Social Welfare
भारतातील वैद्यकीय आणि निरामय (वेलनेस) पर्यटन जीवनासाठी जगाचे पर्यटनस्थळ
Posted On:
02 MAY 2026 10:10AM
नवी दिल्ली, 2 मे 2026
|
अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि 'आयुष' सारख्या पारंपरिक आरोग्य प्रणालींचे एकात्मिकरण करून भारत 'मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल' (MVT) साठी एक आघाडीचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. भक्कम धोरणात्मक पाठबळ, डिजिटल सुलभता आणि 'आयुष व्हिसा' आणि प्रादेशिक वैद्यकीय केंद्रांसारखे उपक्रम या परिसंस्थेला अधिक बळकट करत आहेत. जागतिक स्तरावर आरोग्य सेवेचा वाढता खर्च आणि परिपूर्ण उपचारांची मागणी यामुळे आंतरराष्ट्रीय रुग्ण परवडणाऱ्या, उच्च दर्जाच्या उपचारांसाठी आणि प्रतिबंधात्मक निरामयता उपायांसाठी भारताकडे आकर्षित होत आहेत.
|
भारत: एक जागतिक उपचार केंद्र
आरोग्य सेवेचा वाढता खर्च, उपचारांसाठी बराच काळ करावी लागणारी प्रतीक्षा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचा वाढता भार यामुळे जगभरात रुग्ण त्यांच्या देशांपेक्षा परदेशात उपचार घेण्यास पसंती देत आहेत. या जागतिक बदलामुळे अब्जावधी डॉलर्सच्या 'मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल' उद्योगाचा उदय झाला आहे.
जागतिक 'मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल' बाजारपेठेचे मूल्य 2022 मध्ये सुमारे 115.6 अब्ज डॉलर इतके होते. 2030 पर्यंत हे मूल्य सुमारे 286.1 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या बाजारपेठेचे मूल्य सुमारे 10.8% च्या वार्षिक चक्रवाढ वृद्धी दराने (CAGR) वाढत आहे.
या बदलत्या जागतिक परिदृश्यात भारत एक अत्यंत महत्त्वाचे गंतव्य स्थान म्हणून उदयास आला आहे. उद्योगाच्या अंदाजानुसार, 2025 मध्ये वैद्यकीय पर्यटन बाजारपेठ सुमारे 8.7 अब्ज डॉलर असेल, तर 2030 पर्यंत ती 16.2 अब्ज डॉलर वर पोहोचण्याचा अंदाज आहे.
शतकानुशतके, भारत हा उपचार, संतुलन आणि आरोग्याकडे पुन्हा वळू इच्छिणाऱ्यांसाठी एक आश्रयस्थान मानला गेला आहे. आज, हा प्राचीन वारसा एका गतिशील 'मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल' परिसंस्थेच्या रूपात विकसित झाला आहे. हे आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि पारंपारिक प्रणालींच्या कालातीत ज्ञानाचा संगम घडवून आणते.
सरकार आपल्या “हील इन इंडिया” (Heal in India) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे, देशाला एकात्मिक आणि सर्वांगीण आरोग्य सेवेसाठी एक अग्रगण्य गंतव्य स्थान म्हणून प्रस्थापित करत आहे.

या क्षेत्राची व्याप्ती समजून घेण्यासाठी, त्याच्या दोन प्रमुख स्तंभांमधील फरक स्पष्ट करणे आवश्यक आहे:
- वैद्यकीय पर्यटन: हे प्रामुख्याने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण आणि विशेष रुग्णालये तसेच आरोग्य संस्थांद्वारे प्रदान केली जाणारी प्रगत निदान सेवा, यांसारख्या उपचारात्मक हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करते.
- निरामयता पर्यटन: हे योग, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि इतर 'आयुष' (AYUSH) पद्धतींसारख्या पारंपारिक प्रणालींद्वारे प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण कल्याणावर भर देते. हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारणाऱ्या उपचार पद्धती प्रदान करते.
या दोन्ही स्तंभांनी एकत्रितपणे भारताच्या 'मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल' परिसंस्थेच्या पायाची उभारणी केली आहे. प्रगत क्लिनिकल उपचारांच्या गरजा आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी वाढणारी जागतिक मागणी या दोन्ही बाबींची ते पूर्तता करत आहेत.
वैद्यकीय पर्यटन निर्देशांक 2020-21 नुसार:
- जागतिक स्तरावरील पहिल्या 46 वैद्यकीय पर्यटन स्थळांमध्ये भारत 10 व्या क्रमांकावर आहे.
- जगातील पहिल्या 20 वेलनेस पर्यटन बाजारपेठांमध्ये भारत 12 व्या क्रमांकावर आहे.
- आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील पहिल्या 10 वेलनेस स्थळांमध्ये भारत 5 व्या क्रमांकावर आहे.

2025-26 चे सांख्यिकीय परिदृश्य
पर्यटन मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2024 या आर्थिक वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) पर्यटन क्षेत्राचा 5.22 टक्के वाटा होता, जो महामारीपूर्व स्तराच्या जवळ आहे. या क्षेत्राने अंदाजे 8.46 कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांना देखील आधार दिला, जे एकूण रोजगाराच्या सुमारे 13.3 टक्के आहे.
2025 ची ताजी आकडेवारी या क्षेत्रातील गती अधोरेखित करते:
- परदेशी पर्यटक आगमन (FTAs): 2025 मध्ये भारतात 9.15 दशलक्ष विदेशी पर्यटकांची नोंद झाली.
- वैद्यकीय हेतूने येणारे पर्यटक: 2025 मध्ये 507,244 विदेशी नागरिक विशेषतः वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आले.
- क्षेत्रीय वाटा: 2025 च्या आकडेवारीनुसार, एकूण विदेशी पर्यटक आगमनामध्ये वैद्यकीय पर्यटनाचा वाटा अंदाजे 5.5% आहे.

- प्रमुख बाजारपेठा: 2025 च्या आकडेवारीनुसार, वैद्यकीय पर्यटकांचा प्रमुख स्रोत असलेल्या देशांमध्ये बांगलादेश (3,25,127 आगमन) प्रथम स्थानी आहे, त्यानंतर इराक (30,989), उझबेकिस्तान (13,699), सोमालिया (11,506), तुर्कमेनिस्तान (10,231), ओमान (9,738) आणि केनिया (9,357) यांचा क्रमांक लागतो.
- इतर देशांतील रुग्ण प्रामुख्याने खालील विशेष उपचारांसाठी भारतात येतात:
- हृदय शस्त्रक्रिया
- अस्थिव्यंगोपचार
- कर्करोग उपचार
- अवयव प्रत्यारोपण
- मज्जासंस्थेशी संबंधित उपचार
- कॉस्मेटिक सर्जरी
- दंत चिकित्सा
- प्रजनन उपचार
- आयुष आधारित वेलनेस थेरपी
भारताची स्पर्धात्मक झेप: गुणवत्ता, नैपुण्य आणि परवडणारे दर
भारताकडे एक वैशिष्ट्यपूर्ण लाभदायक बाब आहे ज्यामुळे 'मेडिकल टुरिझम इंडेक्स' (MTI) मध्ये भारताचा जगात 10 वा क्रमांक लागतो. सरकारने या स्पर्धात्मक फायद्याचे काही मुख्य स्तंभ निश्चित केले आहेत:
भक्कम वैद्यकीय संसाधने
भारताची आरोग्य सेवा प्रणालीला जगातील सर्वात मोठ्या प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांच्या समुदायांपैकी एक असलेल्या समुदायाचे पाठबळ आहे.
भारतात एकूण 69,364 रुग्णालये (43,486 खाजगी आणि 25,778 सरकारी रुग्णालये) असून 1.2 दशलक्ष नोंदणीकृत डॉक्टर आहेत. या माध्यमातून भारताने जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले डॉक्टर-लोकसंख्या गुणोत्तर साध्य केले आहे.
त्याशिवाय, भारतात वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसायात इंग्रजी ही प्राथमिक भाषा असल्याने आंतरराष्ट्रीय रुग्णांशी संवाद साधणे सहज शक्य होते. गेल्या दशकात, भारताने आपली वैद्यकीय शिक्षण क्षमता आणि आरोग्य सेवा पायाभूत सुविधांचा लक्षणीय विस्तार केला आहे. यामुळे विशेष शाखांमध्ये कुशल आरोग्य सेवा व्यावसायिकांची उपलब्धता वाढली आहे.
प्रगत तंत्रज्ञान आणि अधिस्वीकृती
भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीला भक्कम गुणवत्ता हमी यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अधिस्वीकृती मानकांचे पाठबळ आहे. देशभरातील रुग्णालये आणि आरोग्य सेवा पुरवठादार 'नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स' (NABH) कडून मान्यता प्राप्त करतात.
रुग्णांची सुरक्षितता आणि दर्जेदार सुश्रुषा यासाठी एनएबीएचने कठोर मापदंड स्थापित केले आहेत. 2026 पर्यंत एनएबीएचने, 600 पेक्षा जास्त मापदंड लावत 1299 पेक्षा जास्त रुग्णालयांना अधिस्वीकृती दिली आहे. दरम्यान भारतीय गुणवत्ता परिषद, गुणवत्ता सुधारणेवर देखरेख करते.
इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्वालिटी इन हेल्थ केअर समवेत (आयएसक्यूयुए)संलग्नतेच्या माध्यमातून एनएबीएचला जागतिक स्तरावर मान्यता आहे. याशिवाय अनेक भारतीय रुग्णालये आंतरराष्ट्रीय संयुक्त आयोग मान्यताप्राप्त (जेसीआय)आहेत. वैद्यकीय उत्कृष्टतेच्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निकषांची पूर्तता करणाऱ्या आरोग्य सुश्रुषा संस्थामध्ये या रुग्णालयांना स्थान राहते.
मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल (एमव्हीटी) सेवा पुरवठादार प्रामुख्याने भारताच्या दक्षिण आणि पश्चिमी राज्यांमध्ये आहेत. 2022 पर्यंत शहरनिहाय जेसीआय- प्रमाणित रुग्णालय केंद्रीकरण याप्रमाणे आहे :
|
शहर
|
जेसीआय- प्रमाणित रुग्णालयांची संख्या
|
|
दिल्ली
|
9
|
|
मुंबई
|
6
|
|
बंगळूरु
|
3
|
|
चेन्नई
|
2
|
|
हैदराबाद
|
2
|
|
अहमदाबाद
|
2
|
|
कोलकत्ता
|
1
|
|
नागपूर
|
1
|
|
कोची
|
1
|
पुणे आणि नाशिक ही सेवा पुरवठादार केंद्रित इतर उल्लेखनीय शहरे आहेत.
किफायतशीर वैद्यकीय उपचार
भारताच्या वैद्यकीय पर्यटनासाठीच्या आवाहनाला त्याच्या किफायतशीर खर्चाची भक्कम जोड लाभली आहे. भारतात उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय उपचार तुलनात्मक वैद्यकीय गुणवत्ता कायम राखत बहुतेकवेळा अनेक विकसित देशांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी खर्चात उपलब्ध असतात.
या किफायतशीरपणाला अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि कुशल व्यावसायिकांची जोड लाभली आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय रुग्णांना दीर्घ काळाच्या प्रतिक्षेविना तज्ञ उपचार शक्य होतात.
आयुष प्रणीत मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल बळकट करणे
वैद्यक पर्यटनामध्ये भारताला अनोखा लाभ आहे तो त्याच्या आयुष म्हणजेच आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या शतकांपासूनच्या पारंपारिक औषधोपचार पद्धतींचा.
योग आणि आयुर्वेदाची जन्मभूमी असलेल्या भारताने या प्रणालींना समावेशक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक काळजी या रूपाने प्रोत्साहन जारी राखले आहे.
- आयुष व्हिसा सुविधा : आंतरराष्ट्रीय रुग्णांना सोयीचे व्हावे या दृष्टीकोनातून भारत सरकारने 27 जुलै 2023 रोजी समर्पित आयुष व्हिसा सुरु केला. यामुळे आयुष प्रणाली अंतर्गत मान्यताप्राप्त उपचारांसाठी भारतात येणाऱ्या परदेशी रुग्ण आणि त्यांच्या सहाय्यकांना सुलभता प्राप्त होते.
- गुणवत्ता मानके : या क्षेत्रात विश्वासार्हता आणि प्रमाणीकरण दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय मानक संस्थेने वैद्यकीय आरोग्य पर्यटन सेवेशी निगडीत आंतरराष्ट्रीय मानक ISO 22525 चा स्वीकार केला आहे.
- विमा व्याप्ती : आयुष पद्धतीसाठी विमा व्याप्तीचा लक्षणीय विस्तार करण्यात आला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) च्या आरोग्य विमा नियमनाखाली विमा कंपन्यांना आयुष अंतर्गत उपचार समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परिणामी सुमारे 27 विमा कंपन्या, आयुष उपचारांचा समावेश असलेली 140 पॉलिसी प्रोडक्ट देऊ करत आहेत.
- जागतिक मेळ आणि परिसंस्था विकास : मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल, महत्वाच्या आयुष उपक्रमांच्या केंद्र स्थानी आहे. यामध्ये ‘आयुषमध्ये जागतिक मेळ: मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल द्वारे आरोग्य आणि निरामयता क्षेत्रात परिवर्तन’ या मुंबईत (2024) आणि चेन्नई (मे 2025) मध्ये झालेल्या परिषदेचा समावेश आहे.
- आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषदेअंतर्गत आयुष उप परिषद यासारख्या उपक्रमातून क्षमता वृद्धी बळकट करण्यात येत आहे.
- जागतिक आरोग्य संघटना- जागतिक पारंपारिक औषधोपचार परिषद,जाणून घ्या भारताविषयी कार्यक्रम आणि महा कुंभ मेळा 2025 दरम्यान दर्शविण्यात आलेले आयुष उपक्रम यांसारख्या मंचाद्वारे जागतिक व्याप्ती विस्तारण्यात आली आहे.
|
भारतातला तुमचा उपचार प्रवास
अधिस्वीकृती रुग्णालये,प्रमाणित आयुर्वेद केंद्रे,उपचार खर्च,व्हिसा मार्गदर्शन आणि एमव्हीटी सुविधा – सर्व काही एकाच ठिकाणी
www.indiahealthcaretourism.com
एसईपीसीचा, वाणिज्य मंत्रालयाचा उपक्रम / पर्यटन,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आयुष मंत्रालय द्वारा सहकार्य
|
 |
धोरणात्मक उपक्रम : केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 ठळक बाबी
जागतिक वैद्यकीय केंद्र म्हणून देशाची भूमिका भक्कम करण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 द्वारे भारत सरकारने दूरगामी मार्ग आखला आहे.
प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे
राज्य सरकारे आणि खाजगी क्षेत्राशी भागीदारी करत देशभरात पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावाचा महत्वाच्या प्रस्तावामध्ये समावेश आहे. एकाच छताखाली वैद्यकीय, शैक्षणिक आणि संशोधन सुविधा प्रदान करणारी एकात्मिक आरोग्य देखभाल संकुले म्हणून ही केंद्रे आखण्यात आली आहेत.
समावेशक उपचारांचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी या केंद्रांची वैशिष्ट्ये याप्रमाणे असतील:
- विशेष केंद्रे : प्रत्येक केंद्रामध्ये आयुष केंद्र आणि समर्पित मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल (एमव्हीटी) सुविधा केंद्राचा समावेश राहील.
- सुरवातीपासून ते पुर्णत्वापर्यंत देखभाल:अद्ययावत निदान,उपचारानंतरची देखभाल आणि पुनर्वसन यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील.
- रोजगार निर्मिती : ही संकुले, डॉक्टर्स आणि संलग्न आरोग्य व्यावसायिकांसाठी (एएचपीएस)विविधांगी रोजगार संधी उपलब्ध करतील अशी अपेक्षा आहे.
आरोग्यासाठी पायाभूत सुविधा
आधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याबरोबरच सरकार पारंपारिक औषध प्रणालीमध्येही देशाची क्षमता विस्तारत आहे.
- आयुर्वेदामध्ये शिक्षण,संशोधन आणि नैदानिक सेवा विस्तारण्यासाठी तीन नव्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना प्रस्तावित आहे.
- त्याचबरोबर, पारंपारिक औषध प्रणालीमध्ये जागतिक समन्वय आणि तथ्याधारीत संशोधन बळकट करण्याकरिता, जामनगर इथल्या जागतिक आरोग्य संघटना जागतिक पारंपारिक औषध केंद्रामध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.
वैद्यकीय उपचार सेवा आणि आरोग्य आधारित उपचार परंपरा या दोन्हींचा विकास भारताच्या आरोग्य परिसंस्थेचा पूरक पाया म्हणून करण्याचा सरकारचा एकात्मिक दृष्टीकोन या उपक्रमांमधून प्रतीत होतो.
गुणवत्ता आणि प्रशासन यासाठी प्रारूप
भारताचा स्पर्धात्मक लाभ जारी ठेवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने वैद्यकीय आणि निरामयता पर्यटनासाठी राष्ट्रीय धोरण आणि प्रारूप जारी केला आहे.
हे प्रारूप प्रशासनाच्या तीन प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित आहे.
- संस्थात्मक रचना: 'राष्ट्रीय वैद्यकीय आणि निरामयता पर्यटन प्रोत्साहन मंडळ' (एनएमडब्ल्यूटीबी) ही यासाठी एक शिखर संस्था म्हणून कार्य करते. विविध मंत्रालये, राज्य सरकारे आणि खाजगी क्षेत्र यांच्यात समन्वय साधण्याचे काम ही संस्था करते.
- गुणवत्ता हमी: सरकार रुग्णालये, निरामयता केंद्रे आणि दंत चिकित्सालयांसाठी 'एनएबीएच' (रुग्णालये आणि आरोग्यसेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ) मानांकन अधिक काटेकोर करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने, मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल (एमव्हीटी) सुलभकर्त्यांची नोंदणी आणि मानांकन करण्यासही सरकार प्रोत्साहन देत आहे.
- कौशल्य विकास आणि क्षमता बांधणी: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये, 12 आठवड्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे 20 प्रतिष्ठित पर्यटन स्थळी 10,000 गाइड्सचे कौशल्य अद्ययावत करण्यासाठी एका पथदर्शी योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी, निम-वैद्यकीय आणि वैद्यकेतर कर्मचाऱ्यांना विविध संस्कृतींविषयीची संवेदनशीलता आणि परदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशासकीय आणि गुणवत्ता उपाययोजनांचे एकात्मीकरण करून भारत, सर्वांगीण उपचारांसाठी 365 दिवस सज्ज असल्याची ओळख जगापुढे अधिक प्रभावीपणे मांडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या एकात्मिक संप्रेषण धोरणाचा 'अतुल्य भारत' मोहिमेचा एक उप ब्रॅण्ड म्हणून प्रसार केला जात आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून, भारत आता 'सर्वांगीण आरोग्य क्रांतीचे' अधिक औपचारिक, नियमबद्ध आणि विश्वासार्ह असे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सरकारी सुविधा आणि डिजिटल परिवर्तन
सरकारने मजबूत डिजिटल आणि धोरणात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रुग्णांचा प्रवास सुलभ केला आहे. या प्रक्रियेचा एक मुख्य आधार म्हणजे उदारीकृत व्हिसा व्यवस्था. या अंतर्गत ई-मेडिकल व्हिसा आणि ई-मेडिकल अटेंडंट व्हिसा, या सुविधा 172 देशांतील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त, भारतीय पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने, ई-आयुष व्हिसा आणि ई-आयुष अटेंडंट व्हिसा, यांसारख्या नवीन श्रेणीदेखील सुरू करण्यात आल्या आहेत.
डिजिटल उपक्रम, 'हील इन इंडिया' अनुभव अधिक समृद्ध करत आहेत. :
- सुधारित एमव्हीटी पोर्टल: सरकार एकाच ठिकाणी सर्व सेवा देणारे मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल पोर्टल अद्ययावत करत आहे. यामुळे रुग्णांना सेवा शोधणे, नियोजन करणे आणि सेवेसाठी नोंदणी करणे, तसेच पैसे भरणे आणि शस्त्रक्रियेनंतरची देखभाल उपलब्ध होते.
- विमानतळ सुविधा: महत्त्वाच्या विमानतळांवर एमव्हीटी कंसीयज अर्थात सेवा सहायक ठेवण्याची आणि लाउंज उभारण्याची योजना आहे. यामुळे एअरब्रिजवर प्रवाशांचे स्वागत केले जाईल आणि त्यांना इमिग्रेशन, सीमा शुल्क आणि सामान दावा प्रक्रियेत मदत केली जाईल.
|
वैद्यकीय आणि निरामयता पर्यटनासाठी संस्थात्मक यंत्रणा
मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलचा समन्वित विकास सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने एक संस्थात्मक चौकट स्थापित केली आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटन प्रोत्साहन मंडळ (एनएमडब्ल्यूटीबी): पर्यटन मंत्रालयाने 2015 मध्ये हे मंडळ स्थापित केले असून केंद्रीय पर्यटन मंत्री या मंडळाचे अध्यक्ष आहेत. हे मंडळ भारतातील वैद्यकीय आणि निरामयता पर्यटनाला प्रोत्साहन देते आणि त्यासाठी सुविधा पुरवते.
बहु-हितधारक मंच: हे मंडळ मंत्रालये, राज्य सरकारे, रुग्णालये, आरोग्य केंद्रे, मान्यता संस्था आणि उद्योग क्षेत्रातील हितधारकांना एकत्र आणते. ते एकत्रितपणे एमव्हीटी परिसंस्थेला बळकट करतात.
राज्यस्तरीय समन्वय: प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी, राज्यांना समर्पित वैद्यकीय आणि निरामयता पर्यटन प्रोत्साहन मंडळे किंवा कक्ष स्थापन करण्यास प्रोत्साहित केले जाते.
|
निरामयता आणि सांस्कृतिक पर्यटन एकात्मीकरण
निरामयता पर्यटन हे देशाच्या व्यापक आरोग्य पर्यटन धोरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. योग, ध्यान, आयुर्वेद आणि आध्यात्मिक उपचारांमधील देशाच्या समृद्ध परंपरा, निरामयता आणि सांस्कृतिक पर्यटन यांच्या एकात्मीकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण संधी पुरवतात.
सर्वांगीण आरोग्यासाठी एक जागतिक ब्रँड म्हणून योग
योग ही प्राचीन भारतीय परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. संस्कृत भाषेतील 'युज' (अर्थात "जोडणे" किंवा "एकत्र करणे") या धातूपासून या शब्दाची निर्मिती झाली आहे. हे भारताच्या जागतिक सॉफ्ट पॉवरचा एक आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहे. हे मन, शरीर, विचार आणि कृती यांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे आणि आरोग्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते.

11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025, हा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर निरामयतेची संकल्पना रुजवण्यासाठी प्रमुख माध्यम ठरला. 'एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग', या संकल्पनेअंतर्गत, या कार्यक्रमाने योगाला शाश्वतता आणि जागतिक कल्याणाशी जोडले.
भारत हे योग आणि पारंपरिक उपचार पद्धतींसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून ओळखले जात असून परदेशी पर्यटकांना आकर्षित करत आहे. हे पर्यटक विशेषतः आपली निरोगी जीवनशैली जपण्यासाठी किंवा प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मिळवण्यासाठी प्रवास करतात. सरकारच्या समर्पित ई-आयुष व्हिसा सुविधेमुळे हा प्रवास आता लक्षणीयरीत्या सुलभ झाला आहे.
ग्लोबल हीलिंग हबच्या दिशेने वाटचाल
भारताची वैद्यकीय आणि निरामयता पर्यटन परिसंस्था एकात्मिक आरोग्यसेवेचे जागतिक विश्वासाचे प्रारूप म्हणून उदयाला येत आहे. यात आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि आयुषसारख्या पारंपरिक प्रणालींचा संगम आहे. यामुळे उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन्ही प्रकारची काळजी घेणे शक्य होते.
सरकारची ठोस धोरणे, डिजिटल सुविधा आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके या वाढीस बळ देत आहेत. यासोबतच वाढता जागतिक प्रसार, मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलसाठी एक सर्वसमावेशक आणि आकर्षक गंतव्यस्थान म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करत आहे.
जागतिक स्तरावर मागणी वाढत असताना, भारत जागतिक आरोग्यसेवा आणि निरामयता पर्यटनाच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.
संदर्भ
Press Information Bureau (PIB):
Ministry of Tourism:
National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers:
Ministry of AYUSH:
FICCI:
भारतातील वैद्यकीय आणि निरामय (वेलनेस) पर्यटन जीवनासाठी जगाचे पर्यटनस्थळ
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/निलीमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे
(Explainer ID: 158474)
आगंतुक पटल : 66
Provide suggestions / comments