Social Welfare
जागतिक होमियोपॅथी दिन 2026
बदलत्या जगात समग्र आरोग्यसेवेचा पुनर्विचार
Posted On:
09 APR 2026 11:54AM
महत्त्वाचे मुद्दे
- होमियोपॅथीचे संस्थापक डॉ. हॅनेमन यांच्या जयंतीदिनी दरवर्षी 10 एप्रिल रोजी जागतिक होमियोपॅथी दिन साजरा केला जातो.
- "शाश्वत आरोग्यासाठी होमियोपॅथी" ही 2026 च्या जागतिक होमियोपॅथी दिनाची मुख्य संकल्पना आहे.
- भारत जगात होमिओपॅथीशी संबंधित व्यावसायिकांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांपैकी एक आहे.
- जर्मन मिशनरींनी 1810 मध्ये होमियोपॅथिक औषधांचे वाटप करण्यास सुरूवात केली, तेव्हा तिचा भारतात प्रथम प्रवेश झाला.
- भारतात 3.45 लाख नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर्स, 8,593 होमिओपॅथी दवाखाने, 277 होमिओपॅथीचे शिक्षण देणाऱ्या संस्था आणि 34 संशोधन केंद्रे आहेत.
अजूनही विकसित होत असलेला वारसा
सॅम्युअल हॅनेमान (1755-1843) हे जर्मन वैद्यकीय चिकित्सक होते, त्यांनी 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात होमियोपॅथीचा शोध लावला. त्यांचा 'ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन' हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आजही जगभरातील होमियोपॅथीचे उपचार करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून 10 एप्रिल हा त्यांचा जयंती दिवस 'जागतिक होमियोपॅथी दिन' म्हणून साजरी केली जाते.
होमियोपॅथी, हा शब्द 'होमोइस' (समान) आणि 'पॅथोस' (दुःख) या ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. ही एक वैद्यकीय उपचार पद्धती असून त्यामध्ये रुग्णामध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांसारखेच परिणाम घडवणाऱ्या औषधांचा वापर करून रोगांवर उपचार केले जातात. होमियोपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमन यांनी 1796 मध्ये या पद्धतीला औपचारिक स्वरूप दिले. दरवर्षी 10 एप्रिल ही त्यांची जयंती जागतिक होमियोपॅथी दिन म्हणून साजरी केला जाते. या वर्षीच्या म्हणजे 2026 मधील या दिनाची "शाश्वत आरोग्यासाठी होमियोपॅथी" अशी संकल्पना आहे.
त्यांनी उपचारपद्धतीचे पायाभूत सिद्धांत स्थापित केले, त्यातील पहिला म्हणजे "सारखेच सारख्या गोष्टी बरे करतात" (like cures like), या सिद्धांतानुसार ज्या पदार्थांमुळे निरोगी व्यक्तीमध्ये लक्षणे निर्माण होऊ शकतात, तेच पदार्थ काळजीपूर्वकपणे तयार केलेल्या स्वरूपात आजारी व्यक्तीमध्ये दिसणाऱ्या तशाच लक्षणांवर उपचार करण्यासाठी उपयोगी करू शकतात. "किमान मात्रेचा नियम" (law of minimum dose) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या सिद्धांतानुसार, दुष्परिणाम कमी करून शरीराच्या स्व-उपचार यंत्रणेला चालना देण्यासाठी अत्यंत सौम्य स्वरुपातील औषधांच्या वापरावर भर दिला जातो.
वनस्पती, खनिजे आणि प्राणीजन्य पदार्थ यांसारख्या नैसर्गिक स्रोतांचे विरलीकरण आणि सकशन करून म्हणजेच हे पदार्थ पातळ करून, ते जोराने हलवून होमिओपॅथिक औषधे तयार केली जातात आणि ती गोळ्या, थेंब व द्रव यांसारख्या स्वरूपात दिली जातात. याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक उपचार पद्धती, त्यामध्ये उपचार केवळ रोगावर आधारित न राहता रुग्णाच्या एकूण शारीरिक आणि मानसिक स्थितीवर आधारित असतात.

भारतात, होमिओपॅथी ही विस्तृतपणे वापरली जाणारी प्रणाली म्हणून विकसित झाली असून ती प्रतिबंधात्मक काळजी, जुनाट व्याधींचे व्यवस्थापन आणि सर्वांगीण आरोग्यामध्ये योगदान देत आहे.
जागतिक होमियोपॅथी दिन 2026: प्रमुख ठळक मुद्दे

- देशपातळीवर आयोजन: राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने राज्य परिषदा, संस्था आणि व्यावसायिकांना 10 एप्रिल रोजी देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.
- शैक्षणिक सहभाग: परिसंवाद, वैद्यकीय चिकित्सेसंदर्भात चर्चा आणि स्पर्धांमुळे विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यावसायिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन मिळेल.
- जनसंपर्क: मोफत आरोग्य तपासणी, जनजागृती मोहीम आणि सामुदायिक उपक्रमांद्वारे प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीची भूमिका अधोरेखित केली जाईल.
- सर्जनशील सहभाग: निबंध लेखन, भित्तीचित्रे तयार करणे आणि लघुपट यांसारख्या स्पर्धांमुळे व्यापक जनसमुदाय आणि विद्यार्थ्यांच्या सहभागास प्रोत्साहन मिळेल.
परंपरा ते धोरणात्मक प्राधान्य
जवळपास अडीच लाख नोंदणीकृत होमिओपॅथी चिकित्सकांसह, भारत हा जगातील सर्वाधिक होमिओपॅथी चिकित्सक असलेल्या देशांपैकी आहे. गेल्या शतकात, ही उपचारपद्धती केवळ टिकूनच राहिली नाही, तर देशाच्या नैसर्गिक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या समृद्ध परंपरांशी सहजपणे एकरूप झाली आहे.
याच्या स्वीकृतीत सातत्य राहिल्याने अलिकडच्या काळात होमिओपॅथीला भक्कम संस्थात्मक पाठिंब्याची जोड मिळाली आहे. 2014 मध्ये झालेली आयुष मंत्रालयाची स्थापना हा महत्त्वपूर्ण बदल ठरला असून त्यामुळे संशोधन, मानकीकरण आणि जागतिक स्तरावर पोहोचण्यासारख्या संरचित हस्तक्षेपांद्वारे होमिओपॅथीवर नव्याने धोरणात्मक भर दिला गेला. या प्रयत्नांमुळे होमिओपॅथी ही पारंपरिक उपचार पद्धती भारताच्या आरोग्यसेवा प्रणालीचा मान्यताप्राप्त, धोरणात्मक घटक बनण्यास मदत झाली आहे.

भारतातील होमियोपॅथीचा इतिहास
भारताला 19व्या शतकाच्या सुरुवातीला होमियोपॅथीची ओळख झाली, तीच तिच्या हळूहळू विस्ताराची सुरुवात ठरली. सन 1810 च्या आसपास, सॅम्युअल हॅनेमान यांचे शिष्य जॉन मार्टिन होनिगबर्गर यांनी भारतात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. 1839 मध्ये त्यांनी महाराजा रणजीत सिंग यांच्यावर केलेल्या यशस्वी उपचारामुळे उच्चभ्रू तसेच सामान्य जनतेमध्येही या उपचारपद्धतीचा अंगिकार करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
महत्त्वाचे टप्पे
- 1847: तामिळनाडूतील तंजावर येथे सर्वात जुन्या होमिओपॅथिक रुग्णालयांपैकी एकाची स्थापना .
- बंगालमधील वैद्यकीय व्यावसायिक आणि समाजसेवी राजेंद्र लाल दत्ता यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रसार
- प्रख्यात वैद्य महेंद्र लाल सरकार यांच्या पाठिंब्यामुळे विश्वासार्हता वाढली.
- कलकत्ता, बनारस आणि अलाहाबाद येथे दवाखान्यांचा विस्तार
स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडी
स्वातंत्र्योत्तर काळात, भारत सरकारने होमियोपॅथीला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी उचललेली पावले:
- 1973: केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची स्थापना
- 1978: होमियोपॅथी संशोधनासाठी केंद्रीय परिषदेची स्थापना
या उपक्रमांमुळे या क्षेत्रातील नियमन, शिक्षण आणि संशोधनाच्या कामाला अधिक बळकटी मिळाली आहे.
भारतातील होमियोपॅथी पायाभूत सुविधा
अलिकडच्या वर्षांत, होमियोपॅथीच्या पुराव्यावर आधारित प्रमाणीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. भारतामध्ये सुमारे 34 होमियोपॅथी समर्पित संशोधन केंद्रे असून ती पद्धतशीर संशोधनासाठी भक्कम पाया तयार करत आहेत. राष्ट्रीय होमियोपॅथी आयोग आणि केंद्रीय होमियोपॅथी संशोधन परिषद यांसारख्या संस्था नैदानिक संशोधन, औषध मानकीकरण आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

विशेषतः जागतिक होमियोपॅथी दिनाच्या आसपास स्थापन केले जाणारे, सरकारचे पाठबळ असलेले मंच, माहिती-आधारित निष्कर्षांवर अधिक लक्ष केंद्रित करत असून ते अधिक सशक्त वैज्ञानिक सहभागाच्या रुपात होत असलेला बदल दर्शवतात.
सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमियोपॅथी (सीसीआरएच)
नवी दिल्लीस्थित सीसीआरएच, वैद्यकीय पद्धती अधिक मजबूत करण्यासाठी आणि होमिओपॅथीच्या जागतिक स्वीकृतीला पाठिंबा देण्यासाठी वैज्ञानिक आणि नैतिक संशोधनाला प्रोत्साहन देते. भारतभरातील 33 संस्था/युनिट्सच्या नेटवर्कद्वारे होमिओपॅथीमधील वैज्ञानिक संशोधन केले जाते.

सीसीआरएच चे प्रमुख उपक्रम:
- पुराव्यानिशी औषधांचा प्रभाव सिद्ध करणे, प्रमाणीकरण आणि मानकीकरण
- निदानविषयक संशोधन, पडताळणी, दस्तऐवजीकरण आणि प्रकाशन
- संशोधन सहकार्य आणि अनुदान सहाय्य
सार्वजनिक आरोग्य उपक्रम:
- निरोगी मुलासाठी होमियोपॅथी
- हृदयरोग आणि स्ट्रोक (एनपीसीडीसीएस)सह एकीकरण
स्वास्थ्य रक्षण कार्यक्रम
·माता आणि बाल संगोपनासाठी होमियोपॅथीच्या वापरासंबंधीची राष्ट्रीय मोहीम
राष्ट्रीय होमियोपॅथी आयोग (एनसीएच)
- एनसीएचची 5 जुलै 2021 रोजी अंमलात आलेल्या राष्ट्रीय होमियोपॅथी आयोग अधिनियम, 2020 अंतर्गत स्थापना करण्यात आली. याच्या स्थापनेमुळे केंद्रीय होमियोपॅथी परिषद अधिनियम, 1973 अंतर्गत गठीत करण्यात आलेली नियामक मंडळ आणि केंद्रीय होमियोपॅथी परिषद बरखास्त झाली.
- एनसीएचची प्रमुख कार्ये/उपक्रम:
- होमिओपॅथिक शिक्षण आणि संस्थांचे नियमन
- अभ्यासक्रम आणि शैक्षणिक मानके स्थापित करणे
- व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावर नोंद ठेवणे
- व्यावसायिक नीतिमत्ता आणि कार्यपद्धतीची गुणवत्ता सुनिश्चित करणे
- आरोग्यविषयक गरजांचे मूल्यांकन आणि नियोजन
- राज्य परिषदा आणि मंडळांमध्ये समन्वय साधणे
- अनुपालनावर देखरेख ठेवणे आणि अपीलांची हाताळणी करणे
भारतीय वैद्यकीय प्रणालींच्या या संस्थात्मक बळकटीकरणामुळे आणि मानकीकरणामुळे मजबूत अशी नियामक आणि गुणवत्ता चौकट निर्माण झाली आहे, त्यामुळे या क्षेत्रातील शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विस्तारास आधार मिळाला आहे.
2013-14 ते 2024-25 या कालावधीत होमिओपॅथी महाविद्यालये आणि जागांच्या संख्येत झालेली स्थिर वाढ ही या नियामक सुधारणांचा प्रभाव आणि भारतातील होमिओपॅथी शिक्षणाची वाढती क्षमता दर्शवणारी आहे.

भारतीय वैद्यकीय आणि होमिओपॅथी औषधसंहिता आयोग (PCIM&H):
'भारतीय वैद्यकीय आणि होमिओपॅथी औषधसंहिता आयोग’ (PCIM&H) आयुष मंत्रालयाच्या अधीन असून भारतीय चिकित्सा पद्धती आणि होमिओपॅथीसाठी औषधसंहिता (Pharmacopoeias) व सूत्रसंहिता (Formularies) विकसित करणे ही आयोगाची जबाबदारी आहे; तसेच, या औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी 'केंद्रीय औषध चाचणी-तसेच -ॲपलेट प्रयोगशाळा' म्हणूनही हा आयोग कार्य करतो .
या आयोगाची स्थापना 'भारतीय वैद्यकीय औषधसंहिता आयोग' (PCIM) म्हणून 18 ऑगस्ट 2010 रोजी 'सहकारी संस्था नोंदणी अधिनियम, 1860' (Societies Registration Act, 1860) अंतर्गत करण्यात आली होती. याच्या कार्यकक्षेत होमिओपॅथीचा समावेश करण्यात आल्यानंतर, 20 मार्च 2014 रोजी याचे नाव बदलून 'भारतीय वैद्यकीय आणि होमिओपॅथी औषधसंहिता आयोग' (PCIM&H) असे करण्यात आले.
होमिओपथीला सहाय्य करणारी 'आयुष' धोरणे आणि योजना:
भारत सरकारने होमिओपॅथीचे शिक्षण, संशोधन, रुग्णसेवा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेशन या बाबतीत होमिओपथीचा विकास करण्यासाठी 'आयुष' मंत्रालयामार्फत,अनेक योजनां राबवल्या आहेत. होमिओपथी डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे, पुरावा-आधारित उपचार पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि व्यावसायिक व संस्थात्मक क्षमता विकसित करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. यामुळे होमिओपथी हा भारताच्या आरोग्य सेवा यंत्रणेचा एक सुरक्षित, प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित घटक म्हणून कार्यरत राहण्यासाठी साहाय्य मिळेल.
प्रमुख योजना आणि उपक्रम :
राष्ट्रीय आयुष मिशन (NAM )
सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील सेवा आणि पायाभूत सुविधा बळकट करून, होमिओपॅथी व इतर पारंपारिक उपचार पद्धतींना मुख्य प्रवाहातील आरोग्यसेवेशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला एक प्रमुख कार्यक्रम.
- प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs) आणि समुदाय आरोग्य केंद्रे (CHCs) येथे होमिओपॅथी उपचार सेवा उपलब्ध करून देणे (Co-location).
- रुग्णालये, दवाखाने आणि शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहाय्य.
- राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांशी एकात्मिकरण.
- देशभरात 1,84,235 हून अधिक 'आयुष्मान आरोग्य मंदिरे' कार्यान्वित करण्यात आली आहेत.
आयुर्स्वास्थ्य
- होमिओपॅथी संस्थांची गुणवत्ता सुधारण्यावर, तसेच प्रगत संशोधन आणि चिकित्सा उत्कृष्टतेला चालना देण्यावर भर .
- संशोधन आणि चिकित्सा प्रशिक्षणासाठी 'उत्कृष्टता केंद्रां'ची (Centres of Excellence) स्थापना.
- संस्थात्मक बळकटीकरण आणि क्षमता बांधणी.
- पुराव्यांवर आधारित सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि समुदाय संपर्क मोहीम.
आयुर्ज्ञान
होमिओपॅथी डॉक्टरांचा व्यावसायिक विकास आणि संशोधन-आधारित चिकित्सापद्धतीला चालना देणारा हा एक क्षमता-बांधणी उपक्रम आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक व्यावसायिक पद्धतींची ओळख (orientation) करून देण्यास, शिक्षक व डॉक्टरांचे ज्ञान अद्ययावत करण्यास आणि होमिओपॅथी क्षेत्रातील घडामोडींबद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळते. .
- सातत्यपूर्ण शिक्षण, कार्यशाळा आणि परिसंवाद
- अध्यापक विकास आणि कौशल्य वृद्धी
- संशोधन निष्कर्षांचे दस्तऐवजीकरण आणि प्रसार
बाह्य संशोधन (EMR) योजना
- निधी-पुरवठ्याच्या आधारे केलेल्या व राष्ट्रीय आरोग्यविषयक प्राधान्यांशी सुसंगत असलेल्या संशोधनाद्वारे होमिओपथीच्या वैज्ञानिक प्रमाणीकरणाला चालना देण्यासाठीचा एक प्रमुख उपक्रम.
- 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी ₹70 लाखांपर्यंतचे आर्थिक सहाय्य
- चिकित्साधारित (Clinical), औषधनिर्माणसंबंधित आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील संशोधनाचा यात समावेश होतो
- साथीचे रोग, दीर्घकालीन आजार आणि एकात्मिक उपचार पद्धतींवर विशेष भर
- अभ्यासपूर्ण प्रकाशने, पेटंट्स आणि ज्ञानाच्या प्रसारास सहाय्य
आयुष औषधी गुणवत्ता एवं उत्पादन संवर्धन योजना (AOGUSY )
औषधे व सौन्दर्यप्रसाधने कायदा 1940 अंतर्गत भारतातील आयुर्वेद, सिद्ध, युनानी, व होमिओपॅथी (ASU&H) औषधांचे प्रमाणीकरण करून दर्जेदार उत्पादन वाढवणे तसेच नियम अनुपालन करण्यास प्रोत्साहन देणे आणि अशा रीतीने त्या औषधांची गुणवत्ता वाढवणे व तिचे नियमन करणे, हे AOGUSY चे उद्दिष्ट आहे.
महत्वाची उद्दिष्टे:
- पारंपरिक औषधांची उत्पादन क्षमता तसेच निर्यात वाढवणे,
- दर्जेदार उत्पादन व चाचणीसाठी पायाभूत सुविधा व तांत्रिक अद्ययावतीकरणावर भर
- सुरक्षितता आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी नियामक यंत्रणा बळकट करणे
लाभार्थी व साहाय्य :
- उत्पादक - उपकरणांसाठी अनुदान, WHO-GMP अनुपालन, क्षमता वर्धन
- चाचणी प्रयोगशाळा- विश्लेषण उपकरणे व दर्जा नियंत्रणासाठी निधी
- औषधालये- पायाभूत सुविधा साहाय्य, प्रमाणीकरण, नियमांचे अनुपालन
आयुष आरोग्यसेवा यंत्रणेसाठी 7000 ते 7500 प्रजातींमध्ये विखुरलेल्या औषधी वनस्पती हा आवश्यक कच्चा माल आहे. भारतात आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, आणि होमिओपॅथी या सर्वच चिकित्सापद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या प्रतीच्या औषधी वनस्पतींची मागणी देखील वाढत आहे. NMPB च्या औषधी वनस्पती उपक्रमामुळे होमिओपॅथी औषधांसाठी आवश्यक औषधी वनस्पतींचे संवर्धन, लागवड व पुरवठा सुनिश्चित होत आहे. या उपक्रमामुळे दर्जेदार कच्च्या मालाची उपलब्धता वाढते आहे तसेच आरोग्य सेवांची पूर्तता आणि शेतकरी व संबंधित भागधारकांची उपजीविका या दोन्ही गोष्टींना आधार मिळत आहे. दर्जेदार औषधी वनस्पतींचा अविरत पुरवठा हा जरी 'आयुष' (AYUSH) प्रणालींचा कणा असला, तरी त्यांचा प्रभावी वापर हा सातत्यपूर्ण जनजागृती आणि संपर्क-प्रसाराच्या प्रयत्नांवर अवलंबून असतो.
माहिती, शिक्षण आणि संवाद' (IEC) या उपक्रमाद्वारे सुव्यवस्थित संवाद धोरणांच्या माध्यमातून होमिओपथीविषयीची जागृती आणि तिचा जनसामान्यांपर्यंतचा प्रसार वाढवता येईल. होमिओपथीची किफायतशीरता आणि तिचे फायदे यांचा प्रसार या उपक्रमातून होऊ शकतो. संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे, आरोग्य मोहिमा व चर्चासत्रे आयोजित करणे, जनसहभाग कार्यक्रम राबवणे आणि प्रतिबंधात्मक व आरोग्य-संवर्धक उपचार पद्धतींना प्रोत्साहन देणे—या मार्गांनी हे उद्दिष्ट साध्य केले जाते.
आयुष' (AYUSH) क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी तज्ञांची देवाणघेवाण, शैक्षणिक सहयोग आणि शिष्यवृत्तींचा समावेश असून या सर्व प्रयासांद्वारे 'आयुष' प्रणालींचा देशांतर्गत पाया आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रसार या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन मिळते.
साथीच्या रोगांच्या पूर्वतयारीमध्ये आणि उपचारात होमिओपॅथी ची भूमिका :
साथीच्या रोगांच्या पूर्वतयारीमध्ये, प्रतिबंधात्मक, आरोग्य-संवर्धक आणि सहाय्यक उपायांचा वापर करणारे एक पूरक साधन म्हणून होमिओपॅथी उदयास आली आहे. 'सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी' (CCRH) ही संस्था संपूर्ण भारतातील आपल्या 33 संस्था/विभागांच्या माध्यमातून साथीच्या रोगांशी संबंधित संशोधन आणि वैद्यकीय मदत कार्य करत असते.
जागतिक स्तरावरील होमिओपथीच्या यशोगाथा:
- भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साथरोग व्यवस्थापनासाठी होमिओपथी उपचारांचा वापर करण्यात 'केंद्रीय होमिओपथी संशोधन परिषदे'ने (CCRH) महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रमुख उदाहरणे:
- भारत – जपानी एन्सेफलायटीस/एईएस (उत्तर प्रदेश): 96 गावांमध्ये 3 लाखांहून अधिक लोकांना वितरित केलेल्या बेलाडोना 200 या औषधाचा वापर प्रमाणित उपचारांसोबत केल्यास एईएस ची बाधा रोखण्यास आणि बाधितांची प्रकृती सुधारण्यास मदत झाली.
- भारत – चिकुनगुनिया प्रतिबंध (केरळ, 2007): 19,750 लोकांना ब्रायोनिया अल्बा 30सी देण्यात आले, त्यानंतर आजाराच्या बाधेमध्ये लक्षणीय घट झाली, तापाच्या रुग्णांमध्ये सुमारे 84.5% जलद सुधारणा आणि जुनाट संधिवाताच्या रुग्णांमध्ये सुमारे 90% सुधारणा दिसून आली.
- क्युबा – डेंग्यू व्यवस्थापन: होमिओपॅथिक कॉम्प्लेक्स (ब्रायोनिया अल्बा, युपेटोरियम पर्फोलिएटम, जेलसेमियम एस., डेंग्यू नोसोड) च्या साहाय्याने उपचार केलेल्या 25,000 रुग्णांमध्ये लक्षणीय वैद्यकीय सुधारणा दिसून आली आणि रुग्णांचे रुग्णालयातील वास्तव्यदेखील कमी झाले .
- बहु-रोग साथ शिबिरे (भारत): सीसीआरएचने डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, गोवर, मेंदुज्वर आणि डोळे येणे या रोगांच्या लक्षणांवर आधारित उपचार केले तसेच जीनस एपिडेमिकस औषधांचा वापर केला.
- कोविड-19 उपचार (भारत): आयुष मंत्रालयाच्या सहाय्याने देशातील 136 कोविड उपचार केंद्रांमधील सुमारे 5 लाख रुग्णांसाठी आर्सेनिकम अल्बम 30सी चा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापर.
भारतातील होमिओपॅथी चा प्रवास अनोखा आहे. अनेक वर्षांपूर्वीपासूनचे सिद्धांत आता आधुनिक संशोधनातून पुन्हा सिद्ध होत आहेत. या प्रणालीत सर्वंकष उपचारांची समृद्ध परंपरा रुजलेली आहे . त्यासोबतच वैज्ञानिक संशोधन, कठोर नियमन आणि वाढत्या शैक्षणिक क्षमतेमुळे होमिओपॅथी चिकित्सेत महत्त्वपूर्ण परिवर्तन होत आहे. परंपरा आणि आधुनिकीकरणाच्या या संगमामुळे आजच्या आरोग्यसेवा क्षेत्रात तिची विश्वासार्हता आणि प्रासंगिकता दोन्ही वाढली आहे.
सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी आणि नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी यांसारख्या संस्थांमध्ये पुरावा-आधारित उपचार, प्रमाणीकरण आणि व्यावसायिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन दिले जात आहे. सार्वजनिक आरोग्य उपक्रम आणि साथीच्या रोगांच्या उपचारात होमिओपॅथीचे समावेशन झाल्यामुळे आरोग्यक्षेत्रातील आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यामधील तिची वाढती भूमिका अधोरेखित होत आहे.
यापुढील काळात भारतात एक सर्वसमावेशक, सर्वांना सहज उपलब्ध असणारी एकात्मिक आरोग्यसेवा यंत्रणा तयार करण्यात होमिओपॅथी चिकित्सा प्रणालीची मोठी भूमिका असेल हे स्पष्ट होत आहे.
References
Ministry of Ayush
https://ayush.gov.in
https://elms.ayush.gov.in/homoeopathy
About PCIM&H - PHARMACOPOEIA COMMISSION FOR INDIAN MEDICINE & HOMOEOPATHY (Government of India)
https://ccrhindia.ayush.gov.in/emr?language_content_entity=en
Central Council for Research in Homoeopathy
https://ccrhindia.ayush.gov.in/
https://ccrhindia.ayush.gov.in/publications/annual-reports
https://ccrhindia.ayush.gov.in/publications/annual-reports
https://whdccrh.org/about.html
https://homeopathy.delhi.gov.in/homeopathy/origin-and-growth-homeopathy-india
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://ayush.telangana.gov.in/open_record_view.php%3FID%3D150&ved=2ahUKEwjF7Oyc6caTAxVWTmwGHZ_FGjUQFnoECBoQAQ&usg=AOvVaw2IYzqHzr6hHSsiz_CI_WDq
https://www.instagram.com/p/DIQLCJ9ptKd/?img_index=4
Press Information Bureau
https://www.pib.gov.in/newsite/PrintRelease.aspx?relid=133271&utm_source=chatgpt.com®=3&lang=2
Click here to see pdf
***
सौरभ खेकडे/मंजिरी गानू/उमा रायकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
(Explainer ID: 158258)
आगंतुक पटल : 142
Provide suggestions / comments