• Sitemap
  • Advance Search
Others

साधना सप्ताह 2026

नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी क्षमता विकास बळकटीकरण

Posted On: 04 APR 2026 3:54PM

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2026

 

महत्त्वपूर्ण मुद्दे

  • साधना सप्ताह 2026 हा देशव्यापी क्षमता बांधणी उपक्रम म्हणून 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित केला जात आहे.
  • यामध्ये 100 हून अधिक केंद्रीय मंत्री आणि विभाग, 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 250 हून अधिक प्रशिक्षण संस्था सहभागी होणार आहेत.
  • मिशन कर्मयोगीने iGOT वर 1.5 कोटींहून अधिक विद्यार्थ्यी जोडले गेले असून 8 कोटींहून अधिक अभ्यासक्रम पूर्णता नोंदवली गेली आहे. या व्यासपीठावर विविध भाषांमधील 4,600 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
  • तंत्रज्ञान, परंपरा आणि ठोस परिणाम या तीन संकल्पनांवर या सप्ताहात भर दिला जाणार आहे.
  • कर्मयोगी क्षमता कनेक्ट, उन्नती पोर्टल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण साधने यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचा प्रारंभ या सप्ताहात केला जाणार आहे.

प्रस्तावना

राष्ट्रीय उन्नतीसाठी अनुकूलशील विकास आणि मानवी क्षमतांचे बळकटीकरण म्हणजेच साधना सप्ताह 2026 हा भारतातील सर्वात मोठ्या सहयोगी क्षमता-बांधणी उपक्रमांपैकी एक असून याचे आयोजन 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान केले जात आहे. नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आहे, हा या सप्ताहाचा उद्देश आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेला हा उपक्रम प्रतिसादक्षम आणि नागरिक-केंद्रित प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच प्रशिक्षण संस्थांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणतो. हम बने कर्मयोगी/चला कर्मयोगी बनूया हे घोषवाक्य असलेला उपक्रम, क्षमता विकास आयोगाचा स्थापना दिवस आणि मिशन कर्मयोगीला पाच वर्षे पूर्ण होणे साजरे करत आहे.

मिशन कर्मयोगी: लोककेंद्रित प्रशासनासाठी क्षमता निर्मिती

'साधना सप्ताह' हा 'मिशन कर्मयोगी' अंतर्गत राबवला जाणारा एक उपक्रम आहे, जो 'राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम' म्हणूनही ओळखला जातो. हा केंद्र सरकार पुरस्कृत उपक्रम ही कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामार्फत राबवला जात असून भविष्याभिमुख, पारदर्शक आणि नागरिक केंद्रित नागरी सेवा निर्माण करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. नियम-आधारित दृष्टिकोन सोडून भूमिका-आधारित आणि क्षमता आधारित कार्यप्रणाली विकसित करण्यावर या मिशनचा भर आहे. हे अभियान म्हणजे, सरकारच्या मानवी संसाधनांचा पाया मजबूत करून शासनामध्ये परिवर्तन घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे हे मिशन प्रतिबिंब आहे. हे मिशन क्षमता विकास आणि क्षमता-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करते, जेणेकरून नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा देण्यासाठी अधिकारी योग्य कौशल्ये, मानसिकता आणि उत्तरदायित्वाने सुसज्ज होऊ शकतील.

या मिशनला दोन संस्थांचा पाठिंबा आहे. 2021 मध्ये स्थापन झालेला 'क्षमता विकास आयोग' जो मंत्रालये, विभाग आणि संस्थांना त्यांच्या क्षमता विकास योजना तयार करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्य करतो. 2022 मध्ये स्थापन करण्यात आलेले कर्मयोगी भारत विशेष उद्देश वाहन (कर्मयोगी भारत एसपीव्ही) जो iGOT डिजिटल शिक्षण मंचाचे व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठी जबाबदार आहे.

क्षमता विकास आयोग (सीबीसी) हा 'मिशन कर्मयोगी' आराखड्याचा संरक्षक आहे, जो क्षमता विकास आणि योग्यता-आधारित शिक्षणाच्या माध्यमातून नागरी सेवा सुधारणांना चालना देतो. हा आयोग वैयक्तिक आणि संस्थात्मक क्षमता विकसित करणे, नागरिक-केंद्रित प्रशासनाला प्रोत्साहन देणे, भविष्यासाठी सज्जता आणि सार्वजनिक प्रशासनाच्या सर्व स्तरांवर आजीवन शिक्षणाची संस्कृती जोपासण्यावर लक्ष केंद्रित करून शासनाचा मानवी संसाधन पाया मजबूत करण्याचे काम करतो. शासनाला अधिक पारदर्शक, उत्तरदायी, नागरिक-केंद्रित आणि भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी हा आयोग आराखडे तयार करतो, मानके निश्चित करतो आणि सहकार्याला प्रोत्साहन देतो.

'मिशन कर्मयोगी' उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'iGOT कर्मयोगी' हे डिजिटल शिक्षण व्यासपीठ. हे व्यासपीठ कर्मचाऱ्यांना वर्तणूकविषयक, कार्यात्मक आणि विषयविशेष क्षेत्रांमध्ये ऑनलाइन प्रशिक्षण देते. यामुळे सरकारी कर्मचारी कधीही आणि कुठूनही शिक्षण घेऊ शकतात.

हे मिशन भारत सरकारची सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये विद्यमान नागरी सेवा प्रशिक्षण संस्था आणि 'iGOT कर्मयोगी' व्यासपीठाद्वारे राबवले जात आहे. क्षमता विकासाचे प्रयत्न प्रामुख्याने या डिजिटल व्यासपीठाद्वारे केले जातात, तर क्षमता विकास योजना प्रत्येक मंत्रालय आणि विभागाद्वारे त्यांच्या विशिष्ट क्षमतेच्या गरजेनुसार विकसित केल्या जातात.

मिशन कर्मयोगीने गेल्या पाच वर्षांत, नियम-आधारित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन भूमिका-आधारित चौकटीकडे वाटचाल करत नागरी सेवांमधील क्षमता विकासात परिवर्तन घडवले आहे. आता शिक्षण हे विशिष्ट कार्ये आणि जबाबदाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांशी जोडले गेले आहे.

मिशन कर्मयोगी: मोठ्या प्रमाणावर क्षमता विकासातील परिवर्तन

मिशन कर्मयोगीने गेल्या पाच वर्षांत क्षमता विकासात एक मूलभूत परिवर्तन घडवून आणले आहे. iGOT व्यासपीठावर 1.5 कोटींहून अधिक प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली असून, 8 कोटींहून अधिक अभ्यासक्रम पूर्णता नोंदवली गेली आहे. या व्यासपीठावर विविध भाषांमध्ये 4,600 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, 130 हून अधिक क्षमता विकास आराखडे विकसित केले गेले आहेत आणि शिकण्याचे परिणाम कामगिरी मूल्यांकन प्रणालीशी जोडले गेले आहेत.

हा बदल हे दाखवतो की प्रभावी शासन केवळ प्रशासकीय ज्ञानावरच नव्हे, तर समस्या निराकरण, सहयोग, नवोन्मेष आणि सहानुभूती यांसारख्या वर्तनात्मक कौशल्यांवरही अवलंबून असते. यामुळे मंत्रालये, विभाग आणि संघटना, प्रशिक्षण संस्था यांना त्यांच्या क्षमता विकासाला संस्थात्मक प्राधान्यक्रम आणि सेवा वितरणाच्या गरजांशी संरेखित करता येते.

साधना सप्ताह मिशन कर्मयोगीच्या भक्कम पायावर उभा राहून कौशल्य आधारित क्षमता विकासाला अधिक बळ देणारा उपक्रम आहे. कर्मयोगी घडवण्याच्या या तत्त्वज्ञानावर भर देण्यासाठी आणि त्याची पुष्टी करण्यासाठी साधना सप्ताह साजरा केला जातो. नागरी सेवांमधील सुधारित कौशल्ये आणि क्षमतांचे रूपांतर प्रत्यक्ष उत्तम सेवा वितरणात व्हावे, हा या उपक्रमाचा मुळ गाभा आहे. 'विकसीत भारत 2047' या राष्ट्रीय दृष्टिकोनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रशासन अधिक सक्षम करण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील चळवळ

साधना सप्ताह 100 हून अधिक केंद्रीय मंत्रालये आणि विभाग, 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तर 250 हून अधिक नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांना एका एकीकृत राष्ट्रीय चौकटीखाली एकत्र आणतो. पहिल्यांदाच, शासनाच्या विविध स्तरांवरील क्षमता विकास उपक्रमांना समान संरचनेत समन्वित करण्यात आले असून शिक्षण आणि प्रशिक्षण प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावरील सामूहिक चळवळीत रूपांतरित होत आहे. असा दृष्टिकोन बाळगल्याने सर्व स्तरांतील अधिकाऱ्यांच्या सहभागाला चालना मिळाली आहे, आणि त्यातून देशभरातील कल्पना तसेच उत्कृष्ट कार्यपद्धतींची परस्परस देवाणघेवाण आणि सहकार्यपूर्ण भागिदाऱ्यांच्या माध्यमातून समस्यांचे निवारण करण्याच्या वृत्तालाही प्रोत्साहन मिळाले आहे. नवी दिल्लीत मिशन कर्मयोगी वर होणार असलेल्या राष्ट्रीय परिषदेसोबतच साधना सप्ताहाचाही प्रारंभ होईल. या उपक्रमाच्या निमीत्ताने सरकारमधील वरिष्ठ नेतृत्व, प्रशिक्षण संस्था आणि धोरण तज्ञ एकाच ठिकाणी येतील.

साधना सप्ताहाच्या तीन संकल्पना

साधना सप्ताह हा तंत्रज्ञान, परंपरा आणि मूर्त फलनिष्पत्ती या तीन सूत्रांवर आधारलेला आहे. या सप्ताहाअंतर्गत विकसित भारत 2047 चा संकल्प साकार करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला गेला आहे.

तंत्रज्ञान : या सप्ताहअंतर्गतच्या 3 आणि 4 एप्रिल रोजी होणाऱ्या उपक्रमांची तंत्रज्ञान ही मुख्य संकल्पना असेल. याअंतर्गत प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि नागरिक केंद्रित बनवण्यासाठी आधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा कशारितीने लाभ घेता येईल, यावर भर दिला जाईल. यासोबतच प्रशासनातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सोयीसुविधा, माहिती साठ्यावर आधारित निर्णय प्रक्रिया आणि नेमक्या उद्देशाची अभियांत्रिकी अर्थात प्रॉम्ट इंजिनिअरिंग तसेच स्वयंचलन व्यासपीठे अर्थात ऑटोमेशन प्लॅटफॉर्म यांसारख्या उदयोन्मुख साधनांच्या पैलूंशी संबंधीत सांगोपांग चर्चा केली जाईल.

परंपरा : या सप्ताहअंतर्गतच्या 5 आणि 6 एप्रिल रोजी होणाऱ्या उपक्रमांमध्ये परंपरा या मुद्दावर भर दिला जाणार आहे. याअंतर्गत भारतीय ज्ञान व्यवस्था, भारतीय तत्त्वज्ञानाचा नितीमूल्य विषयक आराखडा आणि समकालीन सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित समुदाय आधारित प्रशासनाची इतिहासातील ऐतिहासिक उदाहरणांवर भर दिला जाणार आहे. विद्यमान प्रशासकीय कार्यपद्धतींमध्या या बाबी सामावून घेत, प्रशासनाला नागरिकांच्या गरजांना अधिकाधिक अनुरुप स्वरुप कसे मिळवून देता येईल याच्या शक्यता चाचपडून पाहणे हा यामागचा उद्देश आहे.

मूर्त फलनिष्पत्ती : या सप्ताहअंतर्गतच्या 7 आणि 8 एप्रिल रोजी होणाऱ्या उपक्रमांची मुख्य संकल्पना मूर्त फलनिष्पत्ती अशी असणार आहे. याअंतर्गत सार्वजनिक मूल्याचे मूल्यमापन करणे, देखरेख विषयक आराखड्याला बळकटी देणे आणि धोरणांचे नागरिकांच्या जीवनातील प्रत्यक्ष दिसून येतील अशा स्वरुपाच्या सुधारणांमध्ये रुपांतर घडून येईल याची सुनिश्चिती करणे किती गरजेचे आहे यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांवरील परिणामकारकतेचा मागोवा घेणे, नागरिकांसाठी प्राधान्यक्रमावर ठेवलेल्या क्षेत्रांमधील फलनिष्पत्तीची सुस्पष्ट मांडणी आणि डॅशबोर्ड अर्थात माहिती फलक आधारित देखरेख हे याअंतर्गच्या चर्चांमधले काही मुख्य मुद्दे असणार आहेत.

साधना सप्ताहाची अपेक्षित फलनिष्पत्ती

या सप्ताहाच्या शेवटी प्रत्येक मंत्रालय / विभाग दोन प्राधान्यक्रमावरील तंत्रज्ञानाधारीत उपाययोजना, दोन क्षेत्राशी संबंधित स्वदेशी किंवा पारंपरिक प्रारुपे आणि 2026–27 या आर्थिक वर्षासाठी मूल्यमापन करता येण्याजोग्या तीन फलनिष्पत्त्या सादर करण्याची वचनबद्धता पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर या सर्व घटकांचे पायाभूत सुविधा, संसाधने, सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार, प्रशासन, वित्त आणि अर्थव्यवस्था, कल्याण, वाणिज्य, मानवी विकास, कृषी आणि ग्राम विकास तसेच तंत्रज्ञान या निर्धारीत केलेल्या दहा क्षेत्रांतर्गत एका आंतर क्षेत्रीय संचाअंतर्गत संकलित केले जाणार आहेत.

यानिमीत्ताने प्रारंभ केले जाणारे मुख्य उपक्रम

मिशन कर्मयोगीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने तसेच नागरी सेवा विषयक परिसंस्थेअंतर्गतच्या क्षमता बांधणीला अधिक दृढ स्वरुप मिळवून देण्याण्यासाठी साधना सप्ताहादरम्यान अनेक महत्त्वाचे उपक्रम सुरू केले जाणार आहेत.

  1. कर्मयोगी क्षमता कनेक्ट (Karmayogi Kshamata Connect) : आघाडीवर राहून काम करत असलेल्या यंत्रणांचे सुधारित कार्यक्षमता आणि डिजिटल जागरूकतेसह नागरिक केंद्रित सेवा प्रदान करण्याच्यादृष्टीने सक्षमीकरण व्हावे यासाठी, एका सुनियोजित शैक्षणिक प्रारुपाच्या माध्यमातून आघाडीवर राहून काम करत असलेल्या यंत्रणांच्या क्षमता विकसित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
  2. राष्ट्रीय जनसेवा कार्यक्रम : युवा स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांना सेवा देणारे म्हणून प्रशिक्षण देऊन, नागरिकांशी संबंधित सेवा वितरण व्यवस्थेला बळकटी देणे आणि तळागाळातील सेवा भावनेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  3. उन्नती पोर्टल : उन्नती अर्थात नव्या युगाचे एकात्मिक राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था पोर्टलच्या (Unified New-Age National Training Institutions Portal) माध्यमातून प्रशिक्षण संस्थांसाठी एक एकात्मिक स्वरुपाचा डिजिटल आधार (Digital backbone) लाभणार आहे. यामुळे संबंधीत संपूर्ण परिसंस्थेअंतर्गत वास्तव वेळेत देखरेख ठेवणे, परस्पर सहकार्य आणि माहितीसाठ्याच्या आधारे क्षमता बांधणी करणे शक्य होणार आहे.
  4. आयगॉट लर्निंग असेसमेंट फ्रेमवर्क : या उपक्रमाअंतर्गत शिक्षण प्रक्रियेतून हाती आलेली फलनिष्पत्ती प्रत्यक्ष कामकाजाच्या परिस्थितीत लागू केली जाईल आणि त्याद्वारे प्रशासनाच्या परिणामकारतेते सुधारणा घडून येईल, याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने विश्वासार्हतेवर आधारलेली मूल्यमापन प्रणाली सुरू केली जाणार आहे.
  5. कर्मयोगी गान : हा उपक्रम समर्पण, सेवा आणि सातत्यपूर्ण शिक्षणाच्या भावनेची प्रचिती देणारा ठरणार आहे. यासोबतच मिशन कर्मयोगीअंतर्गतच्या मूल्यांना अधिक दृढता मिळवून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे प्रशिक्षण कार्यक्रमांसोबत एकात्मिकीकरण घडवून आणले जाणार आहे.
  6. कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड असलेला अमृत ज्ञान कोश संच : या उपक्रमाअंतर्गत प्रशासकीय पातळीवरील अभ्यासासाठीच्या प्रत्यक्ष उदाहरणांची संकलनपूर्ण निर्मिती आणि ती प्रत्यक्ष अमलात आणता यावीत यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक साधनांच्या माध्यमातून त्यांचे विश्लेषण, शोध आणि त्यांचे प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सामावून घेण्याच्या प्रक्रियेचा सुधारणापूर्ण विस्तार घडवून आणला जाणार आहे.
  7. विकसित पंचायतीसाठी क्षमता बांधणी : या उपक्रमाअंतर्गत तळागाळातील प्रशासकीय आस्थापनांचे उत्तम निर्णय घेण्याच्यादृष्टीने तसेच, उत्तम तऱ्हेने सेवा वितरण करता यावे यादृष्टीने सक्षमीकरण करण्यासाठी, ई-लर्निंग मॉड्यूल्स (ऑनलाईन शिक्षणासाठीची प्रारुपे) आणि कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड असलेल्या साधनांच्या माध्यमातून त्यांच्या बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे.
  8. शास्त्रज्ञांमधील प्रशासकीय कामकाजविषयक कौशल्यांच्यादृष्टीने क्षमता बांधणी : हा एक विशेषत्वाने आखणी केलेला खास उपक्रम आहे. याअंतर्गत शास्त्रज्ञ जेव्हा प्रशासकीय कामाजाची जबाबदारी स्विकारतील, त्यासाठी त्यांना प्रशासन, नेतृत्वगुण आणि निर्णय घेण्याच्या कौशल्यांनी सज्ज केले जाणार आहे.

सातत्यपूर्ण क्षमता विकासासाठी शैक्षणिक मार्ग

साधना सप्ताहाअंतर्गत आयगॉट (iGOT) कर्मयोगी या व्यासपीठावरून विशिष्ट उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने आखणी केलेले अभ्यासक्रम, सामूहिक चर्चा सत्रे, संकल्पनाधारित वेबिनार आणि प्रशिक्षण संस्थांद्वारे आयोजित प्रात्यक्षिक कार्यशाळांच्या माध्यमातून शिकण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या उपक्रमांअंतर्गत नेतृत्वगुण, संवाद, माहिती साठ्याचे विश्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन आणि डिजिटल प्रशासन यांसारख्या क्षमतांवर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमामुळे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेत सातत्यपूर्ण शिक्षणाच्या संस्कृतीला बळकटी मिळणार आहे. यासोबतच अवलंबता येण्याजोग्या आणि भविष्यासाठी सज्ज संस्थांच्या उभारणीचे महत्वही या उपक्रांमुळे अधोरेखित होणार आहे. विकसित भारत 2047 चा संकल्प साकार करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मनुष्यबळाच्या विकासात सातत्यपूर्णतेने गुंतवणूक करत राहण्याची गरजही या उपक्रमांतून अधोरेखित होणार आहे.

निष्कर्ष

साधना सप्ताह 2026 हा उपक्रम देशभरात भविष्यासाठी सज्ज नागरी सेवा वितरण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने उचलल्या जात असलेल्या पावलांचे प्रतिनिधीत्व करणारा एक महत्वाचा उपक्रम आहे. याअंतर्गत सातत्यपूर्ण शिक्षण, सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देत प्रभावशाली ठरू शकेल अशा प्रशासनाचा पाया अधिक बळकट होणार आहे.

आज भारत विकसित भारत 2047 चा संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. अशा वेळी हा उपक्रम नागरी सेवा कर्मचाऱ्यांना उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच नागरिकांच्या दृष्टीने उत्तम फलनिष्पत्तीची स्थिती साध्य करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि क्षमतांनी सज्ज करण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राहणार आहे.

References:

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2248331&reg=3&lang=2

PIB Research

पीडीएफ येथे पाहता येईल

 

नेहा कुलकर्णी / श्रद्घा मुखेडकर / तुषार पवार /प्रिती मालंडकर

 

(Explainer ID: 158110) आगंतुक पटल : 61
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Kannada