• Sitemap
  • Advance Search
Social Welfare

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा

आदिवासी क्रीडाक्षेत्रातील नवे पर्व

Posted On: 27 MAR 2026 11:24AM

 

 

मुख्य मुद्दे

  • खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान होत आहे. ही देशातील आदिवासी खेळाडूंसाठीची पहिली राष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे.

  • या स्पर्धा छत्तीसगडमधील रायपूर, जगदलपूर आणि सरगुजा येथे होत असून, देशभरातील आदिवासी खेळाडू एकाच राष्ट्रीय मंचावर एकत्र आले आहेत. 

  • स्पर्धांमध्ये सात पदक क्रीडा प्रकार आहेत आणि पारंपरिक आदिवासी खेळांचे प्रात्यक्षिकही दाखवले जात आहे. 

  • देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 60,000 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले असून, 338 पदकांसाठी स्पर्धा होत आहे.

 

भारताचा क्रीडा विस्तार : खेलो इंडिया दृष्टिकोन

A person running with a basketballAI-generated content may be incorrect.

क्रीडा व्यक्ती आणि समाज घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना वाढवतात, तसेच एकात्मता आणि सामूहिक उद्दिष्टांची जाणीव निर्माण करतात. भारतासारख्या देशासाठी क्रीडा केवळ स्पर्धा नाहीत, तर युवकांना जोडण्याचे, आरोग्यदायी जीवनशैली प्रोत्साहित करण्याचे आणि प्रगती व संधी निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे.

याच दृष्टिकोनातून, भारत सरकारने देशभरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी खेलो इंडिया' कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम तळागाळातील सहभाग वाढविण्यावर, उदयोन्मुख गुणवत्ता शोधण्यावर आणि तरुण खेळाडूंना सातत्यपूर्ण पाठबळ देण्यावर लक्ष केंद्रित करतो. स्पर्धा, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य यांच्या एकत्रित माध्यमातून, खेलो इंडिया अधिक सुव्यवस्थित आणि सुलभ क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यास मदत करत आहे.

A group of people runningAI-generated content may be incorrect.

या दृष्टिकोनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'सर्वसमावेशकता'.  ज्या भागात किंवा समुदायांमध्ये खेळाच्या संधी पूर्वी मर्यादित होत्या, तिथपर्यंत पोहोचण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यामुळे संपूर्ण देशातील गुणवत्ता शोधणे आणि ती जोपासणे शक्य होत आहे. या संदर्भात, आदिवासी समुदायांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेले पुढाकार हे सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. खेलो इंडिया’ अंतर्गत युवा क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, बीच गेम्स, हिवाळी क्रीडा स्पर्धा अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांत ‘खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा’ या नव्या घटकाची भर घालण्यात आली असून, यामुळे आदिवासी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळत आहे तसेच भारतातील पारंपरिक क्रीडांचा वारसा जपण्यास आणि प्रोत्साहन देण्यासही मदत होत आहे.

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा

भारताच्या आदिवासी समाजात उत्तम क्रीडा प्रतिभा आहे. हे खेळाडू ताकदवान, कुशल आणि पारंपरिक खेळांशी जोडलेले आहेत. मात्र, यापैकी बरीच प्रतिभा आतापर्यंत संघटित क्रीडा मंचांपासून दूर राहिली होती. ‘खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा’ या प्रतिभेला आता राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेचे पहिले आयोजन 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान छत्तीसगडमध्ये रायपूर, जगदलपूर आणि सरगुजा या तीन शहरांमध्ये होत आहे. ‘खेलो इंडिया’ अंतर्गत केवळ आदिवासी खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही पहिली राष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा असून, देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू एकाच व्यासपीठावर सहभागी होत आहेत. 

या स्पर्धांमध्ये मैदानी क्रीडा प्रकार, फुटबॉल, हॉकी, भारोत्तोलन, तिरंदाजी, जलतरण आणि कुस्ती असे सात पदक क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत. याशिवाय मल्लखांब आणि कबड्डी यांसारख्या प्रात्यक्षिक क्रीडा प्रकारांचाही समावेश असून, स्पर्धात्मक क्रीडेसोबत भारताच्या पारंपरिक खेळांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.

 

कबड्डी : पारंपरिक खेळाची जागतिक ओळख

Kabaddi.

कबड्डी हा भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक खेळांपैकी एक असून, त्याची मुळे भारतीय उपखंडात खोलवर रुजलेली आहेत. हा खेळ पूर्वी ताकद, डावपेच आणि सहनशक्तीची परीक्षा म्हणून खेळला जात असे. कालांतराने हा स्थानिक खेळ विकसित होत गेला आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचे नियम निश्चित करण्यात आले. त्यानंतर लवकरच या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन सुरू झाले. 

1936 मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कबड्डीचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला, ज्यामुळे या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. यामुळे भारताबाहेरील प्रेक्षकांनाही कबड्डीची माहिती झाली. 

आज कबड्डी हा पारंपरिक वारसा आणि आधुनिक स्पर्धात्मक स्वरूप यांचा संगम असलेला खेळ आहे आणि भारताच्या पारंपरिक क्रीडा संस्कृतीचे महत्त्वाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

 

मल्लखांब : ताकद, संतुलन आणि परंपरा

A person jumping off a poleAI-generated content may be incorrect.A person jumping off a pole with a group of people watchingAI-generated content may be incorrect.

मल्लखांब हा भारतातील पारंपरिक क्रीडा प्रकार असून, त्यात व्यायाम, योग आणि शक्तीविकास यांचा संगम दिसतो. हा खेळ लाकडी खांब, दोरी किंवा लटकत्या साधनांवर सादर केला जातो. ‘मल्ल’ म्हणजे कुस्तीगीर आणि ‘खांब’ म्हणजे खांब, अशा शब्दांपासून ‘मल्लखांब’ हे नाव तयार झाले असून, याची सुरुवात कुस्तीपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी झाली. 

A group of men standing on top of each otherAI-generated content may be incorrect.A group of people standing around a poleAI-generated content may be incorrect.

शतकांपूर्वीपासून अस्तित्वात असलेला हा खेळ शरीराची चपळता, ताकद आणि समन्वय वाढवण्यासाठी वापरला जात होता. कालांतराने तो अधिक संघटित क्रीडा प्रकार म्हणून विकसित झाला आणि खांब, दोरी व लटकता मल्लखांब अशा विविध प्रकारांत सादर केला जाऊ लागला. या प्रत्येक प्रकारात संतुलन आणि नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. 

1936 मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मल्लखांबचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला, ज्यामुळे या पारंपरिक क्रीडेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. 

आज मल्लखांब हा भारताच्या समृद्ध शारीरिक संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. परंपरा आणि कौशल्य यांचा संगम असलेला हा खेळ ‘खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा’सारख्या उपक्रमांमधून मुख्य प्रवाहातील क्रीडांसोबत प्रोत्साहन मिळवत आहे. 

A statue of a green person with horns and a garmentAI-generated content may be incorrect.

हा उपक्रम केवळ क्रीडापुरता मर्यादित नाही. ज्या भागांत क्रीडासुविधा मर्यादित होत्या, तिथे संघटित क्रीडा पोहोचवून या स्पर्धा तरुणांसाठी नवे मार्ग उघडत आहेत. त्यामुळे त्यांना संधी, आत्मविश्वास आणि पुढील वाटचालीसाठी आधार मिळत आहे. या अर्थाने क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून, जोडणारी, घडवणारी आणि पुढे नेणारी शक्ती ठरते. 

या स्पर्धांचा अधिकृत मॅस्कॉट ‘मोरवीर’ हा या उपक्रमाची ओळख दर्शवतो. ‘मोर’ म्हणजे आपला आणि ‘वीर’ म्हणजे शौर्य, या छत्तीसगढी शब्दांपासून तयार झालेला ‘मोरवीर’ हा आदिवासी समाजाचा अभिमान, उत्साह आणि ओळख यांचे प्रतीक आहे.

 

छत्तीसगड : नव्या पर्वाची सुरुवात

डाव्या नक्षलवादाच्या प्रभावाचा अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या छत्तीसगडमध्ये ‘खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026’ होत आहेत, ही एक महत्त्वाची बाब आहे. यामुळे या भागातील लोकांची जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. या स्पर्धांमुळे बस्तर, सरगुजा आणि दंडकारण्य पट्ट्यासारख्या आदिवासी बहुल भागांपर्यंत क्रीडाच्या संधी थेट पोहोचत आहेत. या भागांतील अनेक प्रतिभावान खेळाडूंना यापूर्वी पुरेशी संधी मिळाली नव्हती. गेल्या वर्षी राज्य सरकारने बस्तर ऑलिम्पिक आयोजित केले होते, त्यानंतर 2026 मध्ये सरगुजा ऑलिम्पिक झाले. या उपक्रमांमुळे स्थानिक स्तरावर खेळाडूंची क्षमता पुढे येऊ शकते, हे दिसून आले. ‘खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा’मुळे अशा सहभागाला आणखी चालना मिळणार असून, स्थानिक पातळीवरून खेळाडू शोधण्यावर भर दिला जात आहे. या भागांना सामाजिक आणि आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला आहे. हे लक्षात घेऊन या स्पर्धांद्वारे आदिवासी खेळाडूंना देशाच्या क्रीडा व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि भविष्यातील क्रीडा प्रतिभा तयार करण्यावर भर दिला जात आहे. 

 

‘खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026’चे आयोजन युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय ऑलिम्पिक संघटना, विविध राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि छत्तीसगड राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. या स्पर्धांचे तांत्रिक निकष आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या मानकांनुसार ठेवण्यात आले आहेत.

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धांना जसा अधिकाधिक रंग चढत आहे, तसतसे खेळाडूंचे केवळ कौशल्यच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, स्वप्ने आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची त्यांची धडपडही पुढे येत आहे.

सहभाग, पदके आणि निवड प्रक्रिया

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर अत्यंत लक्षणीय सहभाग पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 60, 000 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. हा व्यापक सहभाग देशातील आदिवासी समुदायांमध्ये संघटित खेळांचा वाढता प्रसार दर्शवतो.

सात विविध खेळ प्रकारांमध्ये एकूण 338 पदकांसाठी चुरस  आहे. यामध्ये 106 सुवर्ण, 106 रौप्य आणि 126 कांस्य पदकांचा समावेश आहे. ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके असून, त्यापाठोपाठ पोहणे(जलतरण), कुस्ती आणि भारोत्तोलन यांचा क्रमांक लागतो.  या स्पर्धांमधील विविध खेळांचा समावेश आणि स्पर्धेचा स्तर, यावरुन दिसून येतो.

 

अनु क्र.

खेळ

पदक

एकूण

सुवर्ण

रौप्य

कांस्य

1.

तिरंदाजी

10

10

10

30

2.

ॲथलेटीक्स

34

34

34

102

3.

फुटबॉल 

2

3

4

8

4.

हाॅकी

2

2

2

6

5.

जलतरण

24

24

24

72

6.

भारोत्तोलन

16

16

16

48

7.

कुस्ती

18

18

36

72

एकूण

106

106

126

338

 

या खेळांसाठी खेळाडूंची निवड दोन टप्प्यांच्या शिस्तबद्ध प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे:

पहिला टप्पा: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या क्रीडा विभागांमार्फत निवड चाचण्या घेतल्या, जेणेकरून पात्र आदिवासी खेळाडू हुडकून त्यांना पुढील टप्प्यासाठी नामांकित करता येईल.

दुसरा टप्पा: निवडलेल्या खेळाडूंनी संबंधित राष्ट्रीय क्रीडा महासंघांद्वारे (खेलो इंडिया चमुच्या समन्वयाने) आयोजित राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला. या चाचण्यांमधील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड करण्यात आली. यामुळे निवडीचा मार्ग पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित राहील याची खात्री झाली.

याव्यतिरिक्त, या स्पर्धा, गुणवत्ता हेरण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करत आहेत. खेलो इंडिया व्यवस्थे अंतर्गत पुढील प्रशिक्षण आणि विकासासाठी उत्तम कामगिरी बजावू शकतील असे खेळाडू शोधण्यासाठी एक समर्पित 'टॅलेंट आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट कमिटी' (टी आय डी सी) ही गुणवत्ता पारख आणि विकास समिती  तैनात करण्यात आली आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि रचना

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 चा एकूण कालावधी  दहा दिवसांचा आहे. स्पर्धा सुरळीत आणि कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी स्पर्धांचे आयोजन, वेगवेगळ्या ठिकाणी केले आहे. वेळापत्रक असे आखले आहे की अनेक खेळांच्या स्पर्धा एकाच वेळी चालू राहतील आणि खेळाडूंना भाग घेण्यासाठी तसेच पुढे जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

25 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धांचा जोम आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी म्हणून दररोज नवे सामने, नव्या प्रेरणादायी कथा आणि नवे विजेते समोर येतात. हा केवळ घडामोडींचा मेळ नसून, खेळाडू, स्थानिक समुदाय आणि प्रेक्षक यांना एकत्र आणणारा एक सामूहिक अनुभव निर्माण करण्याचा यामागचा हेतू आहे.

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 चे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले जात आहे, जेणेकरून देशभरातील लोकांना हे क्षण अनुभवता येतील आणि आदिवासी तरुणाईमधील जिद्द आणि प्रतिभेचे कौतुक करता येईल.

 

क्रीडासुविधांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप

सिद्ध झालेला मार्ग: खेलो इंडिया अंतर्गत पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता विकास

सुविधांचा विस्तार: खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा पायाभूत सुविधा

देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत क्रीडा पायाभूत सुविधांचा लक्षणीय विस्तार झाला असून आतापर्यंत एकूण 344 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी एकूण 3,158.15 कोटी रुपयांचा आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यापैकी 2,730.95 कोटी रुपये आधीच वितरित झाले आहेत. यावरुन, अंमलबजावणीतील सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते.

निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमध्ये विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश आहे:

  • 126 बहुउद्देशीय क्रीडागृह

  • 64 ॲथलेटिक ट्रॅक

  • 25 फुटबॉल मैदाने

  • 29 हॉकी मैदाने

  • 16 जलतरण तलाव

  • 84 इतर क्रीडा सुविधा

पायाभूत सुविधांचे हे वाढते जाळे, दर्जेदार क्रीडा सुविधा पारंपरिक केंद्रांपुरत्या मर्यादित न राहता अधिक ठिकाणी पोहोचवत आहे आणि त्यामुळे संघटित खेळ, स्थानिक समुदायांच्या अधिक जवळून उपलब्ध होत आहेत. छत्तीसगड आणि इतर आदिवासी भागांमध्ये होत असलेली ही गुंतवणूक एक मजबूत पाया तयार करत आहे, ज्यावर खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धांसारखे उपक्रम उभे राहू शकतात. हे उपक्रम पायाभूत सुविधा, खेळातील सहभाग आणि दीर्घकालीन प्रतिभा विकास यांना एकमेकांशी जोडतात.

गुणवत्तेकडून यशप्राप्तीकडे: खेलो इंडिया अंतर्गत खेळाडूंची जडणघडण

खेलो इंडिया कार्यक्रम, तळागाळातील गुणवत्ता शोधत आहे आणि विविध क्रीडाप्रकारांमधील खेळाडूंना उच्च स्तरावरील स्पर्धांमधील सहभागासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी पाठबळ देत आहे. खेलो इंडिया केंद्रांमधून (KICs) समोर येणारी यशाची उदाहरणे देशातील गुणवत्तेची विविधता आणि खोली दर्शवतात.

ॲथलेटिक्समध्ये उत्तर प्रदेशच्या गुंजनने 100 मीटर (20 वर्षाखालील गटात) शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, तर उत्तर प्रदेशच्याच संगीताने राज्य भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सांघिक खेळांमध्ये बिहारच्या खुशी कुमारीने राष्ट्रीय कुमार अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. हे यश,  अपारंपरिक क्रीडा क्षेत्रांमधील गुणवत्ता पुढे येत असल्याचे द्योतक आहे.

जम्मू-काश्मीरमधील त्रिझा बलाल हिच्या नेतृत्वाखालील कसरतपटूंनी (जिम्नॅस्ट्स) राष्ट्रीय कुमार तालबद्ध कसरत अजिंक्यपद स्पर्धेत (रिदमिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप) वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. कबड्डीमध्ये शाहिद जहूर आणि नाझिया लतीफ (जम्मू-काश्मीर) यांसारख्या खेळाडूंची, राष्ट्रीय कुमार अजिंक्यपद स्पर्धेसाठी (सब-ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप) निवड झाली. ही बाब, दुर्गम भागातील वाढत्या प्रतिनिधित्वाचे निदर्शक आहे.

केरळमध्ये अहनाफ पीके (मुष्टी युद्ध) आणि हरिनंदन पीए (जलतरण) यांसारख्या खेळाडूंनी राज्यस्तरीय सुवर्णपदके पटकावत, राष्ट्रीय सहभाग निश्चित केला, तर पंजाबच्या ब्रमजोत कौरसारख्या खेळाडूंनी ॲथलेटिक्स स्पर्धाप्रकारांमध्ये पदके मिळवली.

ॲथलेटिक्स आणि मुष्टीयुद्धापासून कबड्डी, जिम्नॅस्टिक्स आणि रग्बीपर्यंत—हे यश एक स्पष्ट बदल दर्शवते. लहान शहरांतील आणि उपेक्षित भागातील खेळाडू आता स्थानिक व्यासपीठावरून राष्ट्रीय स्पर्धेकडे वाटचाल करत आहेत.

या संदर्भात, खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा, हा मार्ग अधिक मजबूत करत आहेत आणि आदिवासी समुदायांमधील गुणवत्ता हेरण्यासाठी आणि त्यांना व्यापक क्रीडा व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी एक केंद्रित व्यासपीठ निर्माण करत आहेत.

निर्माण झालेली गती पुढे चालू ठेवणे 

आदिवासी समुदायांसाठी समर्पित असलेला हा पहिला राष्ट्रीय बहु-क्रीडा कार्यक्रम केवळ विजेते निर्माण करण्यापेक्षा काहीतरी अधिक असे सखोल कार्य करत आहे. हे उपक्रम खेळाडूंना सहभागी होण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मुक्तपणे संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्यामुळे तरुण खेळाडूंना,  आपल्या कौशल्याची ओळख होऊन त्याला योग्य महत्त्व मिळेल, असे वातावरण अनुभवण्याची संधी मिळते.

येथून पुढचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. या स्पर्धा उदयोन्मुख गुणवत्ता पारखण्यासाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी आखल्या गेल्या आहेत. प्रशिक्षक, तांत्रिक तज्ञ आणि टॅलेंट स्काउट्स उपलब्ध असल्यामुळे दर्जेदार कामगिरी बजावू शकणाऱ्या खेळाडूंना पुढील प्रशिक्षणाच्या संधी मिळतात. त्यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रांमधील संधींसह शिस्तबद्ध प्रशिक्षण मार्गांकडे वळता येऊ शकते. अनेकांसाठी ही त्यांच्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात ठरते.

हे मार्ग अधिक मजबूत होत गेल्यावर, खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धांचा परिणाम फक्त पदकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन संधींमध्येसुद्धा दिसून येईल. ज्या ठिकाणी पूर्वी व्यवस्थित आयोजित खेळांची संधी कमी होती, तिथे आता नवीन उदाहरणे घडत आहेत. सहभागी झाल्यामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वासामुळे यशाच्या मोठ्या संधी निर्माण होतात.

References

Press Information Bureau

Ministry of Youth Affairs and Sports

Others

Khelo India Tribal Games

***

नेहा कुलकर्णी / राज दळेकर /  आशुतोष सावे

(Explainer ID: 157964) आगंतुक पटल : 40
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Marathi , हिन्दी , Bengali
National Portal Of India
STQC Certificate