Social Welfare
लसींच्या सामर्थ्याचा उत्सव
Posted On:
17 MAR 2026 12:24PM
महत्वाचे मुद्दे
-
भारताने लसीकरणाच्या माध्यमातून देवी, पोलिओ तसेच माता आणि अर्भकातील धनुर्वात यांचे उच्चाटन केले असून लसीकरण कार्यक्रमाचा भारत सातत्याने विस्तार करत आहे आणि नुकतेच देशाने 2026 मध्ये एचपीव्ही तसेच स्वदेशी टीडी लसींचा वापर सुरु केला आहे.
-
जगातील सर्वात व्यापक लसीकरण कार्यक्रम असलेला युआयपी देशात दरवर्षी सुमारे 2.9 कोटी गर्भवती महिला आणि 2.54 कोटी नवजात बालकांचे मोफत लसीकरण करत आहे.
-
वर्ष 2015 मध्ये 62% असलेला पूर्ण लसीकरणाचा विस्तार जानेवारी 2026 मध्ये 98.4% इतका संपूर्णपणे व्यापक झाला आहे.
-
2023 मध्ये एकही लस न दिल्या गेलेल्या बालकांचे प्रमाण 0.11% होते ते 2024 मध्ये कमी होऊन 0.06% झाले.
राष्ट्रीय लसीकरण दिन
लसीकरणाच्या माध्यमातून रोगांचे प्रतिशमन म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामुळे, आजार होण्याची जोखीम कमी होऊन दर वर्षी कोट्यवधी लोकांचे प्राण वाचतात. लसीकरणामुळे आजारांविरुद्ध संरक्षण करण्यासाठी लोकांची नैसर्गिक प्रतिकारक्षमता निर्माण होते.
भारतामध्ये, लसींनी सार्वजनिक आरोग्य सुधारण्यावर प्रभावी परिणाम साध्य केला आहे. पोलिओसोबतच, या लसींमुळे, भारतातून देवीचे निर्मुलन झाले असून यॉज, पोलिओ तसेच माता आणि अर्भकातील धनुर्वात यांचे उच्चाटन झाले आहे. लसींमुळे अर्भक मृत्युदरात तसेच गोवर-रुबेला आणि क्षयरोगाच्या प्रमाणात देखील घट झाली आहे. जगाची औषधशाळा असलेल्या भारताने, कोविड-19 महामारीच्या काळात, स्वदेशी पद्धतीने विकसित आणि प्रमाणित तसेच भारतात निर्मित लसींसह कोविड-19 लसीच्या सुमारे 200 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा पुरवठा केला. वर्ष 2026 मध्ये भारत सरकारने 14 वर्षांच्या मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण अभियान सुरु केले.

सरकारी आरोग्यसुविधा केंद्रांचे विस्तारित जाळे, कर्मचारी आणि शीत-साखळी विषयक पायाभूत सुविधा तसेच एका सशक्त डिजिटल नेटवर्कसह भारतातील सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाने (युआयपी) परिणाम दाखवून दिले आहेत.
वर्ष 2015 मध्ये 62% असलेला पूर्ण लसीकरणाचा विस्तार जानेवारी 2026 मध्ये 98.4% इतका वाढला आहे. 2023 मध्ये एकही लस न दिल्या गेलेल्या बालकांचे प्रमाण 0.11% होते ते 2024 मध्ये कमी होऊन 0.06% झाले. भारताकडे लसीकरणाला प्राधान्य देण्याचा दीर्घ इतिहास आहे आणि सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य आणखी सुधारण्यासाठी अधिकाधिक लसीकरणाचा उच्च दर गाठण्यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

वर्ष 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरु झाल्यावर त्याअंतर्गत नागरिकांना मौखिक पोलिओ लसीची पहिली मात्रा दिल्यानिमित्त दर वर्षी भारतात 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो.
वर्ष 1995 मध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमाच्या मदतीने, पश्चिम बंगालमध्ये हावडा येथे 13 जानेवारी, 2011 रोजी नोंदवल्या गेलेल्या शेवटच्या पोलिओग्रस्त रुग्णाच्या नोंदीनंतर, भारतातून पोलिओचे यशस्वीपणे निर्मुलन झाले.

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम
मुले जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांच्या मातेकडून त्यांना अँटीबॉडीज मिळतात. मात्र, गर्भावस्थेमध्ये तसेच बाळाच्या जन्मानंतर मातेकडून बाळाला हस्तांतरित होणाऱ्या या अँटीबॉडीज नवजात शिशूच्या आयुष्यातील पहिले काही महिनेच रोगप्रतिकारक संरक्षण देतात.
लहान बालकांना तसेच नवजात अर्भकांना जंतूंपासून आणि अगदी जीवघेण्या आजारांपासून देखील संरक्षण देण्यात लसी फार महत्त्वाच्या असतात.लहान मुलांना आजार होण्यापूर्वीच लसी देणे उत्तम – आदर्शवत विचार करता बाळ जन्मल्यापासून पहिल्या 12 ते 18 महिन्यांच्या आत लसी दिल्या जायला हव्या.
लहान मुलांना तसेच गर्भवती महिलांना विविध आजारांपासून संरक्षण देण्यासाठी मोफत लस पुरवण्याच्या उद्दिष्टासह वर्ष 1985 मध्ये सुरु करण्यात आलेला हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात दरवर्षी सुमारे 2.9 कोटी गर्भवती महिला आणि 2.54 कोटी नवजात बालकांचे लसीकरण केले जाते.
युआयपीची उदिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
नवजात शिशु, लहान बालके, पौगंडावस्थेतील मुले-मुली यांना 12 आजारांपासून संरक्षण देण्यासाठी युआयपीद्वारे लसी देण्यात येतात. जॅपनीज एनसिफीलायटीसवरील लस केवळ हा आजार आढळून येणाऱ्या (एपिडेमिक) जिल्ह्यांतील लोकांनाच दिली जाते, उर्वरित सर्व लसी राष्ट्रीय स्तरावर सगळ्यांनाच पुरवण्यात येतात.
गेल्या दशकभरात, अनेक नव्या लसींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे– इनॅक्टीव्हेटेड पोलिओ लस (आयपीव्ही) (2015), रोटाव्हायरस लस (आरव्हीव्ही) (2016), गोवर-रुबेला (एमआर) लस (2017) तसेच न्युमोकोकल काँज्युगेट लस (पीसीव्ही) (2017). युआयपी अंतर्गत खालील लसी देण्यात येतात:
-
बॅसिलस कॅलमेट-गुरीन (बीसीजी)
-
घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात (डीपीटी)
-
धनुर्वात आणि अडल्ट घटसर्प
-
बायव्हॅलंट तोंडावाटे घेण्याची पोलिओ लस
-
गोवर-रुबेला (एमआर) लस
-
हेपटायटीस बी (हेप बी)
-
पेंटटाव्हॅलंट – डीपीटी + हेपटायटीस बी + हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी (डीपीटी + हेप बी + एचआय बी)
-
रोटाव्हायरस लस (आरव्हीव्ही)
-
न्युमोकोकल काँज्युगेट लस (पीसीव्ही)
-
जॅपनीज एनसिफीलायटीस (जेई) लस
या लसी जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करतात.
|
#
|
आजार
|
आजाराचे वर्णन
|
|
1
|
क्षयरोग (लहान मुलांमध्ये आढळणारा तीव्र स्वरूपाचा आजार)
|
फुफ्फुसांवर परिणाम करणारा जीवाणू संसर्ग; हा आजार मेंदूपर्यंत तसेच विविध अवयवांपर्यंत पसरू शकतो
|
|
2
|
घटसर्प
|
घशावर परिणाम करणारा जीवाणू संसर्ग; हृदय तसेच नसांना इजा पोहोचवू शकतो.
|
|
3
|
डांग्या खोकला (व्हूपिंग कफ)
|
अत्यंत संसर्गजन्य खोकल्याचा आजार, अर्भकांसाठी धोकादायक
|
|
4
|
धनुर्वात
|
दूषित जखमांमुळे होणारा हा जीवाणू संसर्ग स्नायूंच्या ताठरपणाला कारणीभूत ठरतो
|
|
5
|
पोलिओ
|
मज्जासंस्थेवर हल्ला करणारा विषाणू संसर्ग; कायमस्वरूपी लुळेपणा आणू शकतो अथवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.
|
|
6
|
गोवर
|
अत्यंत संसर्गजन्य आजार, ताप येतो आणि पुरळ उठते
|
|
7
|
रुबेला
|
ताप आणि पुरळ येण्यासाठी कारणीभूत ठरणारा सौम्य विषाणूजन्य आजार; खोकला आणि शिंका यांद्वारे पसरतो.
|
|
8
|
हेपटायटीस बी
|
यकृताला होणारा विषाणूजन्य संसर्ग जो दीर्घकाळ टिकून राहू शकतो आणि यकृताचे नुकसान करू शकतो.
|
|
9
|
मेनिन्जायटीस आणि न्युमोनिया (एचआयबी)
|
मेनिन्जायटीस – मेंदू आणि मेरुरज्जूच्या सभोवती असलेल्या आवरणाचा संसर्ग आणि दाह
न्युमोनिया – फुप्फुसांचा संसर्ग आणि दाह
|
|
10
|
रोटाव्हायरस डायरिया
|
अर्भकांमध्ये तीव्र स्वरुपाचा अतिसार होण्यासाठी कारणीभूत विषाणूजन्य संसर्ग
|
|
11
|
न्युमोकोकल न्युमोनिया
|
ताप येण्यासाठी तसेच श्वास घ्यायला त्रास होण्यासाठी कारणीभूत असलेला,फुप्फुसांना होणारा जीवाणू संसर्ग
|
|
12
|
जॅपनीज एनसिफीलायटीस
|
डासांमुळे पसरणारा विषाणू संसर्ग – मेंदूदाहासाठी कारणीभूत ठरतो
|
राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक
जीवघेण्या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी वेळेवर लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे.युआयपीच्या अंतर्गत गर्भवती महिला, अर्भके तसेच लहान मुलांसाठी हे विहित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे:
|
वय
|
दिली जाणारी लस
|
|
जन्माच्या वेळी -
|
बॅसिलस कॅल्मेट ग्युरीन (BCG), ओरल पोलिओ व्हॅक्सीन (OPV)-0 डोस, हिपॅटायटीस B जन्मत: डोस
|
|
6 आठवडे
|
OPV-1, पेंटाव्हॅलेंट-1, रोटाव्हायरस व्हॅक्सीन (RVV)-1, इनॲक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सीनचा फ्रॅक्शनल डोस (fIPV)-1, न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (PCV)-1
|
|
10 आठवडे
|
OPV-2, पेंटाव्हॅलेंट-2, RVV-2
|
|
14 आठवडे
|
OPV-3, पेंटाव्हॅलेंट-3, fIPV-2, RVV-3, PCV-2
|
|
9-12 महिने
|
गोवर आणि रुबेला (MR)-1, JE-1, PCV-बूस्टर
|
|
16-24 महिने
|
MR-2, JE-2, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात (DPT)-बूस्टर-1, OPV – बूस्टर
|
|
5-6 वर्षे
|
DPT-बूस्टर-2
|
|
10 वर्षे
|
धनुर्वात आणि प्रौढ घटसर्प (Td)
|
|
16 वर्षे
|
Td
|
|
गर्भवती माता
|
Td-1, Td-2 किंवा Td-बूस्टर (जर मागील 3 वर्षांत लसीकरण झाले असेल तर दिले जाते)
|

|
अलीकडेच सुरु झालेल्या लसी आणि कार्यक्रम
या विस्तारातील सर्वात अलीकडचा अध्याय सर्वात महत्त्वाकांक्षी देखील आहे – 2026 च्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या लसी देण्याची सुरुवात करण्यात आली आणि त्यातून युआयपीची पोहोच विस्तारली आहे.
स्वदेशी टिटॅनस-डिप्थेरिया (टीडी) लसीचा आरंभ (2026)
स्वदेशी तयार करण्यात आलेली टिटॅनस आणि प्रौढांसाठीची डिप्थेरिया (टीडी) लस देण्यास 21 फेब्रुवारी 2026 रोजी सुरुवात करण्यात आली. ही लस कसौली येथील केंद्रीय संशोधन संस्थेत (सीआरआय) तयार केली जाते. एप्रिल 2026 पर्यंत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमासाठी (यूआयपी) सुमारे 55 लाख लसमात्रा पुरविल्या जातील.
भारताची देशांतर्गत लस उत्पादन क्षमता या संपूर्ण रचनेचा भक्कम पाया आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असलेला भारत जगभरातील जवळपास 60% लसींचा पुरवठा करतो. स्वदेशी बनावटीची टीडी (टीडी) लस सादर करणे हे आत्मनिर्भरतेचेच द्योतक आहे.
देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम (2026)
28 फेब्रुवारी 2026 रोजी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) विरुद्ध देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथून या मोहिमेचा प्रारंभ केला. 14 वर्षांच्या मुलींचे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून रक्षण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. देशभरातील सुमारे 1.15 लाख मुलींना सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत मिळण्याची अपेक्षा आहे.
|
मिशन इंद्रधनुष
लसीकरण न झालेल्या किंवा अंशतः लसीकरण झालेली मुले आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी, सरकारने 2015 मध्ये 'मिशन इंद्रधनुष' कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर, अधिक आंतर-मंत्रालयीन समन्वयासह, 'वर्धित मिशन इंद्रधनुष' अभियाने (शहरी भागांवर अधिक लक्ष केंद्रित करून) राबवण्यात आली. नियमित लसीकरण सेवा बळकट करून आणि दुर्गम भागातील लोकसंख्येला केंद्रस्थानी ठेवून, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत (UIP) 90% हून अधिक संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य साध्य करणे, हे या मोहिमांचे उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत म्हणजे, 2023 पर्यंत मिशन इंद्रधनुषचे 12 टप्पे राबविण्यात आले असून, 765 जिल्ह्यांमधील 5.46 कोटी बालकांचे आणि 1.32 कोटी गर्भवती महिलांचे लसीकरण केले गेले आहे.
यूआयपी अंमलबजावणीसाठी सहाय्यक असलेल्या पायाभूत सुविधा
सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि कार्यकर्ते
लसींचा पुरवठा कुठे केला जातो?
प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि शासकीय रुग्णालये यांसारख्या निश्चित ठिकाणी, उपकेंद्रांवर, तसेच अंगणवाडी केंद्रे किंवा गावातील इतर निश्चित ठिकाणी आयोजित केलेल्या जनजागृती सत्रांद्वारे सर्व लाभार्थ्यांना यूआयपी लसी मोफत दिल्या जातात. 2005 पासून, यूआयपी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात समाविष्ट झाले आहे. या अभियानांतर्गत, शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्येही यूआयपीची अंमलबजावणी केली जात आहे.
फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी – आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या), अंगणवाडी सेविका आणि संपर्क कार्यकर्ते – लाभार्थ्यांना सत्राच्या ठिकाणी एकत्र आणण्यात आणि कोणतेही मूल किंवा गर्भवती महिला सुटणार नाही याची खबरदारी घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
आदर्श लसीकरण केंद्रे
भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदर्श लसीकरण केंद्रे स्थापन करण्यास प्रोत्साहन देत आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि चंडीगड आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही केंद्रे अगोदरच कार्यरत आहेत.
शीत-साखळी नेटवर्क
लसी तयार झाल्यापासून ते लसीकरण करण्याच्या क्षणापर्यंत, त्यांची नेहमी ठराविक तापमान श्रेणीत साठवणूक करणे आवश्यक असते. तापमान खूप जास्त किंवा खूप कमी असल्यास, लसीची परिणामकारकता (रोगापासून संरक्षण करण्याची क्षमता) नष्ट होऊ शकते आणि एकदा ती क्षमता नष्ट झाली की, ती पूर्ववत करता येत नाही. या निर्धारित तापमानात लसींची साठवणूक आणि वाहतूक करण्याच्या प्रणालीला 'कोल्ड चेन सिस्टीम' अर्थात शीत साखळी व्यवस्था म्हटले जाते. लसीकरणाची व्याप्ती आणि पोहोच सुनिश्चित करण्यासाठी, ही व्यवस्था विनाव्यत्यय आणि कार्यक्षम असण्याची आवश्यकता हा व्यापक लस पुरवठा साखळीचाच एक भाग आहे.
भारताची लस शीत साखळी ही जगातील सर्वात मोठ्या शीत साखळींपैकी एक आहे – ती राष्ट्रीय स्तरावरील सरकारी वैद्यकीय पुरवठा डेपोंपासून ते उप-जिल्हा स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंतच्या जवळपास 30,000 शीत साखळी केंद्रांपर्यंत तिचा विस्तार आहे. रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांमधील ही साठवणूक केंद्रे मोठ्या प्रमाणात लसींच्या साठवणुकीसाठी 1.06 लाखांहून अधिक रेफ्रिजरेटेड आणि डीप फ्रीझर्स, तसेच 432 वॉक-इन कूलर्स आणि वॉक-इन फ्रीझर्ससह सुसज्ज आहेत. या संपूर्ण नेटवर्कमध्ये दरवर्षी 1.3 कोटींहून अधिक लसीकरण सत्रे आयोजित करणे आणि प्रत्येक केंद्रावर एकसारखे तापमान राखणे, या लसी अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचा प्रभाव टिकून राहील हे सुनिश्चित करण्यासाठी या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
या विस्तृत पायाभूत सुविधांचे डिजिटायझेशन आणि बळकटीकरण करण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क (इ विन) वापरत आहे. हा अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असून, तो भक्कम आयटी पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित व्यावसायिकांच्या जोरावर, देशभरातील अनेक ठिकाणी लसींच्या साठ्याची पातळी आणि साठवणुकीच्या तापमानावर रिअल-टाइम देखरेख ठेवतो. इ विन देशभरातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचलेले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात हा प्लॅटफॉर्म अत्यंत महत्त्वाचे ठरला असून, त्यामुळे अल्पावधीत विक्रमी संख्येने लोकांचे लसीकरण करणे शक्य झाले होते.
डिजिटल उपक्रम
नोंदणी, भेटीची वेळ निश्चित करणे, लसीकरणाचा मागोवा घेणे आणि रिअल-टाइम देखरेख यासाठीच्या प्लॅटफॉर्मसह सशक्त डिजिटल इकोसिस्टमद्वारे भारताची लसीकरण व्यवस्थापन प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे.
यू-विन
यू-विन हे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ॲप्लिकेशन असून लोकांना त्यांच्या निवासस्थानाजवळील लसीकरण केंद्रे शोधण्यास, आरोग्य सुविधांमध्ये लसीकरणास जाण्याची वेळ ठरविण्यास आणि लसीकरणाच्या नोंदी ठेवण्यास मदत व्हावी यासाठी तयार करण्यात आले आहे.
एका वापरकर्त्याला एका मोबाईल नंबरवर नागरिक/पालक, गर्भवती महिला, अर्भक (0-1 वर्ष), मुले (1-7 वर्षे) आणि किशोरवयीन (7-19 वर्षे) अशा जास्तीत जास्त 10 लोकांची नोंदणी करता येऊ शकते. यू-विन ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आले असून ते इंग्रजीसह 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
कोविन
यू-विन प्रमाणेच, कोविन हे आरोग्य आणि इतर केंद्रांवर कोविड-19 लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी, तसेच लसीकरणाकरिता भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी आणि नोंदी व्यवस्थापित करण्यासाठीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तो 16 जानेवारी 2021 रोजी सुरू करण्यात आला होता, तेव्हापासून त्याद्वारे 220 कोटींहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत, त्यापैकी कोविनच्या माध्यमातून दिल्या न गेलेल्या मात्रांची संख्या केवळ 56.28 लाख आहे.
परिणाम
भारतातील बालके आणि गर्भवती महिलांच्या जगण्याच्या दरात झालेल्या व्यापक वाढीमागे, पोषण, स्वच्छता, मातांची काळजी आणि आरोग्यसेवेची उपलब्धता यांमधील सुधारणांसारख्या अनेक घटकांपैकी लसीकरण हा एक घटक आहे. अधिक चांगले पोषण आणि उत्तम लसीकरण झालेल्या महिलांना गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान धोके उद्भवण्याची शक्यता कमी होते, तर लसीकरणासाठी आरोग्य प्रणाली अधिक बळकट झाल्याने कुशल प्रसूती सहाय्यक आणि आपत्कालीन प्रसूती सेवेची उपलब्धता देखील वाढते, त्यामुळे प्रसूतीवेळी मातांच्या मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे.

नवीन लसी – रोटाव्हायरस, पीसीव्ही आणि गोवर-रुबेला – यांनी बालमृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या मुख्य संसर्गजन्य घटकांना थेट लक्ष्य केले आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत, लसीचा डोस न मिळालेल्या मुलांचे प्रमाण 2023 मधील 0.11% वरून कमी होऊन 2024 मध्ये 0.06% म्हणजे निम्म्यावर आले आहे – या कामगिरीची संयुक्त राष्ट्रांच्या बालमृत्यू अंदाज आंतर-संस्था गटाने (2024) दखल घेतली असून, यामुळे जागतिक स्तरावर भारत बाल आरोग्याच्या क्षेत्रातील आदर्श उदाहरण ठरला आहे.

लसीकरण मोहिमांमुळे केवळ सार्वजनिक आरोग्याचेच रक्षण होत नाही, तर आजारपणांमुळे कुटुंबांवर आर्थिक भारही त्यामुळे कमी होतो, मुले निरोगी राहतात आणि त्यांना अधिक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगणे शक्य होते. याचे फायदे पुढील पिढ्यांनाही होतात: एखादे निरोगी मूल मोठेपणी निरोगी प्रौढ बनते, आणि एक निरोगी लोकसंख्या कार्यबलात अधिक उत्पादकपणे योगदान देते, त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला व्यापक प्रमाणात चालना मिळते.
निष्कर्ष
1977 मध्ये देवीच्या निर्मूलनापासून ते पोलिओ आणि नवजात बालकांमधील धनुर्वाताचे निर्मूलन, कोविड-19 च्या 200 कोटी मात्रांचे वितरण, आणि आता गोवर-रुबेला निर्मूलनासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न— अनेक मैलाचे दगड गाठत, भारताच्या लसीकरणाचा प्रवास यशस्वी असल्याचे सिद्ध झालेले आहे.
References
See in PDF
***
नेहा कुलकर्णी / संजना चिटणीस / मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
(Explainer ID: 158156)
आगंतुक पटल : 149
Provide suggestions / comments