• Sitemap
  • Advance Search
Technology

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने भारताचे परिवर्तन

सुमारे 10,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 38,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स ने समावेशी नवोन्मेषाला मिळत आहे सामर्थ्य

Posted On: 30 DEC 2025 1:30PM

 

प्रमुख वैशिष्ट्ये

• इंडिया एआय मिशनसाठी येत्या पाच वर्षांच्या कालावधीकरिता 38,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स तैनात आणि 10,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक  

•  तंत्रज्ञान आणि एआय परिसंस्थेत 60 लाख लोकांसाठी रोजगारांचे सृजन.

•  भारतीय तंत्रज्ञान क्षेत्र यावर्षी महसुलाच्या रुपाने 280 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा गाठण्याचा अंदाज.

• 2035 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत एआय 1.7 ट्रिलियन डॉलर्सची भर घालू शकते.

प्रस्तावना

भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामर्थ्य लाभलेल्या एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे जिथे तंत्रज्ञान जीवनात परिवर्तन घडवून आणत असतानाच राष्ट्राच्या प्रगतीला आकार देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता केवळ संशोधन प्रयोगशाळा किंवा मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ती प्रत्येक स्तरावर नागरिकांपर्यंत थेट पोहोचत आहे. अगदी दुर्गम भागातील आरोग्यसेवांचा आवाका अधिक सक्षम करण्यापासून ते शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यापर्यंत, एआय दैनंदिन आयुष्य सुगम, अद्ययावत आणि अधिक प्रमाणात जोडत आहे. वैयक्तिक अध्ययनाची जोड देऊन एआय वर्गखोल्यांचा कायापालट करत आहे, महानगरे स्वच्छ आणि सुरक्षित करत आहे आणि जलद आणि डेटा चलित प्रशासनाच्या आधारे सार्वजनिक सेवांमध्ये अगणित सुधारणा करत आहे.  

या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत इंडिया एआय मिशन आणि एआय उत्कृष्टता केंद्रांसारखे उपक्रम. हे उपक्रम संगणकीय क्षमतांची पोहोच विस्तारत आहे, संशोधनाला पाठबळ देत आहे आणि त्याचवेळी लोकांचा थेट लाभ होईल अशा उपायांची निर्मिती करण्यासाठी स्टार्टअप्स आणि इतर संस्थांना मदत करत आहे. यासंदर्भात भारताचा दृष्टिकोन एआय क्षेत्र सर्वांसाठी खुले, सर्वांना परवडण्याजोगे करण्याचा असून या नवोन्मेषामुळे संपूर्ण समाजाचे उत्थान होईल हे सुनिश्चित करण्यावर भारताचा भर आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सामान्यतः ज्या कामांमध्ये मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते अशी कामे करण्याची यंत्रांची क्षमता. एआय यंत्रणांना अनुभवांपासून शिकण्यासाठी सक्षम करते, नवीन स्थिती आत्मसात करण्यास प्रवृत्त करते आणि जटिल गुंतागुंतीच्या समस्या स्वतंत्रपणे सोडवते. माहितीचे विश्लेषण करण्यासाठी, नमुने ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद निर्माण करण्यासाठी एआय डेटासेट, अल्गोरिदम आणि मोठ्या भाषा मॉडेल्सचा वापर करते. कालांतराने, या प्रणाली त्यांची कार्यक्षमता सुधारतात,ज्यामुळे त्यांना मानवांप्रमाणेच तर्क करण्याची, निर्णय घेण्याची आणि संवाद साधता येतो.

सर्वसमावेशक सामाजिक विकासाकरिता एआय (ऑक्टोबर  2025) या नीती आयोगाच्या अहवालात ही सर्वसामावेशी दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. एआय कशाप्रकारे भारतातील 490 दशलक्ष असंघटित कामगारांना आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य आणि वित्तीय समावेशनात सामावून घेण्यासाठी सक्षम करु शकते, हे या अहवालात मांडण्यात आले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या लाखो लोकांसाठी एआय आधारित उपकरणे कशाप्रकारे उत्पादन आणि लवचिकतेत वाढ करु शकते यावर या अहवालात  प्रकाश टाकण्यात आला आहे.  अहवालात असेही अधोरेखित केले आहे की तंत्रज्ञान खोल सामाजिक आणि आर्थिक दरी भरून काढू शकते, ज्यामुळे एआयचे फायदे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील याची खात्री होते.

भारतातील विद्यमान एआय परिसंस्था

  • भारताचे तंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, या क्षेत्राचा वार्षिक महसूल यावर्षी 280 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे. 
  • तंत्रज्ञान आणि एआय परिसंस्थेत 60 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.
  • देशात 1,800 पेक्षा अधिक जागतिक क्षमता केंद्र असून त्यामध्ये एआय केंद्रीत 500 केंद्रांचा समावेश आहे.
  • भारतात सुमारे 1.8 लाख स्टार्टअप्स असून गेल्या वर्षी सुरू झालेल्या नवीन स्टार्टअप्स पैकी सुमारे 89 टक्के त्यांच्या उत्पादनात किंवा सेवेत एआय चा वापर करत आहेत.
  • NASSCOM एआय स्वीकार निर्देशांकात  भारताला 4 पैकी 2.45  गुण मिळाले असून, यावरून 87% उद्योग सक्रियपणे एआय उपायांचा वापर करत आहेत हे दिसून येते. 
  • एआय चा वापर करणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये औद्योगिक आणि वाहनउद्योग, ग्राहककेंद्रीत उत्पादने आणि किरकोळ बाजारपेठ, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा आणि आरोग्यक्षेत्र यांचा समावेश आहे. आजमितीला हे उद्योग एआय च्या एकूण मूल्याच्या 60 टक्के योगदान देत आहेत. 
  • अलीकडील बीसीजी - बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप- सर्वेक्षणानुसार, सुमारे 26% भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर AI परिपक्वता (AI maturity) साध्य केली आहे.

भारत एक सर्वसमावेशक एआय परिसंस्था उभारत असताना, त्याच्या वाढत्या जागतिक मान्यतेतून ही प्रगती दिसून येते. स्टॅनफोर्ड एआय निर्देशांकांसारख्या क्रमवारीने भारताला एआय कौशल्य, क्षमता आणि धोरण यादृष्टीने अव्वल चार राष्ट्रांमध्ये स्थान दिले आहे. याशिवाय गिटहबवरील एआय प्रकल्पांमध्ये आपला  देश दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा योगदानकर्ता असून यादारे त्याच्या विकासक समुदायाची ताकद अधोरेखित होत आहे. मजबूत STEM कार्यबल, विस्तारत असलेली संशोधन परिसंस्था आणि वाढत असलेली डिजिटल पायाभूत सुविधा यांच्या बळावर भारत आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या या दीर्घकालीन दृष्टीकोनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर करण्याच्या दिशेने सज्ज होत आहे. 

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा एआय स्पर्धात्मक देश:

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या 2025 ग्लोबल एआय व्हायब्रन्सी टूलच्या अहवालानुसार, भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता स्पर्धात्मकतेत जागतिक स्तरावर तृतीय स्थान पटकावले आहे. जागतिक एआय परिदृश्यात ही क्रमवारी भारताची जलद वृद्धी दर्शवते. या अहवालात 2017 ते 2024 पर्यंत एआय वाढ आणि नवोपक्रम मोजले जातात. या अलीकडच्या कामगिरीने भारताचे वाढते एआय नैपुण्य, भक्कम संशोधन क्षमता, चैतन्यशील स्टार्टअप परिसंस्था, गुंतवणूक आणि आर्थिक प्रभाव, पायाभूत सेवासुविधा आणि धोरण आणि प्रशासन कौशल्य अधोरेखित होत आहे.

इंडिया एआय अभियान

मेकिंग एआय इन इंडिया आणि मेकिंग एआय वर्क फॉर इंडिया अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला आणि योग्य वापराला देशात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च 2024 मध्ये सर्वसमावेशी इंडिया एआय मिशन अर्थात अभियानाला  10,371.92 कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चासह मंजुरी दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेत भारताला जागतिक नेतृत्त्व म्हणून विराजमान करण्यासाठी हे अभियान एक मोठे पाऊल आहे.

हे अभियान सुरु केल्यापासून देशाच्या संगणकीय पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात मोठी प्रगती केली आहे. आरंभीच्या 10,000 जीपीयूज च्या उद्दिष्टापासून भारताने आता 38,000 जीपीयूज च्या निर्मितीपर्यंत मजल मारली असून त्यामुळे परवडण्याजोगी जागतिक दर्जाची एआय संसाधने उपलब्ध झाली आहेत. 

जीपीयू म्हणजे काय?

जीपीयू किंवा ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट ही एक शक्तिशाली संगणकीय चिप आहे, जी  मशीनना अधिक वेगाने विचार करण्यास, प्रतिमांवर प्रक्रिया करण्यास, एआय  प्रोग्राम चालविण्यास आणि साध्या प्रोसेसरपेक्षा अधिक कार्यक्षमतेने जटिल कामे हाताळण्यास मदत करते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत स्वतंत्र व्यवसाय विभाग असलेल्या इंडियाएआय द्वारे अंमलात आणलेले हे अभियान नवोन्मेषला चालना देणारी, स्टार्टअप्सना पाठिंबा देणारी, डेटा सर्वांना उपलब्ध करुन देणारी आणि लोकांच्या हितासाठी एआयचा जबाबदार वापर सुनिश्चित करणारी  एक सर्वसमावेशक परिसंस्था उभारत आहे.

A diagram of a company's missionAI-generated content may be incorrect. 

इंडिया एआय अभियानाचे सात स्तंभ:

1. इंडिया एआय संगणन क्षमता –

हा  स्तंभ परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाचे जीपीयू प्रदान करेल. आधी सांगितल्याप्रमाणे, 38,000 हून अधिक जीपीयू ऑनबोर्ड केले गेले आहेत. हे जीपीयू केवळ 65 रुपये प्रति तास या अनुदानित दराने उपलब्ध आहेत.

2. इंडिया एआय एप्लिकेशन विकास उपक्रम

हा  स्तंभ भारत-विशिष्ट आव्हानांसाठी एआय अनुप्रयोग विकसित करतो. यात आरोग्यसेवा, शेती, हवामान बदल, प्रशासन आणि सहाय्यक शिक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे. जुलै 2025 पर्यंत तीस अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रालये आणि संस्थांच्या सहकार्याने क्षेत्रनिहाय हॅकाथॉन आयोजित केल्या जात आहेत. उदाहरणार्थ, सायबरगार्ड एआय हॅकेथॉन, सायबरसुरक्षेसाठी एआय उपाय विकसित करण्यास मदत करते. 

3. एआयकोष (विदासंच व्यासपीठ)

एआयकोष एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी मोठे डेटासेट विकसित करते.  यामध्ये सरकारी आणि गैर-सरकारी स्रोतांकडून डेटा एकत्रित केला जातो. या प्लॅटफॉर्ममध्ये 20 क्षेत्रांमध्ये 5,500 हून अधिक डेटासेट आणि 251 एआय मॉडेल्स आहेत. ही संसाधने विकासकांना मूलभूत मॉड्यूल तयार करण्याऐवजी एआय सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत करतात. डिसेंबर 2025 पर्यंत या प्लॅटफॉर्मला 385,000 हून अधिक जणांनी भेट दिली असून, 11,000 नोंदणीकृत वापरकर्ते आणि 26,000 डाउनलोड झाले आहेत.

4. इंडिया एआय फाउंडेशन मॉडेल्स

हा स्तंभ भारतीय डेटा आणि भाषांचा वापर करून भारताचे स्वतःचे मोठे बहुआयामी मॉडेल विकसित करतो. इंडियाएआयला 500 हून अधिक प्रस्ताव मिळाले असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील बारा स्टार्टअप्स निवडण्यात आले: सर्वम एआय, सोकेट एआय, ज्ञानी एआय, गण एआय, अवतार एआय, आयआयटी बॉम्बे कन्सोर्टियम - भारतजेन, झेंटेइक, जेन लूप, इंटेलिहेल्थ, शोध एआय, फ्रॅक्टल अॅनालिटिक्स, टेक महिंद्रा मेकर्स लॅब.

5. इंडिया एआय फ्युचरस्किल्स

या स्तंभामुळे एआय कौशल्य असलेले व्यावसायिक तयार होतील. पीएचडी अभ्यासक्रमाच्या 500 विद्यार्थ्यांना, 5,000 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि 8,000 पदवीधारक विद्यार्थ्यांना सहाय्य दिले जात आहे. जुलै 2025 पर्यंत 200 हून अधिक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली आहे. 73 संस्थांनी पीएचडी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प किंवा फेलोशिपसाठी सामील केले आहे. श्रेणी 2 आणि  3 च्या शहरांमध्ये डेटा आणि एआय प्रयोगशाळा  उभारल्या जात आहेत. NIELIT आणि उद्योग भागीदारांसह 31 प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी 174 आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांना प्रयोगशाळांसाठी नामनिर्देश केला आहे.

6. इंडिया एआय स्टार्टअप आर्थिक पाठबळ

हा स्तंभ एआय स्टार्टअप्सना वित्तीय पाठबळ प्रदान करतो. इंडियाएआय स्टार्टअप्स ग्लोबल प्रोग्राम मार्च 2025मध्ये सुरू झाला. स्टेशन एफ आणि एचईसी पॅरिस यांच्या सहकार्याने 10 भारतीय स्टार्टअप्सना युरोपियन बाजारपेठेत विस्तार करण्यास मदत करते.

7. सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय

हा स्तंभ मजबूत प्रशासनासह जबाबदार एआय स्वीकारण्याची खात्री देतो. अभिव्यक्ती स्वारस्याद्वारे 13 प्रकल्प निवडले गेले आहेत आणि सुरू केले गेले आहेत. हे कार्यक्रम मशीन अनलर्निंग, पूर्वग्रह कमी करणे, गोपनीयता राखणारे मशीन लर्निंग, स्पष्टता, लेखा परीक्षण आणि शासकीय चाचण्या यावर लक्ष केंद्रित करतात. इंडियाएआय सेफ्टी इन्स्टिट्यूटमध्ये सामील होण्यासाठी भागीदार संस्थांसाठी 9 मे 2025 रोजी अतिरिक्त स्वारस्य व्यक्त करण्यात आले.

इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये एआय

दिल्लीमध्ये यशोभूमी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 चे उदघाटन केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र केंद्रस्थानी आले. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान संयुक्तपणे आयोजित केलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस 2025 परिषदेची संकल्पना "इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म" अर्थात“परिवर्तनासाठी नवोन्मेष" अशी होती.

 

आयएमसी 2025 सहा प्रमुख शिखर संमेलनांचा समावेश असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय एआय शिखर परिषदेचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये नेटवर्क, सेवा आणि पुढील पिढीतील डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रातील एआय च्या परिवर्तनकारी भूमिकेला अधोरेखित करण्यात आले आहे.  5G/6G, एआय, स्मार्ट मोबिलिटी, सायबर सुरक्षा, क्वांटम कंप्युटिंग आणि हरित तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमधील 1,600 हून अधिक प्रचलित बाबींवर 100 पेक्षा अधिक सत्रे असून 800 हून जास्त वक्त्यांनी त्यावर आपले विचार मांडले. या परिषदेत 150 हून अधिक देशांमधून 1.5 लाखांहून अधिक अभ्यागत, 7,000 हून अधिक जागतिक प्रतिनिधी आणि 400 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या माध्यमातून एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्याच्या उद्देशाने नवोन्मेषी, स्टार्टअप्स, धोरणकर्ते आणि उयोगजगतातील प्रमुख सहभागी झाले होते.

केंद्र सरकारचे इतर प्रमुख उपक्रम आणि धोरणात्मक प्रोत्साहन

केंद्र सरकार आपले कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक संकल्प प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित करण्यासाठी परिवर्तनकारी उपक्रमांची मालिका राबवत आहे. एक चैतन्यशील एआय परिसंस्था उभारणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील सर्व क्षेत्रांना होत असल्याची खात्री करणे यावर या प्रयत्नांचा भर आहे. जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र निर्माण करण्यापासून ते स्वदेशी एआय मॉडेल्स विकसित करण्यापर्यंत, सरकारचा दृष्टिकोन धोरण, पायाभूत सुविधा आणि क्षमता-निर्मिती यांना समान प्रमाणात एकत्रित करतो.

एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्स

संशोधन-आधारित नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने आरोग्यसेवा, शेती आणि शाश्वत शहरे यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये तीन सेंटर्स ऑफ एक्सलन्स  अर्थात उत्कृष्टता केंद्र स्थापन केली आहेत. 2025 च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी चौथ्या उत्कृष्टता केंद्राची घोषणा करण्यात आली. ही केंद्र सहयोगी जागा म्हणून डिझाइन केली आहेत जिथे शैक्षणिक संस्था , उद्योग आणि सरकारी संस्था एकत्रितपणे स्केलेबल विस्तारक्षम एआय सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी काम करतात. याव्यतिरिक्त, तरुणांना उद्योगाशी संबंधित एआय कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी आणि भविष्यासाठी तयार कार्यबल विकसित करण्यासाठी पाच राष्ट्रीय कौशल्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य आराखडा

हा आराखडा सरकारी अधिकाऱ्यांना संरचित प्रशिक्षण प्रदान करतो, ज्यामुळे त्यांना आवश्यक एआय कौशल्ये आत्मसात करण्यास आणि धोरणनिर्मिती आणि प्रशासनात त्यांचा वापर करण्यास सक्षम करता येते. जागतिक मानकांनुसार डिझाइन केलेला हा आराखडा भारताचे सार्वजनिक क्षेत्र माहितीपूर्ण, लवचिक आणि एआय-चालित भविष्यासाठी सज्ज असेल हे सुनिश्चित करतो.

सर्वम एआय: स्मार्ट आधार सेवा

बेंगळुरूस्थित सर्वम एआय ही कंपनी प्रगत एआय संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष शासनव्यवस्थेसाठी उपयुक्त उपायांमध्ये करत आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सोबतच्या भागीदारीत,ती जनरेटिव्ह एआय वापरून आधार सेवा अधिक स्मार्ट आणि अधिक सुरक्षित बनवत आहे. एप्रिल 2025 मध्ये, सर्वम एआयला भारताची सार्वभौम एलएलएम परिसंस्था तयार करण्यासाठी मान्यता मिळाली, हा एक ओपन-सोर्स लार्ज लँगवेज मॉडेल (LLM) प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश सार्वजनिक सेवा वितरण अधिक प्रभावी करणे आणि डिजिटल विश्वास वाढवणे हा आहे

 भाषिणी: डिजिटल समावेशासाठी एक आवाज

भाषिणी हा एआय-आधारित प्लॅटफॉर्म असून तो अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर आणि भाषण साधने उपलब्ध करून देत भाषेच्या अडथळ्यांना दूर करतो. नागरिकांना लिहिणे किंवा वाचणे सहजशक्य नसेल तरी भाषिणी मुळे त्यांना डिजिटल सेवा सहज उपलब्ध होऊ शकतात. जून 2025 मध्ये, डिजिटल इंडिया भाषिणी विभाग आणि रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS) यांनी सार्वजनिक वापरासाठी असलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर बहुभाषिक एआय उपाय लागू करण्यासाठी सामंजस्य करार केला.

जुलै 2022 मध्ये भाषिणीचा आरंभ झाल्यापासून, भाषिणीने दहा लाख डाउनलोड ओलांडले आहेत, 20 भारतीय भाषांना समर्थन देते आणि 350 हून अधिक एआय मॉडेल्स एकत्रित करते. 450 हून अधिक सक्रिय ग्राहकांसह, ते डिजिटल समावेशाला प्रोत्साहन देत आहे आणि भाषिक दरी कमी करत आहे.

भारतजेन एआय : भारताचे बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल

2 जून 2025 रोजी आयोजित भारतजेन समिटमध्ये भारतजेन एआय सादर करण्यात आले. हे सरकारच्या निधीतून विकसित झालेले भारतातील पहिले स्वदेशी बहुविध माध्यमांवर आधारित मोठे भाषा मॉडेल आहे. हे मॉडेल 22 भारतीय भाषांमध्ये कार्य करू शकते आणि मजकूर, आवाज आणि चित्र यांचे आकलन एकत्रितपणे करू शकते. देशांतर्गत माहिती-संच वापरून विकसित करण्यात आलेल्या भारतजेन एआयमध्ये भारताची सांस्कृतिक आणि भाषिक विविधता प्रतिबिंबित होते. तसेच स्टार्टअप्स आणि संशोधकांना भारतीय गरजांनुसार एआयवर आधारित उपाय विकसित करण्यासाठी हे एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देते.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026
भारत फेब्रुवारी 2026 मध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन करणार आहे. या समिटमध्ये भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील क्षमतांचे प्रदर्शन करण्यात येणार असून विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. 18 सप्टेंबर 2025 रोजी भारताने या कार्यक्रमाचा लोगो आणि काही महत्त्वाच्या प्रमुख उपक्रमांचे अनावरण केले.
 
प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत :
 
एआय पिच फेस्ट (उडान) : जगभरातील एआय स्टार्टअप्ससाठी एक व्यासपीठ. विशेषतः महिला नेतृत्व आणि दिव्यांग परिवर्तनकर्त्यांवर यामध्ये विशेष भर दिला जाईल.
 
युवक, महिला आणि इतरांसाठी जागतिक नवोन्मेष आव्हाने : विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष सार्वजनिक समस्यांवर एआय-आधारित उपाय विकसित करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम.
 
संशोधन परिसंवाद : एआय क्षेत्रातील नव्या संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी आयोजित बैठक. यात भारत, ग्लोबल साउथ आणि इतर देशांतील आघाडीचे संशोधक सहभागी होऊन आपले संशोधन मांडतील, पद्धती आणि अनुभवांची देवाणघेवाण करतील तसेच सहकार्याच्या संधी निर्माण करतील.
 
एआय एक्स्पो : या प्रदर्शनात जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर भर दिला जाईल. यात भारतासह 30 पेक्षा अधिक देशांतील आणि 300 हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत.
 
समिटचा लोगो आणि प्रमुख उपक्रमांचे अनावरण करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारतासाठी विशेष डेटा वापरून स्वदेशी एआय मॉडेल विकसित करण्याच्या उद्देशाने आठ नव्या मूलभूत मॉडेल उपक्रमांचीही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात एआय डेटा लॅब्सवरही विशेष भर देण्यात आला. देशभरात 30 नवीन एआय डेटा लॅब्स सुरू करण्यात आल्या असून त्यातून एकूण 570 लॅब्सचे जाळे तयार होत आहे. पहिल्या 31 लॅब्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि उद्योग भागीदारांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आल्या. या लॅब्समध्ये इंडिया एआय मिशनच्या फ्युचर स्किल उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विषयांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय इंडिया एआय फेलोशिप कार्यक्रम आणि पोर्टलचा विस्तारही करण्यात आला असून त्याअंतर्गत 13,500 विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना सहाय्य देण्यात येणार आहे. यात 8,000 पदवीचे विद्यार्थी, 5,000 पदव्युत्तर विद्यार्थी आणि 500 पीएचडी संशोधक यांचा समावेश आहे. ही फेलोशिप आता अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, वाणिज्य, व्यवसाय आणि लिबरल आर्ट्स अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठीही खुली करण्यात आली आहे.
 
 
दैनंदिन जीवन आणि कामकाजात एआय
कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाची नवी लाट निर्माण करत आहे. आरोग्यसेवा, शेती, शिक्षण, प्रशासन आणि हवामानाचा अंदाज अशा दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांवर तिचा प्रभाव दिसून येतो. एआयच्या मदतीने डॉक्टरांना आजारांचे निदान अधिक वेगाने करता येत आहे. शेतकऱ्यांना माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत मिळत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या परिणामांमध्ये सुधारणा होत आहे. तसेच प्रशासन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होत आहे. 
 
या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) ही प्रगत एआय प्रणाली आहे. ही प्रणाली प्रचंड प्रमाणातील माहितीवर प्रशिक्षण घेऊन मानवी भाषेसारखा मजकूर समजून घेते आणि तयार करू शकते. चॅटबॉट्स, भाषांतर साधने आणि व्हर्च्युअल सहाय्यक यांसारख्या सेवा एलएलएममुळे शक्य होत आहेत. त्यामुळे लोकांना माहिती शोधणे, सरकारी सेवा वापरणे आणि आपल्या भाषेत नवी कौशल्ये शिकणे अधिक सोपे होत आहे.
 
भारताचा एआयकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नसून समावेशकता आणि सक्षमीकरणावर भर देणारा आहे. राष्ट्रीय उपक्रम आणि जागतिक सहकार्याच्या माध्यमातून एआयचा वापर प्रत्यक्ष जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, सार्वजनिक सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकांसाठी संधी अधिक उपलब्ध करून देण्यासाठी केला जात आहे. ग्रामीण आरोग्यसेवा सुधारण्यापासून ते हवामानाचे अंदाज वर्तविणे, तसेच न्यायालयीन निर्णयांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यापर्यंत विविध क्षेत्रांत एआयचा वापर होत असून डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि समतोल भारत घडविण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दैनंदिन जीवनात एआयमुळे सुधारणा होत असलेल्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. 
 
आरोग्यसेवा
एआयमुळे आरोग्यसेवा व्यवस्थेत मोठे बदल होत आहेत. डॉक्टरांना आजारांचे लवकर निदान करणे, वैद्यकीय स्कॅनचे विश्लेषण करणे आणि वैयक्तिक उपचारांची शिफारस करणे यासाठी एआय मदत करते. एआयवर आधारित टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्ममुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांशी जोडले जाते. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होते तसेच उपचारांची गुणवत्ता सुधारते. आरोग्य क्षेत्रात सुरक्षित आणि नैतिक एआय वापराला प्रोत्साहन देणाऱ्या हेल्थएआय या जागतिक संस्थेत भारताचा सहभाग आहे. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि इंडियाएआय मिशन यांनी युनायटेड किंग्डम आणि सिंगापूर सारख्या देशांसोबत सहकार्य सुरू केले आहे. या सहकार्यामुळे जबाबदार नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होत आहे.
 
कृषी
शेतकऱ्यांसाठी एआय हा एक विश्वासार्ह डिजिटल सहकारी ठरत आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणे, किडींचा प्रादुर्भाव ओळखणे तसेच सिंचन आणि पेरणीसाठी योग्य वेळ सुचवणे यासाठी एआय मदत करत आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हे मंत्रालय किसान ई-मित्र या उपक्रमाच्या माध्यमातून एआयचा वापर करत आहे. हा एक आभासी सहाय्यक असून तो शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यांसारख्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यास मदत करतो. तसेच नॅशनल पेस्ट सर्व्हेलन्स सिस्टीम आणि क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग या प्रणाली उपग्रह माहिती, हवामानविषयक माहिती आणि मातीच्या विश्लेषणाचा वापर करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वेळेत मार्गदर्शन देतात. त्यामुळे उत्पादन वाढविण्यास आणि उत्पन्नाची सुरक्षितता बळकट करण्यास मदत होते.
 
शिक्षण आणि कौशल्य विकास
भारताच्या शिक्षण व्यवस्थेत एआयचा समावेश करून शिक्षण अधिक समावेशक, आकर्षक आणि भविष्याभिमुख बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गतकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ कडून इयत्ता 6 वी पासून 15 तासांचा एआय कौशल्य मॉड्यूल दिला जातो, तसेच इयत्ता 9 ते 12 साठी एआय हा ऐच्छिक विषय उपलब्ध आहे. दीक्षा या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदच्या डिजिटल शिक्षण मंचावर एआय-आधारित साधने वापरली जातात. यामध्ये व्हिडिओंमध्ये कीवर्ड शोधण्याची सुविधा आणि मजकूर वाचून दाखवण्याची सुविधा आहे, ज्यामुळे विशेषतः दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभ होते.
याशिवाय राष्ट्रीय ई-शासन विभागाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत आपल्या भागीदारांच्या सहकार्याने युवाआय : एआयच्या माध्यमातून उन्नती आणि विकासासाठी युवाहा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश इयत्ता 8 ते 12 मधील विद्यार्थ्यांना एआय आणि सामाजिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हा आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, परिवहन, ग्रामीण विकास, स्मार्ट सिटीज आणि विधी व न्याय या आठ विषयांमध्ये एआय कौशल्ये शिकण्याची आणि त्यांचा वापर करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील समस्यांसाठी एआय-आधारित उपाय विकसित करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
 
प्रशासन आणि न्याय वितरण
एआयमुळे बेरोजगारी वाढेल का?
कृत्रिम बुद्धिमत्ता अनेकदा नोकऱ्यांसाठी धोका मानली जाते; मात्र प्रत्यक्षात ती नव्या प्रकारच्या संधी निर्माण करत आहे. नॅसकॉमच्या अ‍ॅडव्हान्सिंग इंडियाज एआय स्किल्स (ऑगस्ट 2024) या अहवालानुसार, भारतातील एआय क्षेत्रातील मनुष्यबळ सध्या सुमारे 6 ते 6.5 लाख व्यावसायिकांवरून 2027 पर्यंत 12.5 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. यासाठी वार्षिक सुमारे 15 टक्के संयोजित वाढ दर अपेक्षित आहे. एआयमुळे डेटा सायन्स, डेटा क्युरेशन, एआय अभियांत्रिकी आणि विश्लेषण यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित विविध अभ्यासक्रमांमध्ये सुमारे 8.65 लाख उमेदवारांनी नोंदणी केली किंवा प्रशिक्षण घेतले असून त्यापैकी 3.20 लाख उमेदवारांनी एआय आणि बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षण घेतले आहे. भविष्यातील कामगारशक्ती तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फ्युचरस्किल्स प्राइम हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना एआयसह 10 नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये पुनर्कौशल्य आणि कौशल्यवृद्धी देणे हा आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत फ्युचरस्किल्स प्राइम पोर्टलवर 18.56 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून 3.37 लाखांहून अधिक उमेदवारांनी आपले अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरणाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवत आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या माहितीनुसार, ई-कोर्ट्स प्रकल्प तिसरा टप्पा अंतर्गत न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भाषांतर, अंदाज वर्तवणे, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे, स्वयंचलित फाइलिंग, बुद्धिमान वेळापत्रक तयार करणे आणि चॅटबॉटद्वारे संवाद साधणे अशा विविध कामांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, तसेच त्याच्या उपशाखा असलेल्या मशीन लर्निंग, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांचा वापर केला जात आहे. उच्च न्यायालयांमधील एआय भाषांतर समित्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या निर्णयांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम पाहतात. तसेच ई-एचसीआर आणि ई-आयएलआर यांसारख्या डिजिटल कायदेशीर प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना विविध प्रादेशिक भाषांमध्ये न्यायालयीन निर्णय ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे न्यायप्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक होत आहे.
 
हवामान अंदाज आणि हवामानविषयक सेवा
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) भारताची नैसर्गिक घटनांचा अंदाज व त्याला प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट करत आहे. भारतीय हवामान विभाग (इंडिया मेटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट) पर्जन्य, धुके, वीज आणि आगीसारख्या घटनांचा अंदाज वर्तवण्यासाठी एआय-आधारित मॉडेल्सचा वापर करतो. अॅडव्हान्स्ड ड्वोरॅक टेक्निक या तंत्रज्ञानाच्या मदतीने चक्रीवादळांची तीव्रता मोजली जाते. तसेच मौसमजीपीटी हा विकसित होत असलेला एआय चॅटबॉट शेतकरी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना रिअल-टाइम हवामान व हवामानविषयक सल्ला देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
 
समावेशक सामाजिक विकासासाठी एआय
नीती आयोगाच्या समावेशक सामाजिक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ऑक्टोबर 2025) या अहवालात भारतातील असंघटित कामगारांना सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबतचा आराखडा मांडण्यात आला आहे. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान दुर्लक्षित राहिलेल्या कामगारांपर्यंत कसे पोहोचू शकते, जेणेकरून ते आपल्यासमोरील अडथळे पार करून भारताच्या विकासकथेत आपले स्थान निर्माण करू शकतील, हा या अहवालाचा मुख्य प्रश्न आहे. या अहवालात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित उदाहरणे दिली आहेत. यात राजकोटमधील घरगुती आरोग्यसेवा सहाय्यक, दिल्लीतील सुतार, एक शेतकरी आणि इतर अनेकांच्या आव्हानाना व आकांक्षा प्रतिबिंबित होतात. या कथा सातत्याने उभ्या राहणाऱ्या अडथळ्यांचे दर्शन घडवतात; मात्र त्याच वेळी योग्य पद्धतीने वापरलेले तंत्रज्ञान किती मोठी क्षमता उलगडू शकते, हेही स्पष्ट करतात. या लाखो कामगारांसाठी तंत्रज्ञानाने त्यांच्या कौशल्यांची जागा घेऊ नये, तर ती अधिक सक्षम आणि प्रभावी बनवावी, हा या अहवालाचा मुख्य संदेश आहे.
या आराखड्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, रोबोटिक्स आणि इमर्सिव्ह लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातील सुमारे 49 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांपुढील प्रणालीगत अडथळे कसे दूर करता येतील, याचा विचार केला आहे. या दृष्टीकोनानुसार 2035 पर्यंत व्हॉइस-फर्स्ट एआय इंटरफेसमुळे भाषा आणि साक्षरतेशी संबंधित अडथळे कमी होतील. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्समुळे कामगारांना वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पैसे मिळतील. तसेच मायक्रो-क्रेडेन्शियल्स आणि मागणीनुसार उपलब्ध शिक्षण यामुळे कामगारांना आपल्या क्षमतेनुसार आणि गतीनुसार कौशल्यविकास करता येईल. या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी डिजिटल श्रमसेतू मिशन हा राष्ट्रीय पुढाकार आहे. भारतातील असंघटित क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचा या मिशनचा उद्देश आहे. व्यक्ती किंवा क्षेत्रनिहाय प्राधान्यक्रम निश्चित करणे, राज्यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी, नियामक सक्षमता आणि धोरणात्मक भागीदारी यांच्या माध्यमातून परवडणारे तंत्रज्ञान व्यापकपणे स्वीकारले जाईल याची खात्री करण्यावर या मिशनचा भर आहे. यासाठी बळकट बहुपातळी परिणाम-मूल्यांकन चौकटीच्या मार्गदर्शनाखाली सरकार, उद्योग आणि नागरी समाज यांना एकत्र आणले जाणार आहे.
या अहवालात असेही नमूद केले आहे की, समावेशक डिजिटल प्रगती साध्य करण्यासाठी केवळ आशावाद पुरेसा ठरणार नाही. त्यासाठी संशोधन व विकासातील गुंतवणूक, लक्ष्यित कौशल्यविकास कार्यक्रम आणि मजबूत नवोन्मेष परिसंस्था आवश्यक आहे. आधार, युपीआय आणि जनधन यांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील भारताच्या यशस्वी अनुभवांमुळे मोठ्या प्रमाणावर समावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणे शक्य असल्याचेही या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
 
प्रस्तावित अंमलबजावणी आराखडा :
पहिला टप्पा (2025–2026): मिशनची दिशा निश्चिती
या टप्प्यात मिशनचा चार्टर तयार केला जाईल, ज्यामध्ये स्पष्ट उद्दिष्टे, कालमर्यादा आणि मोजता येण्याजोगे परिणाम निश्चित केले जातील. सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाजातील भागधारकांना सहभागी करून प्राधान्यक्रम निश्चित केले जातील आणि उद्दिष्टांची रूपरेषा ठरवली जाईल.
 
दुसरा टप्पा (2026–2027): संस्थात्मक रचना आणि प्रशासन प्रणालीची आखणी
या टप्प्यात विविध क्षेत्रांमधील समन्वयासाठी प्रशासनिक रचना, नेतृत्वाच्या भूमिका आणि अंमलबजावणीची रूपरेषा निश्चित केली जाईल. तसेच कायदेशीर, नियामक आणि डिजिटल पायाभूत सुविधांची तयारी करण्यावर भर दिला जाईल. देशांतर्गत नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी बळकट करणे हेही या टप्प्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल.
 
तिसरा टप्पा (2027–2029): प्रायोगिक प्रकल्प आणि निवडक कार्यक्रमांची सुरुवात
या टप्प्यात उच्च तयारी असलेल्या क्षेत्रांमध्ये प्रायोगिक प्रकल्प सुरू केले जातील, ज्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत उपाययोजनांची चाचणी करता येईल. शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा पोहोचवणे आणि सर्वांना सहज उपलब्धता यावर विशेष भर दिला जाईल. यासाठी प्रभावी निरीक्षण आणि मूल्यांकन व्यवस्था देखील उभारली जाईल.
 
चौथा टप्पा (2029 नंतर): देशभर विस्तार आणि एकात्मीकरण
या टप्प्यात यशस्वी ठरलेल्या उपाययोजना राज्ये आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागू केल्या जातील. स्थानिक गरजांनुसार त्यात बदल करून प्रादेशिक सुसंगती सुनिश्चित केली जाईल आणि विविध क्षेत्रांमध्ये कामगारांची गतिशीलता वाढवली जाईल. या टप्प्याचा उद्देश मिशनची संस्थात्मक स्थापना करून त्याचे फायदे दीर्घकाळ टिकवणे हा आहे.
2035 पर्यंत या मिशनच्या माध्यमातून भारत समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरात जागतिक स्तरावर अग्रणी देश बनेल, अशी कल्पना मांडण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की तंत्रज्ञान केवळ आर्थिक वाढीला चालना देणार नाही, तर लोकांच्या उपजीविकेला बळकटी देईल, संधींची उपलब्धता वाढवेल आणि देशाला समतोल व सक्षम डिजिटल अर्थव्यवस्थेकडे नेण्यास मदत करेल.
 
निष्कर्ष :
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील भारताचा प्रवास स्पष्ट दृष्टी आणि ठोस कृती दर्शवतो. संगणकीय पायाभूत सुविधा वाढवणे, स्वदेशी एआय मॉडेल तयार करणे आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे यांद्वारे देश बळकट एआय परिसंस्था तयार करत आहे, ज्याचा लाभ नागरिकांना मिळत आहे आणि नवोन्मेषालाही चालना मिळत आहे. शेती, आरोग्यसेवा, शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रांमधील उपक्रमांमधून एआयचा प्रत्यक्ष आणि परिणामकारक वापर दिसून येत आहे. इंडिया एआय मिशन, डिजिटल श्रमसेतू आणि मूलभूत एआय मॉडेल विकासासारखे धोरणात्मक उपक्रम नवोन्मेष प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करत आहेत, तसेच संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योजकतेलाही चालना देत आहेत. या प्रयत्नांमुळे भारताला जागतिक एआय नेतृत्वाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी बळकट पाया मिळत आहे आणि विकसित भारत 2047 या संकल्पनेलाही बळ मिळत आहे.

References

Ministry of Electronics & IT

Ministry of Communications

Department of Science and Technology

Ministry of Agriculture & Farmers Welfare

NITI Aayog 

See in PDF

***
नितीन फुल्लुके / भक्ती सोनटक्के / राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com

(Explainer ID: 157712) आगंतुक पटल : 16
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali , Odia , Kannada , Malayalam
Prime Minister mygov.in Content Link
National Portal Of India
STQC Certificate