देशभरातील क्रीडापटूंना आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण, व क्रीडाविज्ञान आधारित मार्गदर्शन देऊ करतील.
या योजनेत खेलो इंडिया साठी खेळाडू तयार करणाऱ्या खेलो इंडिया फीडर शाळा व खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालये सुरु केली जात आहेत,. यामध्ये मुख्य प्रवाहातील औपचारिक शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षण एकत्रितपणे सुरु राहील. यामुळे होतकरू क्रीडापटूंना लवकर ओळखून त्यांच्या नियोजनबद्ध विकासाची व्यवस्था सुरु होईल.
भारताच्या क्रीडापटूंची भक्कम फळी उभारणे व तिचा विस्तार :
नवीन 'उदयोन्मुख खेलो इंडिया खेळाडू' श्रेणीमुळे संघटित खेळाडूंचा समूह जवळपास दहा पटीने वाढेल. एक अधिक सक्षम प्रतिभा ओळख प्रणाली तसेच तळागाळातील स्पर्धांपासून खेलो इंडिया आणि टारगेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टॉप्स)पर्यंतचा एक स्पष्ट मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना सुरुवातीच्या टप्प्यापासून आंतरराष्ट्रीय उत्कृष्टतेपर्यंत निरंतर मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल.
अधिक स्पर्धा आणि व्यापक संधी
शाळा, विद्यापीठ, प्रादेशिक आणि विविध क्रीडा-विशिष्ट लीग खेळाडूंना नियमित स्पर्धात्मक अनुभव प्रदान करतील. महिला, पॅरा-ॲथलीट आणि स्वदेशी खेळांसाठी अधिक संधी निर्माण केल्या जातील, तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांकरिता अधिक सक्षम पाठिंबा दिला जाईल.
तंदुरुस्ती, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान
विस्तारित 'फिट इंडिया चळवळ' सक्रिय जीवनशैली आणि क्रीडा सहभागाला प्रोत्साहन देईल. एक राष्ट्रीय प्रशिक्षक मान्यता मंडळ स्थापन करून प्रशिक्षणाचे दर्जेदार प्रशिक्षण सुनिश्चित करेल. तसेच खेळाडूंची माहिती, क्रीडा पायाभूत सुविधा, स्पर्धा, मूल्यमापन आणि निधी यांचे एकत्रित व्यवस्थापन करणारे एकसंध डिजिटल व्यासपीठ विकसित केले जाईल.
क्रीडा उत्कृष्टतेसाठी भागीदारी
खाजगी अकादमी आणि कॉर्पोरेट संस्थांसोबतची भागीदारी क्रीडा विकासात गुंतवणूक आणि कौशल्य आणेल. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना वाढीव पाठिंबा मिळाल्याने प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, उपकरणे, सराव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव अधिक मजबूत होईल.
भारताच्या जागतिक क्रीडा महत्त्वाकांक्षांना चालना
'खेलो भारत नीती 2025' आणि 'राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020' यांच्याशी सुसंगत असलेली ही योजना क्रीडा, शिक्षण, तंदुरुस्ती, तंत्रज्ञान आणि उच्च-कार्यक्षमता क्रीडा प्रशिक्षण यांचा समन्वय साधते. ही योजना 2030 च्या राष्ट्रकुल खेळांची तयारी, भारताच्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक यजमानपदाच्या महत्त्वाकांक्षा, आणि 'विकसित भारत@2047' च्या संकल्पनेला पाठबळ देईल.
खेलो इंडिया स्पर्धा: भावी विजेत्यांसाठी एक व्यासपीठ
2018 मध्ये 'खेलो इंडिया स्कूल गेम्स'च्या शुभारंभाने 'खेलो इंडिया' चळवळीने एका नव्या टप्प्यात प्रवेश केला. नवी दिल्ली येथे आयोजित या स्पर्धेने देशभरातील तरुण क्रीडा प्रतिभेला एका व्यासपीठावर आणले.
त्याच वर्षी, भारतीय ऑलिम्पिक संघटना या उपक्रमात सामील झाली. 2019 पासून, या स्पर्धेचे नाव बदलून 'खेलो इंडिया युथ गेम्स' (केआयवायजी) असे ठेवण्यात आले. ही स्पर्धा 'खेलो इंडिया'च्या छत्राखालील प्रमुख स्पर्धा म्हणून आजही सुरू आहे.

खेलो इंडिया गेम्सने विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विस्तार केला आहे. वार्षिक स्पर्धांमध्ये आता आपापल्या राज्यांचे आणि विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणारे स्पर्धक एकत्र येतात. त्यामुळे या खेळाडूंना स्पर्धा करण्यास, उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणि उच्च स्तरांवरील स्पर्धांची तयारी करण्यासाठी संधी मिळते. 2018 पासून, 63,000 हून अधिक खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा (केआययुजी) आणि खेलो इंडिया शीतकालीन स्पर्धा (केआयडब्ल्यूजी) 2020 मध्ये सुरू करण्यात आल्या. त्यानंतर 2023 मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स (केआयपीजी) सुरू झाले. 2025 मध्ये खेलो इंडिया बीच गेम्स (केआयबीजी) आणि खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या आयोजनाने हा विस्तार सुरूच राहिला. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स (केआयटीजी) 2026 मध्ये सुरू झाले.
खेलो इंडिया स्पर्धा तरुण खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ देऊन भारताची क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करत आहेत.
भारताच्या क्रीडा यशाला सक्षम करणे
भारताची क्रीडा क्षेत्रातील प्रगती पायाभूत सुविधा आणि स्पर्धांच्या पलीकडे विस्तारलेली आहे. अनेक केंद्रित उपक्रम खेळाडूंच्या विकासाला बळकटी देतात, उदयोन्मुख प्रतिभा शोधून काढतात आणि दीर्घकालीन क्रीडा क्षमता निर्माण करतात. एकत्रितरित्या, हे प्रयत्न तळागाळातील सहभागापासून जागतिक यशापर्यंत एक अधिक मजबूत मार्ग तयार करत आहेत.
टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS)
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) सुरू केली. खेळाडूंना सर्वांगीण सहाय्य देण्यासाठी एका समर्पित तांत्रिक सहाय्यक संघासह एप्रिल 2018 मध्ये या योजनेची पुनर्रचना करण्यात आली.
TOPS योजना खेळाडूंना परदेशी प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे, विशेष उपकरणे आणि दरमहा 50,000 रुपये विद्यावेतन देऊन सहाय्य करते. कनिष्ठ खेळाडूंसाठी विकास गट सुरू करण्यात आला असून त्यांना दरमहा 25,000 रुपये विद्यावेतन दिले जाते.
एप्रिल 2026 पर्यंत, या योजनेत 51 कोअर ॲथलीट्स, 52 पॅरा कोअर ॲथलीट्स आणि 130 डेव्हलपमेंट ॲथलीट्सना सहाय्य दिले जात आहे. टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताच्या पदक-विजेत्या कामगिरीत टॉप्सने (TOPS) महत्त्वाची भूमिका बजावली.
कीर्ती (KIRTI)
'खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' (KIRTI) हा उपक्रम 9 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील क्रीडा प्रतिभा ओळखून तिला प्रोत्साहन देतो. पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित निवड सुनिश्चित करण्यासाठी, हा उपक्रम टॅलेंट असेसमेंट सेंटर्स, प्रमाणित मूल्यांकन पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्ससह प्रगत माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर करतो.
सध्या, 3 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 174 टॅलेंट असेसमेंट सेंटर्स कार्यरत असून, 1,87,921 मूल्यांकन पूर्ण झाले आहेत. कीर्तीचा उद्देश एक शाश्वत प्रतिभावंतांची फळी तयार करणे आहे, जेणेकरून भारत 2026 पर्यंत जगातील पहिल्या 10 अव्वल क्रीडा राष्ट्रांमध्ये आणि 2047 पर्यंत पहिल्या 5 अव्वल क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवेल.
क्रीडा साहित्य उत्पादन
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये क्रीडा साहित्य उत्पादनासाठी 500 कोटींच्या तरतुदीसह एका विशेष उपक्रमाची घोषणा करण्यात आली. उच्च दर्जाच्या आणि परवडणाऱ्या क्रीडा साहित्यासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, उपकरणांच्या डिझाइनमधील संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, पदार्थ विज्ञानात (मटेरियल सायन्सेस) प्रगती साधणे, जागतिक क्रीडा पुरवठा साखळीमध्ये भारताचे स्थान मजबूत करणे तसेच उत्पादन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणे यांचा समावेश आहे.
हे उपक्रम भारताची क्रीडा परिसंस्था मजबूत करत आहेत आणि खेळाडूंना जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने स्पर्धा करण्यासाठी तयार करत आहेत.
जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताची भरारी
भारताच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम जागतिक स्तरावर दिसून येत आहेत. प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील भारताची कामगिरी ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि बहु-क्रीडा प्रकारांमध्ये देशाची वाढती ताकद दर्शवते. खेळाडूंचा अधिक मजबूत विकास, उत्तम प्रशिक्षण सहाय्य आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे भारताच्या कामगिरीत जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण सुधारणा झाली आहे. सहभाग आणि पदकतालिकेतील स्थिर वाढ भारताचा एक अधिकाधिक स्पर्धात्मक क्रीडा राष्ट्र म्हणून उदय होत असल्याचे अधोरेखित करते.
ऑलिम्पिक खेळ
2016 ते 2024 या काळात भारताच्या ऑलिम्पिक प्रवासात एक उल्लेखनीय परिवर्तन दिसून आले. देशाने रिओ 2016 मधील दोन पदकांपासून टोकियो 2020 मध्ये सात पदकांपर्यंत मजल मारली. भारताने पॅरिस 2024 मध्ये सहा पदकांसह ही गती कायम ठेवली. टोकियो 2020 मध्ये नीरज चोप्रा भारताचा पहिला ऑलिम्पिक ॲथलेटिक्स सुवर्णपदक विजेता ठरला. मीराबाई चानू देखील भारताच्या सर्वात सातत्यपूर्ण ऑलिम्पिक पदक विजेत्यांपैकी एक म्हणून उदयास आली.
|
वर्ष
|
यजमान/आयोजक शहर
|
भारतीय क्रीडा/धावपटू
|
जिंकलेली पदके
|
|
2016
|
रिओ दी जानेरो
|
117
|
2
|
|
2020
|
टोकयो
|
119
|
7
|
|
2024
|
पॅरिस
|
117
|
6
|
पॅरालिम्पिक (दिव्यांगासाठी)स्पर्धा
गेल्या तीन स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरालिम्पिक कामगिरीत लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून आले. रिओ 2016 मधील पदकांच्या संख्येत चार वरून वृद्धी होऊन 2020 मध्ये टोकियोतील स्पर्धेत ती 19 पर्यंत वाढली. पॅरिस 2024 स्पर्धा 29 पदकांसह ही भारताची आतापर्यंत सर्वोत्तम पॅरालिम्पिक मोहीम ठरली. अवनी लखेरा, सुमीत अंतिल आणि प्रमोद भगत देशाचे सर्वोत्कृष्ट कामगिरी कणारे खेळाडू ठरले. टॉप्स आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स सारख्या उपक्रमांमुळे दिव्यांग खेळाडूंना मिळणारा पाठिंबा अधिक बळकट झाला आहे.
|
वर्ष
|
यजमान/आयोजक शहर
|
भारतीय क्रीडा/धावपटू
|
जिंकलेली पदके
|
सुवर्ण
|
रौप्य
|
कास्य
|
|
2016
|
रिओ दी जानेरो
|
19
|
4
|
2
|
1
|
1
|
|
2020
|
टोकयो
|
54
|
19
|
5
|
8
|
6
|
|
2024
|
पॅरिस
|
84
|
29
|
7
|
9
|
13
|
आशियाई क्रीडा स्पर्धा
आशियाई क्रीडा स्पर्धेत अधिक संख्येतील खेळाडूंचे गट आणि पदक जिंकण्याचा दृष्टीकोन ठेवत दमदार कामगिरीच्या जोरावर आपली कामगिरी सातत्याने उंचावत ठेवली आहे. भारताने इंचॉन स्पर्धेत 2014 मध्ये 57 पदके जिंकली होती आणि 2018 च्या जाकार्ता स्पर्धेत यात वृद्धी होऊन ती 69 झाली. 2023 मधील हँगझोऊ स्पर्धा ऐतिहासिक ठरली कारण भारताने 107 पदके जिंकून आत्तापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. नीरज चोप्रा, लवलीना बोर्गोहेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या प्रमुख खेळाडूंपैकी होते.
|
वर्ष
|
यजमान/आयोजक शहर
|
भारतीय क्रीडा/धावपटू
|
जिंकलेली पदके
|
सुवर्ण
|
रौप्य
|
कास्य
|
|
2014
|
इंचॉन
|
541
|
57
|
11
|
9
|
37
|
|
2018
|
जाकार्ता
|
570
|
69
|
15
|
24
|
30
|
|
2023
|
हँगझोऊ
|
655
|
107
|
28
|
38
|
41
|
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. देशाने 2014मध्ये ग्लासगो येथे 64 पदके जिंकली आणि त्यात वाढ होऊन गोल्ड कोस्ट 2018मध्ये पदकसंख्या 66 झाली. बर्मिंगहॅममध्ये 2022 मध्ये भारताची ही संख्या 61 पदकांवर पोहोचली. कुस्ती, भारत्तोलन, टेबलटेनिस, बॅडमिंटन आणि अॅथलेटिक्स या खेळांची भारताच्या यशामध्ये सातत्याने मोलाचा वाटा उचलला आहे. पीव्ही सिंधू, विग्नेश फोगाट आणि अंचिता शेउली हे खेळाडू देशाचे उल्लेखनीय खेळाडू ठरले आहेत.
|
वर्ष
|
यजमान/आयोजक शहर
|
भारतीय क्रीडा/धावपटू
|
जिंकलेली पदके
|
सुवर्ण
|
रौप्य
|
कास्य
|
|
2014
|
ग्लासगो
|
215
|
64
|
15
|
30
|
19
|
|
2018
|
गोल्ड कोस्ट
|
218
|
66
|
26
|
20
|
20
|
|
2022
|
बर्मिंगहॅम
|
210
|
61
|
22
|
16
|
23
|
भारताचे वाढते जागतिक यश हे, देशाच्या क्रीडा परिसंस्थेची ताकद आणि जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी दर्शवण्याची खेळाडूंची जिद्दीचे प्रतिबिंब आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान ग्लासगो येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत 74 देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि चार ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश होता त्यामध्ये सहा प्रकारच्या पूर्णपणे दिव्यांग खेळाडूंसाठीच्या स्पर्धांचा समावेश होता. भारताने दमदार कामगिरी करत 39 पदके- 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि नऊ कास्य पदक जिंकून चौथे स्थान पटकावले.
124 सदस्यांच्या पथकाने भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये 78 पुरुष आणि 46 महिला खेळाडूंचा समावेश होता. देशातील विविध क्रीडा प्रकारातील क्षमतांच्या वाढत्या गुणवत्तेचे प्रतिबिंब या पथकाने दर्शवले.
झंडू कुमार याने दिव्यांगाच्या भारत्तोलन स्पर्धेत कास्य पदकाची कमाई करत भारताचे पदकांचे खाते उघडले. पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात ऋषीकांता सिंग भारत्तोलनात पदक जिंकणारा दिव्यांग नसलेला पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने स्नॅच प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
ग्लासगोमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकून मीराबाई चानू हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिचा हा विजय सलग तिसरे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक ठरले. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटातील भारत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकून मुथुपंडी राजा याने भारताच्या पदक संख्येत भर घातली.
भारताच्या या क्रीडामोहीमेत कुस्ती उल्लेखनीय ठरली. भारतीय कुस्तीगीरांनी 10 पदके जिंकली त्यामध्ये 7 सुवर्ण पदकांचा समावेश होता. कोणत्याही एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्याही देशाने केलेली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये साक्षी चौधरीचा समावेश होता तर ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोर्गेहेनने रौप्यपदक पटकावले.
ग्लासगोमध्ये भारतासाठी अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्या. अस्मिता डे ही ज्युडो प्रकारातील भारताची पहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू ठरली, त्यापूर्वी हर्ष टोकास याने या प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. एकाच स्पर्धेत दोन वैयक्तिक पदके जिंकणारा गुलवीर सिंह हा पहिलाच ट्रॅक अँड फील्ड क्रीडापटू ठरला. तेजस्विन शंकर याने भारतासाठी डेकथलॉनमधील पहिले पदक जिंकले. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात नीरज चोप्रा याने जिंकलेल्या रौप्य पदकाने अविस्मरणीय क्षणाची भर घातल्याने भारताची क्रीडा क्षेत्रातील वाढती ताकद प्रतिबिंबित झाली.
खेलो इंडिया ते ग्लासगोमधील सुवर्ण यश
|
अरुंधतीची सुवर्ण सफरः खेलो इंडिया ते ग्लासगो

गणित विषयात नैपुण्य मिळवलेल्या अरुंधती चौधरी हिने पारंपरिक कारकीर्दीची वाट निवडण्याऐवजी मुष्टियु्द्धाचा मार्ग चोखाळला. कोटा येथील या तरुण मुष्टीयोद्धा खेळाडूला खेलो इंडिया गेम्समधून एका निर्णायक टप्प्यावर राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. दिल्ली 2018, पुणे 2019 आणि गुवाहाटी 2020 येथे सलग तीन सुवर्ण पदके पटकावून तिने या संधीचे सोने केले.
ग्लासगो 2026 मध्ये, अरुंधतीने महिलांच्या 70 किलो मुष्टीयुद्ध स्पर्धेचे विजेतेपद पटकावून तिच्या प्रवासातील आणखी एक सुवर्णअध्याय पूर्ण केला. तिच्या प्रवासातून, एका उदयोन्मुख प्रतिभेचे राष्ट्रकुल विजेत्यामध्ये रूपांतर होते ते दिसून येते.
|
|
अस्मिता डेः खेलो इंडिया विजेती ते ज्युडोतील ऐतिहासिक कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रापासून दूर असणाऱ्या त्रिपुरातील बेलोनिया येथून अस्मिता डे हिचा प्रवास सुरू झाला. तिचे वडील सायकल दुरुस्ती करणारे होते. ज्युडोच्या माध्यमातून अस्मिताने हळूहळू ज्युडोच्या माध्यमातून आपले स्वप्न साकारले.
खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेने तिच्या स्वप्नाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. अनेक सुवर्णपदकांच्या कमाईने तिच्यातला आत्मविश्वास दुणावला आणि भारतीय ज्युडो विश्वास तिचे आगमन झाले.
याच आत्मविश्वासाच्या जोरावर ती 2026 च्या ग्लासगो स्पर्धेत दाखल झाली. अटीतटीच्या अंतिम सामन्यात संयमाने तिने कॅनडाच्या हायडी क्वाचला पराभूत केले. या विजयामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोतील अजिंक्यपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
|
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा ध्यास
भारताचा क्रीडा प्रवास सातत्याने गतीमान होत आहे. शाश्वत गुंतवणूक, सक्षम बळकट आधार आणि खेळाडूंच्या विकासावर दिलेला विशेष भर यामुळे यशाचा भक्कम पाया रचला जातो आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील वाढता सहभाग आणि सुधारलेली कामगिरी यांमधून या प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसून येते. 2026मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू असताना, भारतीय खेळाडू जिद्द आणि अभिमानाने आपली कामगिरी करत आहेत. त्यांचे प्रत्येक यश पुढच्या पिढ्यांना मोठी स्वप्ने आणि उच्च ध्येये गाठण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. भविष्याकडे वाटचाल करताना, सर्वोत्तम खेळाडू घडवण्यासाठी आणि जगातीलआघाडीच्या क्रीडा राष्ट्रांमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.
References:
PIB Backgrounders:
Ministry of Youth Affairs and Sports
Ministry of Textiles
Commonwealth Sport:
Olympic Games:
Others
पीडीएफ येथे पाहता येईल.
नेहा कुलकर्णी/उमा रायकर / श्रद्धा मुखेडकर / विजयालक्ष्मी साळवी- साने /प्रिती मालंडकर
(Explainer ID: 159493)
आगंतुक पटल : 197
Provide suggestions / comments