Technology
इंडिया एआय स्टॅकः विद्वत्तेचे व्यापक स्तरावर सक्षमीकरण
डेटा आणि संगणनाचे वास्तविक जगातील प्रभावात रूपांतर
Posted On:
04 FEB 2026 4:12PM
प्रस्तावना
भारतातील तंत्रज्ञानाचे भविष्य एका साध्या पण शक्तिशाली विचाराने प्रेरित आहे आणि तो विचार आहे ‘एआय’ चे लोकशाहीकरण. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) केवळ काही कंपन्या, संस्था किंवा देशांपुरती मर्यादित राहू नये. त्याऐवजी, तिचा विकास आणि वापर अशा प्रकारे झाला पाहिजे की ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होईल आणि जो सार्वजनिक कल्याण तसेच सामूहिक हितासाठी पूरक ठरेल. 'मानवतेसाठी ‘एआय’ ही संकल्पना मानवाला तांत्रिक प्रगतीच्या केंद्रस्थानी ठेवते; ज्यामुळे नवोन्मेष समाजाची सेवा करेल मात्र, समाज तंत्रज्ञानाचा गुलाम होणार नाही.
हा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी एआयने मोठ्या प्रमाणावर विश्वसनीयपणे कार्य करणे आणि आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, वित्त आणि सार्वजनिक सेवांमध्ये दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा लोकसंख्या-स्तरावरील परिणाम एका भक्कम आणि एकात्मिक एआय स्टॅकमुळेच शक्य होतो, जो एआय ॲप्लिकेशन्स प्रभावीपणे तयार करण्यासाठी, तैनात करण्यासाठी आणि चालवण्यासाठी आवश्यक असलेली साधने, प्रणाली आणि पायाभूत सुविधा एकत्र आणतो.
एआय स्टॅक: उपयोजन आणि विस्तार सक्षम करणारे स्तर

एआय स्टॅक हा साधनांचा आणि प्रणालींचा असा एक संपूर्ण संच आहे जो एआय ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी आणि चालवण्यासाठी एकत्रितपणे काम करतो. या ॲप्लिकेशन्सची व्याप्ती सिरी आणि अलेक्सा सारख्या दैनंदिन आभासी साहाय्यकांपासून (Virtual Assistants), तसेच नेटफ्लिक्स आणि स्पॉटिफाय सारख्या प्लॅटफॉर्मवरील वैयक्तिक शिफारसींपासून ते आरोग्य क्षेत्रातील निदाने, वित्तीय फसवणूक शोधणे आणि वाहतूक व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या प्रगत प्रणालींपर्यंत आहे. एआय स्टॅक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्लॅटफॉर्म्सना एकत्र आणतो, ज्यामुळे डेटा गोळा करणे, एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करणे आणि त्यांचा प्रत्यक्ष जीवनात वापर करणे सोपे होते; तसेच एआय सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरळीतपणे कार्य करेल याची खात्री मिळते.
एआय स्टॅक हा पाच स्तरांनी बनलेला असतो आणि प्रत्येक स्तर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. लोक रोज वापरत असलेल्या ऍप्सपासून ते पडद्यामागे काम करणारा डेटा, संगणकीय शक्ती, नेटवर्क्स आणि ऊर्जा येथपर्यंत, एआय स्टॅक कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रत्यक्ष जगात कार्यरत करतो. एआय सोल्युशन्स विस्तारक्षम, विश्वसनीय आणि लोकसंख्या-स्तरावर प्रभाव पाडण्यास सक्षम आहेत, हे सर्व स्तर एकत्रितपणे सुनिश्चित करतात.
- उपयोजन स्तर
उपयोजन स्तर हा एआय स्टॅकचा वापरकर्त्याशी थेट संवाद साधणारा घटक आहे. यामध्ये एआय-आधारित ॲप्स आणि सेवांचा समावेश होतो, जसे की आरोग्य निदान साधने, शेतीविषयक सल्ला देणारे प्लॅटफॉर्म, चॅटबॉट्स आणि भाषांतर उपयोजन. हा स्तर एआयच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांचे रूपांतर साध्या, वापरकर्ता-स्नेही सेवांमध्ये करतो, ज्याचा वापर लोक सहजपणे करू शकतात.
|
उच्च-प्रभाव उपयोजनांच्या माध्यमातून भारतात एआयचा स्वीकार
- भारतीय स्टार्टअप्स स्थानिक भाषा, संदर्भ आणि क्षेत्र-विशिष्ट गरजांनुसार तयार केलेली एआय उपयोजना विकसित करत आहेत, ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने होत आहे.
- कृषी क्षेत्रात, एआय-आधारित सल्लागार साधने पेरणीचे निर्णय, पिकांचे उत्पादन आणि निविष्ठा कार्यक्षमता सुधारत आहेत. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या निवडक राज्य-स्तरीय उपयोजनांमध्ये उत्पादकतेत 30-50% पर्यंत वाढ झाल्याची नोंद आहे.
- आरोग्यसेवेत, एआय उपयोजन क्षयरोग, कर्करोग, मज्जासंस्थेचे विकार आणि इतर आजारांचे लवकर निदान करण्यास सक्षम करत आहेत, ज्यामुळे प्रतिबंधात्मक आणि निदानात्मक काळजी अधिक बळकट होत आहे.
- शिक्षण क्षेत्रात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सीबीएसई अभ्यासक्रम, 'दीक्षा' प्लॅटफॉर्म आणि 'युवाएआय' सारख्या उपक्रमांद्वारे एआय शिक्षणाचे एकत्रीकरण केले जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना एआय चे व्यावहारिक कौशल्य मिळत आहे.
- न्यायदानात, ई-कोर्ट टप्पा III मध्ये भाषांतर, खटला व्यवस्थापन, वेळापत्रक आणि नागरिक-केंद्रीत सेवांसाठी एआय आणि मशीन लर्निंगचा वापर केला जात आहे, ज्यामुळे प्रादेशिक भाषेतील उपलब्धतेद्वारे कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारत आहे.
- हवामान आणि आपत्ती व्यवस्थापनात, भारतीय हवामान शास्त्र विभाग प्रगत अंदाजासाठी एआय चा वापर करत आहे. 'मौसम जीपीटी' सारखी साधने शेतकरी आणि आपत्ती निवारण दलांना मदत करत आहेत.
|
- थोडक्यात सांगायचे तर, एआय मधील प्रगत क्षमतांचे रूपांतर सुलभ आणि वापरकर्ता-केंद्रीत सेवांमध्ये करून, उपयोजन स्तर हाच खऱ्या अर्थाने त्याचे मूल्य सिद्ध करतो. जेव्हा प्राधान्य दिलेल्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जातो, तेव्हा एआय केवळ प्रयोगांच्या पलीकडे जाऊन दैनंदिन निर्णय प्रक्रिया आणि सेवा वितरणाचा एक अविभाज्य भाग बनतो. हा व्यापक स्वीकारच अखेरीस एआयचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव निश्चित करतो.
एआय उपयोजन(ऍप्स) स्वीकारण्यातील सर्वसाधारण कल
ज्याप्रमाणे इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा व्यापक स्वीकार झाला, त्याचप्रमाणे एआय उपयोजनांचा(ऍप्स) मोठ्या प्रमाणावर स्वीकार केल्यास त्याचे क्रांतिकारी परिणाम दिसून येतात. कृषी, आरोग्यसेवा, शिक्षण, उत्पादन, वाहतूक, शासन आणि हवामान कृती यांसह विविध क्षेत्रांमध्ये एआय ऍप्स वाढत्या प्रमाणात तैनात केली जात आहेत. भारत 'एआय डिफ्यूजन' धोरणाचा अवलंब करत असून, लोकसंख्या-स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये एआयचा लाभ घेत आहे. देशभर, एआय-सक्षम ऍप्स शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करत आहेत, डॉक्टरांना रोगांचे लवकर निदान करण्यास साहाय्य करत आहेत आणि सार्वजनिक सेवा वितरणाची कार्यक्षमता वाढवत आहेत. शिवाय, प्रत्यक्ष जीवनातील उपयोगांना आणि मोठ्या प्रमाणावरील स्वीकाराला प्राधान्य देऊन, उपयोजन स्तर हे सुनिश्चित करतो की एआयचे ठोस फायदे मिळतील आणि नागरिकांचे जीवन थेट सुधारेल.

- एआय मॉडेल स्तर
हा स्तर एआय प्रणालीचा 'मेंदू' म्हणून काम करतो. एआय मॉडेल्सना डेटावर आधारित नमुने ओळखण्यासाठी, भाकीत करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. उदाहरणार्थ, हे मॉडेल्स क्ष-किरणांमधून (X-rays) आजार शोधण्यात, पिकांच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात, भाषांचे भाषांतर करण्यात किंवा चॅटबॉट्सच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करतात. हे मॉडेल्स उपयोजनांना (Applications) बुद्धिमत्ता प्रदान करतात, ज्यामुळे ते वापरकर्त्यांना अर्थपूर्ण आणि एआय-सक्षम परिणाम देऊ शकतात.
|
भारतातील एआय मॉडेल स्तराचा विकास
- भारतएआय मिशन अंतर्गत, भारताच्या विशिष्ट गरजा आणि उपयोगांसाठी 12 स्वदेशी एआय मॉडेल्स विकसित केली जात आहेत.
- सार्वभौम मॉडेल विकासाला पाठबळ देण्यासाठी, स्टार्टअप्सना सवलतीच्या दरात संगणकीय उपलब्धता दिली जाते. यामध्ये अनुदाने आणि इक्विटीच्या माध्यमातून संगणकीय खर्चाच्या 25% पर्यंत आर्थिक मदत केली जाते, ज्यामुळे या क्षेत्रातील प्रवेशाचे अडथळे कमी होतात आणि देशांतर्गत नवोन्मेषांना गती मिळते.
- भारतजेन संशोधन, स्टार्टअप्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपयोजनांना(ऍप्सना) पाठबळ देण्यासाठी अब्जावधी ते ट्रिलियन पॅरामीटर्सपर्यंतची भारत-केंद्रीत 'फाउंडेशन' आणि 'मल्टीमोडल' मॉडेल्स विकसित करत आहे.
- भारत एआयकोश डेटासेट्स, मॉडेल्स आणि साधनांसाठी एक राष्ट्रीय भांडार (Repository) म्हणून काम करतो; डिसेंबर 2025 पर्यंत, यामध्ये 20 क्षेत्रांतील 54 संस्थांच्या योगदानासह 5,722 डेटासेट्स आणि 251 एआय मॉडेल्स उपलब्ध आहेत.
- भारतीय स्टार्टअप्स भारतीय भाषा, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सेवा वितरणाशी सुसंगत असे संपूर्ण एआय स्टॅक आणि क्षेत्र-विशिष्ट एआय मॉडेल्स विकसित करत आहेत. उदाहरणार्थ:
- सर्वम एआय (Sarvam AI) भारतीय भाषांसाठी 'लार्ज लँग्वेज' आणि 'स्पीच' मॉडेल्स विकसित करत आहे, जे व्हॉईस इंटरफेस, दस्तऐवज प्रक्रिया आणि नागरिक सेवांना पाठबळ देतील.
- राष्ट्रीय भाषांतर मिशन अंतर्गत भाषिणी, 350 हून अधिक एआय मॉडेल्सचे यजमानपद भूषवते. यामध्ये उच्चार ओळख (Speech recognition), मशिन भाषांतर, मजकूर-ते-ध्वनी (Text-to-speech), ओसीआर आणि भाषा ओळख यांसारख्या सुविधांचा समावेश आहे, ज्यामुळे डिजिटल सेवांमध्ये बहुभाषिक उपलब्धता अधिक बळकट होत आहे.
|
एआय मॉडेल स्तर हा मुख्य बुद्धिमत्ता (Core Intelligence) आहे, जो ऍप्लिकेशन्स प्रत्यक्ष जगातील गरजा किती प्रभावीपणे समजून घेऊ शकतात, भाकीत करू शकतात आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकतात हे निश्चित करतो. सार्वभौम, भारत-केंद्रीत मॉडेल्स आणि सामायिक भांडारे विकसित करून, हा स्तर हे सुनिश्चित करतो की एआय क्षमता सुसंगत, विश्वासार्ह आणि स्थानिक भाषा व प्राधान्यांशी जुळणाऱ्या आहेत. हा पाया भक्कम केल्यामुळे बाह्य मॉडेल परिसंस्थेवरील अवलंबित्व कमी होते आणि मोठ्या प्रमाणावरील नवकल्पनांना वाव मिळतो.
एआय मॉडेल स्वीकारण्यातील सर्वसाधारण कल

एआय मॉडेल्समधील सुरुवातीची प्रगती ही मोठ्या प्रमाणावर संगणकीय शक्ती उपलब्ध असलेल्या काही तंत्रज्ञान अग्रणींपुरती मर्यादित होती. परंतु, ओपन-सोर्स मॉडेल्सच्या उदयामुळे या क्षेत्रातील प्रवेशाचे अडथळे कमी झाले आहेत, खर्च कमी झाला आहे, पारदर्शकता सुधारली आहे आणि विविध भाषा व संदर्भांनुसार स्थानिकीकरण करणे शक्य झाले आहे. या बदलाचा आधार घेत, भारत एक सार्वभौम, सर्वसमावेशक आणि उपयोजन-केंद्रीत एआय मॉडेल परिसंस्था विकसित करत आहे. ही परिसंस्था प्रामुख्याने सार्वजनिक सेवा, आरोग्यसेवा, कृषी आणि प्रशासन यांसारख्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांवर आणि लोकसंख्या-स्तरावरील गरजांवर लक्ष केंद्रीत करते. स्थानिक भाषा, नियामक कायदे (Regulatory Frameworks) आणि सांस्कृतिक विविधतेशी सुसंगत राहून, भारत तांत्रिक स्वावलंबन बळकट करत आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष परिणाम साधत आहे.
- संगणन स्तर
हा एआय प्रणालीचे 'स्नायू' म्हणून काम करतो; एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी आवश्यक असलेली संगणकीय शक्ती हा स्तर प्रदान करतो. प्रशिक्षणादरम्यान (Training), कंप्यूट प्रचंड प्रमाणात डेटावर प्रक्रिया करतो, ज्यामुळे मॉडेल शिकू शकते आणि स्वतःमध्ये सुधारणा करू शकते. आज, ही शक्ती एनव्हिडियाचा (NVIDIA) 'ब्लॅकवेल ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट' (GPU), गुगलचा 'टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स' (TPUs) आणि 'न्यूरल प्रोसेसिंग युनिट्स' (NPUs) यांसारख्या प्रगत प्रोसेसिंग चिप्समधून मिळते, ज्यामुळे एआय प्रणाली कार्यक्षमतेने आणि मोठ्या प्रमाणावर काम करू शकतात.
|
'इंडिया एआय मिशन' अंतर्गत पाच वर्षांच्या काला 10,300 कोटींहून अधिक निधीचे वाटप करण्यात आले आहे.
- 'इंडिया एआय कॉम्प्युट पोर्टल' हे 'Compute-as-a-Service' (सेवा-म्हणून-संगणन) या मॉडेलवर कार्यरत आहे. हे पोर्टल 38,000 GPUs आणि 1,050 TPUs यांचा क्लाउड-आधारित सामायिक वापर 100 रुपयांपेक्षा कमी अशा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देते; परिणामी स्टार्टअप्स आणि लहान संस्थांसाठी या क्षेत्रात प्रवेश करण्यातील अडथळे लक्षणीयरित्या कमी होतात.
- सार्वभौम आणि धोरणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगांसाठी, 3,000 पुढील पिढीच्या GPUs असलेला एक सुरक्षित राष्ट्रीय GPU क्लस्टर उभारला जात आहे.
- 76,000 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीतून राबवल्या जाणाऱ्या 'इंडिया सेमी कण्डक्टर मिशन' अंतर्गत, चिप निर्मिती आणि पॅकेजिंग युनिट्ससह एकूण 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
- 'शक्ती प्रोसेसर' आणि 'वेगा प्रोसेसर’ यासारखे स्वदेशी चिप डिझाइन उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता हार्डवेअर क्षेत्रातील भारताच्या देशांतर्गत क्षमतांना बळकटी देत आहेत.
- भारत सध्या विशेष उद्देशासाठी तयार केलेल्या एआय चिप्स विकसित करत असून, आपल्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला अधिक बळकट करत आहे; यामध्ये 'फॅब्ज' आणि 'एटीएमपी' युनिट्ससह 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांचा समावेश आहे.
- 'राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन’ ने IITs, IISERs आणि विविध राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये 40 पेटा फ्लॉप्सपेक्षा अधिक संगणकीय क्षमता कार्यान्वित केली आहे.
- 'परम सिद्धी - एआय' आणि 'ऐरावत' यांसारख्या प्रमुख सुपरकंप्युटिंग प्रणालीमुळे 'नैसर्गिक भाषा प्रक्रिया', हवामानाचा अंदाज आणि औषध संशोधन यांसारख्या विविध उपयोगांसाठी एआय-अनुकूलित सुपरकंप्युटिंग सेवा उपलब्ध करून देतात.
|
एआय नवोन्मेषाचे प्रमाण, वेग आणि प्रगती निश्चित करणारा संगणकीय स्तर हा एक महत्त्वाचा घटक आहे. उच्च-कार्यक्षमता असलेल्या संगणकीय उपकरणांमध्ये सामायिक, परवडणारी प्रवेश क्षमता वाढवून आणि त्याच वेळी देशांतर्गत चिप आणि सुपरकॉम्प्युटिंग क्षमतांना बळकटी देऊन, भारत एआय विकासातील संरचनात्मक अडथळे कमी करत आहे. या दृष्टिकोनामुळे संगणकीय शक्ती काही मोजक्या कंपन्या किंवा संस्थांकडे केंद्रीत न राहता संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि सार्वजनिक संस्थांमध्ये व्यापक नव्वद मिशाला चालना मिळत आहे.
एआय संगणकीय वापरातील सर्वसाधारण प्रवृत्ती
उच्च-दर्जाच्या एआय संगणकीय साधनांपर्यंत प्रवेश हा मुख्यत्वे अधिक खर्च तसेच प्रगत हार्डवेअर तंत्रज्ञान काही कंपन्या आणि देशांची मक्तेदारी झाल्यामुळे मर्यादित राहिला आहे, त्यामुळे लहान कंपन्या आणि नऊ उद्योजकांचा सहभाग मर्यादित झाला आहे. याउलट, भारत इंडिया एआय मिशन अंतर्गत सरकार-समर्थित क्लाउड पायाभूत सुविधांद्वारे परवडणारा आणि सामायिक संगणकीय प्रवेश वाढवत आहे. इंडिया एआय कम्प्युट पोर्टल द्वारे 38,000 हून अधिक GPU आणि 1,050 TPUs यांचा वापर उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी अनुदानित दर तासाला 100 रुपयांपेक्षा कमी आहे तर जागतिक स्तरावर हा दर 200 रुपयांपेक्षा जास्त असतो. क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्म, राष्ट्रीय मोहिमा आणि सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांना एकत्र करून तसेच देशांतर्गत चिप डिझाइन, सेमीकंडक्टर उत्पादन आणि सुपरकॉम्प्युटिंग क्षमता निर्माण करण्याच्या प्रयत्नाद्वारे भारत प्रवेश अडथळे कमी करत आहे. यामुळे दीर्घकालीन स्वावलंबन बळकट होत असेल संगणकीय उपलब्धतेमुळे कोणतीही अडचण न येता कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष विविध क्षेत्रांमध्ये पसरू शकतो याची खात्री करत आहे.
- डेटा सेंटर्स आणि नेटवर्क पायाभूत सुविधा स्तर
हा स्तर कृत्रिम बुद्धिमत्तेचे घर आणि महामार्ग मानला जातो. डेटा सेंटर्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली साठवल्या जातात आणि चालवल्या जातात. तर इंटरनेट, ब्रॉडबँड आणि 5G सारख्या नेटवर्क द्वारे वापरकर्ते, संगणक आणि एआय मॉडेल्समध्ये डेटा प्रवाहित केला जातो. हे दोन्ही घटक एकत्रितपणे एआय प्रणाली विश्वसनीयरित्या, जलद कार्य करते आणि वापरकर्त्यांसाठी सर्वत्र उपलब्ध राहतील याची खात्री करतात. मजबूत नेटवर्क्स आणि डेटा सेंटर्सशिवाय, एआय ॲप कार्य करणार नाहीत किंवा मोठ्या प्रमाणावर विस्तार करू शकणार नाहीत.
|
भारतात डेटा सेंटर्स आणि नेटवर्क पायाभूत सुविधा
- क्लाउड आणि एआय सेवांसाठी हाय-स्पीड डेटा वहनाला मदत करणारे राष्ट्रव्यापी ऑप्टिकल फायबर नेटवर्क.
- देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आल्या असून देशातील 99.9% जिल्ह्यांमध्ये त्या उपलब्ध आहेत. लोकसंख्येच्या सुमारे 85% भागापर्यंत त्याचे कव्हरेज पोहोचलेले आहे.
- जागतिक डेटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 3% क्षमता भारताकडे आहे. सध्या भारताकडे सुमारे 960 मेगावॅट स्थापित डेटा सेंटर क्षमता आहे. शिवाय, वाढत्या एआय आणि क्लाउड वर्कलोडमुळे 2030 पर्यंत ही क्षमता झपाट्याने वाढून 9.2 गिगावॅटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
- मुंबई–नवी मुंबई हे भारतातील सर्वात मोठे डेटा सेंटर हब असून, देशाच्या एकूण क्षमतेपैकी 25 टक्क्यांहून अधिक वाटा या क्षेत्राचा आहे. बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, पुणे आणि कोलकाता ही इतर प्रमुख डेटा सेंटर केंद्रे आहेत.
- कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी जागतिक स्तरावरील नामांकित तंत्रज्ञान कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत; यामुळे देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. या संदर्भातील काही प्रमुख गुंतवणुकीच्या घोषणांमध्ये मायक्रोसॉफ्टची डेटा सेंटर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक; ॲमेझॉनची 2030 पर्यंत क्लाउड पायाभूत सुविधा आणि एआय-आधारित डिजिटलीकरणसाठी 2.9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक; तसेच गुगलची विशाखापट्टणम (वैजाग) येथे 1GW क्षमतेचे एआय केंद्र उभारण्यासाठी 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक यांचा समावेश आहे.
|
डेटा सेंटर्स आणि नेटवर्क पायाभूत सुविधा स्तर हा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली मोठ्या प्रमाणावर आणि रियल टाईम मध्ये कार्य करण्यासाठी आवश्यक असलेला मूलभूत कडा प्रदान करतो. कनेक्टिव्हिटी मजबूत करून आणि देशांतर्गत डेटा सेंटर क्षमता वाढवून, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा विश्वसनीय, प्रतिसादात्मक आणि व्यापकपणे प्रवेशयोग्य राहतील याची खात्री करत आहे. या एकात्मिक दृष्टिकोनामुळे विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षित आणि विस्तारक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता अवलंब शक्य होतो आणि डिजिटल क्षमता राष्ट्रीय परिसंस्थेमध्ये धूळपणे रुजवली जाते.
कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा विकासातील सर्वसाधारण प्रवृत्ती
पायाभूत सुविधा स्तर हा कृत्रिम बुद्धिमत्ता तैनातीचा कणा आहे. जगभरातील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या उच्च-क्षमता डेटा सेंटर्स आणि हाय-स्पीड नेटवर्क्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. भारत डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि देशांतर्गत डेटा सेंटर पायाभूत सुविधांच्या व्यापक विकास करुन हा पाया मजबूत करत आहे. जागतिक आणि भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स, डेटा आणि नवोन्मेष प्रणाली देशातच निर्माण होत आहेत याची खात्री करण्यास मदत करत आहे. कनेक्टिव्हिटी सुधारून, डेटा सेंटर क्षमता वाढवून आणि डिजिटल पायाभूत सुविधा राष्ट्रीय अधिकारक्षेत्रात ठेवून, भारत सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्यासाठी एक लवचिक आणि विस्तारक्षम वातावरण तयार करत आहे.
- ऊर्जा स्तर
हा स्तर संपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला कार्यरत ठेवतो. एआय डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणात वीज वापरतात कारण एआय सिस्टम्सना प्रशिक्षित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी शक्तिशाली संगणकांची आवश्यकता असते. तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम होत असतानाही, एआयसाठी अजूनही स्थिर आणि विश्वासार्ह वीज पुरवठ्याची आवश्यकता आहे. एआय पायाभूत सुविधांच्या शाश्वत वाढीसाठी स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा आवश्यक आहे.
|
भारतात परवडणारी, सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जा
- भारताने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 242.49 गिगावॅट इतकी विक्रमी कमाल वीज मागणी पूर्ण केली, राष्ट्रीय ऊर्जेची कमतरता केवळ 0.03% इतका कमी झाली. त्यामुळे एआय डेटा सेंटर्स आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या संगणकीय सुविधांसाठी अखंड वीज पुरवठा सुनिश्चित झाला.
- एकूण स्थापित वीज क्षमता 509.7 गिगावॅटपर्यंत पोहोचली (नोव्हेंबर 2025 पर्यंत) आहे, ज्यामुळे ऊर्जा-केंद्रीत एआय वर्कलोड्सना आधार देण्यासाठी आवश्यक प्रमाणात वीज उपलब्ध झाली.
- गैर-जिवाश्म इंधन स्त्रोतांचा वाटा 256.09 गिगावॅट आहे म्हणजेच एकूण स्थापित क्षमतेच्या 51% पेक्षा अधिक आहे. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांच्या वाढीला शाश्वततेची जोड मिळते आणि डेटा सेंटर्सचा कार्बन फूटप्रिंट कमी होतो.
- भारत 2031-32 पर्यंत 57 गिगावॅट क्षमतेचे पंप्ड स्टोरेज प्रकल्प आणि 43,220 मेगावॅट प्रति तास बॅटरी ऊर्जा संचयन प्रणाली उभारण्याची योजना आखत आहे. यामुळे ग्रिडची स्थिरता आणखी वाढेल आणि बदलत्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांसह कार्य करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर्सना आधार मिळेल.
- याव्यतिरिक्त, 'भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती' (शांती) अधिनियमाद्वारे अणुऊर्जेला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्ससाठी स्वच्छ ऊर्जेचा एक स्थिर आणि 24 तास उपलब्ध असलेला स्रोत म्हणून स्थापित करण्यात आले आहे. हा अधिनियम खाजगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करतो आणि 'लहान मॉड्यूलर रिॲक्टर्स' तसेच सूक्ष्म-रिॲक्टर्सच्या उभारणीच्या प्रक्रियेला गती देतो.
|
ऊर्जा स्तर हा संपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या विश्वासार्हतेचा आणि शाश्वतेचा पाया आहे. पुरेसा, परवडणारा आणि वाढत्या प्रमाणात स्वच्छ वीजपुरवठा सुनिश्चित करून, स्थिरतेशी तडजोड न करता भारत ग्रिड ऊर्जा-केंद्रीत कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांचा सिस्टर करत आहे. लवचिक आणि कमी-कार्बन ऊर्जा मिश्रणाकडे होणारे हे संक्रमण दीर्घकालीन कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला समर्थन देते तसेच राष्ट्रीय हवामान आणि शाश्वतता उद्दिष्टांशी तांत्रिक प्रगती संरेखित करते.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जेच्या मागणीतील सर्वसाधारण प्रवृत्ती
एआय आणि डेटा सेंटर्सच्या जलद विस्तारामुळे जागतिक स्तरावर वीज मागणीत लक्षणीय वाढ होत आहे. 2030 पर्यंत जागतिक डेटा सेंटर वीज वापर दुप्पट होण्याचा अंदाज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वर्कलोड वेगाने वाढत असताना वीज वापर दरवर्षी सुमारे 945 TWh पर्यंत पोहोचू शकतो. भारतात, वीज क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन होत असताना ही प्रवृत्ती दिसून येते आहे. देशाची एकूण स्थापित वीज क्षमता 500 GW पेक्षा जास्त झाली आहे, त्यापैकी 51% पेक्षा अधिक क्षमता गैर जीवाश्म इंधन स्रोतामधून येते, जो 2030 च्या लक्ष्यापूर्वी साध्य केलेला एक महत्त्वाचा स्वच्छ ऊर्जा टप्पा आहे. स्वच्छ, परवडणाऱ्या आणि सुरक्षित ऊर्जेचा हा विस्तार ऊर्जा-केंद्रीत, सतत कार्यरत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा-सेंटर वर्कलोड्सना आधार देण्यासाठी ऊर्जा प्रणालीची क्षमता मजबूत करतो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांचा विकास शाश्वत आणि लवचिक ऊर्जा पुरवठ्याशी सुसंगत राहतो.
निष्कर्ष
एक मजबूत एआय स्टॅक तयार करणे हे भारतासाठी केवळ एक तांत्रिक प्राधान्य नसून एक सामाजिक आहे. ॲप्लीकेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स, कंप्यूट, डिजिटल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा यासह प्रत्येक स्तराला बळकट करून, भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण करत आहे आणि त्याचे फायदे देशातील प्रचंड लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. शेती, आरोग्यसेवा, शिक्षण, न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रातील प्रत्यक्ष उपयोगांवर दिलेला भर हे दाखवतो की कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा वितरण, उत्पादकता आणि सार्वजनिक कल्याण थेट सुधारू शकते, तेही समावेशक सार्वभौम आणि राष्ट्रीय प्राधान्याशी सुसंगत पद्धतीने.
परवडणाऱ्या संगणकीय क्षमतेची उपलब्धता, स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकास, सुरक्षित डेटा पायाभूत सुविधा आणि शाश्वत ऊर्जा प्रणाली यांच्या माध्यमातून भारत एक विस्तारक्षम लवचिक आणि भविष्याभिमुख कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था उभारत आहे. हा एकात्मिक दृष्टिकोन सुनिश्चित करतो की कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष खर्च, पायाभूत सुविधा किंवा ऊर्जा उपलब्धतेच्या मर्यादांमुळे सीमित राहणार नाही तसेच दीर्घकालीन स्वावलंबनालाही चालना मिळेल. ‘मानवतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ या दृष्टिकोनावर आधारित, भारताचे एआय स्टॅक तंत्रज्ञानाला समावेशक विकास, सामाजिक समता आणि सर्वांच्या कल्याणासाठीचे साधन म्हणून स्थापित करतो- डिजिटल युगात सर्वांच्या प्रगतीसाठी आणि सर्वांच्या आनंदासाठी मार्ग प्रशस्त करतो.
References:
PIB Headquarters
Ministry of Electronics and Information Technology
Ministry of Science and Technology
Office of the Principal Scientific Adviser to the Government of India
Ministry of Communications:
Ministry of Power:
International Energy Agency:
DD News:
Click here of pdf file.
***
NitinFulluke / ShraddhaMukhedkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 157934)
आगंतुक पटल : 22
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Gujarati
,
English
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam