Social Welfare
क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने भारताची वेगवान वाटचाल
Posted On:
24 MAR 2026 6:43PM
प्रमुख वैशिष्ट्ये
-
दर वर्षी क्षयरोगाने (टीबी) ग्रस्त झालेल्या नव्या रुग्णांची संख्या 2015-2024 या कालावधीत 21% ने कमी झाली; याच कालावधीत क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात 28% घट
-
टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत, 7 डिसेंबर 2024 पासून, 20 कोटींहून अधिक संवेदनशील लोकांची चाचणी करण्यात आली, 28 लाखांहून अधिक रुग्णांमध्ये टीबीचे निदान झाले.
-
देशातील 46,118 हून अधिक ग्रामपंचायतींना वर्ष 2024 साठीचे टीबी-मुक्त प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
-
औषध-प्रतिरोधी टीबी रुग्णांसाठीच्या कार्यक्रमांतर्गत आता कमी मुदतीची, सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक ठरणारी, बेडाक्विलीन, प्रेटोमॅनिड, लिनेझोलिड आणि मॉक्सिफ्लॉक्सॅसिन यांचा समावेश असलेली बीपीएएलएम उपचारपद्धती सुरु करण्यात आली आहे.
-
भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-चलित टीबी कार्यक्रमात खोकल्याची तपासणी करण्यासाठी एआय, छातीच्या क्ष-किरण प्रतिमेची तपासणी करण्यासाठी रेडिओलॉजी एआय आणि अधिक जोखमीचे रुग्ण निश्चित करण्यासाठी अंदाजित अॅनालिटिक्सचा वापर करण्यात येतो.
प्रस्तावना
|
जागतिक क्षयरोग दिन
आरोग्यावर, समाजावर आणि आर्थिक स्थितीवर होणाऱ्या टीबीच्या विनाशकारी परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन करण्यात येते.जगातील टीबी रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची आठवण हा दिन आपल्याला करून देतो. वर्ष 1882 मध्ये याच दिवशी डॉ.रॉबर्ट कॉख यांनी टीबीला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूचा शोध लावल्याचे जाहीर केले. या शोधामुळे या आजाराचे निदान आणि उपचाराचा मार्ग मोकळा झाला.
|
भारत आता क्षयरोग निर्मूलनाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025साठीच्या जागतिक टीबी अहवालानुसार भारतात सापडणाऱ्या नव्या टीबीग्रस्त रुग्णांची संख्या 2015-2024 या कालावधीत 21% ने कमी झाली. जागतिक पातळीवर, टीबी रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वात लक्षणीय घट असून, उच्च-संख्येने टीबीग्रस्त असलेल्या इतर देशांमध्ये नोंदवलेल्या घट होण्याच्या गतीपेक्षा ही कितीतरी अधिक आहे. उपरोल्लेखित कालावधीत टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दरात 28%घट झाली. क्षयरोगाचे निदान, चाचणी तसेच उपचार यासाठी भारत सरकारने स्वीकारलेल्या लक्ष्यित, बहु-शाखीय दृष्टीकोनाने या प्रगतीशील प्रवाहामध्ये लक्षणीय योगदान दिले.
आधुनिक तंत्रज्ञानाने विस्तारित स्थानिक आरोग्य सेवा, समुदायाचा सहभाग आणि किफायतशीर उपचार यांनी भारताला या प्रचलित आणि संभाव्यतः जीवघेण्या आजाराचे निर्मूलन करण्याच्या दिशेने मार्गस्थ केले.

टीबी आणि त्याची लक्षणे
क्षयरोग म्हणजे काय?
मायकोबॅक्टेरीम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जीवाणूमुळे क्षयरोग होतो आणि हा जीवाणू बहुतेकदा फुफ्फुसांवर हल्ला करतो. शरीरातील मेंदू, मूत्रपिंडे अथवा मणक्यासारख्या इतर अवयवांना देखील क्षयरोग ग्रासू शकतो.
या जिवाणूमुळे संक्रमित झालेली व्यक्ती आजारी पडू शकते, मात्र काहीजणांमध्ये आजाराची लक्षण दिसत नाहीत. निष्क्रिय टीबी रुग्ण अथवा अप्रगट टीबी संक्रमणे देखील असू शकतात. सक्रीय टीबीने संक्रमित व्यक्ती जशा प्रकारे इतरांना टीबीचा संसर्ग देऊ शकतो तशा प्रकारे निष्क्रिय टीबी रुग्ण या आजाराचा प्रसार करत नाही. मात्र तरीही अशा रुग्णांमध्ये कोणत्याही वेळी सक्रीय टीबी विकसित होऊ शकतो आणि ते त्या आजाराने ग्रस्त होऊ शकतात.लहान बाळे तसेच लहान बालके आणि दुबळी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना हे संक्रमण होण्याची शक्यता अधिक असते. योग्य उपचार घेतले नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

टीबीची लक्षणे
सक्रिय क्षयरोगाची लक्षणे साधारणतः जीवाणू ज्या अवयवावर परिणाम करतात त्या भागानुसार वेगवेगळी असतात; तरीही काही लक्षणे सर्व प्रकारच्या क्षयरोगामध्ये सामान आढळतात.

सक्रीय अथवा लक्षणदर्शी टीबीचा संसर्ग झालेले लोक इतरांमध्ये टीबीचे जीवाणू पसरवू शकतात. जेव्हा हे लोक खोकतात, शिंकतात अथवा बोलतात, तेव्हा जीवाणू असलेली अत्यंत लहान लहान बिंदुके हवेत पसरतात आणि आजूबाजूला असलेल्या- विशेषतः कमी वायुवीजन असलेल्या जागांमधील लोकांकडून श्वासावाटे शरीरात घेतली जातात.
टीबी हा रोग हवेतून पसरत असला तरीही खालील क्रियांमुळे त्याचा प्रसार होत नाही:
-
हात मिळवणे
-
सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे
-
अन्न तसेच भांड्यांचा सामायिकपणे वापर करणे
-
दररोज होणारा सामाजिक परस्परसंवाद
फुफ्फुसांचा क्षयरोग झालेल्या रुग्ण योग्य उपचार सुरू केल्यानंतर किमान दोन आठवड्यांनंतर सामान्यतः संसर्गजन्य राहत नाहीत. फुफ्फुसाखेरीज शरीराच्या इतर अवयवांमध्ये क्षयरोग संसर्ग झालेल्या व्यक्ती सामान्यतः तो रोग इतरांकडे संक्रमित करू शकत नाहीत.

भारतातून टीबीचा नायनाट करण्यासाठीची धोरणात्मक योजना
शाश्वत विकास ध्येय क्र. 3 ला अनुसरुन, वर्ष 2025 पर्यंत भारतातून टीबीचे समूळ उच्चाटन करण्याचे भारत सरकारचे ध्येय हे जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य अभियान आहे. जून 2020 मध्ये सरकारने भारतातील क्षयरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना 2020-25 ची घोषणा केली. बांधणी, प्रतिबंध, शोध आणि उपचार या चार आधारस्तंभांच्या मदतीने क्षयरोगाचे उच्चाटन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. लवकर निदान, संक्रमण कमी करणे, रुग्णांवर योग्य औषधे आणि उपचारपद्धतींच्या मदतीने उपचार करणे तसेच रुग्णाला मदत करणारी प्रणाली विकसित करणे यांवर सदर योजनेतून लक्ष केंद्रित करण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम
वर्ष 2020 मध्ये भारत सरकारने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे (आरएनटीसीपी) नाव बदलून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) असे केले. जगभरातून 2030 पर्यंत टीबीचे समूळ उच्चाटन करण्याच्या जागतिक उद्दिष्टाच्या आधीच देशातून टीबीचा नायनाट करण्याचे भारताचे उद्दिष्ट यातून दिसून येते. एनटीईपी, एनएसपीच्या चार स्तंभांवर कार्यक्रमाची उभारणी करते: शोध-उपचार-प्रतिबंध-उभारणी. या कार्यक्रमाद्वारे केले जाणारे महत्त्वाचे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
-
उच्च दर्जाच्या चाचणी प्रक्रियेद्वारे क्षयरोग झालेल्या व्यक्तींचे लवकर निदान, आणि असुरक्षित लोकसंख्येतील शोध न लागलेल्या रुग्णांना शोधण्यासाठी सक्रीय सामुदायिक प्रचार कार्यक्रम
-
औषधांना दाद न देणाऱ्या प्रतिरोधक प्रकारच्या टीबीसह, सर्व टीबी रुग्णांवर गुणवत्ता-हमी असलेली औषधे तसेच उपचारपद्धतींच्या मदतीने त्वरित उपचार.
-
खासगी क्षेत्रात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांशी संवाद साधणे.
-
थेट लाभ हस्तांतरण आणि नि:क्षय मित्र उपक्रम यांच्या माध्यमातून रुग्ण-केंद्रित उपचार सहाय्य आणि पोषण हस्तक्षेप यांची अंमलबजावणी.
-
टीबी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तसेच कुटुंबातील संपर्कात असलेले सदस्य,लहान मुले, पीएलएचआयव्ही यांना तसेच अधिक धोका असलेल्या/असुरक्षित लोकसंख्येला टीबी प्रतिबंधात्मक उपचार देणे
-
हवेतून पसरणाऱ्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय.
-
सामाजिक निर्धारकांना हाताळण्यासाठी बहु-क्षेत्रीय प्रतिसाद.
सरकार एनटीईपी अंतर्गत विविध कार्यक्रम राबवते.
पंतप्रधान टीबीमुक्त भारत अभियान
एनटीईपीचा एक अतिरिक्त महत्त्वपूर्ण घटक म्हणून 09 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान- टीबीमुक्त भारत अभियान (टीबीमुक्त भारत अभियान) सुरु करण्यात आले. समाजाच्या सर्व थरांतील लोकांना एका ‘जन आंदोलना’ (लोकांची चळवळ)साठी एकत्र आणणे आणि टीबी निर्मूलनाच्या दृष्टीने देशाच्या प्रगतीला गती देणे या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला. त्याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
नि:क्षय पोषण योजना तसेच नि:क्षय मित्र कार्यक्रम
टीबीच्या उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचे प्रतिकूल दुष्परिणाम टाळण्यासाठी टीबीग्रस्त रुग्णांनी अधिक प्रथिनेयुक्त आहार घेणे आवश्यक असते. वर्ष 2018 मध्ये सुरु करण्यात आलेल्या नि:क्षय पोषण योजनेतून प्रत्येक सूचित टीबी रुग्णाला दर महिन्याला 1,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. एप्रिल 2018 मध्ये ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 1.38 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 4,454.68 कोटी रुपयांचे थेट वितरण करण्यात आले आहे.
टीबीचे उपचार प्रदीर्घ, किमान 6 महिने चालणारे आणि काही वेळा त्याहीपेक्षा अधिक काळ चालणारे असतात. नि:क्षय मित्र हा “क्षयरोगी रुग्णाचा मित्र” अथवा समर्थक असतो जो टीबी रुग्णाला त्याच्या उपचाराच्या कालावधीत मदत करतो. एखादी व्यक्ती, बिगर सरकारी संस्था, महामंडळे, धार्मिक आणि सामाजिक गट, सरकारी अधिकारी तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यापैकी कोणीही स्वयंसेवी भावनेने नि:क्षय मित्र म्हणून भूमिका निभावू शकतात.

चित्र १ कर्नाटकाच्या येलाहंका जिल्ह्यामध्ये क्षयरुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्न पुरवठ्यासाठी निः-क्षय मित्र योगदान देताना. (डिसेंबर 13, 2022), आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय
रुग्णांचा औषधाव्यतिरिक्त होणारा खर्च कमी व्हावा म्हणून टीबी मित्र नियमितपणे धान्यांच्या पिशव्या देतात. तसेच आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांचे जीवन सुधारावे म्हणून त्यांना नियमित भेट देऊन मानसिक सहाय्य तसेच व्यावसायिक सहाय्य ते पुरवू शकतात.
12 नोव्हेंबर 2025 नुसार:
-
6,77,541 व्यक्ती आणि संघटनांनी नि-क्षय मित्र म्हणून नावनोंदणी केली आहे तसेच क्षयरुग्णांमध्ये 45 लाखांहून अधिक खाद्यपदार्थांचे वाटप केले आहे.
-
'माय भारत "चे 2 लाखांहून अधिक स्वयंसेवक नि:क्षय मित्र म्हणून काम करण्यासाठी पुढे आले आहेत. ‘माय भारत’ हा प्रत्यक्षातली आव्हाने आणि अडचणींमध्ये सहाय्य करण्यासाठी तत्पर असणारा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. यामध्ये विविध सरकारी विभाग, खाजगी आस्थापना आणि नागरी समुदायातील १५ ते २९ वर्षाचे तरुण सहभागी आहेत.
शंभर दिवसांची क्षय-मुक्त भारत मोहिम
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परिणामकारक क्षयनिर्मूलन मोहिमांपैकी क्षयमुक्त भारत अभियान या एका मोहिमेचा आरंभ केला. ही 100 दिवसांची मोहीम 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 347 अती-प्राधान्यक्रम असलेल्या जिल्ह्यांमध्ये 7 डिसेंबर 2024 रोजी सुरू केली. यामध्ये क्षयरोगाचे वेळेवर निदान होण्यासाठी या आजाराला सहज बळी पडू शकणाऱ्या रुग्णांचा आराखडा तसेच अती धोक्याच्या श्रेणीत येणाऱ्यां व्यक्तींचे पद्धतशीर स्क्रीनिंग या बाबींचा अवलंब करण्यात आला. निवडून आलेल्या 30,000 प्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग आणि 24 मंत्रालयांचा पाठिंबा तसेच निःक्षय मित्रांचे सहाय्य यामुळे क्षयरोग निर्मूलनासाठी संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार अशा जनआंदोलनाचे स्वरुप आले. टीबी मुक्त अभियान साठीच्या धोरणांचा विस्तार करुन आता ती धोरणे देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहेत.
टी. बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत, 7 डिसेंबर 2024 पासून, क्षयरोगाला सहज बळी पडू शकतील अशा 20 कोटींहून अधिक लोकांची क्षयरोग तपासणी केली जाते, 28 लाखांहून अधिक क्षयरुग्णांचे निदान केले जाते, यामध्ये एरवी लक्षणे नसल्यामुळे तपासणीतून वगळले गेले असते अशा 9 लाख रुग्णांचा समावेश आहे.
सर्वसमावेशक लक्ष्यसाध्य आणि सांघिक प्रयत्नांचा परिणाम म्हणून एकू 46,118 ग्रामपंचायतींना 2024 या वर्षाचे क्षयरोगमुक्त प्रमाणन बहाल करण्यात आले.

क्षयरोगमुक्त भारत अभियानामुळे उपचार यशस्वी होण्याची टक्केवारी जागतिक स्तरावरच्या 88 टक्क्यांच्या आकडेवारीला ओलांडत 90 टक्क्यांपर्यंत गेली.
नवीन सुधारणा
औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या प्रकारातील रुग्णांसाठी बेडाक्विलिन, प्रीटोमॅनिड, लिनझोलिड आणि मोक्सीफ्लॉक्सासिन या चार औषधांचे मिश्रण असणारी BPaLM ही नवीन उपचार पद्धती अवलंबण्यात आली. यामुळे उपचारांचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत कमी होऊ शकेल. आधीच्या MDR/RR- उपचार पद्धतीच्या क्षयरुग्णांना ही नवीन उपचार पद्धती सुरु करण्यात आली.
क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचारः प्रतिबंध हा उपचाराइतकाच महत्त्वाचा असतो म्हणून, इतर आजार असतील तर क्षयरोगाच्या संसर्गाची शक्यता असतेय अशा प्रकारची क्षयरोगाची प्रगती रोखण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना क्षय प्रतिबंधात्मक उपचार (टी. पी. टी.) दिले जातात. या लक्ष्यसाध्य आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून सुरु झालेल्या या उपक्रमाने घरोघरी संपर्क आणि एच. आय. व्ही. (पी. एल. एच. आय. व्ही.) सह राहणाऱ्या लोकांना क्षय प्रतिबंधात्मक उपचार (टी. पी. टी.) देऊन वर्षानुवर्षे संरक्षण यशस्वी केले आहे. या हस्तक्षेपाचा विस्तार सक्रिय आणि तीव्र केसेसच्या शोधांच्या मोहिमा तसंच रोगाला सहज बळी पडण्याचा संभव असणाऱ्या गटांपर्यंत करण्यात आला आहे.

आयुष्मान आरोग्य मंदिरे
आयुष्मान आरोग्य मंदिरे ही आयुष्मान भारत विस्तारीत योजनेंंतर्गत असलेली, सर्वांना एकसारखी आणि किफायतशीर आरोग्यसेवा पुरवणारी सामुदायिक आरोग्य केंद्रे आहेत. 24 मार्च 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार भारतात 1,84,726 मंदिरे आहेत. यामध्ये उप-आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपाथी) केंद्रे तसेच शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रांचा समावेश आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती या केंद्रांवर जाऊन निदान करून घेऊ शकतात.

|
आकृती दोन - हिमाचल प्रदेशातील जिल्ह्यात आरोग्य सेवा कर्मचारी महिने तसेच इतर रोगांच्या निदानासाठी तपासणी करताना 20 सप्टेंबर 2025 (आरोग्य आणि कुटुंबा कल्याण मंत्रालय)
|
तंत्रज्ञान पूरक पायाभूत सुविधा
वेगवान रेणवीय परीक्षणाच्या 9800 हून अधिक सुविधा आणि कल्चर तसेच औषध संवेदनशीलता तपासणाऱ्या 107 प्रयोगशाळा आहेत. क्षयरोगाच्या पूर्व निदानासाठी तसेच काळजी घेण्यासाठी उपलब्ध असलेलं हे जगातील सर्वात मोठे जाळे आहे. याशिवाय इतर टूल्स म्हणजे
-
छातीचा एक्स-रे काढण्यासाठीचे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले, हाताने कुठेही नेता येणारे युनिट ज्यामधून जवळपास एकावेळी 500 एक्सरे काढता येऊ शकतात, अशी 1500 युनिट समुदायासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देण्यात आली आहेत.
-
पोषणसंबंधी सहाय्य म्हणून निःक्षय डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन थेट लाभ परतावा योजनेची मदत देतो
काश्मीरमध्ये दुर्गम प्रदेशातील क्षयरोगाची प्रकरणे
काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात गुलरेज खोरे या हिमालयातील 2400 मी. उंचीवरच्या आणि हिवाळ्यात ज्याचा संपर्क तुटतो अशा दुर्गम प्रदेशात ‘NTEP काश्मीर’ने सखोल क्षय तपासणी मोहीम राबवली. आधुनिक निदान यंत्रे आणि पोर्टेबल क्ष-किरण उपकरणांनी सुसज्ज अशा फिरत्या चाचणी व्हॅनचा वापर करून, या चमूने तीन दिवसांत 1,250 लोकांची तपासणी केली आणि पुढील चाचणीसाठी 250 हून अधिक संभाव्य क्षयरोगाची प्रकरणे शोधली. भारतीय लष्कर, स्थानिक आरोग्य कर्मचारी, गावचे प्रतिनिधी आणि धार्मिक नेत्यांसोबत त्यांनी जागृती सत्रेही आयोजित केली. वर्ष 2025 पर्यंत 'क्षयमुक्त काश्मीर' साध्य करण्याच्या जम्मू आणि काश्मीरच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब या प्रयत्नांतून दिसून येते.
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून होणारे उपक्रम
क्षयरोगाचा शोध, निदान आणि उपचारांसाठी सरकार कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित प्रणालींचा वापर करत आहे. सेवेची उपलब्धता आणि गती सुधारण्यासाठी आरोग्य सेवा वितरणात तंत्रज्ञानाचा वापर करणे हा त्यामागील उद्देश आहे. हे उपक्रम पुढीलप्रमाणे
|
आरोग्य हे लक्ष्य
|
कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित उपाय/पुढाकार
|
प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि ‘उपचार’ यांचा अनुभव
|
क्लिनिकल /ऑपरेशनल प्रभाव
|
|
क्षयरोग निदानासाठी तपासणी
|
खोकला विरुद्ध क्षयरोग (CATB)
|
ध्वनीआधारित कृत्रिम बुद्धीमत्ता - यावर आधारित स्मार्टफोन अॅपद्वारे रुग्णाच्या खोकल्याचे 3 सेकंदाचे रेकॉर्डिंग क्षयाच्या लक्षणांसाठी वारंवारतेच्या नमुन्यांचे विश्लेषण करते.
|
1.62 लाखांहून अधिक लोकांची तपासणी; पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत प्रकरणांमध्ये 12-16 % अधिक निदान दर मिळाला. [2]
|
|
क्षय व्यवस्थापन
|
प्रतिकूल निष्कर्षांचा अंदाज
|
पुर्वानुमानाचे विश्लेषण : उपचार अयशस्वी होण्याची दाट शक्यता असणारे रुग्ण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चिन्हांकित करता येतात.
|
देशभरात याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रतिकूल परिणामांमध्ये 27% घट झाल्याचा अहवाल आहे. [3]
|
|
टीबी प्राथमिक छाननी
|
छातीचे एक्स-रे
|
रेडिओलॉजी कृत्रिम बुद्धीमत्ता: कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित रेडिओलॉजी संभाव्य क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या गाठी/पोकळ्या ओळखण्यासाठी डिजिटल एक्स-रेचे स्वयंचलित वाचन.
|
8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये तैनात; तज्ञांची कमतरता जाणवू नये म्हणून सरकारला विनामूल्य उपलब्ध. [4]
|
निष्कर्ष
भारतात क्षयरोगाच्या घटनांमध्ये झालेली सातत्यपूर्ण घट ही सातत्यपूर्ण वचनबद्धता, सामुदायिक सहभाग आणि प्रभावी सार्वजनिक आरोग्य उपक्रम खरोखर मोठा बदल घडवून आणतात याचं निदर्शक आहे. सततची दक्षता, आरोग्यसेवेची वाढलेली उपलब्धता आणि सामूहिक जबाबदारीच्या जोरावर, देश अशा भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, जिथे क्षयरोगमुक्त भारत हे केवळ एक ध्येय नसून, एक साध्य करण्यायोगी परिस्थिती असेल.
References
Press Information Bureau:
· TB incidence in India drops by 21% from 237 per lakh population in 2015 to 187 per lakh population in 2024 – almost double the rate of decline observed globally: https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2189415
· World Tuberculosis (TB) Day – 2025: https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2114549
· TB is completely curable if right drugs are taken for the right duration - Director, National Tuberculosis Institute: https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1808582
· Mera Yuva Bharat: https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2184456
· India’s 100-Day TB Elimination Campaign: https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2081662
Others:
See in PDF
***
नेहा कुलकर्णी / संजना चिटणीस / विजया सहजराव/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
(Explainer ID: 157988)
आगंतुक पटल : 206
Provide suggestions / comments