• Sitemap
  • Advance Search
Global Affairs

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेदरलँड्स दौरा

प्रगत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सहकार्य

Posted On: 21 MAY 2026 5:16PM

नवी दिल्ली, 21 मे 2026

 

भारत आणि नेदरलँड्स यांनी अलीकडच्या वर्षांत आपल्या द्विपक्षीय संबंधांना लक्षणीय बळकटी दिली आहे. पारंपरिक क्षेत्रांपलीकडे जाऊन आता उदयोन्मुख आणि धोरणात्मक क्षेत्रांपर्यंत आपले सहकार्य विस्तारले आहे. मे 2026मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे सेमिकंडक्टर, ऊर्जा सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शिक्षण या क्षेत्रांतील सहकार्याला अधिक गती मिळाली. या भेटीतून शाश्वत विकास, आर्थिक लवचिकता आणि भविष्योन्मुख सहकार्याबाबतची समान बांधिलकी अधोरेखित झाली. तसेच, अधिक मजबूत आणि दूरदृष्टी असलेल्या भागीदारीच्या संकल्पनेलाही या भेटीमुळे बळ मिळाले.

प्रगत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सहकार्य

भारत-नेदरलँड्स यांच्यादरम्यान 1947 मध्ये धोरणात्मक संबंध प्रस्थापित झाले तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान बळकट आणि विस्तारीत भागीदारी आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये व्यापार, गुंतवणूक, जल, कृषी, आरोग्य आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये विस्तारली आहे. उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत, नियमित उच्च स्तरीय देवाणघेवाणीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत. सखोल आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यालाही यामुळे गती मिळाली आहे. उभय देश, सेमीकंडक्टर्स, नवीकरणीय ऊर्जा, सागरी तंत्रज्ञान, संरक्षण, शिक्षण आणि डिजीटल नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहेत. या भागीदारीमुळे, शाश्वत विकास, जागतिक पुरवठा साखळीची लवचीकता आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय सहकार्य यांनाही समर्थन मिळते आहे. बळकट परस्पर लोकसंपर्क संबंध आणि वाढत्या व्यावसायिक सहभागामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मे 2026 मधील दौऱ्यामुळे ही भविष्यवेधी भागीदारी आणि युरोपिय देशांसमवेत भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत.

भारत-नेदरलँड्स: नवोन्मेष व्यापार आणि शाश्वतता यांना चालना

भारत-डच भागीदारी बळकट ऐतिहासिक संबंध आणि विस्तारत असलेल्या धोरणात्मक सहकार्यावर आधारित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील डच सामर्थ्य आणि भारताची व्याप्ती आणि नवोन्मेष परिसंस्था यांचा संगम यामध्ये होतो. सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, सागरी तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ गतीशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत होत आहे. ही भागीदारी, जागतिक प्रशासन, आर्थिक लवचीकता आणि शाश्वत विकास यांच्यासाठी देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे सामायिक आर्थिक हितसंबंध, तांत्रिक सहकार्य आणि समान जागतिक महत्त्वकांक्षा यांचे प्रतिबिंब दर्शवते.

धोरणात्मक आणि भू-राजकीय संदर्भः नेदरलँड्स आज भारताशी बाजारपेठ म्हणून संलग्न नसून मोठी महासत्ता म्हणून संबंध जोडते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची डच परिसंस्था आणि भारताने मोठ्या प्रमाणात केलेली अंमलबजावणी यामुळे, सेमीकंडक्टर, पाणी, हायड्रोजन आणि सागरी तंत्रज्ञान या क्षेत्रांतील'व्यापकता आणि नवोन्मेष' यांचा मेळ घालणारी भागीदारी निर्माण होते.

व्यापार, गुंतवणूक आणि युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराचे प्रवेशद्वारः नेदरलँड्स हे 27.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स (2024-25) मूल्याचा द्विपक्षीय व्यापारासह भारताचे युरोपमधील सर्वांत मोठे व्यापार केंद्रांपैकी आहे. 55.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीसह तो भारताचा चौथा सर्वांत मोठा गुंतवणूकदार आहे. नेदरलँड्ससमवेत एकूण वस्तू व्यापार हा भारताच्या एकूण व्यापाराच्या 2.46% आहे. भारताचा नेदरलँडस् समवेत 17.393 अब्ज (144,095 कोटी रुपये) इतका शिलकी व्यापार आहे.

भारतात 300हून अधिक डच कंपन्या आणि नेदरलँड्स मध्ये 300हून अधिक भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. नेदरलँडस् भारत चेंबर्स ऑफ कॉमर्स ट्रेड (एनआयसीसीटी) आणि इंडिया बिझनेस चेम्बर्स यांसारख्या संस्था दोन्ही अर्थव्यवस्थांमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात.

सेमीकंडक्टर सहकार्य: 2024 मध्ये भारत आणि नेदरलँड्सने कौशल्य विकास, प्रशिक्षण कार्यक्रम, सहयोगी संशोधन आणि विकास तसेच स्टार्ट-अप्स तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी भागीदारी केली.

ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ उर्जा: भारत आणि नेदरलँड्स हवामान बदलांमध्ये सौम्यता आणि अनुकुलन करण्याच्या संयुक्त महत्त्वकांक्षेला चालना देण्यासाठी भारत आणि नेदरलँड्स एकत्रितपणे कार्यरत आहेत. हे दोन्ही देश संबंधित भागधारकांना जोडणे, ज्ञानाचे हस्तांतरण, तांत्रिक सहविकास, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, पायाभूत सुविधांचा संपूर्ण विकास आणि कार्यन्वयन सुरक्षा आदींवर एकत्रितपणे काम करत आहेत. हरित हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि हरित बंदरांचा विकास ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे आहेत.

गतिशीलता, भारतीय समुदाय आणि पर्यटन: इंग्लंडनंतर युरोपातील देशांपैकी नेदरलँड्स मध्ये दुसऱ्या क्रमांकाची भारतीय वंशाच्या नागरिकांची सर्वांत मोठी लोकसंख्या आहे. इथे जवळपास 2,40,000 प्रवासी भारतीय राहातात, त्यामध्ये डच समाजात एकरूप झालेल्या हिंदुस्थानी सुरीनामी समुदायाच्या अंदाचे 2,00,000 सदस्यांचा समावेश आहे. उभय बाजूंकडून स्थलांतर आणि गतीशीलता सुव्यवस्थित राहण्याचा प्रयत्न आहे.

भारत-नेदरलँड्स भागीदारी ही बळकट ऐतिहासिक संबंधांमधून भविष्यवेधी धोरणात्मक सहकार्यात विकसित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे ही व्यापक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि वाढत्या बहुध्रुवीय जगात युरोपसमवेत भारताचा सहभाग भक्कम करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

द्विपक्षीय व्यापार आणि तंत्रज्ञान भागीदाराचीच्या विस्तारासाठी पंतप्रधानांचा दौरा

भारताचे पंतप्रधान आणि नेदरलँडस् चे राजे विलेम अलेक्झांडर आणि महाराणी मॅक्सिमा यांच्या दरम्यान भारत-नेदरलँड्स संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली, त्यामध्ये परस्पर लोकसंपर्क आणि शिक्षण, नवोन्मेष, सेमीकंडक्टर्स, डिजीटल तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन आणि हरित भागीदारी या क्षेत्रांतील सहकार्य यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

अलीकडच्या काळात या प्राधान्य क्षेत्रांमध्ये झालेल्या उल्लेखनीय प्रगतीची त्यांनी नोंद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्स चे पंतप्रधान महामहिम रॉब जेटेन यांनीही उभय देशांमधील वाढती गतीशीलता आणि धोरणात्मक एकत्रीकरणाला मान्यता दिली. द्विपक्षीय सहकार्याची विस्तारक्षम व्याप्ती लक्षात घेता, दोन्ही नेत्यांनी भारत - नेदरलँड्स संबंधांना 2026-2030 या कालावधीसाठी 'धोरणात्मक भागीदारी'चा दर्जा देण्याच निर्णय घेतला. या भागीदारीमध्ये उच्च-स्तरीय धोरणात्मक संवाद आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सखोल सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

आर्थिक आणि गुंतवणूक संदर्भातील संबंध अधिक दृढ कऱण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

  • द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देणे.
  • बाजार प्रवेश सुधारणे.
  • लघु आणि मध्य उद्योगांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
  • गुंतवणुकीला चालना देणे.
  • लवचीक मूल्य साखळीची उभारणी करणे.

याव्यतिरिक्त, हे वाढीव सहकार्य खालील क्षेत्रांमध्ये विस्तारित झाले आहे:

  • पाणी, कृषी आणि आरोग्य
  • उदयोन्मुख तंत्रज्ञान
  • नवोन्मेष, विज्ञान आणि शिक्षण
  • ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास
  • सागरी मुद्दे
  • संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य
  • स्थलांतर आणि परस्परांच्या देशांत येणे-जाणे आणि
  • सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर देवाणघेवाण

पंतप्रधानांच्या या भेटीने सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला पुढे नेण्यासाठी सखोल आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. नवोन्मेष, आर्थिक लवचिकता आणि नियमांवर आधारित जागतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची वाढती भूमिकाही या भेटीमुळे अधोरेखित झाली.

द्विपक्षीय चर्चेचे प्रमुख फलित

पंतप्रधानांच्या भेटीतून भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ टिकणारे आणि बदलत्या परिस्थितीतही सक्षम राहणारे सहकार्य वाढण्याची मोठी शक्यता दिसून आली. ते मजबूत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय प्रतिबद्धतेद्वारे जागतिक प्रशासन मजबूत करणे, शाश्वत विकासाला पुढे नेणे, नवोन्मेष विकासाला प्रोत्साहन देणे आणि उदयोन्मुख जागतिक आव्हानांवर सहकार्य वाढवण्याप्रती सामायिक वचनबद्धता देखील अधोरेखित करतात.

फलित 1: भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीवर स्वाक्षरी

ही धोरणात्मक भागीदारी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करेल आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असून, स्थिर, टिकाऊ आणि बदलत्या परिस्थितीतही सक्षम राहणाऱ्या आर्थिक विकासाला बळकटी देईल. यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला गती मिळेल, तसेच भारतात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. हे सहकार्य शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील भागीदारीलाही प्रोत्साहन देईल, त्यामुळे नवोन्मेष आणि उच्च दर्जाच्या संशोधनाला चालना मिळेल. याव्यतिरिक्त, यामध्ये भारताच्या सुरक्षा आणि विकास उद्दिष्टांसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे.

फलित 2: चोल साम्राज्यातील ताम्रपट भारत सरकारकडे सुपूर्द

11 व्या शतकातील चोल ताम्रपट भारताकडे परत केले जाणे हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक टप्पा ठरला आहे. हे ताम्रपट चोल राजांमार्फत जारी करण्यात आलेली शाही सनद असून, त्यावर तमिळ आणि संस्कृत भाषेत कोरलेले मजकूर आहेत. तामिळनाडूतील नागपट्टिणम येथील बौद्ध विहाराला 'आनायमंगलम' गाव दान दिल्याचा

उल्लेख यात आहे. हे ताम्रपट परत मिळाल्यामुळे भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे सखोल संशोधन आणि त्याचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल.

फलित 3: अनिवासी भारतीय समुदायाशी सहकार्य मजबूत करणे

मजबूत गतिशीलतेमुळे आणि अनिवासी भारतीयांच्या सहकार्यामुळे भारत आणि नेदरलँड्समधील प्रवास अधिक सोपा आणि सुलभ होईल. भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक, संशोधन आणि इंटर्नशिपच्या सुधारित संधी मिळतील. कुशल व्यावसायिकांना जलद आणि अधिक लवचिक व्हिसा सुविधेचा लाभ मिळेल. ही भागीदारी भारतीय तरुणाईसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण करेल. या उपायांमुळे लोकांमधील परस्परांचे संबंध दृढ होतील आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक सहकार्याला अधिक चालना मिळेल.

फलित 4: टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि ए एस एम एल मधील सहकार्य

सेमीकंडक्टर क्षेत्रातील हे सहकार्य भारताच्या महत्त्वाकांक्षांना पुढे नेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. हे सहकार्य, गुजरात मध्ये ढोलेरा येथे, सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा विकसित करण्यास मदत करेल. ही भागीदारी जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारताचे स्थान बळकट करेल आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देईल. तसेच, हे सहकार्य, 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन' च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून भारतातील प्रगत उत्पादन क्षमतांच्या विकासाला पाठबळ देते.

फलित 5: महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य

महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील सहकार्यामुळे आवश्यक साधनसंपत्तीसाठी विश्वासार्ह पुरवठा साखळी मजबूत होईल. हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत उत्पादन महत्त्वाकांक्षांना पाठबळ देईल. या भागीदारीमुळे प्रगत तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कुशल रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे भारताची धोरणात्मक खनिजांची खाणकाम विषयक आणि प्रक्रियात्मक क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

फलित 6: गुजरातच्या कल्पसर प्रकल्पात नेदरलँड्ससोबत तांत्रिक सहकार्य

भारतातील पाण्याशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी डच तज्ञांच्या मदतीने 'धोरणात्मक जल भागीदारी' मजबूत केली जाईल. घरगुती आणि शेतीकामासाठी स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेत सुधारणा करणे आणि जीवनमानाचा दर्जा उंचावणे हा याचा उद्देश आहे. कल्पसर प्रकल्प अंतर्गत खंबातच्या आखातात मोठा बांध उभारून समुद्रातील पाणी नियंत्रित करून गोड्या पाण्याचा मोठा साठा निर्माण करण्याची योजना आहे. हे सहकार्य, शाश्वत जल व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधांच्या विकासाला देखील गती देईल.

फलित 7: ग्रीन हायड्रोजनवरील पथदर्शी आराखडा

'भारत-नेदरलँड्स ग्रीन हायड्रोजन पथदर्शी आराखडा' नवीकरणीय ऊर्जा आणि गुंतवणुकीतील सहकार्य मजबूत करेल. हा आराखडा ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन, वापर आणि निर्यातीमधील भारताच्या उद्दिष्टांना बळ देतो.हा उपक्रम दोन्ही देशांमध्ये स्वच्छ ऊर्जेचा स्रोत म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वेगवान वापर वाढवण्यास प्रोत्साहन देतो. यामुळे नवीन बाजारपेठा तयार होणे, गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगार निर्मिती करणे आणि भारताला स्वच्छ इंधनाकडे वाटचाल करण्यास मदत मिळणे अपेक्षित आहे.

फलित 8: नवीकरणीय ऊर्जेवर संयुक्त कार्यगटाची स्थापना

सहकार्य वाढवण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी नवीकरणीय ऊर्जेवर एक 'संयुक्त कार्यगट' स्थापन केला आहे. हा कार्यगट प्रामुख्याने ग्रीन हायड्रोजन, जैव-ऊर्जा, जैव-रसायने, चक्रीय फीडस्टॉक्स पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रियेद्वारे पुन्हा उत्पादन प्रक्रियेत वापरता येणारा कच्चा माल, नवीकरणीय ऊर्जा आणि बॅटरी स्टोरेज तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल. या कार्यगटाचा उद्देश दोन्ही देशांमधील औद्योगिक भागीदारी आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हा आहे. हा गट रोजगार आणि संशोधनाच्या संधी निर्माण करत भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला पाठबळ देईल.

फलित 9: नीति आयोग आणि नेदरलँड्स दरम्यान ऊर्जा संक्रमणासाठी क्षमता बांधणीवरील संयुक्त हेतू पत्राचे नूतनीकरण

शाश्वत ऊर्जा संक्रमणातील प्रकल्प आणि भागीदारीमुळे ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा विकासातील सहकार्य अधिक मजबूत होईल. यामुळे, धोरणकर्ते, आघाडीचे उद्योजक आणि तंत्रज्ञ, सखोल सहकार्य आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी एकत्र येतील. या उपक्रमांमुळे भागधारकांमधील समन्वय सुधारेल आणि या क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील आणि दीर्घकालीन शाश्वत विकासात योगदान मिळेल.

फलित 10 : पश्चिम त्रिपुरामध्ये भारत-नेदरलँड्स फुलशेतीसाठी उत्कृष्टता केंद्राची स्थापना

उत्कृष्टता केंद्रा'च्या विकासाच्या या उपक्रमामुळे त्रिपुरामध्ये पुष्पशेतीचा विकास होवू शकेल त्याचबरोबर प्रादेशिक विकासालाही चालना मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. स्थानिक विशेषतः ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये सुधारणा होईल. यामुळे इथल्या ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेल.

फलित 11: बंगळुरू येथील 'पशुसंवर्धन उत्कृष्टता केंद्रा'मध्ये दुग्धव्यवसायातील प्रशिक्षणासाठी 'भारत-नेदरलँड्स उत्कृष्टता केंद्रा'ची स्थापना

बंगळुरू येथील 'पशुसंवर्धन उत्कृष्टता केंद्रा'मध्ये (सीईएएच) दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचे एक 'भारत-नेदरलँड्स उत्कृष्टता केंद्र' स्थापन केले जाईल. यामुळे भारत आणि नेदरलँड्स यांच्यात दुग्धव्यवसाय, संलग्न कृषी क्षेत्रे आणि अन्न प्रक्रिया यांमधील सहकार्य अधिक बळकट होईल. प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या आदानप्रदानामुळे या क्षेत्रातील उत्पादकता, गुणवत्ता आणि कौशल्ये यांमध्ये सुधारणा होईल. तसेच, यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पशुसंवर्धन क्षेत्राला बळकटी मिळेल.

फलित 12: पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायात सहकार्य

या सहकार्यामुळे कृषी आणि पशुपालन क्षेत्रात भारत-नेदरलँड्स सहकार्य अधिक दृढ होईल. या उपक्रमानुसार बाजारपेठ उपलब्धता, हवामान-अनुकूल शेती आणि अन्न सुरक्षा यावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे या संपूर्ण क्षेत्रात ज्ञान-सामायिक करणे, तंत्रज्ञान सहकार्य आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन मिळेल. या भागीदारीमुळे शेतीची उत्पादकता सुधारेल, पशुधनाचे आरोग्य आणि रोग व्यवस्थापन मजबूत होईल, तसेच पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे ग्रामीण उपजीविकेलाही आधार मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि दीर्घकालीन कृषी शाश्वततेमध्ये योगदान मिळेल.

फलित 13 : आरोग्य क्षेत्रातील सहकार्यासाठी व्यवस्था

आरोग्य क्षेत्रातील हे सहकार्य संशोधन, परस्पर सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांद्वारे जागतिक आरोग्यविषयक धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सहसंबंध अधिक बळकट करेल. यामध्ये संसर्गजन्य रोग, प्रतिजैविक-प्रतिकारशक्ती, असंसर्गजन्य रोग, डिजिटल आरोग्य आणि हवामान आणि आरोग्य यांच्यातील परस्परसंबंध या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 'डच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अँड द एन्व्हायर्नमेंट' (आरआयव्हीएम) आणि 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (आयसीएमआर) यांच्यातील सहकार्यामुळे या उपक्रमाला आणखी बळ मिळाले आहे.

फलित 14 : सीमाशुल्क क्षेत्रात परस्परांमध्‍ये प्रशासकीय सहाय्य करार

सीमाशुल्क प्राधिकरणांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने 'सीमाशुल्क गोष्‍टींबाबत परस्परांमध्‍ये प्रशासकीय सहाय्याबाबतचा करार' करण्यात आला आहे. हा करार अंमलबजावणी प्रक्रिया सुधारण्यासाठी माहितीची देवाणघेवाण सुलभ करेल, तसेच भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील कायदेशीर व्यापाराला चालना देईल. शिवाय, या करारामुळे खर्च आणि विलंब कमी करून व्यापाराची कार्यक्षमता वाढू शकेल. त्याच वेळी पारदर्शकता आणि निर्यातीची स्पर्धात्मकता देखील सुधारेल.

फलित 15 : उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य

उच्च शिक्षणातील द्विपक्षीय सहकार्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गतिशीलता वाढेल आणि सहयोगी संशोधनाला बळकटी मिळेल. यामुळे कौशल्ये, रोजगारक्षमता तसेच संशोधनाचे फलित यात सुधारणा होईल, तसेच रोजगाराच्या आणि उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण होतील.

फलित16: नालंदा विद्यापीठ आणि नेदरलँड्सच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्रोनिंगेन यांच्यामध्‍ये सहकार्य

नालंदा विद्यापीठ आणि ग्रोनिंजेन विद्यापीठ यांच्यातील सहकार्य भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील शैक्षणिक आणि संस्थात्मक भागीदारी अधिक दृढ करेल. संयुक्त शैक्षणिक उपक्रम, आदानप्रदान कार्यक्रम आणि सहयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून हे सहकार्य विद्यार्थी आणि प्राध्यापकांना जागतिक स्तरावरील अधिक व्यापक अनुभव मिळवून देईल. ही भागीदारी अभ्यासाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आंतरविद्याशाखीय संशोधन, अध्यापनातील सहकार्य आणि ज्ञान-सामायिक करण्‍यासाठी नवीन संधी निर्माण करेल. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय निधीच्या संधी उपलब्ध करून देणे, नाविन्यपूर्णतेच्या परिसंस्था बळकट करणे, तसेच उच्च शिक्षणातील प्रतिभा विकास आणि क्षमता बांधणीस पाठिंबा देणे या बाबींनाही यामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

फलित 17 : लायडेन विद्यापीठ ग्रंथालये आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांच्यातील सहकार्य

नेदरलँड्सचे लायडन विद्यापीठ ग्रंथालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्यामध्‍ये सहकार्यामुळे ऐतिहासिक संशोधन, अभिलेखीय जतन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होईल. या उपक्रमामुळे चोल काळावरील संयुक्त संशोधनासाठी नवीन संधी निर्माण होतील, शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन मिळेल आणि मौल्यवान ऐतिहासिक नोंदी आणि हस्तलिखितांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, या कामामध्‍ये सुधारणा होईल. यामुळे सांस्कृतिक राजनैतिक संबंध अधिक दृढ होतील आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक तसेच पुरातत्वीय वारशाबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता वाढेल.

एकत्रितपणे, हे परिणाम पारंपरिक सहकार्याकडून भविष्यवेधी धोरणात्मक भागीदारीकडे होणारे संक्रमण दर्शवतात. यागोष्‍टी लवचिक विकास, तांत्रिक प्रगती आणि जागतिक आव्हानांवर अधिक मजबूत समन्वयासाठी असलेल्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहेत. विस्तारत असलेली भारत-नेदरलँड्स भागीदारी नवोन्मेष-प्रेरित आंतरराष्ट्रीय सहकार्याचा एक प्रमुख आधारस्तंभ बनण्यास सज्ज आहे.

भविष्यासाठी सज्ज भारत-नेदरलँड्स भागीदारीच्या दिशेने

भारत आणि नेदरलँड्स आपली भागीदारी एका व्यापक आणि भविष्यवेधी सहकार्यामध्ये सातत्याने विस्तारत आहेत. तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर, जल व्यवस्थापन, नवोन्मेष आणि व्यापार या क्षेत्रांतील मजबूत पूरकता अधिक सखोल संबंधांसाठी एक भक्कम पाया प्रदान करते. या संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळणे हे वाढता परस्पर विश्वास आणि सामायिक जागतिक प्राधान्यक्रम दर्शवते. दोन्ही देश आर्थिक, तांत्रिक आणि लोकां-लोकांमधील थेट संबंध दृढ करत असल्यामुळे, ही भागीदारी शाश्वत विकास, लवचिक पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सज्ज आहे.

References:

  1. Ministry of External Affairs
  1. Press Information Bureau
  1. Embassy of the Netherlands in India

· https://www.netherlandsandyou.nl/web/india/w/the-netherlands-and-india-work-together-to-boost-the-semiconductor-industry

·  https://www.netherlandsandyou.nl/web/india/themes/climate-energy

पीडीएफ येथे पाहता येईल

नेहा कुलकर्णी / विजयालक्ष्मी साळवी- साने / आशुतोष सावे / सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

(Explainer ID: 158723) आगंतुक पटल : 53
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam