Social Welfare
पंतप्रधान ई-विद्या
प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक जागी सक्षम करताना
Posted On:
10 MAR 2026 3:07PM
नवी दिल्ली, 10 मार्च 2026
|
महत्त्वाचे मुद्दे
-
दीक्षा या पंतप्रधान ई-विद्या उपक्रमाच्या महत्त्वाच्या घटकाचे मार्च 2026 पर्यंत 2.00 कोटींपेक्षा जास्त नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.
-
जानेवारी 2026 पर्यंत स्वयम या भारताच्या स्वदेशी एमओओसी मंचावर 5.80 कोटींपेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केली आहे.
-
सध्या कार्यरत असलेल्या 48 डीटीएच स्वयम प्रभा वाहिन्या विविध भारतीय भाषांमध्ये अहोरात्र शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करत आहेत.
-
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), कानपूर या सहकार्याने सुरु केलेले साथी हे पोर्टल उच्च शिक्षण आणि प्रवेश परीक्षा यांच्या तयारीसाठी विशेषत्वाने सुरु करण्यात आले असून ते पोर्टल संकेतस्थळ तसेच 7 डीटीएच स्वयम प्रभा वाहिन्यांच्या मदतीने वापरता येते.
|
प्रस्तावना
विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि सामाजिक पाया घडवण्यात तसेच वेगाने बदलत्या जगात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांना सज्ज करण्यात, शिक्षण तसेच ज्ञानाचा प्रसार यांची महत्त्वाची भूमिका असते. सर्वसमावेशक तसेच अभ्यासकांच्या वैविध्यपूर्ण गरजांना प्रतिसाद देऊ शकणाऱ्या भविष्यासाठी सज्ज शैक्षणिक प्रणालीची गरज ओळखून सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या माध्यमातून ही कल्पना मांडली. एनईपी 2020 भारताच्या शिक्षण व्यवस्थेसाठी एक परिवर्तनशील दृष्टी ठेवते. हे धोरण दर्जेदार शिक्षणापर्यंतची समान पोहोच सुनिश्चित करत समग्र आणि बहुशाखीय अध्ययनाला चालना देण्याचे ध्येय ठेवते. या धोरणात अध्यापन तसेच शिक्षणाचे निकाल सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच गांभीर्यपूर्ण विचारसरणी आणि सर्जनशीलता यांची जोपासना करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. भारतात शाळेत जाणारी 24.8 कोटी मुले आहेत तसेच उच्च शिक्षण घेणारे 4.33 कोटी विद्यार्थी आहेत, मात्र त्यांच्यापैकी अनेक जण अशा दुर्गम भौगोलिक प्रदेशात राहतात जेथे शैक्षणिक संस्थांची उपलब्धता मर्यादित आहे आणि शिक्षणासाठी वर्गांमध्ये नियमितपणे उपस्थित राहणे हे बहुतांश वेळा घरगुती जबाबदाऱ्या आणि उपजीविका मिळवण्याच्या कामात सहभागी होण्याची गरज अशांसारख्या सामाजिक-आर्थिक सक्तीमुळे मर्यादित होऊन जाते. अनेक भागांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांच्या सततच्या कमतरतेमुळे या आव्हानांमध्ये आणखी भर पडून शिक्षणाचे असमान परिणाम मिळतात. कोविड-19च्या जागतिक महामारीमुळे देखील पारंपरिक वर्गांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले आणि त्याचा परिणाम सुमारे 25 कोटी शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागला. या सगळ्यातून नाविन्यपूर्ण उपायांची गरज वाढली. या संदर्भात, लवचिकता आणि समावेशकतेचा महत्वाचा घटक म्हणून डिजिटल शिक्षणाची कल्पना मांडण्यात आली; ज्या विद्यार्थ्यांना वर्गांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते, तेथे वर्गच त्यांच्यापर्यंत नेण्यात आले. ऑनलाईन शिक्षणात सातत्य सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान ई-विद्या उपक्रमाच्या रुपात व्यापक डिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरु केला. देशभरातील अभ्यासकांना समावेशक, सहजप्राप्य आणि तंत्रज्ञानाने सक्षम शिक्षण उपलब्ध करून देऊन एनईपी 2020 च्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी जुळवून घेण्याच्या हेतूने, दीक्षा, स्वयम, स्वयम प्रभा दूरदर्शन वाहिन्या, रेडिओ, पॉडकास्ट्स आणि समुदायाधारित डिजिटल उपलब्धता अशा विविध मंचांना “एक देश, एक डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा” या तत्वावर आधारलेल्या पंतप्रधान ई-विद्या या उपक्रमात एकत्र करण्यात आले.
पंतप्रधान ई-विद्या उपक्रमामुळे झालेले परिवर्तन: डिजिटल मंचाच्या माध्यमातून शिक्षण
देशव्यापी कोविड-19 टाळेबंदीच्या काळात, दूरचित्रवाणी, रेडिओ तसेच ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून शिक्षणातील सातत्य राखणे शक्य करत, आपत्कालीन बहुपद्धतीय शिक्षण प्रतिसादाच्या स्वरुपात 17 मे 2020 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान ई-विद्या उपक्रम सुरु करण्यात आला. नंतरच्या काळात, त्याला औपचारिक स्वरुप देण्यात येऊन 7 ऑगस्ट, 2020 रोजी आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत त्याला नवे नाव देण्यात आले आणि विद्यमान डिजिटल मालमत्तेचा एकीकृत चौकटीत समावेश करण्यात आला.
हा उपक्रम माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (एनएमईआयसीटी), स्वयम एमओओसीएस मंच, समग्र शिक्षण तसेच निशिताज शिक्षक प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती कार्ये यांच्या माध्यमातून डिजिटल भारत, राष्ट्रीय शिक्षण अभियान यांसारख्या मुलभूत कार्यक्रमांच्या पाठबळावर चालतो. पंतप्रधान ई-विद्याच्या स्वयम प्रभा घटकांतर्गत एक वर्ग, एक दूरचित्रवाणी वाहिनी, दीक्षा आणि स्वयम एमओओसीएस पोर्टलच्या स्वरुपात आकाराला आलेली एक देश, एक डिजिटल मंच संकल्पना हे या उपक्रमाचे प्रमुख परिचालनात्मक स्तंभ आहेत.

पंतप्रधान ई-विद्या: महत्त्वाचे आधारस्तंभ
पंतप्रधान ई-विद्या उपक्रमाचे सहा महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत जे समावेशक आणि समान डिजिटल शिक्षणाची एकसमान उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ऑनलाइन, ऑन-एअर तसेच ऑफलाईन वाहिन्यांना एकत्र आणतात. यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे: स्वयम (युवा आकांक्षित विद्यार्थ्यांसाठी सक्रीय शिक्षणाचे स्टडी वेब्स), स्वयम प्रभा, दीक्षा (ज्ञान सामायिकीकरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा), रेडिओ, कम्युनिटी रेडिओ तसेच पॉडकास्ट यांचा व्यापक वापर, सीडब्ल्यूएसएनसाठी विशेष ई-सामग्री आणि स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाइन कोचिंग.
युवा आकांक्षित विद्यार्थ्यांसाठी सक्रीय शिक्षणाचे स्टडी वेब्स (स्वयम)
आयआयटी मद्रास या संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेला स्वयम हा महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम “कोणालाही, कोठूनही, कोणत्याही वेळी शिक्षण” घेण्याच्या संकल्पनेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेवर आधारलेला आहे.समग्र आणि व्यापक शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी प्रमुख संस्थांनी तयार केलेला हा कार्यक्रम विविध विद्याशाखांमध्ये अभ्यासक्रमांची वैविध्यपूर्ण श्रेणी देऊ करतो. जानेवारी 2026 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, एनपीटीईएल, युजीसी, एआयसीटीई, सीईसी, आयजीएनओयु, आयआयएमबी, एनआयटीटीटीआर, आयएनआय, एनसीईआरटी आणि एनआयओएस अशा दहा राष्ट्रीय समन्वयकांनी तयार केलेले 4,400 पेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम स्वयम मंचावर विकसित करण्यात आले आहेत.

औपचारिक उच्च शिक्षण व्यवस्थेत ऑनलाइन शिक्षणाचा सुरळीतपणे समावेश करण्यासाठी, विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) स्वयम नियम, 2021 अन्वये ऑनलाईन शिक्षण अभ्यासक्रमांसाठी क्रेडीट आराखडा अधिसूचित केला. हा आराखडा उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना एका सहामाहीमध्ये कार्यक्रमाच्या एकंदर अभ्यासक्रमांपैकी 40 टक्के अभ्यासक्रम स्वयमच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे शक्य करतो.
तसेच, शैक्षणिक लवचिकता आणि विद्यार्थ्यांची सोय यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने, युजीसीने विद्यापीठांसाठी स्वयम अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्यासाठीचा आराखडा देखील अधिसूचित केला आहे. सदर आराखडा नियमांचा स्वीकार केलेल्या विद्यापीठांना स्वयमच्या परीक्षा घेण्याची परवानगी देतो आणि त्यायोगे, शिक्षण संस्थांचा सहभाग तसेच ऑनलाईन शिक्षणाची विद्यार्थी-केंद्रित अंमलबजावणी आणखी बळकट करतो.
स्वयम उपक्रमातील अभ्यासक्रमांमध्ये पुढील चार महत्त्वाचे घटक अंतर्भूत असतात: (1)व्हिडीओ, (2)डाउनलोड करण्याजोगे आणि छापण्यायोग्य वाचन साहित्य, (3)प्रश्नमंजुषा तसेच परीक्षांच्या माध्यमातून स्वयंमूल्यमापन आणि (4)शंका निरसन करून घेण्यासाठी ऑनलाईन चर्चा व्यासपीठ. दृक्श्राव्य घटक, मल्टीमिडीया तसेच प्रगत अध्यापनशास्त्रीय आणि तंत्रज्ञानसंबंधी पद्धती यांच्या समावेशाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुधारण्यात आली आहे.
स्वयम च्या माध्यमातून उपलब्ध होणारे सर्व अभ्यासक्रम, शिकणाऱ्यांसाठी मोफत उपलब्ध आहेत. मात्र, ज्यांना स्वयमचे अधिकृत प्रमाणपत्र हवे आहे त्यांना विहित अंतिम परीक्षांसाठी नोंदणी करणे अनिवार्य असून यात शुल्क भरणे तसेच ठराविक तारखांना विहित केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन या परीक्षा देणे बंधनकारक आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या माहितीपृष्ठावर प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचे पात्रता तपशील निर्दिष्ट केलेले असून हे पात्रता निकष पूर्ण केल्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात येते. क्रेडीट हस्तांतरणाला मंजुरी देणारी विद्यापीठे आणि महाविद्यालये या अभ्यासक्रमांमध्ये मिळवलेले गुण अथवा प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदींमध्ये ग्राह्य धरू शकतात.
स्वयं प्रभा
स्वयं प्रभा हा 48 डीटीएच वाहिन्यांचा एक समूह आहे जो उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करण्यासाठी समर्पित असून त्याचा उद्देश विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी शिक्षण सुलभ करणे आहे. ही वाहिनी देशभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असून डीडी फ्री डिश आणि इंटरनेट ॲप्लिकेशन्सद्वारे ती प्रसारित केली जाते.


डिसेंबर 2024 मध्ये, भारत सरकारने डीटीएचवर वाहिनी 31 सुरू केली. ही वाहिनी भारतीय सांकेतिक भाषा (आयएसएल) प्रशिक्षणासाठी समर्पित आहे. ही वाहिनी श्रवणदोष असलेले विद्यार्थी, विशेष शिक्षक, दुभाषी आणि संबंधित संस्थांसाठी उपयुक्त आहे.
साथी
शिक्षण मंत्रालयाने आयायटी कानपूर यांच्या सहकार्याने नोव्हेंबर 2023 मध्ये सेल्फ असेसमेंट, टेस्ट ॲंड Self-Assessment, Test, and Help for Entrance Examination (SATHEE) हे व्यासपीठ सुरू केले आहे..
हे व्यासपीठावर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील शिक्षण तज्ञांनी तयार केलेली उच्च दर्जाची शैक्षणिक सामग्री विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. ही सामग्री JEE, NEET, SSC, ICAR, CUET, IBPS इत्यादी यासारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार केलेली आहे.
साथी ची प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत:
• आयआयटी आणि एम्स मधील तज्ञ प्राध्यापकांची रेकॉर्ड केलेले आणि थेट व्याख्याने
• दैनिक सराव प्रश्न (डीपीपी), मॉक टेस्ट आणि स्व-मूल्यांकन साधने - ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपली प्रगती सतत तपासता येते आणि स्वतःमध्ये सुधारणा करता येते
• नामांकित संस्थांमधील मार्गदर्शकांकडून प्रेरणादायी सत्रे आणि मार्गदर्शन
• स्पर्धात्मक परीक्षेच्या मानकांनुसार तयार केलेल्या 80,000 पेक्षा अधिक उच्च दर्जाच्या प्रश्नांचा व्यापक संग्रह उपलब्ध.
• आयआयटी आणि एम्स विद्यार्थ्यांद्वारे आयोजित परस्परसंवादी शंका-निरसन सत्रे.
• परीक्षांपूर्वी विशेष क्रॅश कोर्सेस तसेच वास्तविक परीक्षेचा अनुभव देणारी ऑल इंडिया मॉक टेस्ट सिरीज
• हिंदी, इंग्रजी आणि अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध बहुभाषिक सामग्री
• वैयक्तिकृत अभ्यास योजना, कामगिरी विश्लेषण आणि सहभाग वाढविण्यासाठी गेमिफाइड शिक्षण अनुभव देणारी स्मार्ट कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्ये.
विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रभावी तयारी करता यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावे यासाठी, सात समर्पित डायरेक्ट-टू-होम (DTH) वाहिन्यांचा संच कार्यान्वित करण्यात आला आहे. शिवाय, सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये या वाहिन्या सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात आणि वापरकर्त्याला त्या विना अडथळा पाहता याव्यात याची खात्री करण्यासाठी आयओएस आणि अँड्रॉइड दोन्ही प्रणालीमध्ये मोबाइल ॲप सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना कधीही आणि कुठेही या व्यासपीठावरील शिक्षण सामुग्री उपलब्ध होईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये तंत्रज्ञान आधारित समतोल शिक्षण आणि कौशल्य विकासावर दिलेल्या भराशी सुसंगत राहून साथी’ने लाखो विद्यार्थ्यांना डेटा आधारित तयारीची धोरणे, रियल टाईम प्रगती निरीक्षण तसेच आयआयटी मधील प्राध्यापक आणि टॉपर विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.
ज्ञान सामायिकरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा
दिक्षा (ज्ञान सामायिकरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा) पोर्टल आणि मोबाइल ॲप शालेय शिक्षणासाठी भारतातील प्रमुख राष्ट्रीय डिजिटल परिसंस्था म्हणून काम करते. हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केले गेले आहे. हे व्यासपीठाचे नेतृत्व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) करत असून त्यांना केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (सीआयइटी) चे सहकार्य लाभले आहे. 2017 मध्ये सुरू झालेले दीक्षा हे एक मुक्त-स्रोत व्यासपीठ आहे जे भारतातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि प्रशासकांना उच्च-दर्जाची डिजिटल शिक्षण सामग्री सहज उपलब्ध करून देते. विविध गरजा नुसार सानुकूलित करता येणारे हे व्यासपीठ लोकशाही पद्धतीने काम करते.
दीक्षा हे व्यासपीठ K-12 स्तरावरील संपूर्ण डिजिटल शिक्षणाला समर्थन देते. यात NCERT, CBSE, NIOS तसेच विविध राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंडळाचा समावेश आहे. मूलभूत साक्षरता आणि अंक ज्ञान (FLN) पासून ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी लागणारी सामग्री या व्यासपीठावर उपलब्ध आहे. ते देशभरातील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध प्रमाणित, अभ्यासक्रम-संरेखित डिजिटल सामग्री प्रदान करून समानतेला प्रोत्साहन देते. या व्यासपीठावर 2D/3D ॲनिमेशन, ऑगमेंटेड रियालिटी अनुभव, सिम्युलेशन्स, व्हर्च्युअल लॅब्स आणि सांकेतिक भाषेतील व्हिडिओ यासारखी मल्टीमीडिया आधारित संवादात्मक शैक्षणिक साधने उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक स्पष्ट होण्यास मदत होते तसेच विविध प्रकारच्या शिकवण्याच्या पद्धतींना आधार मिळतो. हे व्यासपीठ QR-कोडेड एनर्जाइज्ड पाठ्यपुस्तकांद्वारे मुद्रित आणि डिजिटल शिक्षणातील दरी कमी करते. NCERT च्या पाठ्यपुस्तकांमधील QR-कोड स्कॅन केल्यास संबंधित व्हिडिओ, संवादात्मक सामग्री आणि शिक्षक मार्गदर्शन सहज उपलब्ध होते. या व्यासपीठावर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी DAISY (डिजिटल ॲक्सेसिबल इन्फॉर्मेशन सिस्टम) स्वरूपातील ऑडिओ बुक्स, टेक्स्ट-टू-स्पीच सुविधा आणि भारतीय सांकेतिक भाषा व्हिडिओ उपलब्ध आहेत.
दिक्षा वैयक्तिकृत शिक्षणालाही प्रोत्साहन देते. यासाठी अमर्यादित सराव प्रश्न, सविस्तर उत्तरे, अनुकूली मूल्यांकन आणि कौशल्य-आधारित प्रश्न संच उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कमतरता ओळखून योग्य वेळी सुधारणा करता येतात. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी निष्ठा ( NISHTHA) आणि राज्य-विशिष्ट शिक्षक प्रशिक्षण (TPD) मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. यामुळे देशभरातील शिक्षकांना स्व-अभ्यासाच्या पद्धतीने प्रमाणित प्रशिक्षण घेऊन आपली कौशल्य वाढवता येतात. आशय निर्मिती, संकलन, वापर आणि विश्लेषणे यांचा समन्वय असलेली ही एकात्मिक प्रणाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी सुसंगत असून सर्व समावेशक डेटा आधारित आणि आनंददायी शिक्षणाला चालना देते.
आकाशवाणीवरील शिक्षण: मुक्त विद्या वाणी आणि शिक्षा वाणी
पीएम ई-विद्या उपक्रमांतर्गत, राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था (NIOS) द्वारे संचालित मुक्त विद्या वाणी ही भारतातील अग्रणी शैक्षणिक वेब रेडिओ सेवा आहे. ही सेवा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी थेट, परस्परसंवादी ऑडिओ शिक्षण कार्यक्रम प्रसारित करते. पाच वर्षांहून अधिक काळापासून ही सेवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयावरील थेट वैयक्तिक संपर्क कार्यक्रमाद्वारे (PCPs) द्वि-मार्गी संवादाची सुविधा देते. हे कार्यक्रम वेब स्ट्रीमिंगद्वारे प्रसारित केले जातात आणि रेडिओ वाहिनी (FM 91.2 MHz) वर त्यांचे पुनर्प्रसारण केले जाते, [6] जेणेकरून इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. सर्व सत्रे NIOS व्यासपीठावर 24x7 संग्रहित असतात. तसेच, यूट्यूब आणि फेसबुक द्वारेही ते उपलब्ध करून दिले जातात, ज्यामुळे हे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी कधीही, कुठेही सहज उपलब्ध असतात. याला पूरक म्हणून, सीबीएसईचे शिक्षा वाणी पॉडकास्ट इयत्ता 9वी ते 12वी [7] साठी 400 हून अधिक अभ्यासक्रम-संरेखित ऑडिओ मॉड्यूल प्रदान करते, ज्यामध्ये एनसीईआरटी विषय संक्षिप्त, आकर्षक स्वरूपात समाविष्ट केलेले आहेत. गुगल प्लेवरील शिक्षा वाणी मोबाइल ॲपद्वारे ही सामग्री सर्वांसाठी मुक्तपणे उपलब्ध आहे.
डिजिटल आणि प्रसार माध्यमांना पूरक म्हणून, दूरदर्शन (डीडी) आणि ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) [8] हे पीएम ई-विद्या अंतर्गत देशव्यापी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करतात. यामध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरांसाठी अभ्यासक्रम-आधारित व्हर्च्युअल वर्ग, बोर्ड परीक्षेची तयारी (मॉडेल प्रश्नपत्रिकांसह), जेईई/एनईईटी प्रवेश मार्गदर्शन आणि कथाकथन आणि प्रश्नमंजुषा यासारखी समृद्धीपर सामग्री समाविष्ट आहे. इष्टतम वयोगटापर्यंत पोहोचण्यासाठी हे कार्यक्रम सकाळ आणि दुपारच्या वेळेत प्रसारित केले जातात. हे कार्यक्रम इंटरनेट अवलंबित्व नसलेल्या दुर्गम आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी टीव्ही, रेडिओ आणि यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
सर्वसमावेशक शिक्षण : विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (सीडब्ल्यूएसएन) डिजिटल शिक्षण
पीएम ई-विद्या उपक्रमांतर्गत, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (सीडब्ल्यूएसएन) समावेशक डिजिटल शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले गेले आहे. दीक्षा व्यासपीठ आणि एनआयओएस प्रणालीवर डिजिटली अॅक्सेसिबल इन्फॉर्मेशन सिस्टम (DAISY) स्वरूपातील ऑडिओबुक्स तसेच भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश [9] सहज उपलब्ध आहेत, ज्यामुळे दृष्टिदोष आणि श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित सामग्री स्वतंत्रपणे आणि सहजपणे उपलब्ध होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने माध्यमिक-स्तरावरील 7 विषय आणि योग[10] यांचा समावेश असलेले 270 हून अधिक भारतीय सांकेतिक भाषेतील व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत तसेच डीव्हीडी द्वारेही वितरित केले जातात. याव्यतिरिक्त, NCERT ने पाठ्यपुस्तकांना डिजिटल ई-बुक्स (UNICODE) मध्ये रूपांतरित केले आहे जे टेक्स्ट-टू-स्पीच (TTS) साधनांशी सुसंगत आहेत. याशिवाय गंभीर दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांना घरातून शिक्षण घेता यावे म्हणून स्पर्शाने ओळखता येणारे नकाशे आणि कमी खर्चातील ई लर्निंग मॉड्युल्स विकसित करण्यात आले आहेत. हे सर्व उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या समान आणि अडथळा मुक्त शिक्षणाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने विकसित केलेली बरखा: 'सर्वांसाठी एक वाचन मालिका', ही समावेशक शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून सुरू करण्यात आली आहे. ही वाचन मालिका युनिव्हर्सल डिझाइन फॉर लर्निंग (UDL) या संकल्पनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
यात 40 बहुभाषिक कथा पुस्तिकांचा समावेश असून त्या प्रिंट आणि डिजिटल दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. या पुस्तकांमध्ये स्पर्शाने जाणवणारी चित्रे, उच्च-कॉन्ट्रास्ट असणारी चित्रे, सुलभ लिपी, तसेच भारतीय सांकेतिक भाषा आणि बोलीभाषेतील ऑडिओ व्हिडिओ परिचय समाविष्ट आहे. बरखा’मुळे दृष्टीदोष, बौद्धिक किंवा हालचालींशी संबंधित अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरतेचा विकास होण्यास मदत होते. या मालिकेची डीजिटल आवृत्ती एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर तसेच ई-पाठशाळा व्यासपीठावर उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या मालिकेचे कोणत्याही उपकरणांवर स्व गतीने वाचन करता येते, परिणामी गोपनीयता, स्वायत्तता आणि आनंददायी शिक्षण यांना प्रोत्साहन मिळते. शिक्षणाच्या प्रारंभिक टप्प्यापासूनच सांकेतिक भाषेला नियमित संवादाच्या माध्यमाप्रमाणे समाविष्ट करुन बरखा केवळ विशेष गरजा असलेल्या मुलांना मदत करत नाही तर सर्व मुलांना समावेशक पद्धतींबद्दल संवेदनशील बनवते. त्यामुळे सर्व शैक्षणिक टप्प्यांमध्ये सुलभ आणि समावेशक पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठी ही एक प्रभावी आणि विस्तार योग्य पद्धत ठरते.
निष्कर्ष
पीएम-ई विद्या उपक्रम सुरुवातीला कोविड-19 महामारी दरम्यान आपत्कालीन उपाय म्हणून सुरू झाला होता. मात्र आज तो एक मजबूत, विस्तारक्षम आणि समावेशक डिजिटल सार्वजनिक शिक्षण पायाभूत व्यवस्था बनला आहे, जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या परिवर्तनशील दृष्टीकोनाला मूर्त रूप देते. हा उपक्रम ऑनलाइन, प्रसारण माध्यमांद्वारे (on-air) आणि ऑफलाइन अशा बहुविध माध्यमांमधून उच्च दर्जाचे, अभ्यासक्रमाशी संलग्न आणि बहुभाषिक शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देतो. यामुळे भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातील 24.8 कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, प्रौढ शिक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार यांना शिक्षणाची संधी मिळत आहे. पीएम-ई विद्या ने डिजिटल दरी कमी करण्याबरोबरच मूलभूत साक्षरता, शिक्षक सक्षमीकरण आणि आजीवन शिक्षण यांना चालना दिली आहे.
देश विकसित भारत @2047 या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना, पीएम-ई विद्या हा तंत्रज्ञानावर आधारित, समान आणि अनुकूल शिक्षण व्यवस्थेचा जागतिक आदर्श ठरत आहे.
समावेशकता आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोच यांना प्राधान्य देत हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याला—त्याचे स्थान, भाषा किंवा क्षमता काहीही असो—आपली संपूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम करतो. सातत्यपूर्ण गुंतवणूक, विविध घटकांमधील सहकार्य आणि सतत नवोन्मेष यांमुळे पीएम-ई विद्या भारताला सर्वसमावेशक, आनंददायी आणि भविष्यासाठी सज्ज अशा शिक्षणव्यवस्थेकडे अधिक वेगाने नेईल.
संदर्भ:
Press Information Bureau:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2097864
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1900797
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1997882
PM e-Vidya:
https://pmevidya.education.gov.in/radio.html
https://pmevidya.education.gov.in/cwsn.html
https://pmevidya.education.gov.in/swayam-portal.html
Central Institute of Educational Training:
https://ciet.ncert.gov.in/barkhaa
https://ciet.ncert.gov.in/initiative/nistha
SWAYAM:
https://swayam.gov.in/
SWAYAM Prabha:
https://www.swayamprabha.gov.in/about/competitive
https://www.swayamprabha.gov.in/about
Ministry of Education:
https://www.nios.ac.in/departmentsunits/media-unittelecast/mukta-vidya-vani-and-community-radio.aspx
https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3kv04a78efe4184c43df899cc8ec2e7bd/uploads/2024/08/2024081655-1.pdf
https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/1714/AU210.pdf?source=pqals#:~:text=ANNPURNA%20DEVI),teacher%20educators%20across%20the%20country.
https://diksha.gov.in/
https://www.onos.gov.in/
https://dsel.education.gov.in/en/nep-overview
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नेहा कुलकर्णी / संजना चिटणीस / श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
(Explainer ID: 157783)
आगंतुक पटल : 14
Provide suggestions / comments