• Sitemap
  • Advance Search
Infrastructure

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे : देशाच्या रेल्वे आधुनिकीकरणाला चालना

Posted On: 12 JUN 2026 5:04PM

नवी दिल्‍ली, 12 जून 2026

 

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प (एमएएचएसआर) हा भारतातील रेल्वे आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देशातील पहिलाच हाय-स्पीड रेल्वेमार्ग म्हणून, हा प्रकल्प आंतर-शहर प्रवासाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आणि देशातली रेल्वे क्षमता बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. 508 किलोमीटर लांबीचा हा मार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा व नगर हवेली या प्रदेशातून जातो. यात उच्च वेगाने प्रवासी वाहतुकीसोबतच पायाभूत सुविधा विकासालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून पायाभूत सुविधांमध्ये व्हायडक्ट्स अर्थात उंच सेतू, बोगदे, पूल, स्थानके तसेच सिग्नलिंग आणि विद्युत प्रणाली समाविष्ट आहेत. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्याबरोबरच, हा प्रकल्प तांत्रिक कौशल्य, औद्योगिक क्षमता आणि संस्थात्मक ज्ञान विकसित करत आहे. या क्षमता भविष्यात देशभरात हाय-स्पीड रेल्वेच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरतील.

 

पारंपरिक रेल्वे ते हाय स्पीड कनेक्टिव्हिटी

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असून, प्रवासी आणि मालवाहतुकीचे ते एक अत्यंत महत्त्वाचे साधन राहिले आहे. रेल्वे, विविध प्रदेशांना एकमेकांशी जोडून देशभर लोकांची आणि मालाची ने-आण सुलभ करते. या दळणवळण सुविधेमुळे आर्थिक विकासाला चालना मिळते, तसेच बाजारपेठा, शिक्षण आणि अत्यावश्यक सेवांपर्यंतची पोहोच सुधारते. वाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, गेल्या काही वर्षांत रेल्वेचे जाळे आणि तिची वहनक्षमता यात सातत्याने वाढ करण्यात आली आहे.

देशाच्या बदलत्या शहरी रंगरूपाने लोकांचे जीवन, काम आणि प्रवास यासंदर्भातही कायापालट केला आहे. मोठ्या आर्थिक केंद्रांच्या विकासामुळे लांबच्या आणि आंतर-शहर प्रवासाची गरज वाढली आहे. प्रवासाच्या या बदलत्या गरजा लक्षात घेऊन, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला. सप्टेंबर 2017 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. यासोबतच भारताच्या उच्च गती रेल्वेयात्रेचा प्रारंभ झाला. प्रवाशांसाठी आराम, सुरक्षितता आणि प्रवासातील विश्वासार्हता वाढवण्यासोबतच प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे हे या कॉरिडॉरचे उद्दिष्ट आहे. तसेच, देशाच्या रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

मुंबई-अहमदबाद हाय-स्पीड रेल्वे : संकल्पनेचे पायाभूत सुविधेत रूपांतर

हाय स्पीड रेल्वे, पारंपरिक रेल्वेपेक्षा अधिक वेगाने धावण्यासाठी विकसित केलेली प्रवासी रेल्वे प्रणाली आहे. सामान्यपणे या गाड्या त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या मार्गांवर धावतात. प्रगत रेल्वेगाड्या, प्रगत सिग्नल, प्रगत संज्ञापन आणि प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानावर या प्रणाली आधारित असतात. या वैशिष्ट्यांमुळे उच्च दर्जाची संचालन क्षमता आणि विश्वासार्हता शक्य होते. संचालनाच्या दृष्टीने ताशी 250 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वेंना हाय स्पीड रेल असे संबोधले जाते.

सध्या, भारतीय रेल्वे जाळ्यातील सर्वाधिक डिझाइन स्पीड म्हणजेच रचनेनुसार अपेक्षित वेग ताशी सुमारे 180 किमी इतका असून तो वंदे भारतसारख्या सेमी-हाय-स्पीड सेवांद्वारे गाठला जातो. याउलट, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचा, रचनेनुसार अपेक्षित वेग ताशी 350 किमी आणि प्रत्यक्ष परिचालन वेग 320 किमी/तास इतका आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असून, यामुळे मुंबई आणि अहमदाबाद ही शहरे अवघ्या 1तास 58 मिनिटांत जोडली जातील.

उच्च वेगाच्या प्रवासी वाहतुकीसोबतच हा प्रकल्प प्रथमच देशांतर्गत उच्च वेगाची रेल्वे व्यवस्था स्थापित करणार आहे. यात व्हायडक्ट्स अर्थात उंच सेतू उभारणी, बॅलास्ट विरहित अर्थात खडी विरहित मार्ग स्थापन करणे स्थानक परिसराचे नियोजन यांचा समावेश आहे. तसेच सिग्नलिंग आणि विद्युत प्रणालीसह भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी विशेष प्रशिक्षणही समाविष्ट आहे. या प्रकल्पातून विकसित होणाऱ्या क्षमता, ज्ञान आणि कौशल्ये, भविष्यात देशभरात उभारल्या जाणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे मार्गांसाठी उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.

508 किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा आणि नगर हवेली मधून जातो. या कॉरिडोरमध्ये मुंबई (बीकेसी), ठाणे, विरार, भोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती येथील एकूण 12 स्थानकांचा समावेश आहे. प्रत्येक स्थानक हे त्या शहराची गुण वैशिष्ट्य आणि ऊर्जा प्रतिबिंबित करेल अशा प्रकारे डिझाइन केले आहे. समकालीन वास्तुकला, आधुनिक सुविधा आणि मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, हा या डिझाईनचा अविभाज्य भाग आहे. साबरमती स्थानक हे बुलेट ट्रेन, मेट्रो, बीआरटीएस आणि रेल्वे नेटवर्कला जोडणारे 'मल्टीमोडल हब' म्हणून विकसित केले जात आहे. सभोवतालच्या परिसराचे देखील ‘ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ तत्त्वांचे पालन करून नियोजन केले जात आहे. या कॉरिडॉरवरील पहिली हाय-स्पीड रेल्वे सेवा ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या मार्गाचे सुमारे 90% बांधकाम उन्नत पातळीवर असून, ते प्रामुख्याने ‘फुल स्पॅन लाँचिंग मेथड (एफएसएलएम)’ द्वारे केले जात आहे. भारतात या तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर केला जात असून, ते पारंपरिक 'सेगमेंटल कन्स्ट्रक्शन' पद्धतीपेक्षा दहापट जलद आहे. परिचालनादरम्यानचा आवाज कमी करण्यासाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना ध्वनी-रोधक बसवले जात आहेत. ही वैशिष्ट्ये एकत्रितपणे, कार्यक्षम बांधकाम, कार्यान्वयीन कामगिरी आणि एकात्मिक शहरी विकास यांवर या कॉरिडॉरचा असलेला भर अधोरेखित करतात.

 

तांत्रिक वैशिष्ट्ये आणि प्रणाली

मुंबई-अहमदबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प जपानी शिंकान्सेन तंत्रज्ञान आणि परिचालन मानकांचा वापर करून विकसित केला जात आहे. या कॉरिडॉरमध्ये ट्रॅक्शन, विद्युतीकरण, ट्रॅक पायाभूत सुविधा आणि परिचालन यांच्यासाठी प्रगत प्रणालींचा समावेश आहे. याबाबतच्या अधिकृत प्रकल्प आढाव्यात पुढील प्रमुख तांत्रिक घटकांची नोंद आहे:

  • ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (ओएचई): या कॉरिडॉरवर 20,000 हून अधिक ओएचई मास्ट (खांब) उभारण्याचे नियोजन आहे. 2×25 केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीमध्ये शिंकान्सेन-आधारित ओएचई कॅन्टिलिव्हर्सचा वापर केला जातो.
  • ट्रॅक्शन आणि वीजपुरवठा: या प्रकल्पात 12 ट्रॅक्शन सबस्टेशन्स, 2 डेपो ट्रॅक्शन सबस्टेशन आणि 16 वितरण उपकेंद्रांचा समावेश आहे.
  • ट्रॅक सिस्टम: जपानी शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित जे-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक भारतात प्रथमच तैनात केला जात आहे.
  • ट्रॅक बांधकाम तळ: रेल्वे, ट्रॅक स्लॅब, यंत्रसामग्री आणि उपकरणे हाताळण्यासाठी समर्पित ट्रॅक बांधकाम तळ स्थापित केले जात आहेत.
  • रोलिंग स्टॉक डेपो : गुजरातमधील साबरमती आणि सुरत आणि महाराष्ट्रात ठाणे येथे तीन डेपो उभारले जात आहेत.

 

संपूर्ण कॉरिडॉरमधील अभियांत्रिकी प्रगती

मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर नद्या, शहरी भाग आणि आव्हानात्मक भूप्रदेशातून जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पूल आणि बोगद्यांच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. या संरचना प्रकल्पातील अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी घटकांपैकी एक आहेत.

कॉरिडॉरवरील पुलांचे काम

या कॉरिडॉरमध्ये 25 नदी पुलांचा समावेश आहे, त्यापैकी 21 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात आहेत. मेशवा, वात्रक,

मोहर (सेधी), विश्वामित्री, धाधर, किम, मिंधोला, पूर्णा, अंबिका, वेंगानिया, कावेरी, खरेरा, औरंगा, पार, कोलक, दमणगंगा आणि दारोठा या नद्यांसह अनेक नद्यांवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

  • साबरमती, नर्मदा, तापी, जगनी आणि वैतरणा या नद्यांवरील प्रमुख पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
  • माही नदीच्या पुलावर, 12 पैकी 11 ठिकाणचे खोदकाम पूर्ण झाले आहे आणि पाच स्पॅन कार्यान्वित झाले आहेत.
  • तापी नदीच्या पुलावर, पायाभरणीचे काम सुरू आहे आणि 12 पैकी 10 ठिकाणचे खोदकाम पूर्ण झाले आहे.
  • साबरमती नदीवरील पुलाचे सबस्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले असून, सुपरस्ट्रक्चरचे बांधकाम सुरू आहे.
  • देसाई खाडी क्रॉसिंगसाठी भू-तांत्रिक तपासणी पूर्ण झाली असून डिझाइनचे काम प्रगतीपथावर आहे.
  • उल्हास नदी शाखा क्रॉसिंगवर तात्पुरता प्रवेश पूल देखील पूर्ण करण्यात आला आहे.

नद्यांवरील पुलांव्यतिरिक्त, या कॉरिडॉरमध्ये महामार्ग, कालवे, नद्या आणि रेल्वे मार्गांवरून जाणारे 28 पोलादी पूल समाविष्ट आहेत. एकत्रितपणे, हे सर्व पूल कॉरिडॉरच्या अभियांत्रिकी पायाभूत सुविधांचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत.

भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा

या कॉरिडॉरअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 21 किलोमीटर बोगद्याचा भाग येतो. या भागाचे वैशिष्टय म्हणजे ठाणे खाडीच्या खाली असलेला हा भारतातील पहिला समुद्राखालील भूमिगत बोगदा आहे. समुद्राखालील भाग अंदाजे 7 किलोमीटर एवढा आहे. नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (एनएटीएम) आणि टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) तंत्रज्ञान यांच्या संयोजनाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात आला आहे. या संरेखनामध्ये 5 किलोमीटरचा एनएटीएम विभाग आणि 16 किलोमीटरचा टीबीएम विभाग समाविष्ट आहे. दोन्ही ट्रॅक सामावून घेण्यासाठी यात 13.1 मीटर व्यासाचा एकच बोगदा आहे. यामध्ये 13.6 मीटर व्यासाचे, भारतातील रेल्वे प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले सर्वात मोठे टीबीएम कटर हेड वापरले आहे. बांधकामाची प्रगती सातत्याने होत असून, घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या समुद्राखालच्या बोगद्याचा 4.8 किलोमीटरचा भाग आधीच पूर्ण झाला आहे.

बोगदा खोदणारी यंत्रे (टीबीएम)

मेट्रो नेटवर्क आणि लांब रेल्वे/रस्ते बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी टीबीएम, दाट लोकवस्तीच्या आणि भूवैज्ञानिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या प्रदेशांमध्ये उच्च अचूकता, कमी कंपन आणि वाढीव सुरक्षितता प्रदान करतात.

नवीन ऑस्ट्रियन बोगदा खोदण्याची पद्धत (एनएटीएम)

पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर स्वीकारलेली, एनएटीएम पद्धत अभियंत्यांना प्रत्यक्ष वेळेत (रिअल टाइममध्ये) उत्खननाच्या आधारात बदल करण्याची परवानगी देते, ज्यामुळे ती बदलत्या आणि नाजूक खडक रचनांसाठी आदर्श ठरते.

सुरक्षित आणि विश्वासार्ह कामकाज सुनिश्चित करणे

बदलणाऱ्या पर्यावरणीय परिस्थितीचा विचार करुन रेल्वेचे सुरक्षित आणि विश्वासार्ह संचालन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर च्या बांधकामात प्रगत सुरक्षा आणि निरीक्षण प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये भूकंप शोधन प्रणाली, पर्जन्यमान निरीक्षण आणि वाऱ्याच्या वेगावर निरीक्षण यासारख्या बाबींचा समावेश असून या प्रणालींमुळे प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन आणि आवश्यक असेल तिथे तत्काळ कार्यवाही करून रेल्वे संचालनात योग्य प्रतिसाद देणे शक्य होते.

मुंबई अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये विविध पर्यावरणीय परिस्थितींमध्ये रेल्वेचे सुरक्षित आणि विश्वासार्ह संचालन सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक सुरक्षा आणि निरीक्षण प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भूकंप शोध प्रणाली, पर्जन्यमान (पावसाचे) निरीक्षण प्रणाली आणि वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण प्रणाली यांचा समावेश आहे. या प्रणालींमुळे वास्तविक वेळेत परिस्थितीचे मूल्यांकन करता येते आणि आवश्यकतेनुसार तत्काळ कार्यवाही करून रेल्वे संचालनात योग्य प्रतिसाद देता येतो.

पर्जन्यमान निरीक्षण प्रणाली

बुलेट ट्रेन रेल्वेसेवेत सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक स्वयंचलित पर्जन्यमान निरीक्षण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली कॉरिडॉरवरील महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या उपकरणयुक्त पर्जन्यमापकांद्वारे प्रत्यक्ष वेळेतील पावसाची माहिती उपलब्ध करून देते. पर्जन्यमानाविषयीची माहिती सातत्याने ऑपरेशन कंट्रोल सेंटरकडे पाठवली जाते. या माहितीच्या आधारे रेल्वेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनासाठी आवश्यक निर्णय घेण्यास मदत होते. या प्रणालीमध्ये दोन महत्त्वाचे घटक मोजले जातात: ताशी होणारा पाऊस आणि मागील 24 तासांतील एकूण संचयी पर्जन्यमान. या मोजमापांमुळे मातीच्या बांधकामांच्या परिसरातील परिस्थिती, नैसर्गिक उतार, बोगद्यांची प्रवेशद्वारे तसेच इतर संवेदनशील आणि जोखमीच्या ठिकाणांच्या स्थितीचे मूल्यांकन प्रभावीपणे करता येते. पूर्वनिर्धारित मर्यादा मूल्ये आणि देखभाल पथकांकडून करण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष क्षेत्र पडताळणीच्या आधारे, आवश्यकतेनुसार योग्य परिचालनात्मक उपाययोजना राबवता येतात. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर सहा उपकरणयुक्त पर्जन्यमापक केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्र सुमारे 10 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील पर्जन्यमानाचे निरीक्षण करेल.

वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करणारी प्रणाली

मुंबई अहमदाबाद जलद गती रेल्वे कॉरिडॉर चा काही भाग किनारी प्रदेश आणि अशा ठिकाणांमधून जातो जिथे वारे वेगाने वाहत असतात. अशा भागांमध्ये रेल्वेचे संचालन सुरक्षितपणे करण्यासाठी, वाऱ्याच्या गतीचे निरीक्षण करणारी एक समर्पित प्रणाली या कॉरिडॉर मध्ये बसवण्यात आली आहे. गुजरातमधील 9 आणि महाराष्ट्रातील 5 अशा एकूण 14 ठिकाणांची अ‍ॅनेमोमीटर (वाऱ्याचा वेग मोजणारे उपकरण) बसविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या उपकरणांमुळे वाऱ्याच्या वेगाचे आणि दिशेचे प्रत्यक्ष मोजमाप केले जाऊ शकते आणि 0 ते 252 किमी/तास या श्रेणीतील वाऱ्याचा वेग नोंदवू शकतात. प्राप्त होणारी माहिती सतत ऑपरेशन कंट्रोल सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवली जाते. वाऱ्याचा वेग निर्धारित मर्यादांपर्यंत पोहोचल्यास, संबंधित परिचालन प्रोटोकॉल कार्यान्वित केले जातात. वाऱ्याचा वेग 72 किमी/तास ते 130 किमी/तास दरम्यान असल्यास, सुरक्षित रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी गाड्यांचा वेग नियंत्रित केला जाईल.

पूर्वसूचना भूकंप शोध प्रणाली

प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या उद्देशाने मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेमध्ये 28 भूकंपमापकांचा (सिस्मोमीटर) समावेश असलेली भूकंपाची पूर्वसूचना देणारी शोध प्रणाली बसवली जाणार आहे. ही प्रणाली भूकंपाच्या प्राथमिक लहरी ओळखेल आणि आपोआप वीजपुरवठा बंद करेल. यामुळे बाधित विभागातील गाड्यांना आपत्कालीन ब्रेकिंगद्वारे सुरक्षितपणे थांबणे शक्य होते. एकूण 28 भूकंपमापकांपैकी 22 भूकंपमापक बुलेट ट्रेन मार्गाच्या बाजूने स्थापित केले जातील. उर्वरित 6 भूकंपमापक (सिस्मोमीटर) सविस्तर भूकंपीय सर्वेक्षणे आणि मातीच्या उपयुक्ततेच्या अभ्यासांद्वारे ओळखण्यात आलेल्या भूकंपप्रवण भागांमध्ये बसविण्यात येतील. या ठिकाणांची निवड ऐतिहासिक भूकंप नोंदी आणि मायक्रोट्रेमर चाचण्यांच्या आधारे करण्यात आली आहे.

 

2026 या वर्षातील प्रकल्पासंदर्भातील साध्य केलेले महत्वाचे टप्पे

2026 या वर्षा दरम्यान अनेक महत्त्वच्या टप्प्यांची नोंद झाली, या कॉरिडोअरच्या विविध घटकांमध्ये झालेली प्रगती यातून दिसून येते. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग दर्शवणाऱ्या घडामोडी खाली नमूद केल्या आहेत.

दिनांक

टप्पा

29 जानेवारी 2026

अहमदाबादमध्ये 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया पोलाद पुलाचे काम पूर्ण झाले.

03 फेब्रुवारी 2026

महाराष्ट्रातील पालघर इथे डोंगरातून जाणाऱ्या बोगदा खणण्याचे काम पूर्ण (दोन्ही दिशांनी बोगदा खणून होणे आणि तो एकसंध होणे - ब्रेकथ्रू) झाले.

17 मार्च 2026

बुलेट ट्रेन स्थानके शहराच्या वाहतूक परिसंस्थेशी जोडली जाण्यासाठी सज्ज झाली आहेत.

08 एप्रिल 2026

सुरू असलेल्या रेल्वे मार्गिकेवर सर्वात जड पोर्टल बीम बसवण्यात आला.

09 एप्रिल 2026

महाराष्ट्रातील विक्रोळी इथे पहिल्या टनेल बोरिंग मशीनची (TBM - Tunnel Boring Machine) जुळवणी सुरू झाली.

11 एप्रिल 2026

सावली इथे दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनची जुळवणी सुरू झाली.

22 एप्रिल 2026

बुलेट ट्रेन मार्गिकेवर (वायडक्ट) रुळ बसवण्याचे काम सुरू झाले.

27 एप्रिल 2026

साबरमती नदीवरील पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

04 मे 2026

अहमदाबादमध्ये अवघ्या 22 दिवसांत रेल्वे मार्गिकेवर सर्व पाच जड पोर्टल बीम बसवण्यात आले.

17 मे 2026

विक्रोळी इथे 350 टनांचे कटरहेड खाली उतरवण्यात आले.

20 मे 2026

भरूचजवळ पोलादी पुलाचा 130 मीटर लांबीचा भाग बसवण्यात आला.

23 मे 2026

मुंबईजवळच्या सावली इथे दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनचे कटरहेड खाली उतरवण्यात आले.

27 मे 2026

अहमदाबादमधील कालुपूर उड्डाणपुलावर 45 मीटरचा सेगमेंटल पूल पूर्ण झाला.

02 जून 2026

पालघर जिल्ह्यात डोंगरातून जाणाऱ्या तिसऱ्या बोगद्याचे खणण्याचे काम पूर्ण (दोन्ही दिशांनी बोगदा खणून होणे आणि तो एकसंध होणे - ब्रेकथ्रू) झाले.

 

आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाला गती

या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे वाहतूक जोडणी वाढवण्यासोबतच, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होईल, उद्योगांनांही बळ मिळेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि देशांतर्गत उत्पादनाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

वेगवान दळणवळणीय जोडणी

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा वेळ दोन तासांपेक्षा कमी होणार आहे. सध्या हाच प्रवास रस्त्याने केला तर त्याण्यासाठी 8 ते 9 तास लागतात, आणि विमानाने केला तर विमानतळावरील प्रक्रियांसह सुमारे 4 ते 5 तास लागतात. मात्र आता या वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने व्यावसायिक कार्यक्षमता वाढेल आणि प्रवाशांच्या मौल्यवान वेळेची बचतही होईल.

 

प्रादेशिक अर्थव्यवस्थेला बळ

हाय-स्पीड रेल्वेमुळे औद्योगिक केंद्रे आणि बाजारपेठांमधील अंतर खूपच कमी होईल. या प्रकल्पामुळे वापी आणि मुंबई यांसारख्या उत्पादन केंद्रांमधील दळणवळणीय जोडणीही सुधारणार असल्यामुळे पुरवठा साखळीही मजबूत होईल आणि या संपूर्ण कॉरिडोअरअंतर्गतच्या क्षेत्रात उद्योग - व्यवसाय विषयक नवीन संधींचा विस्तार होईल.

 

पर्यटन आणि स्थानिक विकास

हा कॉरिडोअर नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या भागांतून जातो. या प्रकल्पामुळे इथल्या दळणवळणीय परिस्थितीत सुलभता येऊ शकणार आहे. त्यामुळे पर्यटन, आदरातिथ्य आणि पर्यटनाशी संबंधित सेवा क्षेत्राला मोठे पाठबळ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या इथल्या रेल्वे स्थानकांमुळे उद्योग व्यावसायांशी संबंधित क्रिया प्रक्रिया आणि स्थानिक विकासालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

कौशल्य विकास आणि संधींची निर्मिती

या प्रकल्पामुळे सुमारे 4,000 प्रत्यक्ष आणि 35,000 ते 40,000 अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या टप्प्या दरम्यान अंदाजे 40,000 कामगारांची गरज असण्याची शक्यता आहे. यादृष्टीनेच वडोदरा इथली समर्पित हाय-स्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्था ही, प्रगत रेल्वे तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य विकासाचे काम करणार आहे.

 

मेक इन इंडियाला पाठबळ

या प्रकल्पाअंतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण आणि देशांतर्गत उत्पादनाच्या माध्यमातून मेक इन इंडिया उपक्रमाला मोठे बळ मिळेल. या प्रकल्पाशी संबंधित विविध घटकांमध्ये भारतीय कंपन्यांच्या सहभाग असणार असल्याने, देशाची औद्योगिक क्षमता अधिक मजबूत होईल, यासोबतच पोलाद, सिमेंट आणि इलेक्ट्रिक उपकरणे यांसारख्या संलग्न क्षेत्रांनाही मोठे पाठबळ मिळेल.

 

2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामधील हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोअरसंबंधीच्या तरतुदी

आधुनिक आणि हाय-स्पीड रेल्वे व्यवस्थेच्या या संकल्पाला पुढची दिशा देण्याच्या उद्देशाने, 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकासाला गती देणाऱ्या सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोअरची घोषणा करण्यात आली आहे. या कॉरिडोअरच्या माध्यमातून देशातील प्रमुख शहरे आणि प्रदेश परस्परांशी जोडले जातील, नागरी वाहतूक अधिक सुलभतेने होऊन त्याची कार्यक्षमता वाढेल, यासोबतच विविध राज्यांमधील आर्थिक संवादालाही यामुळे मोठे बळ मिळेल. हा प्रस्तावित कॉरिडोअर सुमारे 4,000 किलोमीटर अंतराचा आहे. या कॉरिडोअरमुळे अंदाजे ₹16 लाख कोटींची गुंतवणूक येईल अशी अपेक्षा आहे. या घडामोडींमधून भारताच्या वाहतूक विषयक पायाभूत सुविधाच्या बाबतीत आता हाय स्पीड रेल्वे हा एक मुख्य घटक म्हणून उदयाला येऊ लागला असल्याचे दिसून येते. हे नियोजित हाय स्पीड रेल्वे कॉरिडोअर धोरणात्मकदृष्ट्या देशाच्या विविध भागांमध्ये प्रस्तावित केले गेले आहेत.

मार्ग

प्रवासाचा वेळ

दिल्ली-वाराणसी

3 तास 50 मिनिटे

वाराणसी-पटना-सिलिगुडी

2 तास 55 मिनिटे

चेन्नई-बेंगळुरू

1 तास 13 मिनिटे

बेंगळुरू-हैदराबाद

2 तास

चेन्नई-हैदराबाद

2 तास 55 मिनिटे

मुंबई-पुणे

48 मिनिटे

पुणे-हैदराबाद

1 तास 55 मिनिटे

 

रेल्वे वाहतुकीच्या भविष्याला आकार

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हा भारतीय रेल्वेच्या विकासातील एक परिवर्तनकारी टप्पा ठरला आहे. देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोअर असलेला हा प्रकल्प वेग, दळणवळणीय जोडणी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत नवीन मानके प्रस्थापित करतो आहे. नागरी कामे, पुलांचे बांधकाम आणि बोगदे तयार करण्याच्या कामात महत्त्वाची प्रगती घडून आली आहे. त्यातून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दिशेने पकडलेल्या सातत्यपूर्ण गतीची प्रचिती येते. आतापर्यंत साध्य करण्यात आलेल्या बांधकामाची व्याप्ती लक्षात घेतली, तर त्यातून या प्रकल्पाच्या अनेक घटकांअंतर्गत होत असलेली प्रगती दिसून येते. या सगळ्यासोबतच या प्रकल्पासाठी, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रगत अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब केला गेलेला असल्याने हाय-स्पीड रेल्वे विकासित करण्याच्यादृष्टीने देशांतर्गत क्षमतांनाही मोठी बळकटी मिळू लागली आहे. हा मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प म्हणजे केवळ एक वाहतुकीचे माध्यम नाही, तर हा प्रकल्प भारताच्या दीर्घकालीन हाय-स्पीड रेल्वे महत्त्वाकांक्षांना गती देणारा एक मुख्य कारक घटक ठरला आहे.

 

संदर्भ

Prime Minister’s Office

Ministry of Railways

National High-Speed Rail Corporation Limited

 

Click here to see pdf

 

* * *

आशिष सांगळे/सोनाली काकडे/राजश्री आगाशे/भक्‍ती सोनटक्‍के/तुषार पवार/दर्शना राणे

(Explainer ID: 158944) आगंतुक पटल : 17
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Tamil , Kannada , Malayalam