Global Affairs
तिसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद
हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेश धोरणात्मक भागीदारीला चालना
Posted On:
26 MAY 2026 11:51AM
| भारत–नॉर्डिक आघाडीमुळे भारत आणि नॉर्डिक देशांमधील द्विपक्षीय सहकार्याने नवा आकार घेतला. दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीची उभारणी करण्यासाठी संरेखीत उच्च स्तरीय संबंधांचा प्रारंभ करण्याच्या दृष्टीने पहिली भारत-नॉर्डिक शिखर परिषद 2018 मध्ये घेण्यात आली. 19 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्डिक देशांचे पंतप्रधान यांची तिसऱ्या नॉर्डिक शिखर परिषदेसाठी नॉर्वेमध्ये ओस्लो येथे भेट झाली. या बैठकीने भारत-नॉर्डिक संबंधांना हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेश धोरणात्मक भागीदारीचा आयाम दिला. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ बळकट करण्याबरोबरच हवामानबदलविषयक कृती, STEM क्षेत्रात सहकार्य, नील अर्थव्यवस्था, शिक्षण, संरक्षण सहकार्य आणि आर्क्टिक संबंध या क्षेत्रांमध्ये संयुक्त उपक्रम या दिशेने परिषदेने पुढे पाऊल टाकले. |
प्रस्तावना
2018 मध्ये झालेल्या पहिल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत भारत आणि नॉर्डिक देशांनी बहुआयामी भागीदारीचा प्रारंभ केला. या भागीदारीमध्ये नवोन्मेश, हरित तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. भारताच्या आर्थिक विकासाला सहाय्य, शाश्वत विकास मार्गांना प्रोत्साहन, कौशल्य आणि प्रतिभा विकासाला बळकटी देणे आणि चैतन्यशील नवोन्मेश परीसंस्थेची जोपासना करण्याचा याचा उद्देश आहे. नविकरणीय ऊर्जा आणि हवामान बदलविषयक उपक्रमांमधील सहकार्याद्वारे नॉर्डिक नैपुण्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचा लाभही भारत घेऊ शकतो. ही धोरणात्मक भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी तिसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद 19 मे 2026 रोजी ओस्लो येथे झाली. या परिषदेने व्यापार, गुंतवणूक, डिजिटल नवोन्मेश आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ केले. नील अर्थव्यवस्था, सागरी सहकार्य, STEM संशोधन, लवचिक पुरवठा साखळी आणि संरक्षण भागीदारी या क्षेत्रातही उभय पक्षांनी सहयोग व्यापक केला. आर्थिक भागीदारीबरोबरच भारत मुत्सद्देगिरीच्या सॉफ्ट पॉवर साधनाद्वारेही नॉर्डिक देशांशी जोडला गेला आहे.
|
भारताचे आर्क्टिक धोरण
नॉर्डिक देशांसमवेत आघाडी हा भारताच्या आर्क्टिक धोरणाचा महत्वाचा घटक आहे. आर्क्टिक प्रदेशातील हवामान बदलामुळे प्रामुख्याने बर्फ वितळल्यामुळे हवामानाच्या स्थितीवर आणि पर्जन्यमान आकृतीबंधावर प्रचंड मोठा परिणाम होऊ शकतो. हे परिवर्तन भारताच्या आर्थिक, अन्न आणि जल सुरक्षा आणि 1300 पेक्षा जास्त द्वीप क्षेत्रे आणि सागरी सुविधांच्या स्थैर्यासाठी अतिशय व्यत्ययकारक ठरू शकते.
‘भारत आणि आर्क्टिक : शाश्वत विकासासाठी भागीदारी उभारणी’ या नावाचे भारताचे आर्थिक धोरण सहा स्तंभांवर आधारित आहे : भारताचे शास्त्रीय संशोधन आणि सहकार्य दृढ करणे, हवामान आणि पर्यावरणीय संरक्षण, आर्थिक आणि मानव विकास, वाहतूक आणि कनेक्टीव्हिटी, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आर्क्टिक क्षेत्रात राष्ट्रीय क्षमता उभारणी.
|
नॉर्डिक देशांसमवेत भारताचा विकसित होणारा सहयोग
नॉर्डिक देशांसमवेत भारताचे संबंध पारंपारिक मुत्सद्देगिरीपासून भविष्यवेधी धोरणात्मक भागीदारीपर्यंत विकसित झाले आहेत. हरित विकास, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवोन्मेश आणि शाश्वत विकास या क्षेत्रातील सामायिक प्राधान्य या परिवर्तनासाठी चालक ठरले आहे. नॉर्डिक देश, प्रगत तंत्रज्ञान निपुणता आणत आहेत तर भारत बाजारपेठ, व्यापक प्रमाण, प्रतिभा आणि उत्पादन क्षमता प्रदान करत आहे. यांचा संगम भारताच्या हरित संक्रमण, डिजिटल विस्तार, आर्क्टिक प्रदेशांसमवेत संबंध आणि लवचिक आर्थिक विकास धोरण यासाठी महत्वाचा स्तंभ म्हणून पुढे येत आहे.
डेन्मार्क:
- 2025 मध्ये भारत आणि डेन्मार्क यांच्यातील द्विपक्षीय वस्तू व्यापार 2.05 अब्ज डॉलर होता.
- त्याच वर्षात भारताची डेन्मार्कमध्ये वस्तू निर्यात 1.06 अब्ज डॉलर्स राहिली तर आयात 0.98 अब्ज डॉलर्स राहिली. सेवा क्षेत्रातला द्विपक्षीय व्यापार 4.25 अब्ज डॉलर्स वर पोहोचला तर 2025 मध्ये भारताची या क्षेत्रातील निर्यात 1.9 अब्ज डॉलर्स आणि आयात 2.3 अब्ज डॉलर्स राहिली.
- डेन्मार्कमध्ये भारताच्या एकूण गुंतवणूकीचे मूल्य सुमारे 560 दशलक्ष डॉलर्स आहे.
- माहिती तंत्रज्ञान, नविकरणीय ऊर्जा आणि अभियांत्रिकीसह विविध क्षेत्रात सुमारे 40 भारतीय कंपन्या डेन्मार्कमध्ये कार्यरत आहेत. तर नौवहन, नविकरणीय ऊर्जा, पर्यावरण, कृषी, अन्न प्रक्रिया आणि स्मार्ट शहरी विकास यांसारख्या क्षेत्रात सुमारे 200 डॅनिश कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे.
- 2024 पर्यंत डेन्मार्कमधून भारतातला एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 1.413 अब्ज डॉलर्स होता.
- भारत आणि डेन्मार्क यांनी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम (2022) आणि सिल्व्हर ट्रेझर्स फ्रॉम इंडिया अॅन्ड डेन्मार्क प्रदर्शन यासारख्या उपक्रमांद्वारे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक सहकार्य बळकट केले आहे.
- आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत ध्वजारोहण, महोत्सव, शालेय कार्यक्रम, क्रीडा कार्यशाळा आणि डेन्मार्कमध्ये व्यापक समुदाय सहभाग यातून सॉफ्ट पॉवर दृष्टीकोन प्रतीत होतो.
- आंतरराष्ट्रीय योग दिन डॅनिश शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, यामध्ये व्यापक सहभाग आणि कोपनहेगन येथे योग सर्वांसाठी यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
- डेन्मार्कमध्ये भारतीय समुदायाचे सुमारे 21,000 लोक विविध व्यवसायांमध्ये योगदान देत आहेत. आरहूस येथे आरहूस विद्यापीठाजवळ गांधी प्लेन (गांधी पार्क), इंडीयाकाज (भारताच्या नावावरून रस्त्याचे नाव) आणि नेहरू मार्ग यासारखी सार्वजनिक ठिकाणे दोन्ही देशांतील जनतेमधील दृढ संबंध तसेच सांस्कृतिक बंध यांचे प्रतिक आहेत.
- 2026 मध्ये भारत आणि डेन्मार्कच्या नेत्यांनी मोबिलिटी, भागीदारी दृढ करण्याविषयी आणि लोकांमधील परस्पर आदान-प्रदान व्यापक करण्याबाबत चर्चा केली.
फिनलंड :
- 2024-25 मध्ये फिनलंडसमवेत द्विपक्षीय वस्तू व्यापार 1.017 अब्ज डॉलर होता. त्याच वर्षात भारताने फिनलंडला केलेली निर्यात 356.37 दशलक्ष डॉलर्स तर आयात 660.70 दशलक्ष डॉलर्स राहिली.
- 2025 मध्ये सेवा क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार 1.9 अब्ज डॉलर्स राहिला. भारतातून फिनलंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त राहिला असून यामध्ये अनेक अधिग्रहण आणि भागीदाऱ्याचा समावेश आहे. फिनलंडच्या 100 पेक्षा जास्त कंपन्या भारतात कार्यरत आहेत. फिनलंडची भारतातील गुंतवणूक वाढून 4 अब्ज डॉलर्स झाली आहे.
- योग केंद्रे, कला, भारतीय नृत्य शाळा आणि भारतीय दूतावासाच्या सहाय्याने संगीत, नृत्य, महोत्सव यांना चालना देणारे सांस्कृतिक कार्यक्रम यातून फिनलंडमध्ये भारतीय संस्कृती ठळकपणे दिसून येते. ‘तेर्वे नमस्ते’ मालिकेतून दूतावास भारतीय विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधतो.
- फिनलंडमध्ये सुमारे 33000 भारतीय असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची ठळक उपस्थिती आहे. सुमारे 2400 विद्यार्थी तिथे उच्च शिक्षण घेत आहेत.
- पर्यटन आणि प्रवास क्षेत्रातील संबंधांमध्ये वृद्धी होत असून, इ-व्हिसा सुविधा आणि हेल्सिन्की आणि नवी दिल्ली दरम्यान थेट विमान सुविधेच्या उपलब्धतेमुळे गोवा, केरळम् आणि गोल्डन टेम्पल यांसारख्या स्थळांना भेट देणाऱ्या फिनिश पर्यटकांचे प्रमाण वाढते आहे.
- 2026 मध्ये, भारत आणि फिनलंडने फिनलंडच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिसंस्थेमध्ये भारतीय व्यावसायिकांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेतली आहे.
आइसलँड:
- 2024-25 या वर्षांत आइसलँडसमवेत 77.06 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढे द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण होते.
- त्याच वर्षांत, भारताने आइसलँडला केलेल्या निर्यातीचे मूल्य 66.01 दशलक्ष डॉलर्स इतके होते.
- आइसलँडमध्ये, भारतीय संस्कृती विशेषतः योग, शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, चित्रपट आणि खांद्यसंस्कृती लोकप्रिय आहे. आइसलँडमध्ये सुमारे 600 भारतीय नागरीक वास्तव्यास आहेत.
- 2026मध्ये भारत आणि आइसलँडने आपल्या सहकार्याचा आढावा घेतला आणि परस्पर लोक संपर्क, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील देवाणघेवाण विस्तारण्यावर तसेच आर्क्टिक संशोधनामध्ये सहकार्य वाढवण्यावर दिला.
नॉर्वे:
- 2024-25 या वर्षांत भारत आणि नॉर्वे यांच्यादरम्यान द्विपक्षीय व्यापार 1.05 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता.
- त्याच कालावधीत भारताने 630 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या वस्तूंची निर्यात केली, 420 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंमतीच्या वस्तूंची आयात केली आहे.
- नॉर्वेच्या गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल (जीपीएफजी) ने (डिसेंबर 2025 पर्यंत) जवळपास 28 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम भारतीय भांडवली बाजारामध्ये गुंतवली आहे.
- त्याव्यतिरिक्त, नॉर्वेमधून होणारा थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत 764 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका होता.
- भारत आणि नॉर्वे दरम्यान जवळपास 30,000 लोकांच्या भारतीय समुदायाच्या माध्यमातून परस्पर लोकसंपर्कामुळे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले.
- भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि 40 हून अधिक भारतीय संस्था नॉर्वेच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात योगदान देतात.
- दर्बनडागेन आणि ओस्लो कलर फेस्टिवल सारख्या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती आणि सांस्कृतिक, मूल्य, आदर्श क्षमतेचा (सॉफ्ट पॉवर) वाढत असलेला प्रभाव अधोरेखित करतात.
स्वीडन
- भारत आणि स्वीडन यांच्यादरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2024 मध्ये 6.96 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता.
- एप्रिल 2000 ते डिसेंबर 2024 या कालावधीत स्वीडनकडून एकूण थेट परकीय गुंतवणूक इक्विटीचा ओघ 2.596% अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता.
- भारतामध्ये साधारणपणे 280 स्वीडीश कंपन्यांचे व्यावसायिक अस्तित्व आहे तर व्यावसायिक अस्तित्व असलेल्या भारतीय कंपन्याची संख्या 2024 मध्ये वाढून 75 झाली आहे.
- भारतीय सांस्कृतीक परंपरा जसे भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य, योग, आयुर्वेद, भारतीय सण आणि चित्रपट यांचे स्वीडनमध्ये मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाते.
- आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीडनच्या विविध शहरांमध्ये साजरा केला जातो, त्यातून भारताचा वाढता सांस्कृतिक प्रभाव दिसून येतो.
- ‘नमस्ते स्टॉकहोम’ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवामुळे हजारो पर्यटक आकर्षित होतात आणि त्यामुळे भारतीय कला आणि आंतरसांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळते.
- भारत आणि स्वीडीश विद्यापीठांमध्ये सक्रिय भागीदारी आहे. उपसाला येथील भारतीय विद्या अभ्यासाची परंपरा जवळपास 200 वर्षापूर्वीची असून, ती भारतीय संस्कृतीशी असलेल्या सखोल बौद्धिक आणि संशोधनात्मक बांधिलकीचे दर्शन घडवते.
- द्विपक्षीय संबंधांमध्ये क्रीडा आणि चित्रपटाचेही योगदान आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाने स्वीडनला भेट दिली, भारतीय डेव्हिस करंडक संघाने 2024 मध्ये भेट दिली, स्वीडीश चित्रपटकर्ते लेवान अकीन यांना 2024 मध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक मिळाले आहे.
- जवळपास 88,000 प्रवासी भारतीय समुदायाचे भारतीय संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्यात मोठे योगदान आहे.
तिसरी नॉर्डिक परिषदः दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीच्या दिशेने भविष्यातील पावले.
तिसऱ्या नॉर्डिक शिखर परिषदेत भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये चर्चा झाली. गेल्या दशकात द्विपक्षीय व्यापारात झालेली चौपट वाढ, गुंतवणुकीच्या ओघात झालेली 200% वृद्धी आणि भारताच्या आर्थिक विकासावरील सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन, भारत आणि नॉर्डिक देशांनी आपले संबंध हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्यास सहमती दर्शवली आहे. या उपक्रमांतर्गत भारताने पुढील योजना आखल्या आहेत.
- भूऔष्णिक ऊर्जा आणि मत्स्यव्यवसायात आइसलँडसोबत सहकार्य करणे.
- नील अर्थव्यवस्था आणि आर्क्टिक सहकार्य यांमध्ये नॉर्वेसमवेत भागीदारी करणे आणि
- सागरी आणि शाश्वतता क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसमवेत संलग्न होणे.
याव्यतिरिक्त, प्रगत उत्पादन, संरक्षण, दूरसंचार, डिजीटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि आरोग्य तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष तसेच आर्क्टिक आणि ध्रुवीय संशोधन या क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा झाली. ही भागीदारी भारत आणि नॉर्डिक प्रदेश या दोन्ही ठिकाणी आर्थिक विस्तार, तांत्रिक प्रगती आणि रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करण्याबरोबरच शाश्वत विकासाला पाठिंबा देते. दोन्ही देशांनी बहुपक्षीय संस्थांमध्ये तातडीच्या सुधारणांची गरज अधोरेखित केली आणि दहशतावादविरोधात एकजूट भूमिकेचा पुनरुच्चार केला. नुकताच भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए) व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) भारत-नॉर्डिक संबंधांमध्ये एका 'नव्या सुवर्णयुगाची' सुरुवात करेल.
शिखर परिषदेतील महत्वाची फलनिष्पत्ती
या शिखर परिषदेत, भारत आणि नॉर्डिक देशांमधील संबंध, हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणात्मक भागीदारीपर्यंत उन्नत करण्यावर परस्पर सहमती झाली. यात, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, डिजिटल नवोन्मेष, शाश्वत उत्पादन आणि हवामान बदलविषयक कृती यावर भर दिला जाईल. तसेच, व्यापार, गुंतवणूक, संशोधन सहकार्य, लवचिक पुरवठा साखळी आणि लोकांचा परस्परांशी संबंध या सगळ्या क्षेत्रांची व्याप्ती वाढवत, नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांना पाठबळ देण्याविषयीची कटिबद्धताही व्यक्त करण्यात आली.
फलनिष्पत्ती एक : भारत – नॉर्डिक हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणात्मक भागीदारी

हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणात्मक भागीदारीतून, भविष्यात शाश्वत तंत्रज्ञानांचा वापर, शाश्वत विकास आणि व्यवस्थापन, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि अंगीकार करण्याचा मार्ग खुला होईल. डिजिटल पायाभूत सुविधा अधिक भक्कम झाल्याचा सकारात्मक परिणाम प्रशासनावर होईल आणि त्यातून, सेवांची निर्वेध अंमलबजावणी होऊ शकेल.
या फलनिष्पत्तीचा आणखी एक सकारात्मक परिणाम हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यातही आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठीही होणार आहे. त्याशिवाय, यातून हरित रोजगार निर्मिती होईल, प्रशासन मजबूत होईल आणि नॉर्डिक देशांसोबत, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधीही वाढतील. पाण्याच्या शाश्वत वापर, त्याचा पुनर्वापर, आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यांच्यातील सहकार्यामुळे, लोकांच्या जीवनमानाचा दर्जा तर उंचावेलच, त्याशिवाय दीर्घकालीन वित्तीय विकासाला पाठबळ मिळेल. एकत्रित संशोधन आणि शिक्षण यामुळे, भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि व्याख्याते यांना परदेशात विशेष वाव मिळणार आहे, तसेच, यातून शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासही मदत होईल.
फलनिष्पत्ती 2 : भारत-ईएफटीए टीईपीए : भारत नॉर्डिक संबंधावरील परिणाम

भारत ईएफटीए -टीईपीए मुळे, दोन्ही बाजूसाठी, बाजारपेठ प्रवेश सुधारण्यास मदत मिळेल, व्यापारातील अडथळे कमी करेल, व्यापार आणि गुंतवणूकीचा ओघ वाढण्यास प्रोत्साहन मिळेल आणि मूल्यसाखळी अधिक मजबूत होईल. नॉर्डिक देशांसोबत झालेला मुक्त व्यापार करार, रोजगार निर्मितीला चालना देईल, नवोन्मेष आणि शाश्वत विकासाचे मार्ग प्रशस्त करेल.
फलनिष्पत्ती 3 : हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठीचे उपक्रम

हवामान बदलविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी हाती घेण्यात आलेले उपक्रम उपाययोजनांवर केंद्रित आहेत. या क्षेत्रातील सहकार्य, केवळ हवामान बदलविषयक आव्हानांचा सामना करण्यात मदत करणार नाही, तर हरित रोजगाराच्या संधी निर्माण करेल, द्विपक्षीय व्यापारात वृद्धी करेल आणि गुंतवणुकीच्या अधिक संधी निर्माण करेल. परिणामी, त्यातून, अधिक शाश्वत अर्थव्यवस्था उभी राहिल आणि दीर्घकालीन वित्तीय विकासाला पाठबळ मिळेल.
फलनिष्पत्ती 4: आर्टिक्ट प्रदेशात भारत-नॉर्डिक सहकार्य

भारताच्या आर्टिक्ट धोरणाचा भाग म्हणून हा सहकार्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ध्रुवीय संशोधनाचा दीर्घकालीन परिणाम हवामान बदल प्रणाली, पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास यावर होतो. हवामान बदलाच्या संकटाचा सामना तसेच एक स्थिर आर्टिक्ट प्रदेश भारताच्या मोसमी पावसाचे पॅटर्न सुरक्षित ठेवणे, पर्यावरणाचा समतोल राखणे, शाश्वतता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृषी उत्पादकता वाढवणे यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.
फलनिष्पत्ती 5 : स्टेम क्षेत्रात संशोधनविषयक सहकार्य

हा संशोधन विषयक उपक्रम नवीन रोजगार संधी निर्माण करण्यास, संशोधन व विकास विस्तारण्यास, तंत्रज्ञान हस्तांतरणाला प्रोत्साहन देण्यास तसेच शैक्षणिक सहकार्य आणि संशोधनाच्या गुणवत्तेला बळकटी देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल. 6-जी सहित पुढील पिढीतील दूरसंचार तंत्रज्ञानातील संशोधनाला गती मिळाल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि देशाची डिजिटल पायाभूत सुविधा अधिक सक्षम होईल.
फलनिष्पत्ती 6 : नील अर्थव्यवस्थेतील सहकार्य

सशक्त नील अर्थव्यवस्थेमधील सहकार्यामुळे शाश्वत विकासासह आर्थिक वृद्धी साध्य होईल. रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, व्यापार वृद्धिंगत होईल तसेच दीर्घकालीन पर्यावरणीय आणि हवामान संरक्षण होऊ शकेल. नील अर्थव्यवस्थेचा मुख्य भर महासागर आणि सागरी संसाधनांच्या शाश्वत वापरावर आहे. नील अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे सागरी संसाधनांचा जबाबदारीने वापर, सागरी संपर्कक्षमता बळकट करणे आणि भागीदार देशांमधील प्रादेशिक सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देणे यांद्वारे स्थिर आणि सुरक्षित हिंद-प्रशांत प्रदेशाच्या निर्मितीलाही महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.
फलनिष्पत्ती 7 : कौशल्य आणि प्रतिभांचे आदानप्रदान

संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यामुळे भारतीय विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांना नवीन दृष्टिकोन तसेच जागतिक शिक्षण वातावरणाचा अधिक व्यापक अनुभव मिळेल. संशोधन क्षेत्रातील वाढीव सहकार्यामुळे संशोधनाच्या गुणवत्तेत आणि प्रमाणातही वाढ होईल. याशिवाय कौशल्य विकासाला चालना मिळेल, आर्थिक वृद्धीला गती मिळेल तसेच नवोन्मेष, उद्योग आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन मिळेल.
फलनिष्पत्ती 8 : संरक्षण उत्पादनात सहकार्य

भारताच्या संरक्षण उद्योग क्षेत्रात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिल्यामुळे संरक्षण उद्योग सहकार्य विकास क्षेत्र विकसित करण्याने तंत्रज्ञान हस्तांतरण, संशोधन आणि नवोन्मेष याला गती मिळेल, देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल, अधिक रोजगारनिर्मिती होईल, निर्यातीत वाढ होईल आणि संरक्षण उत्पादनांची कार्यक्षमता वाढेल. त्याशिवाय, यामुळे संरक्षणविषयक सज्जता अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
भारत-नॉर्डिक यांच्यातील भक्कम भागीदारीच्या दिशेने वाटचाल
भारत आणि नॉर्डिक देशातील संबंध अत्यंत स्थिर वेगाने उत्क्रांत आणि मजबूत होत आहेत. अनेक द्वीपक्षीय उपक्रमातून गेल्या काही वर्षात, हे संबंध अधिकच बळकट करण्यात आले आहेत. शिखर परिषदेमधील फलनिष्पत्तीचा उद्देश या भागीदारीला हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाधारित धोरणात्मक भागीदारीच्या पुढील स्तरावर नेणे हा आहे. या परिषदेमुळे दीर्घकालीन ऊर्जा भागीदारी, हवामान बदल नियंत्रण, व्यापार आणि गुंतवणूक संबंध, डिजिटल नवोन्मेष, नील अर्थव्यवस्था, सागरी सहकार्य, स्टेम क्षेत्रातील सहकार्य तसेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यास महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. भारत–ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार - टीईपीए यामुळे भारत आणि नॉर्डिक प्रदेशातील द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक बळकट होण्याची अपेक्षा असून, त्याद्वारे शाश्वत आर्थिक विकासालाही प्रोत्साहन मिळेल. आर्थिक भागीदारी मजबूत करण्याच्या उपक्रमांबरोबरच सुप्त शक्तीच्या दृष्टिकोनामुळेही परस्पर संबंध अधिक दृढ आणि व्यापक झाले आहेत.
References:
- Ministry of External Affairs
- Press Information Bureau
- Ministry of Earth Sciences
- DD News
See In PDF
***
NitinFulluke / NilimaChitale / Vjayalaxmi Salvi / RadhikaAghor / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 158717)
आगंतुक पटल : 41
Provide suggestions / comments