• Sitemap
  • Advance Search
Social Welfare

सोमनाथ: भारताच्या अविनाशी आत्मज्योतीचे प्रतीक

श्रद्धा, धैर्य आणि सांस्कृतिक सातत्याच्या 75 वर्षांचा उत्सव

Posted On: 08 MAY 2026 6:05PM

सोमनाथ हे भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असून, भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये हे तीर्थक्षेत्र प्रथम स्थानी विराजमान आहे. इ.स. 1026 पासून वारंवार आक्रमणे झाल्यानंतरही सोमनाथ हे श्रद्धा, चिकाटी आणि सांस्कृतिक सातत्याचे प्रतीक म्हणून अढळ राहिले आहे. 1951 साली राष्ट्रीय नेतृत्वाखाली पुनर्बांधणी करण्यात आलेल्या या मंदिराच्या पुनर्उद्घाटनाने भारताच्या सांस्कृतिक आणि नागरी पुनरुत्थानाची नांदी दिली आहे. 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' हे, इ.स. 1026 साली मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रसंगाचे स्मरण करते. त्याचबरोबर, मे 1951 मध्ये मंदिराचे पुन्हा उद्घाटन झाले, त्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याचाही हा एक विशेष प्रसंग आहे. हे पर्व मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करते आणि त्याच्या चिरंतन वारशाचा गौरव करते. या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी, पंतप्रधान मोदी 11 मे रोजी सोमनाथ मंदिराला भेट देत आहेत. 

सोमनाथचे पवित्र किनारे

गुजरातच्या सौराष्ट्र किनारपट्टीवर, प्रभास पाटण येथे वसलेले सोमनाथ हे भारतातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. 'शिवपुराणा'त उल्लेख असलेल्या अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना या मंदिरामध्ये करण्यात आली आहे. भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण आणि 'शक्ती' (देवी) यांच्या उपासनेचे एक मुख्य केंद्र म्हणून या मंदिराला अत्यंत आदराने पूजले जाते.

'द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये' सोमनाथचा उल्लेख बारा ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वप्रथम केला आहे. हे स्थान भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशातील त्याच्या अग्रक्रमाचे आणि सर्वोच्च स्थानाचे प्रतिबिंब आहे.

गेल्या अनेक शतकांमध्ये आक्रमकांनी या सोमनाथ मंदिराची वारंवार नासधूस आणि लूटमार केली आहे, मात्र प्रत्येक वेळी भाविकांनी आणि शासकांनी या मंदिराची पुनर्बांधणी करून, त्याची गमावलेली वैभवशाली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून दिली आहे. म्हणूनच सोमनाथ हे भारताच्या अविचल श्रद्धेचे एक प्रज्ज्वल प्रतीक म्हणून उभे आहे, ज्या श्रद्धेने शतकानुशतके, वारंवार झालेल्या आक्रमणांवर विजय मिळवला आहे. हे मंदिर आपल्या संस्कृतीचे सातत्य, आपल्या श्रद्धेची खोली आणि आपल्या सामूहिक संकल्पाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारे आहे.

शाश्वत ज्योत: काळ आणि संकटांशी दोन हात करणारे सोमनाथ

सोमनाथचा उगम प्राचीन भारतीय परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे. भगवान शंकर आणि 'चंद्र' (चंद्रदेव) यांच्या उपासनेशी अत्यंत नजिकचा संबंध असणारे हे पवित्र स्थळ आहे.

गेल्या अनेक शतकांमध्ये, सोमनाथने बांधकामाचे विविध टप्पे अनुभवले आहेत. प्राचीन परंपरांनुसार वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करून या ठिकाणी एकापाठोपाठ एक मंदिरांची उभारणी करण्यात आली असून ही प्रक्रिया नवनिर्मितीचे आणि सातत्याचे प्रतीक मानली जाते.

सोमनाथच्या इतिहासातील सर्वात धामधुमीचा आणि अस्थिरतेचा कालखंड अकराव्या शतकात सुरू झाला. जानेवारी 1026 मध्ये सोमनाथवर आक्रमकांकडून पहिला हल्ला झाल्याची नोंद आढळते. या घटनेने एका काळ्याकुट्ट दीर्घ कालखंडाला सुरुवात झाली, ज्यामध्ये अकराव्या ते अठराव्या शतकादरम्यान या मंदिराचा वारंवार विध्वंस करण्यात आला.

हे मंदिर नष्ट झाले, त्या प्रत्येक वेळी तत्कालिन भाविक आणि राजांनी त्याच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला. बाराव्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करणारे राजा कुमारपाल यांचा येथे विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे. तेराव्या शतकात जुनागढच्या राजाने या मंदिराची पुनर्बांधणी केली. त्यानंतर पुन्हा एकदा मंदिर नष्ट झाल्यावर, अठराव्या शतकात इंदूरच्या मराठा राणी, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी सोमनाथ येथे एका नवीन मंदिराची उभारणी करून त्याची प्रतिष्ठापना केली. अशा प्रकारे, वारंवार विध्वंस होऊनसुद्धा सोमनाथ लोकांच्या सामूहिक स्मृतीतून कधीच पुसले गेले नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, 1947 साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथच्या भग्नावशेषांना भेट दिली आणि मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला. भारताचा सांस्कृतिक आत्मविश्वास पुनरुज्जीवित करण्यासाठी सोमनाथची पुनर्बांधणी अत्यावश्यक आहे, या दृढ विश्वासावर त्यांचा हा संकल्प आधारलेला होला. जनसहभाग आणि राष्ट्रीय संकल्पाच्या बळावर, सध्याचे हे मंदिर 'कैलाश महामेरू प्रसाद' या वास्तुकला शैलीत उभारण्यात आले.

11 मे 1951 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या मंदिराची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 75 वर्षांनंतरही सोमनाथ हे राष्ट्रीय स्वाभिमान आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून नवचैतन्याने बहरून उभे आहे.

वीर हमीरजी गोहिल: इतिहासाच्या नोंदींपलीकडील स्मृती

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005YHFI.jpgसोमनाथची गाथा अशा शूरवीरांनी घडवली आहे, ज्यांचे शौर्य आजही लोकांच्या स्मृतींमध्ये जिवंत आहे.

वीर हमीरजी गोहिल हे असेच एक थोर व्यक्तिमत्त्व होते.

ते या भागातील एक स्थानिक योद्धा होते. इसवी सन 1299 मध्ये जफर खानच्या आक्रमणा दरम्यान सोमनाथ मंदिराचे रक्षण करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. परंपरांमध्ये त्यांच्या या बलिदानाचे स्मरण आजही आदराने केले जाते.

अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्यांचा फारसा उल्लेख नसला तरी स्थानिक परंपरा आणि लोकांच्या सामूहिक स्मृतींच्या माध्यमातूनच त्यांची आठवण अधिक जिव्हाळ्याने जपली गेली आहे.

जिंकण्याची अपेक्षा नसताना आणि मर्यादित मदत उपलब्ध असतानाही पवित्र स्थळे, समाज आणि सांस्कृतिक वारसा यांचे रक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडण्याचा अर्थात राजधर्म जपण्याचा बाणा त्यांच्या चरित्रातून अधोरेखित होतो.

सोमनाथ स्वाभिमान पर्व

'सोमनाथ स्वाभिमान पर्व' हे सोमनाथ मंदिराच्या चिरंतन वारशाचा गौरव करणारे आहे. काही सापडलेल्या नोंदींनुसार इसवी सन 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला आता एक हजार वर्षे पूर्ण झाली. याचबरोबर 11 मे, 2026  हा दिवस पर्व म्हणून साजरा करण्‍यासाठी एक महत्वाचे कारणही आहे. या मंदिराचे पुन्हा बांधकाम पूर्ण केल्या नंतर सोमनाथ मंदिराचे सन 1951 मध्‍ये पुनर्उद्घाटन करण्‍यात आले. या मंदिर मुक्त करण्‍याच्या घटनेचा यंदा  75  वा वर्धापन दिन  आहे.  भारताचे तत्कालीन  पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते हे मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यात आले होते. त्यांनी सोमनाथचे वर्णन भारताच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक असे केले होते. हे पुनर्उद्घाटन म्हणजे केवळ मंदिराचा जीर्णोद्धार नव्हते तर त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्‍टी त्यामागे होत्या. शतकानुशतकांच्या संघर्षानंतर भारताच्या नागरी-सांस्कृतिक आत्मविश्वासाचे झालेले पुनरुज्जीवन हे नवनिर्मित मंदिर  दर्शवत होते.

या सर्व कारणांमुळे  'सोमनाथ स्वाभिमान पर्व' म्हणजे भारताच्या इतिहासातील दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांची सांगड घालणारा उत्सव आहे. यापैकी  पहिला टप्पा हा विध्वंसाचे प्रतिनिधित्व करतो. तर दुसरा टप्पा हा त्याच  विध्वंसावर विजय मिळवून पुन्हा उभे राहण्याची देशाची अढळ श्रद्धा आणि दुर्दम्य जिद्द दर्शवतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या  'सोमनाथ न्यासा'चे अध्यक्षही आहेत. त्यांनी  मंदिराचा पुनर्उद्घाटनाचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी 11 मे रोजी सोमनाथ मंदिराला भेट दिली.

आपल्या भेटीपूर्वी, पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराविषयीचे आपले विचार मांडले. त्यांनी मंदिराच्या 'विध्वंसापासून पुनरुज्जीवनापर्यंतच्या' प्रवासाचे वर्णन केले आणि ही घटना  'भारताच्या अजिंक्य आत्मशक्तीचे प्रतीक' असल्याचे प्रतिपादन केले.  शतकानुशतके ज्या लोकांनी  या मंदिराचे रक्षण केले आणि त्या मंदिराचे पुनर्निर्माण केले, अशा व्यक्तींना त्यांनी आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी विशेषत्वाने "विकास भी, विरासत भी" (विकासही, वारसाही) या दृष्टिकोनावर भर दिला.  हा दृष्टिकोन वारसा संवर्धनासोबतच विकासावरही लक्ष केंद्रित करणारा आहे. पंतप्रधानांनी सोमनाथ येथे आगामी  एक हजार  दिवसांसाठी विशेष पूजा-अर्चना  आयोजित  करण्यात येतील, अशी घोषणाही केली. या पूजा कार्यक्रमाच्या माध्‍यमातून  मंदिराच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान केला जाईल. या महत्त्वपूर्ण कालावधीत लोकांनी सोमनाथला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी  केले. 

यापूर्वी, जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी 10 -11 जानेवारी 2026 रोजी सोमनाथ मंदिरात आयोजित सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्यात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात 72 तास अखंड 'ओंकार मंत्र' जपाचे आयोजन करण्यात आले होते.  यासोबतच राष्ट्राचे कल्याण आणि समृद्धीसाठी पवित्र विधी आणि  प्रार्थनाही करण्यात आल्या. प्रभास पाटण येथे एका भव्य 'शौर्य यात्रे'चे आयोजन करण्यात आले होते.  या यात्रेमध्ये, शतकानुशतके सोमनाथचे रक्षण करणाऱ्या योद्ध्यांना आदरांजली म्हणून 108  घोड्यांची एक प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली होती.

सोमनाथ स्वाभिमान पर्व यात्रा

"चलो चलें सोमनाथ" या मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेली 'सोमनाथ स्वाभिमान पर्व यात्रा', 30 एप्रिल, 2026 रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून रवाना करण्यात आली. यामध्‍ये सहभागी झालेल्या 1,300 पेक्षाही जास्त  भाविकांना घेऊन जाणारी ही विशेष रेल्वेगाडी सोमनाथकडे मार्गस्थ झाली. मंदिराच्या श्रद्धा आणि कणखरपणाला एक हजार  वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या उत्सवाचाच एक भाग म्हणून ही यात्रा आयोजित करण्यात आली होती.

प्रस्तूत यात्रा 1 मे रोजी सोमनाथ येथे पोहोचली. त्यानंतरच्या काही दिवसांत आरती, मंदिर दर्शन आणि प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम यांसारख्या विविध भक्तीपूर्ण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेचे इथे आयोजन करण्‍यात आले होते.

सोमनाथ मंदिर: भव्यता, भक्ती आणि जिवंत वारसा

भगवान शंकराच्या बारा 'आदि ज्योतिर्लिंगां'पैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून सोमनाथला अत्यंत पवित्र स्थान प्राप्त आहे. मंदिराच्या संकुलामध्ये गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप यांचा समावेश आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हे अत्यंत भव्य मंदिर उभे आहे.

मंदिराचे शिखर 150 फूट उंच असून, त्याच्या माथ्यावर दहा टनांचा सुवर्णकलश विराजमान आहे. मंदिराचा 27 फूट उंच ध्वजदंड हा मंदिराच्या चिरंतन आध्यात्मिक अस्तित्वाचे प्रतीक आहे. या संकुलात सुवर्णाने मढवलेले 1,666 कलश आणि 14,200 ध्वज आहेत. शतकानुशतके चालत आलेली भक्ती आणि उत्कृष्ट कारागिरीचे  दर्शन या कलश आणि ध्‍वजांमुळे होते.

सोमनाथ हे आजही उपासना आणि तीर्थयात्रेचे एक चैतन्यदायी  केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी 92 ते 97 लाख भाविक दर्शनासाठी येतात. 'बिल्व पूजा' सारख्या धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी 13.77 लाखांहून अधिक भाविक येथे येतात.

विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे सोमनाथच्या वारशाशी लोकांचे नाते अधिकच दृढ झाले आहे. इथे ‘प्रकाश आणि ध्‍वनी' कार्यक्रमाचा प्रारंभ 2003 मध्ये झाला होता आणि 2017 मध्ये या कार्यक्रमाला आधुनिकीकरणाचा साज चढवण्‍यात आला. आता या कार्यक्रमामध्‍ये निवेदन दिले आहे आणि 'त्रिमितीय लेझर तंत्रज्ञाना'चा वापर केला जातो.

'वंदे सोमनाथ कला महोत्सव' सारख्या कार्यक्रमांमुळे दीड हजार वर्षांपासूनच्या जुन्या नृत्यपरंपरांना पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथमध्ये सांस्कृतिक विकासाची नवी लाट अनुभवास आली आहे. प्रशासकीय सुधारणा आणि वारसा जतन करण्याच्या प्रयत्नांमुळे सोमनाथचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिकच वाढले आहे.

श्री सोमनाथ न्याासाचे सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रम

शैक्षणिक विकास आणि कौशल्य प्रशिक्षण

या संस्थेमार्फत शिक्षण आणि रोजगार-केंद्रित कौशल्य विकास कार्यक्रमांना सक्रिय प्रोत्साहन दिले जाते. व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे जवळपासच्या परिसरातील  युवक आणि महिलांसाठी संधींमध्ये वाढ करतात. या अभ्यासक्रमांमध्ये संगणक शिक्षण, शिवणकाम, सौंदर्य सेवा आणि डिजिटल साक्षरता प्रशिक्षणाचा समावेश आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत पुरवली जाते.

‘स्कूल ऑन व्हील्स’  हा उपक्रम गावागावांत मोबाईल डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यावहारिक संगणक प्रशिक्षण आणि मूलभूत डिजिटल साक्षरतेचे शिक्षण दिले जाते. शैक्षणिक स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छता आणि जलसंधारणाच्या सवयींबाबत जागरूकता निर्माण केली जाते. तसेच, विद्यार्थी आणि स्थानिक समुदायांसाठी नियमितपणे पर्यावरणीय भान निर्माण करणारे  कार्यक्रम आयोजित केले जातात.

अन्नदान आणि समुदाय कल्याण

ही विश्वस्त संस्था भाविक आणि गरजू व्यक्तींसाठी नियमितपणे अन्नदानाचे उपक्रम राबवते. समुदायाच्या पाठबळाने चालणाऱ्या अन्न सहाय्यता कार्यक्रमांद्वारे दररोज मोफत जेवण दिले जाते.

देणगीदारांच्या सहभागामुळे हे कल्याणकारी उपक्रम वर्षभर सुरू ठेवणे शक्य होते. आणीबाणीच्या काळात, ही संस्था बाधित समुदायांना मानवतावादी मदत पुरवत राहते.  मदतकार्यामध्ये अन्न वाटप, वैद्यकीय मदत आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा यांचा समावेश होतो. हे कल्याणकारी उपक्रम सामुदायिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वंचित कुटुंबांनाही मदत करतात.

आरोग्य, शिक्षण आणि समुदाय कल्याण उपक्रम

श्री सोमनाथ ट्रस्ट आरोग्य सेवा आणि समुदाय कल्याण उपक्रमांना सातत्याने पाठबळ देत आहे. सोमनाथ-प्रभास पाटण जवळच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना वैद्यकीय सहाय्य कार्यक्रम मदत देत असतात. फिजिओथेरपी सुविधा स्थानिक रहिवाशांना पुनर्वसन आणि तब्येत पूर्ववत करण्यासाठी परवडण्याजोगे आवश्यक पाठबळ देतात. जवळच्या परिसरातील समुदायांसाठी नियमितपणे मोफत दंत आणि नेत्र उपचार शिबिरे आयोजित केली जातात.

वैद्यकीय मदत शिबिरांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी उपक्रम देखील सुरू आहेत. या सहाय्यता कार्यक्रमांदरम्यान व्हीलचेअर्स, श्रवणयंत्रे आणि कुबड्यांचे वाटप केले जाते.

श्री सोमनाथ ट्रस्टकडून कोविड-19 मदत सहाय्य 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0097M8J.jpgकोविड-19 महामारीच्या काळात, श्री सोमनाथ ट्रस्टने बाधितांना आर्थिक मदत, अन्न वाटप, वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासह मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. महामारीच्या दोन्ही लाटांदरम्यान आघाडीवर काम करणारे कर्मचारी, स्थलांतरित मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत देण्यात आली.

पहिल्या लाटेदरम्यान ₹8.73 कोटींची मदत

·         दुसऱ्या लाटेदरम्यान ₹2.21 कोटींची मदत

·         मुख्यमंत्री मदत निधीला ₹1 कोटींची देणगी

·         ऑक्सिजन प्लांट आणि कॉन्सन्ट्रेटर पुरवण्यात आले.

पर्यावरण आणि जनहितकारी उपक्रम

पर्यावरण संवर्धन हे ट्रस्टसाठी एक महत्त्वाचे लक्ष केंद्रित करण्याचे क्षेत्र राहिले आहे. मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण मोहिमांमुळे सभोवतालच्या भागातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होते. बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण उपक्रम देखील सोमनाथ परिसरातील पर्यावरणीय जागरूकतेस चालना देतात.

पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन पद्धतींद्वारे मंदिरातील आणि सेंद्रिय कचऱ्याचा जबाबदारीने पुनर्वापर केला जातो. शाश्वत वापरासाठी सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट आणि नैसर्गिक खतामध्ये केले जाते. सार्वजनिक स्वच्छता उपक्रम अधिक स्वच्छ आणि पर्यावरणाप्रति जागरुक तीर्थक्षेत्रासाठी उपयुक्त ठरतात.

श्री सोमनाथ ट्रस्टचे कल्याणकारी उपक्रम केवळ नियमित सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य सेवांपुरते मर्यादित नसून, ते आपत्कालीन प्रतिसाद आणि आपत्ती निवारणापर्यंत विस्तारलेले आहेत. समुदायाच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या निरंतर विकासकामांसोबतच, नैसर्गिक आपत्ती आणि मानवतावादी संकटाच्या वेळीही ट्रस्ट सक्रिय पुढाकार घेऊन मदत करते.

सोमनाथमधील महिला सक्षमीकरण आणि शाश्वतता

2018 मध्ये 'स्वच्छ आयकॉनिक प्लेस' म्हणून घोषित झाल्यानंतर, सोमनाथने शाश्वततेच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केला आहे. मंदिरातील फुलांचे रूपांतर गांडूळ खतात केले जाते, ज्याचा उपयोग 1,700 बिल्व वृक्षांच्या पोषणासाठी होतो. 'मिशन लाईफ' (Mission LiFE) अंतर्गत प्लास्टिक कचऱ्याचे रूपांतर पेव्हर ब्लॉक्समध्ये केले जाते, ज्यामध्ये दरमहा 4,700 ब्लॉक्सची निर्मिती होते. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेद्वारे दरमहा सुमारे 30 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.

72,000 चौरस फूटांवर पसरलेल्या 7,200 झाडांच्या मियावाकी जंगलामुळे वार्षिक सुमारे 93,000 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड शोषला जातो. शुद्ध केलेले अभिषेकाचे पाणी 'सोमगंगा जल' म्हणून बाटलीबंद केले जाते, ज्याचा फायदा डिसेंबर 2024 पर्यंत 1.13 लाखाहून अधिक कुटुंबांना झाला आहे.

सोमनाथ हे महिला सक्षमीकरणाचे एक प्रबळ केंद्र म्हणूनही उदयास आले आहे. सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या 906 कर्मचाऱ्यांपैकी 262 महिला आहेत. 'बिल्व वन'चे व्यवस्थापन पूर्णपणे महिलांमार्फत केले जाते. प्रसाद वाटपात 65 महिला आणि मंदिराच्या भोजन सेवेमध्ये 30 महिला कार्यरत आहेत. एकंदरीत, 363 महिलांना प्रत्यक्ष रोजगार मिळत असून, त्या वार्षिक अंदाजे 9 कोटी रुपये कमावत आहेत, जे आर्थिक स्वावलंबन आणि प्रतिष्ठेचे दर्शन घडवते.

सोमनाथः काळाच्या ओघात अढळ राहिलेली श्रद्धा

सोमनाथ हे भारताची श्रद्धा, विध्वंसातून पुन्हा उभे राहण्याची क्षमता आणि सांस्कृतिक निरंतरतेचे एक अजरामर प्रतीक आहे. शतकानुशतके वारंवार झालेला विनाश आणि त्यानंतर झालेले पुनरुज्जीवन असे चढऊतार सहन करून, हे स्थान भक्तीच्या अढळ शक्तीचे प्रतिबिंब बनले आहे.  

पौराणिक महत्त्वापासून ते 1951 मधील ऐतिहासिक जीर्णोद्धारापर्यंत, सोमनाथ केवळ एक पवित्र मंदिरच नव्हे, तर सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय पुनरुत्थानाची सामूहिक अभिव्यक्ती दर्शवते. या वर्षी त्याच्या जीर्णोद्धाराचा 75 वा वर्धापन दिन हा त्याच्या आधुनिक वारशातील एक महत्त्वाचा टप्पा असून, भारताच्या सामायिक वारशातील त्याचे स्थान पुन्हा अधोरेखित करतो.

उपासना, सांस्कृतिक पुनरुज्जीवन, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाचे जिवंत केंद्र म्हणून सोमनाथची वाटचाल सुरूच आहे. खऱ्या वारशाचे अस्तित्व केवळ जतन करण्यामुळेच नव्हे, तर ठराविक काळाने होणारे  नूतनीकरण आणि सामूहिक श्रद्धेमुळे टिकून राहते, याची एक चिरंतन आठवण म्हणून हे स्थान उभे आहे.

References

PM India

https://www.pmindia.gov.in/en/news_updates/pm-writes-an-oped-on-forthcoming-visit-to-somnath/?comment=disable

https://www.pmindia.gov.in/en/image-gallery/#gallery16769128-15

https://www.pmindia.gov.in/en/image-gallery/#gallery16769128-21

Ministry of Culture

Somnath Swabhiman Parv Yatra from Delhi Flagged Off by Union Minister of Culture Shri Gajendra Singh Shekhawat and Delhi CM Smt. Rekha Gupta | Ministry of Culture

https://amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv

https://amritkaal.nic.in/flip-book/somnath-history-english-booklet.html

https://culture.gov.in/events/somnath-swabhiman-parv-yatra-delhi-flagged-union-minister-culture-shri-gajendra-singh

https://culture.gov.in/events/honble-prime-minister-shri-narendra-modi-attends-somnath-swabhiman-parv-and-leads-shaurya

https://amritkaal.nic.in/event-campaign-detail?2831

Ministry of Information and Broadcasting

https://indiacinehub.gov.in/location/somnath

All India Radio

https://www.newsonair.gov.in/pm-modi-leads-shaurya-yatra-at-somnath-pays-tribute-to-temples-defenders/

https://www.newsonair.gov.in/somnath-temples-survival-reflects-countrys-indomitable-civilisational-spirit-pm-modi/

https://www.facebook.com/reel/1212231374334173

Others

https://www.facebook.com/photo?fbid=1301080755386653&set=pcb.1301081125386616

https://www.facebook.com/photo?fbid=1301080755386653&set=pcb.1301081125386616

https://somnath.org/social-activities/

https://www.narendramodi.in/somnath-and-bharat-s-unconquerable-spirit-605118

Somnath: The Eternal Flame of Bharat

***

NehaKulkarni / MadhuriPange / SuvarnaBedekar / ShaileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Explainer ID: 158592) आगंतुक पटल : 175
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam