• Sitemap
  • Advance Search
Technology

भारत सेमीकंडक्टर मिशन 2.0

सेमीकंडक्टर आत्मनिर्भरतेसाठी अर्थसंकल्प 2026 मध्ये मोठी तरतूद

Posted On: 07 FEB 2026 12:56PM

नवी दिल्‍ली, 7 फेब्रुवारी 2026

 

महत्वाचे मुद्दे
  • भारत सेमीकंडक्टर मिशन आयएसएम 2.0 साठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रु 1000 कोटी ची तरतूद
  • डिसेंबर 2025 पर्यंत सहा राज्यांमधील रु 1.60 लाख कोटी खर्चाच्या 10 आयएसएम प्रकल्पांना मंजुरी
  • भारताची सेमिकंडक्टर बाजारपेठ 2030 सालापर्यंत $100-110 अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज

 

प्रस्तावना

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील भारत सेमीकंडक्टर मिशन 2.0 च्या घोषणेतून भारताने तंत्रज्ञानक्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा गाठलेला दिसून येत आहे. सध्या प्रत्येक महत्वाच्या डिजिटल व औद्योगिक यंत्रणेत सेमीकंडक्टर चिप्स हा अत्यावश्यक घटक बनला आहे, अशा वेळी या नवीन टप्प्यात देशांतर्गत चिप उत्पादनाला दिलेले धोरणात्मक पाठबळ स्पष्ट दिसून येते आहे. भारतामध्ये सेमीकंडक्टर उपकरणे व साहित्य उत्पादनावर आयएसएम 2.0 चा भर असून याद्वारे भारतीय सेमीकंडक्टर बौद्धिक संपदा निर्मिती तसेच देशांतर्गत व जागतिक स्तरावरील पुरवठा साखळ्या विकसित होतील. आयएसएम 2.0 साठी आर्थिक वर्ष 2026-27 साठी रु 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून उद्योग क्षेत्राच्या गरजेनुरूप संशोधन केंद्रे व तंत्रज्ञान विकास घडवण्यासाठी तसेच भविष्यातील गरजांसाठी तयार असलेले मनुष्यबळ उभे करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभी करण्यात येतील.

आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स, पॉवरिंग संगणक, मोबाईल उपकरणे, दूरसंचार, वाहने, संरक्षण यंत्रणा व कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सेमीकंडक्टर हा प्रमुख घटक आहे. आयएसएम 1.0 अंतर्गत भारताने याआधीच्या गुंतवणुकीतून सेमीकंडक्टर परिसंस्थेसाठी संपूर्ण मूल्यसाखळी उभी करण्यात मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आरेखन क्षमता वाढली, तसेच फॅब्रिकेशन, असेम्ब्ली व चाचणीच्या पायाभूत सुविधा विकसित झाल्या आहेत. या गतिमान प्रवासामधून आत्मनिर्भर भारताचे भव्य दृष्टिचित्र व भारताची धोरणविकासापासून उत्पादनसज्जतेकडे झालेली प्रगती दिसून येते. जागतिक सेमीकंडक्टर आराखड्यातील एक विश्वासार्ह व स्पर्धात्मक सहभागी म्हणून भारताची भूमिका आयएसएम 2.0 तयार करत आहे.

 

भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था : क्षेत्रीय दृष्टिकोन

जागतिक स्तरावरील सेमीकंडक्टर केंद्र म्हणून भारताचा उदय होत आहे. भारतात होणाऱ्या मोठ्या गुंतवणुकी, वाढणारी उत्पादन क्षमता व सेमिकॉन इंडिया 2025 सारख्या व्यासपीठांमुळे भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासावर जगाचा वाढता विश्वास दिसून येतो आहे. देशांतर्गत चिप बाजारपेठेत वेगाने वाढ होत आहे. उद्योग क्षेत्राच्या अनुमानानुसार भारतीय सेमीकंडक्टर बाजारपेठ 2023 साली 38 अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्याची होती, 2024-25 मध्ये 45 ते 50 अब्ज डॉलर्स मूल्याची होती, आणि 2030 सालापर्यंत तिचे मूल्य 100 ते 110 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे. मेक इन इंडिया व मेक फॉर वर्ल्ड या सारख्या उपक्रमांमुळे हा विकास शक्य झाला असून भारत आता उत्पादक तसेच जागतिक पुरवठादार देखील झाला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने डिसेंबर 2021 मध्ये भारत सेमीकंडक्टर मिशन 1.0 ला मंजुरी दिली त्याचवेळी या प्रगतीचा पाया घातला गेला होता. या मोहिमेला ₹76000 कोटींच्या प्रोत्साहनात्मक तरतुदीचे साहाय्य मिळाले असून त्यामध्ये सिलिकॉन फॅब्स, कंपाऊंड सेमीकंडक्टर सुविधा, असेंब्ली आणि टेस्टिंग युनिट्स आणि चिप डिझाइनसाठी 50 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्याचा समावेश आहे. डिसेंबर 2025 पर्यंत, 6 राज्यांमध्ये एकूण ₹1.60लाख कोटी गुंतवणुकीचे 10 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सिलिकॉन फॅब्रिकेशन युनिट्स, सिलिकॉन कार्बाइड फॅब्स, प्रगत आणि मेमरी पॅकेजिंग सुविधा आणि विशेष असेंब्ली आणि टेस्टिंग पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या सर्व एकत्रित प्रयत्नातून एक लवचिक देशांतर्गत सेमीकंडक्टर परिसंस्था तयार होत आहे.

भारत देशांतर्गत वापरासाठी आवश्यक असलेल्या चिप्स डिझाइन आणि उत्पादन करण्याची जवळजवळ 70-75 टक्के क्षमता 2029 पर्यंत प्राप्त करेल अशी अपेक्षा आहे. यातून पुढे जात, सेमिकॉन 2.0 अंतर्गत पुढील टप्प्यात प्रगत उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. त्यात 3-नॅनोमीटर आणि 2-नॅनोमीटर तंत्रज्ञान नोड्स साध्य करण्यासाठी स्पष्ट नियोजन असेल. भारताने 2035 पर्यंत, जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर उत्पादक राष्ट्रांमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ग्राहकोपयोगी उपकरणे, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, वाहने, दूरसंचार, एरोस्पेस आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या प्रमुख क्षेत्रांच्या वाढत्या चिप गरजा या कंपन्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, अनेक मंजूर प्रकल्पांमध्ये सेमीकंडक्टर चिप्सच्या असेंब्ली, चाचणी आणि पॅकेजिंगसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारताची सखोल तांत्रिक क्षमतेकडे आणि परदेशी प्रणालींवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने वाटचाल यातून दिसून येते. यामुळे जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारताचे स्थान मजबूत होईल.

 

सेमीकंडक्टर कार्यक्रमाचा 2026-27 मध्ये अपेक्षित प्रभाव

जागतिक स्पर्धा वाढत असल्याने आणि मर्यादित संख्येतील उत्पादकांमध्ये प्रगत चिप तंत्रज्ञानाचे केंद्रीकरण होत असल्याने भारताच्या सेमीकंडक्टर कार्यक्रमाचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे. स्थापित सेमीकंडक्टर परिसंस्था असलेले अनेक देश खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सवलती देत आहेत , त्यामुळे भारताला त्याचे धोरण बदलणे आवश्यक झाले आहे. म्हणूनच या सुधारित कार्यक्रमात सेमीकंडक्टर उत्पादन, डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि आरेखन परिसंस्थेतील गुंतवणुकीसाठी आर्थिक पाठबळ मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

भारतातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी सुधारित कार्यक्रमाचा 2026-27 साठी एकूण खर्च ₹8000 कोटी आहे. भांडवली गुंतवणूक वाढवणे, उच्च दर्जाचे रोजगार निर्माण करणे आणि फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि चिप डिझाइनमध्ये देशांतर्गत क्षमतांचा विस्तार करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. वरील आर्थिक वर्षासाठी अपेक्षित फलश्रुती खालीलप्रमाणे आहेत.

 

2026-27 साठी ISM अंतर्गत अपेक्षित उद्दिष्टे 

योजना

मुख्य निर्देशक

अपेक्षित उद्दिष्टे

सेमीकंडक्टर फॅब्ससाठी सुधारित योजना (मदतीची अपेक्षा असलेल्या फॅब्स– 1)

वर्षादरम्यान गुंतवणूक

₹4000 कोटी

 

रोजगारनिर्मिती

1500 व्यक्ती

कंपाउंड सेमीकंडक्टर्स, सिलिकॉन फोटोनिक्स, सेन्सर्स, डिस्क्रीट फॅब्स आणि असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (ATMP)/ आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (OSAT) साठी सुधारित योजना (मदतीची अपेक्षा असलेल्या कंपन्या – 9)

वर्षादरम्यान प्रत्येक कंपनीमागे गुंतवणूक

₹11000 कोटी

 

साहाय्य केलेल्या कंपन्यांद्वारे निर्माण होणारा रोजगार

3000 व्यक्ती

डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना (मदतीची अपेक्षा असलेल्या डिझाइन कंपन्यांसाठी – 30)

पुढीलप्रमाणे सेमीकंडक्टर आयपी कोअर विकसित केले जातील

10

 

सेमीकंडक्टर डिझाइनसाठी वापरलेले मनुष्यबळ

200 व्यक्ती

 

देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी, डिझाइन क्षमता वाढवण्यासाठी आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन या फलश्रुतीमधून दिसून येते. .

 

भारताचे सेमीकंडक्टर मिशन का महत्त्वाचे आहे

आधुनिक अर्थव्यवस्था चालवण्यासाठी सेमीकंडक्टर्सचा वापर आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात क्वचितच दिसत असले तरी, अर्थव्यवस्था चालवणाऱ्या प्रणालींना उर्जा पुरवण्याचे कार्य मायक्रोप्रोसेसर करत असतात. 2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणात अधोरेखित केल्याप्रमाणे, ऊर्जा उत्पादन व वितरण यंत्रणा, वित्तीय बाजारपेठ आणि दूरसंचार यांचा अविभाज्य घटक मायक्रोप्रोसेसर आहेत. उत्पादन केंद्रे , रुग्णालये, वाहतूक व्यवस्था आणि उपग्रहांना ते सक्षम करतात. म्हणूनच, आर्थिक स्थिरता आणि सर्व उत्पादन क्षेत्रांमध्ये सातत्य राखण्यासाठी सेमीकंडक्टर्सचा विश्वासार्ह पुरवठा आवश्यक आहे.

अलिकडे दिसून आलेल्या जागतिक स्तरावरील व्यत्ययांमुळे आपले सेमीकंडक्टर्सवरील हे अवलंबित्व अधोरेखित झाले आहे. कोविड-19 महामारीमुळे सेमीकंडक्टर पुरवठा साखळ्यांमधील गंभीर कमकुवतपणा कळून आला होता. त्या उणिवांमुळे जगभरातील 169 हून अधिक उद्योगांवर विपरीत परिणाम झाला होता. उत्पादनात विलंब आणि वाढत्या खर्चामुळे, देशांमध्ये आर्थिक व्यवहार मंदावले. पुरवठादारांच्या मर्यादित संख्येवर अवलंबून राहण्यातील धोके या धक्क्यांमुळे उघड झाले. सध्या सेमीकंडक्टर उद्योगात तैवान, दक्षिण कोरिया, जपान, चीन आणि अमेरिकेसारख्या काही देशांचे वर्चस्व आहे. एकटा तैवान जगातील 60 टक्क्यांहून अधिक सेमीकंडक्टर आणि जवळजवळ 90 टक्क्यांहून अधिक प्रगत चिप्स तयार करतो. या केंद्रीकरणामुळे कोणतेही बाह्य अडथळे किंवा भू-राजकीय तणाव आल्यास जागतिक पुरवठा साखळ्या बाधित होतात.

याचा सामना करण्यासाठी जगातील प्रमुख अर्थव्यवस्था त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत आहेत. अमेरिका, युरोपियन युनियन, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी देशांतर्गत चिप उत्पादन मजबूत करण्यासाठी आणि पुरवठा साखळी मधील घटकांमध्ये विविधता आणण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम सुरू केले आहेत. भारत या जागतिक बदलांच्या वातावरणात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान मिळवत आहे. भारत सेमीकंडक्टर मिशन याचसाठी कार्यरत आहे. या मिशनमुळे डिझाइन, उत्पादन आणि नवोपक्रमात देशांतर्गत क्षमता निर्माण करून स्वयंपूर्णता आणि तंत्रज्ञान सार्वभौमत्वाच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे. अधिक लवचिक होणाऱ्या जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थे मध्ये भारताची भूमिका मजबूत होत आहे .

तंत्रज्ञानविषयक स्वावलंबनाचा पाया तयार करण्यासाठी या धोरणामधून सेमीकंडक्टर आरेखन आणि या क्षेत्रातील प्रतिभा विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.

 

भारताच्या बहुविध सेमीकंडक्टर डिझाइन व्यवस्थेचे सबलीकरण

डिसेंबर 2021 मध्ये प्रारंभ झाल्यापासून, डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेने, भारतात क्षमता निर्मितीपासून तांत्रिक सखोलतेपर्यंत संक्रमण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.ही योजना देशांतर्गत नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर,कंपन्यांना सुरुवातीच्या टप्प्यात पाठिंबा देण्यावर आणि एका जागृत आणि समृद्ध फॅबलेस पद्धतीने पाया तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. यामुळे शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक अनुप्रयोगांमधील अंतर कमी करण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे डिझाइनींगच्या जागतिक परीप्रेक्षात भारताचे स्थान मजबूत झाले आहे

डीएलआय योजनेअंतर्गत (जानेवारी 2026 पर्यंत) केलेली प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी :

  • हा कार्यक्रम सध्या देशभरातील 24 सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअप्सना समर्थन देतो.
  • या योजनेअंतर्गत स्टार्टअप्सना जवळजवळ 430 कोटी रूपयांचे बीज भांडवल (व्हेंचर कॅपिटल फंडिंग) मिळाले आहे, जे भारताच्या डिझाइन व्यवस्थेवरील गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.
  • राष्ट्रीय चिप डिझाइन प्लॅटफॉर्म, ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन (EDA) ने उच्च दर्जाच्या डिझाइन साधनांची उपलब्धता सक्षम केली आहे, ज्यामध्ये अंदाजे 2.25 कोटी साधन उपयुक्त तासांची नोंद झाली आहे.
  • चिप डिझाइन आणि विकासासाठी,सुमारे 67,000 विद्यार्थी आणि 1,000 हून अधिक स्टार्ट अप अभियंते या साधनांचा सक्रियपणे वापर करत आहेत.
  • शैक्षणिक क्षेत्रात, मोहाली येथील सेमीकंडक्टर प्रयोगशाळेत 180 एनएमवर 56 चिप्स तयार करून 122 डिझाइन्स टेप कार्यरत (आउट) करण्यात आल्या आहेत.
  • स्टार्टअप्सनी 16 टेप कार्यरत (आउट) केले आहेत, ज्यामुळे प्रगत फाउंड्री नोड्सवर सहा चिप्स तयार केल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये 12 एनएम पर्यंतच्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
  • शैक्षणिक संस्थांनी 75 पेटंट दाखल केले आहेत, तर स्टार्टअप्सनी 10 पेटंट दाखल केले आहेत, जे नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा निर्मितीच्या वाढत्या संस्कृतीचे संकेत देते.

पुढील टप्प्यात, किमान 50 फॅबलेस सेमीकंडक्टर कंपन्यांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवून, सेमीकंडक्टर डिझाइन आणि नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळकटी देणारा हा कार्यक्रम, आणखी व्यापक होणार आहे.

 

स्वदेशी मायक्रोप्रोसेसर आणि कोअर सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचा विकास

मायक्रोप्रोसेसर हे आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांचा पायाभूत स्तर निर्माण करतात, तसेच दूरसंचार, गतिशीलता, आरोग्यसेवा, उद्योग, संरक्षण आणि अवकाश या सर्व ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या उपकरणे आणि प्रणालींना वीज पुरवतात. त्यांचे धोरणात्मक महत्त्व ओळखून, भारताने सेमीकंडक्टर स्वावलंबनाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून प्रगत प्रोसेसर डिझाइनमध्ये सार्वभौम क्षमता निर्माण करण्यासाठी लक्ष्यित गुंतवणूक केली आहे.

या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे DHRUV 64 चे प्रक्षेपण हा आहे.हा पूर्णपणे स्वदेशी 64-बिट मायक्रोप्रोसेसर आहे जो मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम (MDP) अंतर्गत C-DAC ने विकसित केला आहे. आधुनिक वास्तुशिल्पीय तत्त्वांवर आधारित, DHRUV 64 सुधारित कार्यक्षमता, बहुविध कार्य करण्याची क्षमता आणि विश्वासार्हता प्रदान करते, ज्यामुळे 5जी पायाभूत सुविधा, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक ऑटोमेशन, ग्राहक उपकरणे आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सारख्या क्षेत्रांमध्ये तो तैनात करणे शक्य होते. त्याचा विकास भारताला एक सुरक्षित, स्वदेशी प्रोसेसर प्लॅटफॉर्म प्रदान करतो, ज्यामुळे आयात केलेल्या चिप्सवरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी होते - विशेषतः तो भारत जागतिक मायक्रोप्रोसेसर आउटपुटच्या जवळजवळ 20 टक्के क्षमता वापरतो,हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

DHRUV 64 हे शक्ति(SHAKTI), अजित(AJIT), विक्रम (VIKRAM) आणि तेजस (THEJAS) यासारख्या स्वदेशी प्रोसेसरच्या वाढत्या पोर्टफोलिओवर आधारित आहे, जे एकत्रितपणे भारतीय प्रोसेसर इकोसिस्टमचा पाया तयार करतात. डिजिटल इंडिया RISC-V (DIR-V) कार्यक्रमांतर्गत विकसित केलेले, हे प्रोसेसर ओपन-सोर्स RISC-V बांधणीचा (आर्किटेक्चरचा) वापर करतात, परवाना खर्च कमी करतात आणि शैक्षणिक, स्टार्टअप्स आणि उद्योगांमधील सहयोगी नवोन्मेषांना सक्षम करतात. DHRUV 64 चे रोलआउट, DHANUSH आणि DHANUSH+ सिस्टम ऑन चिप्स व्हेरियंटच्या चालू विकासासोबत, भारताच्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला बळकटी देते, उत्पादनांच्या प्रतिकृतीला (प्रोटोटाइपिंग) गती देते आणि देशांतर्गत डिझाइन प्रतिभेसाठी संधी वाढवते.

नवोन्मेषाला समर्थन देत, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा सुरक्षित करत आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत देशाच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षांना आधार देत, एकत्रितपणे, हे उपक्रम मायक्रोप्रोसेसरचे केवळ घटक म्हणून नव्हे तर भारताच्या डिजिटल सार्वभौमत्वाचे धोरणात्मक सक्षमकर्ता म्हणून स्थान देतात.

 

सेमीकंडक्टरसाठी बुद्धिमत्ता विकास

एक मजबूत सेमीकंडक्टर बहुविध व्यवस्था पायाभूत सुविधांइतकीच लोकांवर देखील अवलंबून असते. म्हणूनच भारताने डिझाइन, उत्पादन आणि प्रगत पॅकेजिंगमध्ये मोठा, कुशल आणि उद्योगासाठी तयार प्रतिभाशाली कामगार वर्ग तयार करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन स्वीकारला आहे. चिप तंत्रज्ञानाची लवकर ओळख करून घेत, व्यावहारिक प्रशिक्षण आणि विकसित होत असलेल्या उद्योग आवश्यकतांनुसार यातून सततच्या कौशल्य विकासावर भर दिला जात आहे.

  • चिप्स पासून स्टार्टअपपर्यंत संपूर्ण कार्यक्रम: चिप्स पासून स्टार्टअप पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम 397 विद्यापीठांत आणि स्टार्टअप्समध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन टूल्सची उपलब्धता प्रदान करतो. या टूल्सचा वापर करून, 46 हून अधिक विद्यापीठांमधील चिप डिझायनर्सनी मोहाली येथील सेमीकंडक्टर लॅबोरेटरीमध्ये 56 चिप्स डिझाइन आणि तयार (फॅब्रिकेट) केले आहेत.
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) अंतर्गत शैक्षणिक कार्यक्रम: सेमीकंडक्टर शिक्षणाला मुख्य प्रवाहातील अभियांत्रिकीमध्ये समानुकूलित करण्यासाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये VLSI डिझाइनवर लक्ष केंद्रित करून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बी टेक, एकात्मिक सर्किट उत्पादनात डिप्लोमा आणि VLSI डिझाइन आणि तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील एक लघु अभ्यासक्रम पदवी यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, या कार्यक्रमांचे उद्दिष्ट उद्योगाशी संबंधित कौशल्यांनी सुसज्ज पदवीधर तयार करणे हा आहे.
  • नीलिट(NIELIT) कालिकत येथील स्मार्ट लॅब: नीलिट (NIELIT) कालिकत येथील कुशल मनुष्यबळ प्रगत संशोधन आणि प्रशिक्षण प्रयोगशाळा सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देते. या उपक्रमाचे लक्ष्य देशभरातील एक लाख अभियंत्यांना प्रशिक्षित करणे हे आहे, त्यापैकी 62,000 हून अधिक अभियंते आधीच प्रशिक्षित झाले आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय प्रतिभा समूहाचे लक्षणीयरीत्या सबलीकरण झाले आहे.
  • लॅम रिसर्चसोबत औद्योगिक सहयोग: लॅम रिसर्चच्या सहयोगाने नॅनोफॅब्रिकेशन आणि प्रक्रिया अभियांत्रिकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत.या उपक्रमांद्वारे एटीएमपी (ATMP) आणि प्रगत पॅकेजिंग सुविधांमधील विशेष कौशल्ये निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील दहा वर्षांत या उपक्रमातून 60,000 प्रशिक्षित व्यावसायिक निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • फ्यूचरस्किल्स प्राइम प्रोग्राम: फ्यूचरस्किल्स प्राइम हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि नॅस्कॉम(NASSCOM) यांचा संयुक्त उपक्रम आहे,जो भारताला जागतिक डिजिटल प्रतिभेचे (टॅलेंटचे) महत्वाचे केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी डिझाइन केला आहे. हा उपक्रम सेमीकंडक्टरसह उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कौशल्यविकास, पुनर्कौशल्य विकास आणि अद्ययावत कौशल्यविकासावर लक्ष केंद्रित करतो. हे अभ्यासक्रम उद्योगातील माहितीसह विकसित केले जातात आणि प्रशिक्षण ऑनलाइन पोर्टलद्वारे दिले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना कधीही प्रशिक्षण घेता येते आणि त्यांच्या आकांक्षांशी जुळणारे मान्यताप्राप्त कौशल्य प्रमाणपत्र मिळविण्यास सक्षम करते.

एकत्रितपणे, हे सर्व उपक्रम एक सशक्त आणि भविष्यासाठी तयार सेमीकंडक्टर्सचे कार्यबल तयार करत आहेत, ज्यामुळे चिप मूल्य साखळीत भारत आपली संपूर्ण दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवू शकतो.

 

निष्‍कर्ष

भारताचे सेमीकंडक्टर मिशन 2.0 हे इकोसिस्टम निर्मितीपासून इकोसिस्टम एकत्रीकरण आणि जागतिक एकात्मतेकडे जाणाऱ्या एका निर्णायक परीवर्तनाचे दर्शन घडवते.आर्थिक लवचिकता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि तांत्रिक सार्वभौमत्वाचे केंद्र बनत- उत्पादन, डिझाइन आणि प्रगत कौशल्यांमधील समर्थन विकसित करून, आयएसएम 2.0 सेमीकंडक्टरना एक धोरणात्मक राष्ट्रीय क्षमता म्हणून स्थान देते.2026–27 मध्ये यासाठी अर्थसंकल्पात वाढीव समर्थन दिले गेले आहे जेणेकरून अंमलबजावणीला गती देण्यासाठी, खाजगी गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी आणि संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये देशांतर्गत क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक गती मिळत आहे.

भविष्यकाळाचा विचार करता, ISM 2.0 भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि नवोपक्रमासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. प्रगत केंद्रांसाठी (नोड्स) स्पष्ट आराखडा (रोडमॅप), मजबूत डिझाइन प्रोत्साहने आणि वाढत्या प्रतिभेसह,भारत जागतिक पुरवठा साखळींमध्ये अधिक लवचिक योगदान देत बाह्य अवलंबित्व हळूहळू कमी करण्यास सज्ज होत आहे. अशा प्रकारे ही मोहीम,भारताच्या, येत्या दशकात जगातील आघाडीच्या सेमीकंडक्टर राष्ट्रांमध्ये गणना होण्याच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षेला समर्थन देत आहे.

 

संदर्भ

PIB Backgrounders:

Ministry of Electronics & IT:

Union Budget:

 

India Semiconductor Mission 2.0

 

* * *

नेहा कुलकर्णी/उमा रायकर/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

(Explainer ID: 157822) आगंतुक पटल : 14
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Kannada , Malayalam
National Portal Of India
STQC Certificate