• Sitemap
  • Advance Search
Infrastructure

आंतर-शहरी प्रवासाची नव्याने व्याख्या: भारतातील हाय- स्पीड रेल्वे कॉरिडॉर

Posted On: 11 FEB 2026 2:11PM

नवी दिल्‍ली, 11 फेब्रुवारी 2026

 

मुख्य मुद्दे

  • हाय- स्पीड रेल्वे ही भारताच्या भविष्यातील प्रवासी रेल्वे व्यवस्थेचा नियोजित भाग असून, निवडक मार्गांवर जलद आणि उच्च क्षमतेची आंतर-शहरी वाहतूक उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
  • केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये सात नवीन हाय- स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबई–अहमदाबाद मार्गापलीकडे विस्तार होण्याचे संकेत मिळतात.
  • मुंबई–अहमदाबाद कॉरिडॉर हा भारतातील पहिला उच्च-गती रेल्वे प्रकल्प असून, भविष्यातील प्रकल्पांसाठी संस्थात्मक आणि तांत्रिक अनुभव प्रदान करतो.
  • हाय- स्पीड रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ कमी होतो, प्रादेशिक संपर्क वाढतो आणि शाश्वत वाहतुकीच्या उद्दिष्टांना चालना मिळते.

 

भारतामधील उच्च-गती रेल्वे: उदयोन्मुख गतिशीलता चौकट

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे प्रणालींपैकी एक असून, प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ती दीर्घकाळापासून एक महत्त्वपूर्ण साधन राहिली आहे. विविध प्रदेशांना जोडून आणि लोक व मालाच्या हालचाली सुलभ करून, तिने आर्थिक क्रियाकलाप, कामगारांची हालचाल आणि बाजारपेठ, शिक्षण व सेवांपर्यंत पोहोच यांना चालना दिली आहे. कालांतराने वाढत्या वाहतूक गरजांनुसार रेल्वे प्रणाली आणि त्याची वहन क्षमता सातत्याने वाढत गेली आहे. अलीकडच्या काळात प्रवासाच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाला आहे. जलद शहरीकरण, वाढती उत्पन्न पातळी, महानगर क्षेत्रांचा विस्तार आणि प्रमुख आर्थिक केंद्रांचा उदय यामुळे लांब पल्ल्याच्या आणि आंतर-शहरी प्रवासात मोठी वाढ झाली आहे.

हा बदल लक्षात घेऊन सरकारने रेल्वे विकासासाठी दीर्घकालीन आणि संरचित दृष्टिकोन स्वीकारला आहे. यामध्ये केवळ क्षमता वाढवण्यावरच नव्हे तर सेवा गुणवत्ता, विश्वासार्हता आणि वेग सुधारण्यावरही भर देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 हा भारताच्या प्राधान्यक्रमांची मांडणी करणारा महत्त्वाचा टप्पा ठरला असून, त्यामध्ये सात उच्च-गती रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे प्रगत रेल्वे प्रणाली आणि कॉरिडॉर-आधारित विकासाकडे भारताचा कल दर्शवितो, जो देशाच्या बदलत्या आंतर-शहरी गतिशीलता चौकटीचा भाग आहे. याचा उद्देश भविष्यासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि प्रवाशांच्या बदलत्या अपेक्षांना पूरक अशा वाहतूक उपाययोजना उपलब्ध करून देणे तसेच सातत्यपूर्ण आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे.

 

हाय- स्पीड रेल्वे: संकल्पना आणि भारतासाठी महत्त्व

हाय-स्पीड रेल्वे म्हणजे पारंपरिक रेल्वेपेक्षा लक्षणीय अधिक वेगाने धावणारी प्रवासी रेल्वे प्रणाली. या प्रणाली सहसा स्वतंत्र मार्गांवर चालतात आणि प्रगत डबे (rolling stock), सिग्नलिंग, संप्रेषण आणि सुरक्षा तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करतात. कार्यान्वयनाच्या दृष्टीने, प्रति तास 250 किमीपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या रेल्वे प्रणालींना हाय-स्पीड रेल्वे असे मानले जाते.

हाय-स्पीड रेल्वे ही पारंपरिक आणि सेमी-हाय-स्पीड सेवांपेक्षा मूलभूतदृष्ट्या वेगळी आहे. पारंपरिक रेल्वे मार्गांवर मालगाड्या आणि कमी वेगाच्या प्रवासी गाड्यांसोबत एकाच मार्गावर चालवल्या जातात. तर हाय-स्पीड रेल्वे स्वतंत्र मार्गांवर चालते, ज्यामुळे अधिक वेग आणि निश्चित वेळापत्रक शक्य होते. हाय-स्पीड रेल्वेसाठी विशेषतः तयार केलेली पायाभूत सुविधा आवश्यक असते.

भारतासाठी हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विशेषतः महत्त्वाचे आहेत, कारण ते मोठ्या शहरांना जोडतात आणि मध्यम ते लांब अंतरांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुलभ करतात. तसेच, हे कॉरिडॉर शाश्वत वाहतूक वाढवणे आणि विद्यमान पायाभूत सुविधांवरील ताण कमी करणे या सरकारच्या व्यापक उद्दिष्टांना देखील पूरक आहेत.

राष्ट्रीय रेल्वे योजना, जी 2030 पर्यंत भारताच्या रेल्वे प्रणालीच्या विकासाचा दीर्घकालीन आराखडा मांडते. त्यात हाय-स्पीड रेल्वेला भविष्यातील प्रवासी रेल्वे प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेनुसार, हाय-स्पीड कॉरिडॉर हे पारंपरिक आणि उपनगरी रेल्वे सेवांना पूरक ठरतील आणि पुढील दशकांत भारताच्या विविध प्रवास गरजा पूर्ण करण्यात मदत करतील.

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मधील हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर

केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठीचा दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित करण्यात आला असून, आधुनिकीकरण, प्रवासी सोय, प्रादेशिक संपर्क आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता यावर भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी ₹2,78,000 कोटींचा विक्रमी भांडवली खर्च निश्चित करण्यात आला आहे, जो या क्षेत्राच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. यामुळे आर्थिक वाढ आणि एकात्मतेसाठी रेल्वे पायाभूत सुविधांना दिलेले धोरणात्मक महत्त्व स्पष्ट होते.

या व्यापक गुंतवणूक आराखड्यांतर्गत, देशभरातील आंतर-शहरी प्रवासाच्या स्वरूपात बदल घडवून आणणारे, उच्च परिणामकारक आणि क्षमता वाढवणारे अनेक प्रकल्प मांडण्यात आले आहेत. यामध्ये प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी हाय- स्पीड कनेक्टिव्हिटीवर विशेष भर देण्यात आला आहे.

या दृष्टीकोनाचा भाग म्हणून, अर्थसंकल्पात सात हाय- स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे कॉरिडॉर प्रमुख शहरे आणि प्रदेशांना जोडणारे विकास दुवे म्हणून काम करतील, लोकांचा प्रवास अधिक सुलभ करतील आणि राज्यांमधील आर्थिक परस्परसंवादाला चालना देतील.

हे कॉरिडॉर मिळून सुमारे 4,000 किलोमीटर अंतर व्यापणार असून, त्यासाठी सुमारे ₹16 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे सरकारच्या हाय- स्पीड रेल्वे कार्यक्रमाची व्यापकता आणि महत्त्वाकांक्षा स्पष्ट होते.

नियोजित हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर देशाच्या विविध भागांमध्ये धोरणात्मक पद्धतीने विकसित केले जाणार आहेत.

उत्तर आणि पूर्व भारत

उत्तर आणि पूर्व भारतातील प्रदेशांमध्ये, ऐतिहासिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमधील संपर्क मजबूत करण्यासाठी हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची संकल्पना मांडण्यात आली आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • दिल्ली ते वाराणसी उच्च-गती कॉरिडॉर, ज्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 3 तास 50 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे दिल्ली आणि महत्त्वाच्या सांस्कृतिक व आर्थिक केंद्रांदरम्यान जलद प्रवास शक्य होईल.
  • वाराणसी–पटना–सिलीगुडी (पश्चिम बंगाल) हाय-स्पीड लिंक, ज्यामुळे सुमारे 2 तास 55 मिनिटांत प्रवास शक्य होण्याची अपेक्षा आहे. यामुळे विविध राज्यांतील महत्त्वाच्या शहरी आणि प्रादेशिक केंद्रांमधील संपर्क सुधारेल.
  • हे कॉरिडॉर शहरी केंद्रे आणि आसपासच्या प्रदेशांमधील संपर्क सुधारून प्रादेशिक एकात्मता वाढवण्यास, आर्थिक क्रियाकलापांना चालना देण्यास आणि गतिशीलता सुधारण्यास मदत करतील.

 

दक्षिण आणि पश्चिम भारत

देशाच्या दक्षिण भागात, हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क “दक्षिण हाय-स्पीड ट्रँगल (South High-Speed Triangle / Diamond)” म्हणून विकसित करण्याची कल्पना आहे, ज्याद्वारे प्रमुख महानगरे आणि आर्थिक केंद्रांना जोडले जाईल. प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • चेन्नई–बंगळुरू हाय-स्पीड कॉरिडॉर, ज्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 1 तास 13 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे दोन प्रमुख औद्योगिक आणि तंत्रज्ञान केंद्रांमधील संपर्क मोठ्या प्रमाणात वाढेल.
  • बंगळुरू–हैदराबाद कॉरिडॉर, ज्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 2 तासांपर्यंत कमी होईल, आणि प्रमुख आर्थिक व आयटी केंद्रांमधील संबंध अधिक मजबूत होतील.
  • चेन्नई–हैदराबाद कॉरिडॉर, ज्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 2 तास 55 मिनिटे होईल, आणि दक्षिण भारतातील प्रादेशिक विकासाला चालना मिळेल.
  • मुंबई–पुणे कॉरिडॉर, ज्यामध्ये प्रवासाचा वेळ सुमारे 48 मिनिटांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे पश्चिम भारतातील दैनंदिन आंतर-शहरी प्रवास सुलभ होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.
  • पुणे–हैदराबाद कॉरिडॉर, ज्यामध्ये प्रवासाचा वेळ सुमारे 1 तास 55 मिनिटे असेल. यामुळे दक्षिणेकडील प्रमुख शहरांशी उच्च-गती जोडणी निर्माण होईल आणि प्रादेशिक संपर्क अधिक सुलभ होईल.
  • एकत्रितपणे, हे कॉरिडॉर महत्त्वाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्रांमधील गतिशीलता सुधारून प्रादेशिक विकासाला चालना देतील.

 

दृष्टीकोन ते अंमलबजावणी: मुंबई–अहमदाबाद उच्च-गती रेल्वे कॉरिडॉर

मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा भारतात हाय-स्पीड रेल्वे प्रणालीच्या प्रारंभासाठी उचललेला पहिला ठोस पाऊल आहे. स्वतंत्र हाय-स्पीड प्रवासी कॉरिडॉर म्हणून संकल्पित हा प्रकल्प, प्रवासी रेल्वे नियोजनामध्ये संरचनात्मक बदल दर्शवतो. या प्रकल्पाद्वारे स्वतंत्र पायाभूत सुविधा, प्रगत रेल्वे प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुरक्षा मानकांचा भारतीय रेल्वे व्यवस्थेत समावेश करण्यात येत आहे, ज्यामुळे देशातील रेल्वे वाहतुकीच्या आधुनिकीकरणाला नवी दिशा मिळत आहे.

कॉरिडॉर प्रोफाइल आणि प्रमुख वैशिष्ट्ये

हा कॉरिडॉर पूर्णतः हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प म्हणून नियोजित असून त्याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  • हा कॉरिडॉर महाराष्ट्रातील मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या आर्थिक व शहरी केंद्रांना जोडतो.
  • एकूण लांबी सुमारे 508 किलोमीटर आहे.
  • हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारची कंपनी असलेल्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) द्वारे राबविण्यात येत आहे.
  • या कॉरिडॉरची रचना 320 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या रेल्वेसाठी करण्यात आली असून, त्यासाठी प्रगत डबे (rolling stock), सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल प्रणालीचा वापर केला जात आहे.

मार्ग, रचना (Alignment) आणि स्थानक नियोजन

मुंबई–अहमदाबाद उच्च-गती रेल्वे कॉरिडॉरचा मार्ग कार्यक्षमतेसह अभियांत्रिकी व शहरी मर्यादा लक्षात घेऊन आखण्यात आला आहे:

  • भूप्रदेश आणि शहरी घनतेनुसार हा कॉरिडॉर उन्नत, भूमिगत (underground) आणि जमिनीवरील (at-grade) अशा मिश्र स्वरूपात तयार केला जात आहे.
  • या मार्गावर एकूण 12 स्थानकांची योजना करण्यात आली आहे.
  • स्थानके मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित केली जात असून, विद्यमान रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीशी एकत्रीकरण सुनिश्चित केले जाईल.

आंतर-शहरी प्रवासात परिवर्तन

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आंतर-शहरी प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे आणि सेवा गुणवत्ता सुधारणा करणे हा आहे:

  • या कॉरिडॉरमुळे मुंबई–अहमदाबाद दरम्यानचा संपूर्ण प्रवास सुमारे 2 तास 7 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
  • हाय स्पीड प्रणालीमुळे पारंपरिक रेल्वे सेवांच्या तुलनेत उच्च कार्यक्षमता, अधिक प्रवासी आराम आणि सुधारित सुरक्षा मानके मिळतील.
  • दीर्घ अंतरावरील प्रवासी वाहतूक स्वतंत्र मार्गावर वळवल्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गांवर अतिरिक्त क्षमता निर्माण होण्यास मदत होईल.

भविष्यातील उच्च-गती रेल्वे कॉरिडॉरसाठी क्षमता निर्मिती

तत्काळ वाहतूक फायद्यांव्यतिरिक्त, मुंबई–अहमदाबाद कॉरिडॉर भारताच्या रेल्वे विकासात व्यापक धोरणात्मक भूमिका बजावतो:

  • या प्रकल्पामुळे भारतात हाय स्पीड रेल्वेसाठी संस्थात्मक, तांत्रिक आणि प्रकल्प व्यवस्थापन क्षमता विकसित झाली आहे.
  • जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय मंजुरी, भागधारक समन्वय आणि तंत्रज्ञान अनुकूलन यांसारख्या क्षेत्रांतील अनुभव भविष्यातील कॉरिडॉरच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प म्हणून हा कॉरिडॉर देशभरात हाय स्पीड रेल्वेच्या टप्प्याटप्प्याने विस्तारासाठी संदर्भ आणि मार्गदर्शक मॉडेल म्हणून कार्य करतो.

 

कॉरिडॉर-आधारित उच्च-गती रेल्वे नेटवर्ककडे वाटचाल

हाय-स्पीड रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या विकासातील पुढील टप्पा मानली जाते, जी दशकांपासून चालू असलेल्या नेटवर्क विस्तार आणि सेवा सुधारण्यावर आधारित आहे. कॉरिडॉर-आधारित विकास आणि दीर्घकालीन नियोजनावर दिलेला भर भविष्यातील प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक धोरणात्मक दृष्टिकोन दर्शवतो. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले सात हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर भारताच्या आर्थिक वाढ, प्रादेशिक एकात्मता आणि शाश्वत विकासासाठी हाय स्पीड रेल्वेचे महत्त्व अधोरेखित करतात. नियोजन आणि अंमलबजावणी पुढे जात असताना, हे कॉरिडॉर देशातील आंतर-शहरी प्रवासात परिवर्तन घडवून आणण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात हाय स्पीड रेल्वेचा यशस्वी विस्तार समन्वित संस्थात्मक प्रयत्न, सक्षम नियोजन प्रक्रिया आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक यावर अवलंबून असेल. अधिकृत धोरणात्मक चौकटींमध्ये आधारलेला आणि समर्पित संस्थांच्या पाठबळाने समर्थित भारताचा हाय स्पीड रेल्वे कार्यक्रम देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

 

संदर्भ

रेल्वे मंत्रालय

अर्थ मंत्रालय

 

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

नितीन फुल्लुके/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

(Explainer ID: 157879) आगंतुक पटल : 11
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Bengali , Gujarati , Kannada , Malayalam
National Portal Of India
STQC Certificate