Infrastructure

वाफेकडून वेगाकडे: रेल्वेची सतत विकसित होत जाणारी वाटचाल

Posted On: 15 APR 2026 11:58AM

नवी दिल्‍ली, 15 एप्रिल 2026

 

महत्त्वाचे मुद्दे

  • दिनांक 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) ते ठाणे यांच्यादरम्यान धावलेल्या पहिल्या प्रवासी रेल्वेगाडीसह भारतातील रेल्वे सेवेचा प्रारंभ झाला.
  • सुरुवातीच्या काळातील वाफेच्या इंजिनांवर धावणाऱ्या रेल्वेने आता, मार्च 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ब्रॉडगेज रेल्वेचे 99.6% विद्युतीकरण साध्य केले आहे.
  • विश्वसनीय जोडणी व्यवस्थेची सुनिश्चिती करत देशभरात विस्तारलेल्या रेल्वेच्या एकूण जाळ्यामध्ये प्रतिदिन सुमारे 25,000 रेल्वेगाड्या धावतात.
  • रेल्वेसेवेच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये केवळ काही शे लोकांना वाहून नेणाऱ्या या भारतीय रेल्वेने वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 741 कोटी प्रवाशांची वाहतूक केली.

  • तील 3,100 किलोमीटर्स लांबीच्या मार्गांवर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून अतिरिक्त 24,000 किलोमीटर्स लांबीच्या मार्गांवर या प्रणालीच्या अंमलबजावणीचे काम सुरु आहे.देशभरा

प्रस्तावना

भारतात 173 वर्षांपूर्वी वाफेच्या इंजिनाच्या शिट्टीने इतिहासाचा मार्गच बदलून टाकला. वर्ष 1853 मध्ये मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) ते ठाणे यांच्यादरम्यान पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली तेव्हा या गाडीने केवळ प्रवाशांचीच वाहतूक केली नाही तर स्वतःसोबत गतिमानता आणि जोडणी व्यवस्थेच्या एका नव्या युगाचे आश्वासन देखील वाहून नेले. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये, रेल्वेचे जाळे विविध शहरे, नगरे आणि गावांमध्ये पसरले आणि या सेवेने लोक, वस्तू आणि कल्पना यांना जोडून घेतले. वाफेच्या इंजिनांनी डीझेल इंजिनांसाठी मार्ग आखला आणि अखेरीस अधिक वेगवान, अधिक स्वच्छ आणि जास्त कार्यक्षम असलेल्या आणि विजेवर चालणाऱ्या गाड्या आल्या. कालांतराने, रेल्वे स्थानकांचे स्वरूप देखील साध्या फलाटापासून विविध प्रकारच्या क्रियाकलापांनी गजबजलेल्या केंद्रांमध्ये विकसित झाले. भूतकाळातील यशावर आधारलेल्या प्रत्येक नव्या तांत्रिक प्रगतीने लाखो प्रवाशांसाठी रेल्वेचा वेग, सुरक्षितता आणि सोयीसुविधांमध्ये सातत्याने सुधारणा केली. जो उपक्रम एका संथ आणि प्रायोगिक टप्प्याच्या रुपात सुरु झाला तो लवकरच जगातील सर्वात मोठ्या रेल्वेच्या जाळ्यांपैकी एक बनला.

आज, भारतीय रेल्वे प्रवासी तसेच मालवाहतूक परिचालनात नवनवे टप्पे गाठत असताना या वाटचालीला आणखीनच गती मिळत आहे. वर्ष 2025-26 मध्ये रेल्वेने तब्बल 741 कोटी प्रवाशांची वाहतूक केली. रेल्वे किती भव्य प्रमाणात देशसेवा करत आहे हेच यातून दिसून येते. याच कालावधीत रेल्वेचा एकूण महसूल सुमारे 80,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला तर रेल्वेद्वारे झालेल्या मालवाहतूकीने 1,670 दशलक्ष टनांचे (एमटी) विक्रमी प्रमाण गाठले. एका अग्रणी वाहतूक प्रणालीकडून रेल्वेसेवेचा आर्थिक विकासाच्या महत्त्वपूर्ण प्रेरक शक्तीमध्ये कशा प्रकारे विकास झाला आहे हेच या यशस्वी कामगिरीमधून दिसून येते. भारतभरातील लाखो व्यक्तींसाठी सुरक्षित, विश्वसनीय आणि सहजप्राप्य गतिमानता पुरवण्यासोबतच रेल्वे विभाग देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राचा कणा म्हणून देखील काम करत आहे.

 

भारतात रेल्वेसेवेची सुरुवात

दिनांक 16 एप्रिल 1853 रोजी बॉम्बे (आताचे मुंबई) ते ठाणे यांच्यादरम्यान धावलेल्या पहिल्या ऐतिहासिक प्रवासी रेल्वेगाडीसह भारतात रेल्वे सेवेची सुरुवात झाली. हा प्रसंग इतका महत्त्वाचा मानला गेला की या दिवशी बॉम्बेमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली, जेणेकरून नागरिकांना या नव्या वाहतूक व्यवस्थेच्या उद्घाटनाचे साक्षीदार होता येईल. त्यावेळी बोरीबंदर स्थानकापाशी फार मोठा जमाव गोळा झाला होता.

या उद्घाटनपर प्रवासासाठी अंदाजे 400 प्रवासी या रेल्वे गाडीत चढले. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपीआर) कंपनीतर्फे परिचालित करण्यात आलेल्या या रेल्वेगाडीला 14 प्रवासी डबे जोडण्यात आले होते आणि ही गाडी फॉकलंड नामक वाफेच्या इंजिनाच्या मदतीने ओढून नेण्यात आली. भारतात रेल्वे वाहतुकीच्या प्रारंभाचे प्रतीक म्हणून ही गाडी सुरु होत असताना 21 फैरींची उत्सवी सलामी देण्यात आली.

सदर रेल्वेगाडीने 34-35 किमीचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने रेल्वेसेवेमध्ये असलेल्या व्यावहारिक क्षमतेचे दर्शन घडवले. या घटनेने भारतीय रेल्वे प्रणालीचा पाया घातला आणि देशभरात रेल्वेच्या वेगवान विस्ताराचा कालखंड सुरु केला.

 

वाफेच्या युगात रेल्वे जाळ्याचा उदय

पहिल्या प्रवासी गाडीची सुरुवात झाल्यानंतर, भारतीय रेल्वेने वाफेच्या इंजिनाच्या तंत्रज्ञानाद्वारे चलित वेगवान विस्ताराच्या कालखंडात प्रवेश केला. रेल्वेच्या यंत्रणेने लवकरच अनेक प्रदेश पादाक्रांत करून एका एकल प्रायोगिक मार्गाला एका विस्तारित वाहतूक जाळ्यात परिवर्तीत केले. वर्ष 1880 पर्यंत रेल्वे प्रणालीने रेल्वे विषयक पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासाचे दर्शन घडवत सुमारे 9,000 मैलांचे (अंदाजे 14,500 किमी) रेल्वे मार्गांचे जाळे विकसित केले होते.

गेजच्या आधारावर, भारतीय रेल्वे मध्ये रेल्वे मार्गांचे खालील विविध प्रकार दिसून येतात:

ब्रॉड गेज– 1.6 मीटर

मीटर गेज – 1 मीटर

नॅरो गेज – 0.76 मीटर आणि 0.6 मीटर

स्टँडर्ड गेज – 1.43 मीटर

वाफेवर धावणाऱ्या रेल्वेच्या कालखंडादरम्यान झालेल्या अनेक महत्त्वाच्या परिचालनविषयक घडामोडींपैकी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितींच्या प्रदेशात रेल्वेच्या विस्ताराला पाठबळ पुरवण्यासाठी विविध रेल्वे गेजचा स्वीकार. रेल्वे धावेच्या दोन रुळांमधील किमान स्पष्ट अंतराला गेज असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात 5 फुट 6 इंच रुंदीच्या (1.6 मीटर) ब्रॉड गेजचा वापर केल्यानंतर वर्ष 1871 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रमाणित गेज म्हणून मीटर गेजचा अधिकृतपणे स्वीकार करण्यात आला. अविकसित भागांच्या विकासासाठी तसेच त्या प्रदेशातील माल मुख्य रेल्वेमार्गावर आणण्यासाठी मीटर गेजपेक्षाही अरुंद गेजेसचा वापर करण्यात आला.

या विस्ताराच्या बरोबरीने, रेल्वे अभियांत्रिकीमध्ये देखील लक्षणीयरित्या प्रगती झाली, विशेषतः आव्हानात्मक प्रदेशांमध्ये केलेल्या वैशिष्टीकृत रेल्वे यंत्रणेच्या बांधकामाद्वारे ही प्रगती साध्य झाली. वर्ष 1881 मध्ये दार्जिलिंग हिमालयन रेल्वे सेवेची सुरुवात हा या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. या मार्गामुळे न्यू जलपायगुडी हा पश्चिम बंगालमधील सखल भाग दार्जिलिंगशी जोडला गेला. या मार्गाच्या बांधकामातून पर्वतीय प्रदेशातील वाहतुकीसाठी अधिक नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी सुविधा आणि डोंगराळ भागातील अधिक सुधारित संपर्कप्रणालीचे दर्शन घडले. आणखी एक लक्षणीय तांत्रिक टप्पा म्हणजे स्वदेशी उत्पादन क्षमता होय. वर्ष 1895 मध्ये राजपुताना माळवा रेल्वेच्या अजमेर येथील कारखान्यात भारतातील पहिल्यावाहिल्या वाफेच्या इंजिनाची निर्मिती करण्यात आली. देशांतर्गत रेल्वे अभियांत्रिकी तसेच देखभाल क्षमतेच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले.

राजपुताना माळवा रेल्वेचे पहिले वाफेचे इंजिन क्र. एफ - 734

एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत वाफेच्या इंजिनांमध्ये बरीच प्रगती झाल्यामुळे दूरवरचे रेल्वे प्रवास सुलभ झाले होते, तसेच, मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होऊ लागली होती  व रेल्वेचे देशव्यापी जाळे तयार झाले होते. या सर्वंकष विकासामुळे भारतीय रेल्वेचा तांत्रिक, कार्यकारी व प्रशासनिक पाया  मजबूत होऊन पुढील प्रगतीची दारे खुली झाली होती. 

विसाव्या शतकात, जगभरातील रेल्वे प्रणालींमध्ये  हळूहळू वाफेच्या इंजिनांऐवजी अधिक कार्यक्षम इंजिनांचा वापर सुरू झाला. भारतात, 1925 मध्ये देशातील पहिली विजेवर चालणारी  ट्रेन मुंबई व्हिक्टोरिया टर्मिनस आणि कुर्ला हार्बर दरम्यान धावली आणि त्याबरोबरच  विद्युत इंजिनांकडे होणारे संक्रमण सुरू झाले. आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल होते. यामुळे प्रवासाचा वेग वाढवणे शक्य झाले आणि वाफेच्या इंजिनांवरील अवलंबित्व कमी झाले. पुढील दशकांमध्ये विद्युतीकरणातील प्रगती धीम्या गतीने  होत राहिली.

  • 1947: स्वातंत्र्यानंतर, भारताला रेल्वेमार्गाचे मोठे जाळे वारसा म्हणून मिळाले, परंतु त्यात मोठ्या सुधारणांची गरज होती. त्यामुळे  प्रमुख शहरांमधील संपर्क वाढवण्यासाठी रेल्वेमार्गांची पुनर्रचना करण्यात आली, नवीन रेल्वेमार्ग बांधण्यात आले, तसेच, पूर्वीच्या संस्थानांच्या रेल्वे प्रणालींसह 42 रेल्वे प्रणालींचे एकत्रीकरण करून भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली.
  • 1952: कार्यक्षमता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी रेल्वे जाळ्याची सहा प्रशासकीय विभागांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. या काळात रेल्वेच्या ताफ्यात कोळसा आणि डिझेल इंजिनांचेच वर्चस्व कायम होते.
  • 1985: वाफेची इंजिने हळूहळू बंद करण्यात आली आणि रेल्वेने अधिकाधिक कार्यक्षम डिझेल व इलेक्ट्रिक इंजिनांचा समावेश केला. हा रेल्वे प्रणालीच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा होता.

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकांपर्यंत, रेल्वेचा वापर करणाऱ्या  प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वाढत्या प्रमाणाला समर्थपणे पेलण्यास सक्षम असा रेल्वेचा एक भक्कम कार्यसंचालन पाया उभा राहिला होता. या कालखंडात  विकासाच्या एका नव्या पर्वाची पायाभरणी झाली.  या पर्वात  केवळ रेल्वे जाळ्याचा विस्तारच नव्हे, तर वेग, सुरक्षा, कार्यक्षमता आणि प्रवासी सेवांमध्येही मोठ्या  सुधारणा झाल्या.

 

भारतीय रेल्वेतील आधुनिकीकरणाचे पर्व

एकविसाव्या शतकात पदार्पण करताना, भारतीय रेल्वेने अद्ययावत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा स्वीकार अधिक वेगाने करण्यास सुरुवात केली. विद्युतीकरण, आधुनिक रेल्वे रचना, सुरक्षा यंत्रणा, रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि डिजिटल सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये रेल्वेने लक्षणीय प्रगती साधली आहे. विकासाच्या या प्रवासात विस्तारीकरणापेक्षा अधिक भर आधुनिकीकरणावर दिला जात होता.  या मध्ये शाश्वत विकास , प्रवाशांची सुखसुविधा, कार्यसंचालनातील कार्यक्षमता आणि विना अडथळा वाहतूक  या बाबींना अधिक महत्व दिले गेले. 

रेल्वेचे विद्युतीकरण

गेल्या एका दशकात, रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाच्या कामाला अभूतपूर्व गती प्राप्त झाली आहे. साल 2014 पूर्वी, भारतातील रेल्वे जाळ्यापैकी केवळ सुमारे 20 टक्के भाग विद्युतीकृत होता. यामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत होत्या आणि डिझेल इंधनावरील अवलंबित्व वाढत होते. आज हे विद्युतीकरण  जवळपास पूर्ण झाले असून, एकूण 70,142 ब्रॉडगेज रूट -किलोमीटर्सपैकी 99.6% रेल्वे जाळे विद्युतीकृत झाले आहे. या विस्ताराची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. साल 2014 मधील 21,801 रूट -किलोमीटर्स  (rkm) मार्गाचे विद्युतीकरण झाले होते, त्यात मोठी वाढ होऊन , मार्च 2026 पर्यंत 69,873 रूट -किलोमीटर्सचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. 

विद्युतीकरणाकडे  (Electric Traction) झालेल्या संक्रमणामुळे देशाच्या ऊर्जा अर्थव्यवस्थेला मोठा लाभ झाला आहे.  त्यातील सर्वात उल्लेखनीय बाबी खालीलप्रमाणे आहेत:

  • रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे 2024-25 या वर्षात सुमारे 180 कोटी लिटर डिझेलची बचत झाली, त्या मुळे कच्च्या तेलाच्या आयातीची गरज कमी झाली.
  • विद्युत इंजिन (विद्युत कर्षण पद्धती) पर्यावरणपूरक असून, ते डिझेल इंजिन ( डिझेल कर्षण पद्धती) पेक्षा सुमारे 70% अधिक किफायतशीर आहे.
  • विद्युतीकरणामुळे डिझेलचा वापर सातत्याने कमी होत असून त्यामुळे सुमारे 6,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

या विद्युतीकरणामुळे भारत जगभरातील अनेक प्रमुख रेल्वे यंत्रणांच्या तुलनेत आघाडीवर आला आहे. भारतातील रेल्वे विद्युतीकरणाचे प्रमाण युके (39%), रशिया (52%) आणि चीन (82%) यांच्यापेक्षा अधिक आहे.

रेल्वे मार्गांचे नूतनीकरण आणि वेगवृद्धी

गेल्या दशकात दूरगामी प्रगतीचे उद्दिष्ट ठेवून रेल्वे मार्गांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा  करण्यात आल्या आहेत.

साल 2014 ते 2026 या कालावधीत एकूण 54,600 किलोमीटर रेल्वे मार्गांचे नूतनीकरण करण्यात आले, व त्याचा परिणाम म्हणून रेल्वे सेवेची विश्वसनीयता आणि कार्यक्षमता सुधारली आहे. साल 2014 मध्ये ताशी 110 किलोमीटर किंवा त्याहून अधिक वेग सहन करू शकणाऱ्या रेल्वे मार्गांची लांबी 31,445 किलोमीटर म्हणजेच एकूण रेल्वेमार्गाच्या 40 टक्के होती, तिच्यात वाढ होऊन  फेब्रुवारी 2026 पर्यंत ती 85,000 किलोमीटरहून अधिक ( एकूण रेल्वेमार्गाच्या 80% हून अधिक) झाली आहे. यामुळे रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि कार्यक्षमतेने करणे सहजशक्य झाले आहे.

आधुनिक रेल्वे सेवांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ 

वंदे भारत नेटवर्क

भारतीय रेल्वेने 'वंदे भारत एक्सप्रेस'ची सुरुवात आणि विस्तार करून प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध केला आहे. ही भारतातील पहिली, पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आणि देशातच निर्मित 'सेमी-हाय-स्पीड' (अर्ध-वेगवान) रेल्वेगाडी आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेली ही सेवा, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत आधुनिक, आरामदायी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर असलेल्या रेल्वे प्रवासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते.

  • आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये, वंदे भारत एक्सप्रेस नेटवर्कवरून अंदाजे 3.98 कोटी प्रवाशांनी प्रवास केला; यावरून प्रवाशांच्या संख्येत  झालेली प्रचंड  वाढ दिसून येते.
  • सुरुवातीपासून आतापर्यंत, वंदे भारत एक्सप्रेसने 1 लाख फेऱ्यांच्या माध्यमातून 9.1 कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे.
  • जानेवारी 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'वंदे भारत स्लीपर' सेवेच्या पहिल्या तीन महिन्यांतच 119 फेऱ्या झाल्या असून  1.21 लाख प्रवाशांनी तिला पसंती दिली आहे. 

अमृत भारत एक्सप्रेस

मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना किफायतशीर वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, भारतीय रेल्वेने 'अमृत भारत एक्सप्रेस' सुरू केली आहे. आधुनिक रेल्वे गाड्यांचा हा  एक नवीन प्रकार असून, त्या वातानुकूलित (AC) नसलेल्या (Non-AC) स्वरूपाच्या आहेत.  तसेच, प्रवासाचा खर्च किफायतशीर ठेवूनही प्रवाशांचा आराम आणि सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने त्यांची रचना करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये 11 सामान्य श्रेणीचे (General Class) डबे, 8 शयनयान श्रेणीचे (Sleeper Class) डबे, 1 पँट्री कार, तसेच  अवजड सामान व दिव्यांग प्रवाशांसाठी 2 राखीव डबे यांचा समावेश असतो. यामुळे प्रवासासंबंधित विविध प्रकारच्या गरजा असलेल्या प्रवाशांना पुरेशा सुविधा मिळू शकतात . 18 मार्च 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेच्या संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यावर (नेटवर्कवर)  60 'अमृत भारत एक्सप्रेस' सेवांचे संचालन केले जात आहे.

भारतात अतिवेगवान रेल्वेचा विकास

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये भारतीय रेल्वेसाठी 2,78,000 कोटी रुपयांची विक्रमी भांडवली तरतूद करण्यात आली आहे, जी या क्षेत्राच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यावरून रेल्वे विकासाला दिलेले सामरिक महत्त्व अधोरेखित होते. या दूरदृष्टीचा एक भाग या नात्याने विकासाला जोडणारे दुवे म्हणून सात अतिवेगवान रेल्वे कॉरिडॉरच्या विकासाची घोषणा करण्यात आली आहे. या कॉरिडॉरचा उद्देश प्रमुख शहरे आणि प्रदेशांना जोडणे, लोकांच्या कार्यक्षम प्रवासाला चालना देणे आणि राज्या-राज्यांमधील आर्थिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हा आहे. प्रस्तावित मार्गांमध्ये मुंबई-पुणे, दिल्ली-वाराणसी आणि हैदराबाद-बंगळूरू यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, हे नियोजित कॉरिडॉर जवळपास 4,000 किलोमीटर लांबीचे आहेत.

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (एमएएचएसआर) कॉरिडॉर हे देशात अतिवेगवान रेल्वे प्रणाली सुरू करण्याच्या दिशेने भारताने उचललेले पहिले ठोस पाऊल आहे. एक समर्पित हाय-स्पीड प्रवासी कॉरिडॉर म्हणून संकल्पित, याची एकूण लांबी अंदाजे 508 किलोमीटर आहे. हा कॉरिडॉर ताशी 320 किलोमीटरच्या कमाल वेगाने अतिवेगवान परिचालनासाठी आरेखित करण्यात आला आहे.

या घडामोडी भारताच्या हाय-स्पीड रेल्वेच्या युगातील संक्रमणाचे संकेत देतात, ज्यामुळे अधिक जलद आणि कार्यक्षम आंतर-शहरी प्रवासाचा पाया घातला जातो.

डिजिटल पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि प्रवासी सुरक्षा

भारतीय रेल्वेने सुरक्षा, परिचालन कार्यक्षमता आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी आपली दूरसंचार आणि डिजिटल पायाभूत सुविधा अधिक मजबूत केली आहे. 2025-2026 या वर्षात प्रगत तंत्रज्ञान आणि एकात्मिक दळणवळण प्रणालीचा अवलंब करणे हे डिजिटल पद्धतीने जोडलेले रेल्वे नेटवर्क उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

  • एकीकृत दूरसंचार आधारस्तंभ पायाभूत सुविधा: रेल्वेने उच्च-क्षमतेच्या, अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे अनुप्रयोगांना समर्थन देण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल मल्टी-प्रोटोकॉल लेबल स्विचिंग (IP MPLS) तंत्रज्ञानाद्वारे दूरसंचार आधारस्तंभ अद्ययावत केला आहे. ही प्रणाली केंद्रीकृत व्हिडिओ निगराणी सक्षम करते आणि मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी), प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआर एस), पर्यवेक्षकीय नियंत्रण आणि डेटा संपादन (स्काडा) इत्यादींसारख्या मुख्य कार्यान्वयन प्रणालींना समर्थन देते. IP MPLS नेटवर्क 1,396 रेल्वे स्थानकांवर यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहे, ज्यामुळे डिजिटली एकात्मिक रेल्वे परिसंस्थेचा पाया अधिक मजबूत झाला आहे.
  • कवच: स्वदेशी 'कवच' या स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणालीच्या विस्तारामुळे सुरक्षा उपक्रम अधिक बळकट करण्यात आले आहेत. ही प्रणाली 3,100 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गांवर कार्यान्वित करण्यात आली असून अतिरिक्त 24,400 किलोमीटरवर तिची अंमलबजावणी सुरू आहे. रेल्वेगाड्यांची टक्कर टाळणे आणि परिचालन सुरक्षा वाढवणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
  • एआय-सक्षम व्हिडिओ निगराणी: प्रवाशांची सुरक्षा आणि देखरेख अधिक मजबूत करण्यासाठी एआय-आधारित विश्लेषण आणि चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ निगराणी प्रणाली (व्हीएसएस) 1,874 रेल्वे स्थानकांपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.
  • रिअल-टाइम प्रवासी माहिती: राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणालीशी (एनटीईएस) जोडलेली एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली (आरटीआय एस) 1,405 स्थानकांवर लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे वेळेवर घोषणा आणि प्रवाशांशी उत्तम संवाद सुनिश्चित होतो.
  • बोगदा दळणवळण प्रणाली: बोगद्याच्या भागांमध्ये अखंड संपर्क आणि सुरक्षित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआर एल) सह प्रमुख प्रकल्पांमध्ये दळणवळण प्रणाली सुरू करण्यात आल्या आहेत.

हे उपक्रम सुरक्षित आणि तंत्रज्ञान-आधारित रेल्वे नेटवर्क उभारण्याप्रती असलेली निरंतर वचनबद्धता अधोरेखित करतात. हे डिजिटल परिवर्तन आणि सुधारित प्रवासी सेवांच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

 

2025-2026 मधील कार्यान्वयन आणि पायाभूत सुविधांमधील यश

दशकांच्या आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक वर्ष 2025-2026 दरम्यान नोंदवलेले यश हे या निरंतर प्रगतीमधील सर्वात अलीकडील टप्पा दर्शवते.

  • 2025-2026 या संपूर्ण वर्षात रेल्वे सेवा मजबूत राहिली, दररोज अंदाजे 25,000 गाड्या धावत होत्या ज्यामुळे देशभरात विश्वसनीय आणि व्यापक कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झाली.
  • प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गर्दीच्या काळात अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांची सोय आणि सुलभता वाढली. या सेवा दिवाळी, छठ इत्यादी सणांच्या काळात चालवल्या जातात. वर्ष 2025-26 मध्ये (डिसेंबर 2025 पर्यंत) अंदाजे 65,000 विशेष गाड्या चालवण्यात आल्या.
  • भारतीय रेल्वेने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत 2025-2026 दरम्यान 1,674 लोकोमोटिव्हचे उत्पादन करून आपली देशांतर्गत उत्पादन क्षमता बळकट केली, जे रेल्वे उत्पादनातील वाढत्या आत्मनिर्भरतेचे द्योतक आहे.
  • जुलै 2025 मध्ये ‘रेलवन ॲप’च्या प्रारंभाने प्रवासी सेवा एका नव्या डिजिटल टप्प्यात दाखल झाल्या आहेत. हे ॲप तिकीट बुकिंग, रेल्वेगाडी चौकशी आणि तक्रार निवारणासाठी एक एकीकृत व्यासपीठ उपलब्ध करून देते.
  • 35 गती शक्ती कार्गो टर्मिनल्सच्या कार्यान्वयनामुळे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांचा विस्तार झाला असून त्यामुळे लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता सुधारण्यास आणि बहुविध वाहतूक साधनांना जोडणी मिळण्यास मदत झाली आहे.
  • अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 119 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आल्याने प्रवासी पायाभूत सुविधांमध्ये प्रगती झाली आहे, ज्यामुळे आधुनिक सोयीसुविधा आणि उत्तम प्रवास यांचा अनुभव मिळतो.

 

निष्कर्ष

दीड शतकाहून‌ मोठ्या कालखंडात भारतीय रेल्वेने बदलत्या गरजा, तंत्रज्ञान आणि अपेक्षांनुसार सातत्याने जुळवून घेतले आहे. कमी अंतरासाठीची एक सामान्य वाफेवर चालणारी सेवा म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता एका विशाल आणि गुंतागुंतीच्या वाहतूक प्रणालीमध्ये विकसित झाला आहे. आज ती दररोज लाखो प्रवाशांची आणि मोठ्या प्रमाणावरील मालाची वाहतूक करण्यास सक्षम आहे.

वाफेच्या इंजिनांपासून आणि सुरुवातीच्या अभियांत्रिकी नवकल्पनांपासून ते विद्युतीकृत जाळे, प्रगत सुरक्षा प्रणाली आणि डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याने नवीन क्षमता जोडल्या आहेत. त्याच वेळी, प्रत्येक प्रगती ही पूर्वीच्या दशकांमध्ये घातलेल्या पायावरच उभारली गेली आहे. आज रेल्वेचे जाळे हे सातत्यपूर्ण अभियांत्रिकी प्रयत्न, कार्यान्वयन शिस्त आणि निरंतर सुधारणेचे प्रतिबिंब म्हणून उभे आहे. व्याप्ती आणि कार्यक्षमता, परवडणारी किंमत आणि नावीन्य, तसेच परंपरा आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याची तिची क्षमता हे दर्शवते की एक ऐतिहासिक संस्था झपाट्याने बदलणाऱ्या जगात कशी प्रासंगिक राहू शकते ! राष्ट्र जसजसे पुढे जाईल, तसतसे रेल्वे ही केवळ वाहतुकीचे साधन म्हणूनच नव्हे, तर दैनंदिन जीवनाला आधार देणारी, उद्योगांना बळकट करणारी आणि राष्ट्रीय विकासात योगदान देणारी एक विश्वासार्ह प्रणाली म्हणूनही आपली सेवा देत राहील.

 

संदर्भ

Ministry of Railways

Ministry of Finance

Others

 

वाफेकडून वेगाकडे: रेल्वेची सतत विकसित होत जाणारी वाटचाल

 

* * *

अंबादास यादव/संजना चिटणीस/उमा रायकर/नंदिनी माथुरे/दर्शना राणे

(Explainer ID: 158282) आगंतुक पटल : 155
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Kannada