Energy & Environment
जागतिक वन्यजीव दिवस 2026
औषधी आणि सुगंधित वनस्पती : आरोग्य, वारसा आणि उपजीविका यांचे संवर्धन
Posted On:
03 MAR 2026 1:59PM
नवी दिल्ली, 3 मार्च 2026
प्रमुख वैशिष्ट्ये
- दरवर्षी 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो. वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार याच दिवशी स्वीकारल्याचे औचित्य साधून हा दिन साजरा केला जातो. वर्ष 2026 च्या जागतिक वन्यजीव दिनाची संकल्पना "औषधी आणि सुगंधित वनस्पती: आरोग्य, वारसा आणि उपजीविकेचे संवर्धन" अशी आहे. यामधून आरोग्य आणि उपजीविकेच्या अनुषंगाने वनस्पतीरुपी संसाधनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
- भारत हा जगातील जैवविविधतेने समृद्ध अशा जगातील 17 राष्ट्रांपैकी एक असून भारतात सुमारे 15,000 औषधी वनस्पतींच्या प्रजाती आढळतात त्यापैकी 8,000 वनस्पतींचा उपयोग भारतीय औषध निर्मितीसाठी केला जातो, ज्यामुळे भारत जगातील औषधी आणि सुगंधित वनस्पतींचे एक महत्त्वाचे केंद्र बनला आहे.
- केंद्र सरकार आयुष मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ – एनएमपीबीच्या माध्यमातून औषधी वनस्पतींचे संरक्षण, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत इन-सीटू म्हणजे नैसर्गिक अधिवासातच वनस्पतींचे संरक्षण, तसेच एक्स-सीटू म्हणजे नैसर्गिक अधिवासाबाहेर औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन आणि संसाधन वृद्धीकरणास सक्रिय पाठबळ देते.
- "भारतातील औषधी वनस्पती : मागणी आणि पुरवठा यांचे मूल्यांकन" (वेद आणि गोराया, 2017), या अभ्यासानुसार वर्ष 2014–15 मध्ये औषधी वनस्पतींची देशांतर्गत मागणी सुमारे 5,12,000 मेट्रिक टन इतकी होती. या अभ्यासात व्यापारासाठी योग्य अशा देशातील 1,178 औषधी वनस्पतींच्या प्रजातींची नोंद असून त्यापैकी 242 प्रजातींची उलाढाल मोठ्या प्रमाणावर केली जाते (वार्षिक 100 मेट्रिक टन पेक्षा जास्त), यामधून या क्षेत्राचा आवाका आणि आर्थिक महत्त्व दिसून येते.
प्रस्तावना
दरवर्षी 3 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो, हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केला असून, वन्य प्राणी आणि वनस्पतींचा गौरव करण्यासाठी तसेच मानव आणि पृथ्वीच्या दृष्टीने त्यांच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार याच दिवशी स्वीकारल्याचे औचित्य साधून वन्यजीव क्षेत्रातील व्यापारामुळे लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे अस्तित्त्व धोक्यात येऊ नये यासंदर्भातील जागतिक वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वन्यजीव हे केवळ निसर्गसौंदर्याचा भाग नव्हेत तर अन्नसुरक्षा, आरोग्यसेवा, उपजीविका, हवामान बदल लवचिकता आणि शाश्वत विकासाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, याची जाणीव हा दिवस ठळकपणे करुन देतो. ज्याकाळात अधिवासांचा ऱ्हास, अतिशोषण, बेकायदेशीर व्यापार आणि हवामान बदल या आव्हानांना जग सामोरे जात आहे, अशा वेळी वन्यजीव दिवस हा वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणीय संसाधनांचे संर्वधन करण्यासाठी आणि त्यांचा डोळस वापर करण्याची आग्रही मागणी करतो.

औषधी आणि सुगंधित वनस्पती : आरोग्य, वारसा आणि उपजीविका यांचे संवर्धन ही 2026 च्या जागतिक वन्यजीव दिनाची संकल्पना, औषधनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे महत्त्व, सांस्कृतिक परंपरा जतन करण्यातील त्यांची भूमिका आणि त्यांच्यामुळे स्थानिक समुदायांना मिळणारे उप्तन्न या घटकांना अधोरेखित करते. जगभरात, विकसनशील देशांमधील 70–95% लोक मूलभूत आरोग्यसेवेसाठी पारंपारिक औषधांवर अवलंबून आहेत, त्यापैकी बहुतेक वनस्पती-आधारित संसाधनांमधून मिळतात. औषधी आणि सुगंधी वनस्पती पारंपारिक औषध प्रणालींचा पाया तयार करतात आणि आधुनिक औषधांमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यांच्या आरोग्यविषयक उपयोगांपलीकडेही या वनस्पती परिसंस्थांना बळकटी देतात. त्या परागीभवन करणाऱ्या कीटकांना आधार देतात, मातीची सुपीकता सुधारतात आणि जैवविविधता वाढवतात. त्यामुळे विशेषतः भारतासारख्या जैवविविधतेने समृद्ध देशांसाठी त्यांचे संरक्षण ही जागतिक स्तरावरील प्राधान्याची बाब आहे,
भारतातील औषधी आणि सुगंधित वनस्पतींची समृद्ध जैवविविधता
भारतासाठी 2026 च्या संकल्पनेला विशिष्ट महत्त्व आहे. भारत हा जगातील जैवविविधतेने समृद्ध अशा जगातील 17 राष्ट्रांपैकी एक असून जगातील जैविविधतेपैकी 7% भारतात आहे. भारतात 15 कृषी-हवामान प्रदेश असून 45,000 विविध वनस्पती प्रजाती आहेत ज्यापैकी 15,000 औषधी वनस्पती आहेत. त्यापैकी 8,000 प्रजातींचा उपयोग भारतीय वैद्यकीय पद्धती आणि लोक औषधांमध्ये वापरल्या जातात. भारतातील औषधी आणि सुगंधित वनस्पतींपैकी 70% या पश्चिम आणि पूर्व घाटमाथ्यावरील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये तसेच हिमालय आणि अरावली पर्वतरांगांच्या परिसरात आढळतात.

भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेने 5,250 हून अधिक वनस्पती प्रजाती ओळखल्या आहेत आणि विविध आजारांसाठी 9,567 हून अधिक लोकपरंपरागत दाव्यांची नोंद केली आहे. या समृद्ध वारशाचे संरक्षण करण्यासाठी भारताने सक्रिय पावले उचलली आहेत. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन यासाठी एक समर्पित योजना राबवते. हे संरक्षण, माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रम, शेतकरी प्रशिक्षण, संशोधन आणि विकास तसेच विपणन यांना पाठबळ देते. या प्रयत्नांमधून औषधी वनस्पतींचा समृद्ध वारसा जतन करण्याची भारताची भक्कम आणि अतूट वचनबद्धता दिसून येते.

संवर्धन यंत्रणा
भारताने आपल्या औषधी आणि सुगंधित वनस्पतींचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या उद्देशाने एक मजबूत आणि बहुस्तरीय दृष्टिकोन अंगिकारला आहे.
नैसर्गिक अधिवासातच वनस्पतींचे संरक्षण

इन-सीटू संवर्धन म्हणजे नैसर्गिक अधिवासातच वनस्पतींचे संरक्षण करणे. हे संरक्षण राष्ट्रीय उद्याने, जैवमंडल राखीव क्षेत्रे आणि जीन अभयारण्ये यांच्या माध्यमातून केले जाते. औषधी वनस्पतींच्या अशा संवर्धनाचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र उपक्रम. औषधी वनस्पती संरक्षण क्षेत्र हे औषधी वनस्पतींच्या प्रजातींचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संरक्षण करण्यासाठी निश्चित केलेले क्षेत्र आहे. सध्या भारतातील 115 औषधी वनस्पती संरक्षण क्षेत्र ही स्वदेशी औषध पद्धतींच्या अंमलबजावणीचे आदर्श प्रारूप दर्शवतात आणि त्याचबरोबर नैसर्गिक अधिवासात वनस्पतींचे संरक्षण करण्याच्या तंत्रातून पर्यावरणीय आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवतात.
एक्स-सीटू म्हणजे नैसर्गिक अधिवासाबाहेर औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन

एक्स-सीटू संवर्धन म्हणजे वनस्पतींच्या अनुवांशिक संसाधचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर नियंत्रित वातावरणात संरक्षण करणे ज्यामुळे त्यांचे दीर्घकालीन जतन होईल आणि वन्यजगात त्यांची पुन्हा नव्याने लागवड होईल. यामध्ये भारतात राष्ट्रीय बियाणे जनुक बँक, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधने ब्युरो येथे केल्या जाणाऱ्या 9,361 औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या संवर्धनांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न एकत्रितपणे भविष्यासाठी औषधी वनस्पतींच्या विविधतेचे रक्षण करण्यात मदत करतात.

केंद्र सरकारच्या प्रमुख योजना आणि उपक्रम
देशभरात औषधी वनस्पतींचे संवर्धन, लागवड आणि शाश्वत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणि उपक्रम सुरु केले आहेत.
राष्ट्रीय आयुष मिशन (NAM)
पूर्वी आयुष मंत्रालयाने आपल्या प्रमुख योजनेअंतर्गतम्हणजे राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमार्फत, औषधी वनस्पती घटक योजना राबवली होती. ही योजना 2015-16 ते 2020-21 या आर्थिक वर्षांदरम्यान राबविण्यात आली होती. तिचा उद्देश शेती पद्धतींमध्ये औषधी वनस्पतींची लागवड समाविष्ट करून पीक विविधीकरणाला पाठिंबा देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा होता.
सध्या, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय त्यांच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) - या केंद्रसरकार पुरस्कृत योजनेद्वारे औषधी वनस्पतींसह फलोत्पादन क्षेत्राच्या समग्र वाढीला प्रोत्साहन देत आहे. या योजनेत (MIDH) देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
औषधी वनस्पती मित्र उपक्रम (AVMP)
औषधी वनस्पतींचे संवर्धन, लागवड आणि विपणन यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, समुदाय आणि संस्थांना एनएमपीबी आयुष मंत्रालयाकडून मान्यता आणि पुरस्कार दिले जातात.तसेच या उपक्रमांद्वारे औषधी वनस्पतींचे संरक्षण करण्यात अधिकाधिक लोकांना सक्रियपणे सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाते.
औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी केंद्रीय क्षेत्रीय योजना
भारत सरकारने औषधी वनस्पती उत्पादन मंडळाद्वारे,(NMPB) 2021-22 ते 2025-26 या वर्षांत 322.41 कोटी रुपये खर्चाच्या प्रमुख योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत,औषधी वनस्पतींचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संरक्षण,संवर्धन आणि विकास करण्यासाठी विशिष्ट भूभाग स्थापन केले आहेत. ग्रामीण भागातील निकृष्ट दर्जाच्या जमिनींवर (MPCDA) वृक्षारोपण करून या वनस्पतींच्या संवर्धनाला प्रोत्साहन दिले जाते. ज्यांना देशभरातील GACPs आणि कच्च्या औषधांच्या भांडारांद्वारे समर्थन दिला जातो,यात संशोधन आणि गुणवत्ता हमी ही प्रमुख क्षेत्रे आहेत.
ई-चरक (e-CHARAK)
औषधी वनस्पतींच्या व्यापारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाला (एनएमपीबी) सुलभ बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पती/ औषधी वनस्पतींच्या प्रचार आणि विपणनासाठी “ई-चरक” मोबाइल ॲप्लिकेशन तसेच वेब पोर्टल सुरू केले आहे. “ई-चरक" हे देशभरातील औषधी वनस्पती क्षेत्रातील विविध भागधारकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यास सक्षम करणारे व्यासपीठ आहे. "ई-चरक" ॲप्लिकेशन विविध स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतातील 25 औषधी वनस्पती बाजारपेठेतील 100 औषधी वनस्पतींच्या पंधरवड्याच्या बाजारभावाची माहिती ई-चरक प्लॅटफॉर्मवर नियमितपणे दिली जाते.
वनौषधी उद्याने आणि जनजागृती कार्यक्रम
विद्यार्थी आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा, संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी वनौषधी उद्यान तयार करावे,असा प्रचार केला जातो. दैनंदिन जीवनात औषधी वनस्पतींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रजाती-विशिष्ट मोहिमा, विविध प्रकारे, तसेच मुद्रित माध्यमांद्वारे देखील चालवल्या जातात.
स्थानिक समुदायांना उपजीविकेसाठी आधार
ही योजना संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, बचत गट, वन पंचायती आणि जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना आर्थिक आणि पायाभूत सुविधा पुरवते. यामुळे स्थानिक समुदायांना औषधी वनस्पतींचे मूल्यवर्धन, वाळवणे, गोदाम आणि विपणन करण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते.
द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य
आयुष मंत्रालयाचे एनएमपीबी हे मंडळ औषधी वनस्पती क्षेत्राला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांशी सक्रियपणे सहकार्य करते. ते आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये देखील भाग घेते आणि भारताच्या पारंपारिक ज्ञानाचे संरक्षण करून जागतिक करारांअंतर्गत न्याय्य लाभ वाटप सुनिश्चित करण्यासाठी कार्य करते.
एकात्मिक घटक (IC)
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे एनएमपीबी हे मंडळ देशभरात "औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन" या केंद्रीय क्षेत्रीय योजनेअंतर्गत "औषधी वनस्पतींच्या पुरवठा साखळीत पुढील आणि मागील जोडणी (एकात्मिक घटक)" हा घटक राबवत आहे.या एकात्मिक घटकांतर्गत पुढील उपक्रमांना पाठिंबा दिला जात आहे:
- औषधी वनस्पतींची दर्जेदार लागवड करण्याचे साहित्य वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा.
- शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी माहिती शिक्षण आणि प्रसार (IEC) उपक्रम.
- कापणीनंतरच्या व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा
- औषधी वनस्पतींची विक्री वाढवणे, उत्पादनांचे मूल्य वाढवणे, नफा वाढवून तोटा कमी करणे.
- कच्च्या मालाची गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणिकरण करणे.
औषधी वनस्पती व्यवसाय केंद्र (MPBC)
आयुष मंत्रालयाच्या एनएमपीबीने अलीकडेच NMPB च्या विद्यमान केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत "औषधी वनस्पती व्यवसाय केंद्र (MPBC)" हा एक नवीन घटक समाविष्ट केला आहे ज्याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
- औषधी वनस्पती उत्पादनांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी औषधी वनस्पती व्यवसाय केंद्र विकसित करणे
- औषधी वनस्पतींच्या कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि विपणन पायाभूत सुविधांमध्ये नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
- श्रेणीबद्ध/प्राथमिक प्रक्रिया केलेले शेती उत्पादन साठवण्यासाठी वैज्ञानिक साठवण क्षमता निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे, जेणेकरून, कापणीनंतरचे आणि हाताळणी करतानाचे नुकसान टाळता येईल.
- औषधी वनस्पतींच्या कच्च्या मालाची स्वच्छता, वर्गीकरण, प्रतवारी, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, साठवणूक आणि गुणवत्ता चाचणीसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
जीआय टॅग्जद्वारे भारताच्या औषधी वनस्पती वारशाचे संरक्षण करणे

- नावरा तांदूळ (ओरिझा सॅटिवा एल.) प्रामुख्याने केरळच्या पलक्कड आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये पिकवला जातो. आयुर्वेदात त्याला शास्तिकशाळी म्हणतात. हा नावाराकिझी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचकर्म उपचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे,जो संधिवाताच्या वेदनांवर उपचार करण्यास मदत करतो. तो पोलिओशी संबंधित अपंगत्वासाठी देखील उपयुक्त आहे. त्याने रक्ताभिसरण समस्या सुधारते. तो श्वसन रोगांमध्ये देखील उपयुक्त आहे.
- हिरवी वेलची (एलेटारिया वेलची (एल.) मॅटन) मध्ये केरळमधील अलेप्पी आणि कर्नाटकमधील कूर्ग, असे दोन जीआय प्रकार आहेत - आयुर्वेदात, याला सूक्ष्म-एला किंवा इलायची म्हणून ओळखले जाते. दम्यावर उपचार करण्यासाठी, खोकला कमी करण्यासाठी आणि लघवीचा त्रास कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- गंजम केवडा फ्लॉवर (पांडानस ओडोरिफर (फोर्स्क.) कुंटझे) हे प्रामुख्याने ओडिशातील गंजम जिल्ह्यासाठी जीआय टॅग केलेले आहे. आयुर्वेदात याला केतकीपुष्प म्हणून ओळखले जाते. डोळ्यांच्या समस्या आणि श्वसनाच्या विकारांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- केशर (क्रोकस सॅटिव्हस एल.) हे जम्मू आणि काश्मीरसाठी जीआय टॅग केलेले आहे. आयुर्वेदात ते कुमकुमा म्हणून ओळखले जाते. ते तीव्र डोकेदुखीवरील (मायग्रेन) उपचार करण्यासाठी, जखमा बरे करण्यासाठी, वमन आजारावरील उपचार आणि त्वचेचा रंग आणि डाग बरे करण्यासाठी वापरले जाते.
- “नागौरी अश्वगंधा” (विथानिया सोम्निफेरा) याला 24 नोव्हेंबर 2025 रोजी GI अर्ज क्रमांक 1143 द्वारे NMPB-समर्थित प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत जीआय टॅग मिळाला आहे.
निष्कर्ष
औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या वारशाचे संरक्षण करण्याचा भारताचा प्रवास हा खोलवर जाणारी मुळे आणि भविष्यातील दृष्टिकोनाचा इतिहास आहे. पश्चिम घाटातील जंगलांपासून ते विदर्भातील शेतांपर्यंत, प्राचीन आयुर्वेदिक ज्ञानापासून ते ई-चरक सारख्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत, देशातील संवर्धन, उपजीविका आणि आरोग्यसेवा यांना एकाच मजबूत धाग्यात विणले जात आहे. या कार्याप्रती वचनबद्ध संस्था, सक्षम समुदाय आणि सर्वसमावेशक धोरणांसह, भारत केवळ आपल्या हिरव्या संपत्तीचेच जतन करतो असे नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आरोग्य, अभिमान आणि समृद्धीचा स्रोत तयार करत आहे.
संदर्भ
संयुक्त राष्ट्रसंघ
CITES
पत्रसूचना कार्यालय
आयुष मंत्रालय
National Medicinal Plants Board
इतर
जागतिक वन्यजीव दिवस 2026
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
(Explainer ID: 157652)
आगंतुक पटल : 46
Provide suggestions / comments